May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग चौथा )

Read Later
अपहरण ( भाग चौथा )

साद्या वेशातील पोलीस गुरूनगर नंबर ९ चा पूर्ण एरिया पिंजून काढत होते. कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसली तरी  तिच्यावर पाळत ठेवत आणि खात्री करून घेत. शिंदे सर सकाळपासून ड्युटीवर आले होते. कोणतीही विश्रांती न घेता ते ह्या केससाठी पोलीस स्टेशनमध्ये बसून सगळ्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. 

रात्रीचे १० वाजले होते. शिंदे सरांनी साक्षी मॅडमना कॉल केला.

" हॅलो..!"

"हॅलो सर..!"

" साक्षी. केतकीच्या वडिलांवर आणि आईवर नजर आहे ना.?"

" हो सर. केतकीची आई अजूनही आपण इथे असल्याबद्दल जरा घाबरून आहे. केतकीच्या काळजीमुळे त्यांची अशी अवस्था असेल. त्यांना वाटतं होत, ह्या प्रकरणात पोलिसांना बरोबर न घेता अपहरणकर्त्यांना पैसे देऊन केतकीला घरी आणावं." 

" चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे पोलिसांवर भरवसाच नसतो ह्यांना. त्याचा परिणाम. बाकी काय बोलायचं. पण आपण आपलं काम चोख करायचं. केतकीच्या वडिलांच्या मोबाईलवर कोणाचा कॉल किंवा मेसेज..?"

" त्यांचा मोबाईल माझ्याकडेच आहे. त्यांनी ह्या गोष्टीची कल्पना कोणालाही दिली न्हवती. फक्त बिल्डिंमधील रहिवासीच जाणतात. त्यामुळे कोणाचा कॉल नाही. बाकी दोन कॉल आले होते. ते त्यांच्या बँकेतील सहकाऱ्यांचे होते."

" मेसेज..?"

" नाही सर..! ऑल क्लीअर.."

"ओके. स्पॉटवर निघताना त्यांच्या आणि तुमच्या गाडीमध्ये बरचं अंतर ठेवा. तुमच्यावर गुन्हेगारांची पाळत असू शकते..!"

" हो सर...!"

" जय हिंद..!"

" जय हिंद सर...!"

शिंदे सरांनी कॉल कट केला. पोलीस स्टेशनमधील व्यवस्था कदम साहेबांवर सोपवून ते स्पॉटवर जायला निघाले. ह्या केसमधील ती टीम शिंदे लीड करत होते,जी टीम केतकीला सोडायला येणाऱ्या अपहरणकर्त्यांवर झडप घालणार होती. केतकीच्या वडिलांनी पैश्याची बॅग ठेवली की ती उचलायला कोणी आलं  तर त्यावर झडप घालायला पाठून येणाऱ्या साक्षी मॅडमची टीम होती.

१०.४० मिनिटं झाली असताना केतकीच्या वडिलांचा मोबाईल वाजला. केतकीच्या नंबरवरून कॉल आला होता. साक्षी मॅडमनी सूचना करताच केतकीच्या वडिलांनी कॉल उचलला, 

" हॅलो..!"

" हॅलो ..! हॅलो..! पप्पा...! "हा  केतकीचा आवाज होता.

" हॅलो केतकी.! " 

अपहरणकर्त्यांने केतकीला अजून काही बोलायची संधी न देता स्वतः बोलला,

" आवाज ऐकलात ना तुमच्या केतकीचा..? अजून ती जिवंत आहे. ती जिवंत हवी असेल तर आम्ही सांगितलंय तसंच करायचं . पोलिसांना जे करायचं ते करू दे..! तुम्ही फक्त आमचं ऐकायचं..!"

" हो..! पण माझ्या मुलीला काही करू नका...!" 

केतकीचे वडिल एवढ बोलले आणि कॉल कट झाला. अपहरणकर्ते केतकीच्या वडिलांवर दबाव टाकत होते. साक्षी मॅडमनी त्यांचं पूर्ण संभाषण ऐकलं होतं. त्यात एक गोष्ट त्यांना खटकली होती. ती म्हणजे, अपहरणकर्ता अस का बोलला की 'पोलिसांना जे करायचं ते करू दे! तुम्ही फक्त आमचं ऐकायचं !' अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं तर होणार होत. तरीही तो अस का बोलला असेल. शिंदे सरांबरोबर बोलावं का ह्यावर...? पण एवढा वेळ नाही आहे. ५ मिनिटांत निघायचं होत.

पोलिसांनी आणलेली पैश्याची बॅग केतकीच्या वडिलांच्या गाडीमध्ये ठेवण्यात आली. केतकीचे वडील एकटेच त्या गाडीतून जाणार होते. त्यांच्या गाडीच्या मागून काही अंतरावर पोलिसांची गाडी असणार होती. बिल्डिंमधील रहिवासी चोरून चोरून सगळा प्रकार पाहत होते. केतकीची आई रडत होती. साक्षी मॅडमने दोन पोलीस शिपाई त्यांच्या घरी ठेवले होते.

केतकीचे वडिल गाडीमध्ये बसले. त्यांनी गाडी बिल्डिंगच्या गेट मधून बाहेर काढली. मागून लगेच पोलिसांची गाडी निघाली. साक्षी मॅडमनी वायरलेसवरून तशी खबर दिली. बिल्डिंगच्या समोरचा छोटा रस्ता पार करून केतकीच्या वडिलांची गाडी मुख्य रस्त्यावरून धावू लागली. ३ किलोमीटर अंतर पार केल्यावर रस्ताला चढण लागलं. रेल्वे मार्गावरून जाणार ब्रिज चालू झाला होता. रेल्वे मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकमेकांना लगतच असे हे दोन वेगवेगळे ब्रीज होते. आधी सांगीतल्याप्रमाणे हे अर्धवर्तुळाकार ब्रीज होते. केतकीच्या वडिलांची गाडी ब्रिजच्या मध्यावर पोहोचायच्या काही सेकंद आधी त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्यांनी गाडी चालवतानाच मोबाईल पाहिला. केतकीच्या नंबरवरून कॉल आला होता. त्यांनी लगेच गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि कॉल उचलला. 

"हॅलो..!"

" बॅग ब्रिजवरून खाली टाका! आमची माणसं तुमच्या मुलगीला तुमच्या घराजवळ घेऊन थांबली आहेत. बॅग खाली टाकली की तुमच्या मुलगीला आम्ही सोडून देऊ..! " 

" पण मी कसं खरं समजून...?"

" आतापर्यंत सांगितलं तसं केलं ना..! आता एवढ करायचं..! ५ सेकंदात बॅग खाली टाकली नाही तर तुमची पोरगी ढगात...!"

" नाही. असं काही करू नका. मी बॅग खाली टाकतोय..!"

कॉल कट झाला. हा सगळा प्रकार घडेपर्यंत पोलीस व्हॅन केतकीच्या वडिलांच्या गाडीपासून काही अंतरावर आली. केतकीच्या वडिलांची गाडी थांबलेली पाहताच पोलिसांची गाडी थांबली. साक्षी मॅडम आणि इतर पोलीस गडबडले. हा काय प्रकार आहे..? गाडी का थांबली..? केतकीचे वडील ठीक आहेत ना..? ह्यांची इकडे क्षणभरासाठी विचारचक्र फिरत असतानाच समोर केतकीचे वडील त्यांच्या गाडीतून घाईघाईने बाहेर येताना दिसले. त्यांच्या हातात पैश्याची बॅग होती. ते गाडीच्या समोरच्या बाजून ब्रिजच्या बाजूच्या फुटपाथवर जाऊ लागले. पुढे काय होणार ह्याचा अंदाज आलेल्या साक्षी मॅडम गाडीतून बाहेर पडतचं ओरडल्या,

" थांबा थोरात....!!!!"

पण केतकीच्या वडिलांनी पैश्याची बॅग खाली फेकली आणि खाली बघत तसेच उभे राहिले. खाली काळाकुट्ट अंधार होता.  खालचं काही दिसतं न्हवतं.

" ओह नो...! थोरात... हे तुम्ही काय केलं..? बॅग का खाली फेकली...?" साक्षी मॅडम ओरडल्या. 

हवालदार शिंदेंनी तर मागून येऊन केतकीच्या वडिलांची बकोटी धरली आणि त्यांना खेचतचं साक्षी मॅडम समोर आणलं. 

" बोल रे..! मॅडम काय विचारतायत ते ऐकायला येतंय ना...?"

" मला केतकीच्या नंबरवरून कॉल आला होता. त्यांनीच अस करायला सांगितलं...!" केतकीचे वडील बोलले.

" काय...?" साक्षी मॅडम ओरडल्या.. " पण इथे का .? तुमच्या केतकीच काय..? "

" ते बोलले, केतकीला आम्ही तुमच्या घराजवळ सोडतोय...!" 

साक्षी मॅडमना सगळा प्रकार समजला. त्यांनी शिंदेंना केतकीच्या घरी जे दोन पोलीस कर्मचारी थांबवले होते त्यांना कॉल करून ही खबर देण्यास सांगितलं आणि स्वतः वायरलेसवरून शिंदें सरांना खबर दिली,

" शिंदे सर......"

" बोला... साक्षी मॅडम...!"

" स्टॉप ऑपरेशन ...! आय रिपीट... स्टॉप ऑपरेशन...!"

" व्हॉट..? "

" येस सर..! "

साक्षी मॅडमनी शिंदे सरांच्या मोबाईलवर कॉल केला. 

" हॅलो सर..! "

" काय झालं तिकडे..!"

" केतकीच्या वडिलांना अपहरणकर्त्यांचा कॉल आला होता. त्यांनी बॅग रेल्वे ब्रिजवरून खाली फेकण्यास सांगितली. केतकीला ते घराच्या इथे सोडणार आहे असं सांगितलं..!"

" ओह नो...! "

" मी दोन शिपाई केतकीच्या बिल्डिंगमध्ये ठेवले होते. शिंदे त्यांना खबर देत आहेत. आम्ही ही इथून केतकीच्या बिल्डिंकडे जात आहोत...!"

" ओके..! त्यांनी बॅग ईस्ट साईडला फेकली आहे की वेस्ट साईडला ..?"

" ..... वेस्ट.... हो... वेस्ट साईडला ."

" तुम्ही तिकडे निघा..! मी टीम घेऊन रेल्वे ट्रककडे निघतोय...!"

" ओक सर..!"
 
शिंदे सरांनी कॉल कट केला. त्यांनी त्यांच्या टीमला आणि तिथे लक्ष ठेऊन असलेल्या टीमला एकत्र केलं.त्यांनी घडला प्रकार सगळ्यांना सांगितला. पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देऊन त्यांनी रेल्वे ब्रिज गाठला. सगळे पोलीस कर्मचारी रेल्वे ब्रिजखाली अपरहरणकर्त्यांचा माग घेऊ लागले. रस्त्यावरील  दिव्यांचा मंद प्रकाश शक्य तेवढा पसरला होता. रेल्वे ट्रॅक तर दिसतंच न्हवता. ह्या अंधारात त्यांचा माग घेणं निव्वळ अशक्य. शिंदेंनी कंट्रोल रूमला कॉल करून गुन्हेगारांकडे दिलेल्या बॅगमधील ट्रॅकिंग डिव्हाईसच लोकेशन विचारलं. पण त्या बॅगच लोकेशन हे त्या ब्रिजजवळच दाखवत होत. पोलीस त्या बॅगचा शोध घेऊ लागले. गुन्हेगार ट्रक क्रॉस करून दुसऱ्या बाजूस ही पळून गेले असतील. सगळे पोलीस कर्मचारी हताश झाले. शेवटी त्यांना ती बॅग भेटली. पण बॅग रिकामी होती. त्या बॅगमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस बसवलं असण्याची शक्यता त्या गुन्हेगारांना वाटली असेल म्हणून त्यांनी हे अस केलं. गुन्हेगार खूप हुशारीने पाऊलं टाकत होते.

इकडे साक्षी मॅडम आणि टीम केतकीच्या बिल्डिंगजवळ पोहोचले. त्यांनी तिथे ठेवलेले दोन पोलीस कर्मचारी एका मुलीची बिल्डिंगच्या गेट बाहेर चौकशी करत होते. हो..! ती केतकीच होती. अपहरणकर्ते तिला बिल्डिंच्याजवळ सोडून गेले होते.