अपहरण ( भाग दहावा)

This is a created story. All the characters, locations are just imagination of the writer . If anyone feel like this story was happened in past, then it will be a coincidence. All the rights are reserved to writer.

साक्षी मॅडम टीना आणि टोनीच्या आईला घेऊन गुरूनगर पोलीस स्टेशनमध्ये आल्या. टोनी पोलिसांच्या कस्टडीत होता. टोनीला पकडताना घडलेल्या नाट्यमय प्रसंगामुळे केतकीच अपहरण प्रकरण आता पोलीस स्टेशनच्या बाहेर आलं. पत्रकार माहिती मिळवायला लागले. पोलिसांकडून शक्य तेवढ मौन बाळगलं जात होतं.

साक्षी मॅडम टीना आणि टोनीच्या आईला शिर्के सरांकडे घेऊन आल्या.

" जय हिंद सर..!" त्या दोघींना बसायला सांगून साक्षी मॅडम बोलल्या.

" जय हिंद..! ह्या कोण..?"

" सर ही टीना..." टीना कडे बोट दाखवून साक्षी मॅडम बोलल्या आणि टोनीच्या आई कडे बोट दाखवून " ह्या टोनीच्या आई..!"

" ओके..! बाहेर पत्रकार आहेत. ह्यांना इथेच बसायला सांगा..! ह्या केसचा अजून तपास बाकी आहे..!"

" ओके सर..!" 

टोनीला चौकशीसाठी एका खोलीत खुर्चीवर बसवण्यात आलं. त्याचे हात मागे बांधलेले होते.पोलिसांनी पकडून सुद्धा पळून जायचा प्रयत्न करत असताना झालेल्या झटापटीत त्याचे कपडे फाटले होते. 

शिर्के सर, साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे त्या रूम मध्ये आले. शिंदे सर टोनीला बोलले,

" टोनी...!"

टोनीच हूं नाही की चुं नाही.

" टोनी...! आता तू पकडला गेलायस. तुझ्या साथीदारांची नावं आम्हाला सांग..!"

टोनीने शिर्के सरांकडे बघितलं आणि फक्त जरा हसला.

ते पाहताच हवालदार शिंदेंनी ओळखल की हा असा बोलणार नाही. त्यांनी टोनीच्या कानाखाली एक सणसणीत 
चपराक खेचली. तसा टोनी बोलला,

" मारा क्यूँ...?"

" आता तोंड उघडलं का तुझं..! " शिंदे बोलले.

शिर्के सर हसले. तस टोनीने तोंड फिरवलं. 

" हे बघ माकडा ! हे सर काय तुझ्यावर हात उचलणार नाहीत. पण तू जोपर्यंत सगळं बोलत नाहीस तोपर्यंत मी इथेच आहे..!"

" टोनी...! तुझ्या साथीदारांची नाव सांग...! " शिर्के सर बोलले.

परत टोनीने शिर्के सरांकडे पाहिलं आणि दुसरीकडे मान फिरवली.

" बोलतो का की परत एक ठेऊन देऊ..?" शिंदे भडकून बोलले.

" ए..! मारणा मत..!" टोनी अंग चोरून घेत बोलला.

" मग तोंड उघड...!"

" मेरे साथ में कोई नही था ,तो कीसका नाम लुं..!"

" आता तोंड खोललंस तर खोटं बोलतोयस..?"

" नाही साहब..!"

" सर.! हा असं बोलणार नाही...!" अस बोलून शिंदेंनी पुढे जाऊन टोनीच्या डोक्याचे केस पकडले.

" थांबा शिंदे..!" शिर्के सर बोलले. " तो काय बोलतोय त्यात किती तथ्य आहे ते पाहूया..!"

" काही पण काय सर..! एक २० वर्षांची पोरगी हा एकटा उचलुन गाडीत टाकणार..?"

" हो सर..! शिंदे बरोबर बोलतायत. हे एकट्याने करणं शक्य नाही..!" साक्षी मॅडम बोलल्या.

"सर..! हा आपला वेळ घालवायचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात त्याचे साथीदार पळून जातील."शिंदे बोलले.

" थांबा...!त्याचा मोबाईल आपण जप्त केलाय. त्यातुन काहीतरी माहिती भेटलंच." शिर्के सरांनी साक्षी मॅडम आणि शिंदेंना थांबवलं . आता ते टोनीला बोलले,

" तू बोलतोयस की तू एकट्याने हे सगळं केलंस ,तर ते १० लाख कुठे आहेत...?"

" ओ मेरे गाडी के डिकी मे हैं..!" टोनी बोलला.

हे ऐकताच साक्षी मॅडम एक कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपाई घेऊन टोनीच्या जप्त केलेल्या गाडीकडे गेल्या. गाडीची चावी घेऊन कॉन्स्टेबलनी चावी गाडीच्या डिकीच्या लॉक मध्ये लावली. एवढ्यात साक्षी मॅडम बोलल्या,

" सांभाळून केतकर...!"

" हो मॅडम..!" असं बोलून कॉन्स्टेबलनी लॉकमध्ये लावले चावी फिरवली आणि डिकीच कव्हर वर खेचलं. कॉन्स्टेबल थोडे लांब झाले. आत एक काळ्या रंगाची पिशवी होती. पोलीस शिपाई पुढे गेले आणि त्यांनी ती पिशवी गाडीतून बाहेर घेतली. बाहेरून अंदाज घेतला तर त्यात पैसे असल्याच दिसत होतं. पण तरीही काळजी घेऊन ती पिशवी उघडली गेली. आता पैश्याचे बंडल होते. ती पिशवी उचलून पोलीस शिपाई, कॉन्स्टेबल आणि साक्षी मॅडम शिंदे सरांकडे घेऊन आल्या. 

" सर..! पैसे भेटले."साक्षी मॅडम शिर्के सरांना बोलल्या.

"अंदाजे चेक करून घ्या पूर्ण आहेत का आणि आपल्या रेकॉर्डला असलेले नोटीचे नंबर जुळतात का ते ही पहा..!"

" ओके सर...!" एवढ बोलून साक्षी मॅडम पैसे चेक करायला घेऊन गेल्या.

" हा तर बराच खरं बोलतोय सर..!" हवालदार शिंदे शिर्के सरांना बोलले.

" हं..! आता हे सगळं ह्या एकट्याने कसं केलं ह्याची स्टोरी ह्याच्या कडून ऐकायची आहे.." शिर्के सर बोलले.

" बोल रे ..!" शिंदे टोनीला उद्देशून बोलले.

" क्या करना था...? लाडकी को गाडी मे बिठाना था और गाडी भगा के चुपानी थी..!"

" एवढ सोपं आहे का..? आम्हाला काय मूर्ख समजतोस.?" शिंदे टोनीला बोलले.

" ठीक आहे..! तुझं हे म्हणणं मान्य केलं. पण दुसऱ्या दिवशी जेंव्हा तू पैसे घ्यायला ब्रिज खाली आलास, तेंव्हा केतकीला घराजवळ सोडायला कोण आल होत..?"

" कोई नही...!"

" म्हणजे..?"

" ओ तो खुद चल के उसके घर चली गयी..!"

" काय...? " शिंदे ओरडले. 

" केतकीला तू कुठे लपवलं होत...?" शिर्के सर बोलले.

"मेरे गाडी मे...!"

" आणि तुझी गाडी कुठे होती...?"

" हमारे बिल्डिंग के पार्किंग मे."

" म्हणजे तू पैसे उचललेस आणि केतकीला गाडीतून बाहेर काडून सोडून दिलंस..?"

" हां...! "

" कसं शक्य आहे. हा खोटं बोलतोय सर...!" हवालदार शिंदे बोलले.

" तू पैसे उचलून बिल्डींगकडे कसा आलास..?" शिर्के सरांनी टोनीला विचारलं.

" चल के..! ब्रीज नजदीक तो है यहा से..! १० मिनिट मे यहा आया."

" मास्टर प्लॅन हां...! म्हणजे तू केतकीच्या वडिलांना कॉल केतकीच्या मोबाईल वरून कॉल केलास . त्यांनी बॅग खाली टाकली आणि तू ते पैसे घेऊन तुझ्या गाडीजवळ आलास.?"

" हां..!"

" केतकीला गाडीतून बाहेरकाडून तिला सोडून दिलंस.?"

" हां...!"

" ओहह..! चला शिंदे..! केस सॉल्व्ह्...!!" शिर्के सर हवालदार शिंदेंना बोलले. 

" पण सर...!" शिंदे पुढे काही बोलणार ह्या आधीच शिर्के सरांनी शिंदेंना रोखलं आणि बाहेर निघाले. शिंदे ही बाहेर आले.

" काय झालं सर..?"

" केतकीच्या वडिलांना कॉल करा! त्यांना फक्त एवढंच सांगा  की फक्त केतकीला घेऊन ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये या...!"

" ओके सर..!"

हवालदार शिंदेंनी केतकीच्या वडिलांना कॉल लावला आणि शिर्के सरांनी सांगितल्याप्रमाणे केतकीच्या वडिलांना केतकीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितलं.

शिर्के सर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. हवालदार शिंदेंनी आत घडलेली सगळी हकीगत साक्षी मॅडमना सांगितली. साक्षी मॅडम ही हैराण झाल्या. केतकीच अपहरण फक्त एका माणसाने केलं.? निव्वळ अशक्य अशी ही गोष्ट टोनीने एकट्याने केली. 

🎭 Series Post

View all