May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग सहावा )

Read Later
अपहरण ( भाग सहावा )

शिंदे सर, साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे आता घडलेला घटनेची क्रमवार मांडणी करत होते. कुठे काही चुकत तर नाही ना याचा शोध घेत होते.

गुरूनगर २ च्या चौकात जे सी.सी.टी. व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत, त्यांचे फुटेज मागवण्यात आलं. काल रात्री १० ते १२ वाजेपर्यंत खूप वाहन तिथून गेली होती. त्यातील कोणत वाहन संशयास्पद वाटत का हे बघितलं गेलं. पण कोणत्याही वाहनावर असा संशय आला नाही. 

तेवढ्यात काहीसं आठवून हवालदार शिंदे म्हणाले,

" सर..! केतकीच्या कॉलेजमध्ये आपण चौकशी केली होती.  त्यात काही सापडतं का पाहूया का..!"

" हो..! त्यावरून आठवलं. आज केतकीच्या बिल्डींगमध्ये चौकशी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोलून घ्या."

" हो सर..!"

शिंदेंनी केतकीच्या कॉलेजमध्ये चौकशी करण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबलना बोलावलं. ते आले.

" जय हिंद सर.."

"जय हिंद...! बोला साटम. "

" सर. मी कॉलेज मध्ये चौकशी केली. केतकी खूप साधी मुलगी आहे. तिचे जास्त कुणी फ्रेंड नाहीत. तिची एक मैत्रीण आहे. तीच नाव काय बर....."

" टीना का..?" साक्षी मॅडम बोलल्या.

" हो मॅडम. टीना. हेच नाव मी बऱ्याच जणांकडून ऐकलं. केतकी टीनाबरोबर कॉलेजला जाते आणि तिच्या बरोबरच परत येते. टीनाचे २-३ खास मित्र आहेत. केतकी त्यांच्याबरोबर जास्त असते."

" ह्या खास मित्रांची काही माहिती..?" शिंदे बोलले.

" काही खास असं नाही. पण काही जणांकडून असं समजलं की बरेच दिवस टीना आणि तिचे मित्र काही खास गोष्टींवर विचार करत असल्यासारखे दिसायचे. पण त्यात काही संशय घेण्यासारखं वाटत नाही."

" अस कसं..! त्यांच्या वागण्यात काही बदल झाला असेल तर त्यांची ही चौकशी करायलाच हवी..!"

" पण सर, केतकी ही त्यांच्या बरोबर असायची. म्हणून म्हणालो संशय घेण्यासारखं वाटतं नाही."

" अच्छा..! केतकी बरोबर असायची...!" शिंदे सरांना वाटलेली शक्यता ह्यामुळे खंडित झाली.

" पण तुम्ही चौकशीला गेलात तेंव्हा ती टीना आणि तिचे मित्र कॉलेजमध्ये होते का...?" हवालदार शिंदेंनी महत्वाचा प्रश्न विचारला.

" हो साहेब. ते कॉलेजमध्ये होते आणि वेळेवर घरी गेले. केतकी आज आली नाही का.. असं विचारायला म्हणून मी टिनाच्या एका मैत्रिणीला विश्वासात घेऊन तिच्याकडे पाठवलं."

" हां मग...?" साक्षी मॅडम बोलल्या.

" टीना तिला बोलली की ती केतकीच्या मोबाईल नंबरवर कॉल करत होती, पण तिचा नंबर ऑफ येतोय. बहुतेक आजारी असेल.." एवढं बोलून कॉन्स्टेबल बोलायचं थांबले.

" गुड जॉब..!" शिंदे सरांनी कॉन्स्टेबलना शाब्बासकी दिली आणि आता केतकीच्या बिल्डींगमध्ये चौकशी करण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबलना विचारलं, " तुम्हाला काही माहिती मिळाली...?"

" सर..! मी पूर्ण बिल्डींगमध्ये चौकशी केली. केतकी किंवा तिच्या आई वडिलांचे कुणाबरोबर वादविवाद किंवा वैर नाही. चांगली आणि साधी माणसं आहेत. केतकीचे वडील चांगलं कमवत असून सुद्धा ते आणि त्यांच्या घरचे खूप साधे राहतात ह्या बाबतीत काहींच बोलणं चालू असत."

" अजून काही...?"

" सर..! एक गोष्ट आहे. ती मला संशयास्पद वाटते, पण त्यांच्या बिल्डींगमध्ये वाचाळ म्हणून प्रसिध्द असलेल्या महिलेकडून मला समजली. म्हणून ती खर बोलतेय की खोट काही समजत नाही...!"

" कोणती गोष्ट...?" आता साक्षी मॅडमनी उत्सुकतेने विचारलं.

" मॅडम.! ती महिला सांगत होती की, केतकी म्हणजे खूप साधी मुलगी. ती महिला केतकीच्या बिल्डींगमध्ये बरेच वर्षांपासून राहते त्यामुळे तिची आई तिची चांगली मैत्रिण आहे. " एवढ बोलून कॉन्स्टेबल जरा थांबले.तेवढ्यात हवालदार शिंदे मिश्किलपणे म्हणाले,

" एवढंच...?" 

शिंदे सर आणि साक्षी मॅडमनी ही हसले.

" नाही ओ शिंदे.! माझं बोलणं संपलं नाही अजून. पण आधी हे सगळं सांगितलं कारण शेवटी जे सांगणार होतो त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवाव म्हणून."

" बोला साहेब."

" ती महिला बोलली, काही महिन्यांपूर्वी केतकीने स्वतःहून तिच्या वडिलांकडे महागडा मोबाईल मागितला होता. पण तिचा मोबाईल चांगला होता म्हणून त्यांनी तिला नवीन नाही घेऊन दिला. त्यावरून बरेच दिवस केतकी नाराज होती. त्यानंतर काही दिवसांपासून केतकी अशी जेवल्यावर बाहेर चालायला म्हणून जायला लागली होती."

" इंटरेस्टींग...! " शिंदे सर बोलले. " साक्षी मॅडम..?"

" येस सर..?"

" तुम्ही केतकीची चौकशी केली तेंव्हा असं काही जाणवलं होत .?"

"नाही सर..! मी तिला त्यांचं कुणाबरोबर भांडण वैगरे झालं आहे का ह्याबद्दल विचारलं, पण घरातच काही वाद असेल अशी शक्यता वाटतं नसल्यामुळे मी तिला तसं काही विचारलं नाही.."

" ओके..! पण ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार चौकशी केली पाहिजे की नाही...?"

"येस सर...!"

" ती टीना आणि तिचे मित्र ह्यांची माहिती काढा.! त्यांच्यावर लक्ष ठेवा...!

"हो सर..!"

आता ह्या केसच एक नवीन टोक मिळालं होत. आता हे टोक  ह्या केसला शेवटपर्यंत घेऊन जात की परत इथेच आणून सोडत हे कुणालाच माहीत न्हवतं.

इकडे केतकी सुखरूप घरी आली म्हणून केतकीची आई खूप खुश होती. ती सारखी केतकीला जाऊन मिठी मारत होती. केतकी मात्र जरा उदासच होती. ती खोटं खोटं हसू चेहऱ्यावर दाखवत होती. केतकीचे वडील सोफ्यावर डोळे मिटून शांत बसले होते. केतकी उठून त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायाजवळ खाली बसली. केतकीने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. ह्यामुळे केतकीच्या वडीलांनी डोळे उघडले.

" काय झालं बाळ ...?" केतकीच्या वडिलांनी केतकीच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं.

" सॉरी पप्पा...."

"सॉरी ...? कशाबद्दल...?"

" हे सगळं माझ्यामुळे झालं.. मी खाली गेली नसती तर हे घडलंच नसतं ...."

" ए बाळ..! असं काही नाही.. जे होणार होत ते घडलं. त्यात तुझा दोष नाही."

" नाही. माझाच दोष आहे. मीच खाली गेले म्हणून झालं.."

हे ऐकून केतकीची आई ही तिथे आली. केतकीच्या वडिलांनी केतकीला उठवून सोफ्यावर बसवलं. केतकीचे वडील बोलू लागले,

" केतकी.! झालं गेलं विसर. तुझा त्यात काही दोष न्हवता एवढ ध्यानात ठेव..."

"पैसे तुझ्यासाठीच जपून ठेवले आहेत. ते गेले असते तरी चालले असते.तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. सगळं तुझ्यासाठी तर करतोय..." केतकीची आई बोलली.

केतकी हे ऐकून जरा संभ्रमित झाली. " पैसे गेले असते तरी चाललं असत म्हणजे ग आई...?"

"तुला ज्यांनी पाळवलं होत ना... त्यांच्याकडून तुला सोडवायला त्यांनी पैसे मागितले होते ना...!"

" मग तुम्ही त्यांना पैसे दिलेच नाहीत..?"

" तस नाही ग..! पैसे दिले म्हणून तर तुला सोडलं.."

" तरी तू असं का बोलतेयस की पैसे गेले असते तरी चाललं असत..?"

" त्यांना जे पैसे दिले ना, ते पोलिसांचे होते. पोलिसांचे पैसे गेले. आता ते त्यांचे पैसे मिळवतील. " केतकीची आई बोलली.

केतकी आता जरा नाक फुगवून बोलली, " म्हणजे मला सोडवायला सुद्धा पप्पानी पैसे नाही दिले ना..?"

हे ऐकून केतकीची आई भडकली, " काय ग...! काय बोलतेयस हे..? तू आली आहेस ना सुखरूप घरी..?"

" हो ..! पण पोलिसांमुळे..! पप्पानी काय केलं..?"

केतकीची आई भडकून केतकीकडे धावली, पण केतकीचे वडील उभे राहून मध्ये आले. केतकी मागे हटली.

" बघा कशी बोलतेय ही.! तुम्ही एवढ कष्ट करताय हिच्या साठी आणि हिचे विचार बघा..! "

" जाऊदे ग ..! लहान आहे ती.."

" लहान नाही राहिली ती. मोठी झाली आहे. तिच्यावर कधी हात उचलला नाहीत किंवा कधी ओरडला नाहीत तरी तुम्हा कशी बोलतेय बघा...!"

केतकीची आई केतकीकडे बघून बोलली,

" आत बेडरूममध्ये जा..! तुझ्या बापाने हे घर आणि दागिने यांच्या शिवाय अजून जे काही कमवून ठेवलं आहे ना त्यातले १० लाख आत आहेत. ते तुझेच आहेत. त्यांना जवळ घेऊन झोप...!"

एवढ बोलून केतकीची आई पदर तोंडात घालून रडू लागली. केतकीचे वडील तिला समजावत होते. त्यांनी केतकीच्या आईला खाली बसवलं. केतकीला तर चार थोबाडीत मारून घेतल्यासारख झालं होतं. आपण काय विचार केला. काय बोललो. केतकीचे वडील पाणी घेऊन आले आणि केतकीच्या आईला दिलं. केतकीचे वडील केतलीला बोलले,

" बाळ..! तू बेडरूममध्ये जाऊन आराम कर..!"

केतकी उठून बेडरूममध्ये गेली.