अपहरण ( भाग तिसरा )

A created story by writer. All the characters, situations, locations and city names are just imagined. If anyone feel like this story was happened and based on that situation, so it will be just coincidence. All the rights reserved to writer .

शिर्के साहेबांनी त्यांच्या टीम बरोबर केतकीच घर गाठलं. केतकीच्या वडिलांना काही सूचना द्यायच्या होत्या. शिर्के साहेब सांगत होते,

" थोरात. बघा कसं करायचं. त्यांचा कॉल आला की लगेच कॉल उचलायचा नाही. थोडा वेळ रिंग होऊद्या ..! मग कॉल उचलायचा. कॉल उचलल्यावर त्यांना हे सांगायचं की ऐवडी रक्कम मला द्यायला जमणार नाही. जेवढा जास्त वेळ तुम्ही कॉलवर बोललं, तेवढा वेळ आम्हाला केतकीचा मोबाईल ट्रेस करायला मिळेल. समजलं..!"

थोरात शांतपणे ऐकत होते. पण शिर्के साहेबांचं बोलणं ऐकून केतकीची आई त्यांना उद्देशून म्हणाली,

" तुम्हाला जे काही करायचय ते करा...! "

आणि केतकीच्या वडिलांना बोलू लागली,

" आपली एकुलती एक मुलगी आहे. पैसा तिच्यासाठीच जमा केला आहे. तुम्ही बँकेत जाऊन पैसे आणा आणि त्यांना देऊन टाका..! पण मला माझी मुलगी सुखरूप परत हवी..!"

केतकीची आई भावुक झाली होती. शिर्के साहेब केतकीच्या वडिलांना समजावत होते. पण थोरात शेवटी वडील होते. केतकी त्यांची एकुलती एक मुलगी होती. जे काही आतापर्यंत कमावलं होत ते तिच्यासाठीच. आता तिचा जीव धोक्यात आहे म्हटल्यावर कमावलेले गेलं तरी चालेल,पण आपली पोरगी सुखरूप घरी आली पाहिजे. ह्या थोरात होते. त्यांनीही केतकीच्या आईच्या हो ला हो दिली.

" साहेब..! आमची मुलगीच काही बरं वाईट झालं आहे की असं काही झालं आहे हे आम्हाला माहीत न्हवतं. आमच्या मुलीसाठी आम्ही तुमच्याकडे मदत मागितली. पण आता समजलं आमची मुलगी सुखरूप आहे. आता तिला सोडवायला आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. "

" तुम्ही केतकीचे आई वडील आहात ह्या नात्याने तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आम्ही सक्षम आहोत. तुमच्या मुलगीला आम्ही काही होऊ देणार नाही. तुम्ही पैसे तयार ठेवा किंवा तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर त्याची व्यवस्था आम्ही करतो. पण केतकीच्या अपहरण कर्त्यांना पैसे घेताना आम्ही पकडणार ...!" शिर्के साहेब सगळं समजावत बोलले.

" नाही साहेब..! तुम्ही ह्यांच्या बरोबर दिसलात तर ते आमच्या मुलीला ...." केतकीची आई रडायला लागली. तिला शब्द फुटत न्हवते.

" असं काहीही होणार नाही. प्रत्येक अपहरणकर्ता असच बोलत असतो. तरीही आम्ही त्यांना पकडतो. त्यांना पैसे हवे आहेत. तुच्या मुलीचा जीव घेऊन त्यांना काही मिळणार नाही." शिर्के साहेब आता जरा टोकाचं बोलून गेले.

कारण वेळ कमी होता.अपहरणकर्त्यांनी पाच तासाचा वेळ दिला होता. अपहरणकर्त्यांचा कधी ही येऊ कॉल येऊ शकणार होता. त्या आधी सगळं प्लॅन करायचं होतं. अपहरणकर्ते पैसे घेण्यासाठी कोणती जागा सांगतायत, ती कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतेय, जर दुसऱ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत असेल तर त्या पोलीस स्टेशनला खबर द्यावी लागणार होती. अपहरणकर्ते किती असतील याचा अंदाज न्हवता. त्यामुळे शक्य तेवढी मोठी टीम तयार करायची होती. 

शिर्के साहेबांचा मोबाईल वाजला. साक्षी मॅडमचा कॉल आला होता.शिर्के साहेबांनी कॉल उचलला,

 " बोला मॅडम...!"

" सर..! मी पोलीस स्टेशनला येतेय. केसबद्द्ल काही अपडेट्स..?"

" साक्षी..! तू पोलीस स्टेशनला जाऊ नकोस. तू इथे केतकीच्या घरी ये."

" ओके सर..! "

शिर्के सरांनी कॉल कट केला. आता अपहरणकर्त्यांच्या कॉलची वाट बघायची होती. वेळ जात होता. जवळपास पाच तास व्हायला आले होते. कधीही कॉल येऊ शकत होता. काही वेळाने साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे केतकीच्या घरी हजार झाले. केतकीच्या वडिलांचा मोबाईल ते बसलेल्या   सोफ्याच्या समोरच्या काचेच्या टेबलवर होता. सगळ्यांच लक्ष त्यांच्या मोबाईलवर होत. पोलीस स्टेशनमधील टीम कॉल टॅप करायला तयार बसली होती. काही वेळातच केतकीचा मोबाईल ऑन झाला. शिर्के सरांना कॅल करून कळवण्यात आलं आणि पुढच्याच क्षणी केतकीच्या वडिलांचा मोबाईल वायब्रेट झाला. मोबाईलची स्क्रीन ओपन झाली. केतकीच्या मोबाईलवरून एक एस.एम.एस. आला होता. शिर्के सरांना आलेला कॉल चालू होता.केतकीचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याचं कळलं. 

अपहरणकर्ते खूप हुशारीने एक एक चाल खेळत होते. ह्यावेळेस त्यांनी कॉल न करता फक्त एक एस.एम.एस केला होता. केतकीच्या वडिलांनी मोबाईल हातात घेऊन अनलॉक केला. केतकीच्या नंबर वरून एस.एम.एस आला होता तो ओपन केला. 

" आज रात्री ११ वाजता, गुरूनगर ९ च्या गांधी चौकाच्याजवळ जे महानगरपालिकेच गार्डन आहे,त्याच्यापुढे एक कचऱ्याचा मोठा डब्बा आहे. त्याच्या मागे पैसे ठेऊन सरळ पुढे निघायचं. आम्हाला पैसे भेटले की पुढे तुमची मुलगी तुम्हाला भेटेल.."

तो एस.एम.एस. वाचून केतकीच्या वडिलांनी मोबाईल शिर्के साहेबांकडे दिला. शिर्के साहेबांनी एस.एम.एस. वाचला. लोकेशन पोलिसांकडून नोट केलं गेलं.

अपहरणकर्त्यांनी निवडलेल ठिकाण गुरूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील होत. केतकी राहत असलेल्या घरापासून गाडीने ५ किलोमीटरच्या अंतरावर. तिथंपर्यंत जाताना एक साधारण अर्धवर्तुळाकार रेल्वे ब्रिज मध्ये होता. गांधी चौक म्हणजे गुरूनगरमधील एक महत्वाचा चौक, पण त्याच्या आसपास रहिवासी वसाहती नाही. महानगरपालिकेच गार्डन ही त्यापासून जवळच होत. रात्री ११ वाजता तिथे चिटपाखरूही फिरकत नाही. 

एस.एम.एस. ७ वाजता आला होता. पोलिसांकडे फक्त ४ तास होते. शिर्के सरांनीं साक्षी मॅडम, हवालदार शिंदें आणि काही शिपाई यांना काही सूचना देऊन केतकीच्या घरी थांबायला सांगितल. आता शिर्के सर बाकी टीम बरोबर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. 

प्लॅन बनू लागला. सगळे पोलीस कर्मचारी साद्या वेशात वावरणार होते. एक टीम अशी बनवली गेली जी आता लगेच गुरूनगर ९ मधील परिसर पिंजून काढणार होती. कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्यावर पाळत ठेवली जाणार होती. दुसरी टीम म्हणजे केतकीच्या घरी सद्या असलेल्या साक्षी मॅडम, शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी. ह्यांच काम हे होत की,जेंव्हा केतकीचे वडील पैसे घेऊन निघतील तेंव्हा त्यांच्या गाडीचा काही अंतर राखून पाठलाग करायचा आणि केतकीच्या वडिलांनी पैश्याची बॅग कचरा पेटी जवळ ठेवली की ती उचलायला कोणी आलं की त्याला पकडायच. तिसरी टीम गार्डनच्या पुढे होणाऱ्या हालचालींवर आणि खास करून केतकीला कोण आणून सोडणार ह्या कडे लक्ष ठेऊन राहणार होती. ती टीम शिर्के साहेब स्वतः लीड करणार होते. प्रत्येक टीमला बारकाईने सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना शिर्के साहेब देत होते.  

केतकीच्या घरी तिचे वडील आणि आई चिंतेत बसले होते. आपल्याबरोबर पोलीस येणार आहेत ह्याची कल्पना त्या अपहरण कर्त्यांना आली आणि त्यांनी आपल्या मुलीचं काही बरं वाईट केलं तर..? पण साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे केतकीच्या आई वडिलांना पूर्णपणे विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना हे पटवून देत होते की आम्ही केतकीला सुखरूप आणू आणि अपहरणकर्त्यांनाही पकडू. पण केतकीची आई पूर्णतः घाबरून गेली होती. काही वेळाने केतकीच्या घरी एक पोलीस १० लाख कॅश असलेली बॅग घेऊन आला. हीच बॅग केतकीचे वडील अपहरण कर्त्यांनी देणार होते. 

ह्या बॅगमध्ये एक ट्रॅकिंग डिव्हाईस बसवण्यात आले होते. जेणेकरून कोणी ती बॅग पोलिसांच्या नजरेआड उचलून घेऊन जरी गेला तरी त्याच लोकेशन समजायला. सगळी तयारी झाली होती. साक्षी मॅडम जरा चिंतेत होत्या. त्यांना तसं पाहून हवालदार शिंदे म्हणाले,

" मॅडम..! शिर्के सरांनी सगळं व्यवस्थित प्लॅन केलं आहे. सगळं आपल्या ठरल्याप्रमाणे होईल..!"

" हो शिंदे..! नक्कीच.! पण.." साक्षी मॅडमनी आजूबाजूला पाहिलं आणि केतकीच्या आई वडिलांपासून शिंदेंना बाजूला घेऊन बोलल्या,

" शिंदे..! अपहरणकर्त्यांनी पैसे घेण्यासाठी आपल्याच एरियातील ती ही बऱ्यापैकी मोकळी जागा कशी निवडली..? कुठे लांब किंवा आडबाजूला का नाही..?"

" नवीन टोळी असेल हो मॅडम. पहिलाच प्रयत्न करत असतील. त्यांचा हा पहिला प्रयत्न आपण शेवटचा ठरणार बघा...!" शिंदे एकदम आत्मविश्वासात बोलले.

" तसच होवो..!" एवढ बोलून साक्षी मॅडम परत काही विचारात गुंतल्या. 

🎭 Series Post

View all