May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग पाचवा )

Read Later
अपहरण ( भाग पाचवा )

साक्षी मॅडमची गाडी थांबली. मॅडम खाली उतरून केतकीजवळ गेल्या. पाठून केतकीचे वडील ही केतकीकडे धावले. केतकीने वडिलांना बघताच त्यांच्याकडे धाव घेतली. केतकीने त्यांना जोरात मिठी मारली.

" बाबा....." 

केतकी जोरजोरात रडायला लागली. केतकीच्या वडिलांचे ही अश्रू अनावर झाले.काही क्षण असेच गेले.केतकी घाबरलेली होती. आधी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ही तिने काही प्रतिसाद दिला न्हवता. साक्षी मॅडमनी तिला जवळ घेतलं. तिचा हात हातात घेऊन विचारलं,

" केतकी.... घाबरू नकोस. आम्ही आहोत आता. "

केतकीकडून तिला सोडायला आलेल्या गाडीची माहिती मिळवायची होती. तीने लगेच काही माहिती दिली तर गुन्हेगारांना पकडायला मदत होणार होती.

" केतकी. तुला ज्या गाडीतून इथे सोडलं, ती गाडी कोणती होती..? तु पाहिलीस ना..?"

केतकी खाली मान घालून फक्त रडत होती.

" केतकी.....! बाळा तू बोललीस तर आम्हाला खूप मदत होईल....! तू गाडी बघितलीस ना...?"

केतकीने खाली मान घालूनच होकारार्थी मान हलवली.

" ग्रेट..! कोणत्या रंगाची होती...? कोणती गाडी होती काही अंदाज...?"

" मला नाही दिसलं बाकी काही ..." एवढंच बोलून परत साक्षी रडू लागली. तिच्या वडिलांनी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले,

" प्लिज मॅडम...! आता माझी मुलगी मला सुखरूप मिळाली आहे. आता जरावेळ तिला शांत राहू द्या. घरी तिची आई तिची वाट बघत आहे. तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती नंतर करा.....!"

एवढ बोलून केतकीच्या वडिलांनी साक्षी मॅडम समोर हात जोडले आणि केतकीला घेऊन बिल्डिंगकडे जाऊ लागले. साक्षी मॅडमनी शिर्के सरांना कॉल केला,

" हॅलो.."

" हॅलो... ! बोल साक्षी...!"

" सर..! केतकीला त्यांनी बिल्डिंगजवळ सोडलं होतं. ती ठीक दिसतेय फक्त घाबरलेली आहे. मी तिच्याकडून इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला, पण काही बोलू शकली नाही. तीला सद्या घरी आणलं आहे.."

" ओके...! इथे गुन्हेगारांनी आपण दिलेल्या बॅग मधील पैसे कडून घेऊन बॅग इथेच टाकली आहे. त्यामुळे त्यांना शोधणं अवघड आहे. अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले असणार. साक्षी..! .."

" येस सर..."

" सगळं आता केतकीवर अवलंबून आहे. तू तिच्याकडून काही माहिती मिळते का ह्याचे प्रयत्न करत रहा...!"

"ओके सर..!"

साक्षी मॅडमनी कॉल ठेवला. केतकीकडे अशा परिस्थितीत चौकशी करणं त्यांना जड जात होतं. केतकीच अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी तिला दरडावल असेल, धमकावलं असेल . अशा परिस्थितीत ती लगेच काही बोलणं शक्य न्हवतं. साक्षी मॅडम विचारात असताना शिंदे बोलले,

" मॅडम.. काय बोलले साहेब..!"

" हं....?" साक्षी मॅडम भानावर येऊन बोलल्या."केतकीकडून माहिती काढायला बोललेत..!"

काही वेळ मनावर ताबा ठेऊन त्या बोलल्या,

" चला शिंदे...! चौकशी तर केली पाहिजे...!"

आणि त्या केतकीच्या बिल्डिंगकडे जाऊ लागल्या. शिंदेनी बाकी कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायच्या सूचना दिल्या आणि स्वतः केतकीच्या घरी जायला निघाले.

साक्षी मॅडम केतकीच्या घरी पोहोचल्या. केतकीच्या शेजारची काही मंडळी केतकीच्या घरी जमली होती. साक्षी मॅडमना पाहताच सगळे केतकीच्या घरातून बाहेर यायला लागले. मॅडम आत गेल्या.

केतकीची आई केतकीला मिठी मारून रडत होती. साक्षी मॅडम केतकीच्या वडिलांजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि बोलल्या,

" आम्हाला केतकीशी बोलावं लागेल. आम्हाला सहकार्य करा...! "

हे बोलणं ऐकून केतकीची आई ओरडली,

" आता काय हवं आहे तुम्हाला माझ्या मुलीकडून..? तीच अपहरण झालं होतं...! आता ती घरी आली आहे..! तुम्हाला काय तपास करायचाय तो करा...पण माझ्या मुलीला काही प्रश्न विचारू नका....!"

" बघा मॅडम..! केतकीच ज्यांनी अपहरण केलं होतं त्यांना लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला केतकीची गरज आहे. ती आम्हाला मदत करू शकते..!"

" ज्यांनी माझ्या मुलीचं अपहरण केलं होतं, त्यांना पकडायच काम तुमचं आहे. आता त्यात ही तुम्हाला माझ्या मुलीची गरज आहे...?"

" बघा मॅडम...." साक्षी मॅडम पुढे काही बोलायच्या आधीच केतकीची आई केतकीच्या वडिलांना उद्देशून बोलली.

" तरी तुम्हाला बोलत होते. पोलिसांना काही न सांगता सरळ त्या माणसांना पैसे देऊन आपल्या मुलीला सोडवून आणा..! पण तुम्ही माझं नाही ऐकलं."

साक्षी मॅडमना आता पुढे काय करायचं सुचत न्हवतं. शेवटी त्या केतकीच्या घरून निघाल्या. इकडे शिर्के सरांची टीम ही अशक्य असे प्रयत्न करून झाली होती. रात्रीचे १२ वाजले होते. शेवटी शिर्के सरांनी शोध घेणे थांबवलं. साक्षी मॅडमनी शिर्के सरांना कॉल करून केतकीच्या घरी घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांनी ही समजून घेऊन उद्या चौकशी करू म्हणून विषय संपवला. पोलिसांना मोठं अपयश आलं होतं. सगळी टीम हताश झाली होती. आता ह्या केसचा खूप खोलवर जाऊन अभ्यास कारण गरजेचं होतं. 

सकाळी शिर्के सर, साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे पोलीस स्टेशनमधील एका केबिनमध्ये हजर झाले. टीममधील इतर काही पोलीस कर्मचारीही तिथे हजर होते. शिंदेसरांनी केतकीच्या बिल्डिंजवळील दुकाने आणि इतर ठिकाणी उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही.चे फुटेज जमा करण्यासाठी काही पोलीस कर्मचारी पाठवले. आता केसचा सगळ्या बाजूने विचार करायचा होता. 

अपहरणकर्त्यांनी १० लाखाची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम त्यांना केतकीच्या वडिलांकडून मिळेल ती ही एक दिवस भरात ह्याची त्यांना खात्री होती. म्हणजे गुन्हेगारांना केतकीच्या कुटुंबाबद्दल माहिती होती. म्हणजे गुन्हेगार त्यांच्या ओळखीतील असण्याची दाट शक्यता होती.

" रात्री घडलेला प्रकार सगळ्यांसाठी अनपेक्षित होता. आता आपल्याला खूप अभ्यासपूर्वक केसचा विचार केला पाहिजे. आता केतकी आणि तिचे घरचे आपल्याला किती मदत करतात ह्यावर अवलंबून न राहता इतर मार्गांनी ही केस सोडवायची आहे. " शिर्के सर बोलत होते." केतकी आणि तिच्या घरच्याना पोलीस स्टेशनमध्ये बोलून घ्या. त्यांना कोणावर संशय असेल तर तशी चौकशी करा. "

शिंदेसरांकडून एक एक आदेश निघत होते. केतकी आणि तिच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं. त्याच वेळात काही पोलीस कर्मचारी केतकी राहत असलेल्या बिल्डिंमध्ये चौकशीला गेले. केतकीची पहिले चौकशी होणार होती आणि ही चौकशी साक्षी मॅडम करणार होत्या. केतकीला एका बंदीस्त रूममध्ये बसवण्यात आलं. साक्षी मॅडम आत आल्या आणि केतकी समोर बसल्या.

" केतकी.! मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. तू त्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे दे. अशा परिस्थितीत तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तरांवर आम्हाला काही लीड मिळू शकते. तू उत्तरे देशील ना..?" साक्षी मॅडम केतकीला बोलल्या. 

" हो..." केतकी अंग चोरून बसावं तसं खुर्चीवर बसून बोलत होती.

" ठीक आहे.  केतकी..! तुला कोणावर संशय आहे..?" 

" नाही..."

" बघ..! नीट विचार करून उत्तर दे..! "

" नाही मॅडम."

" कॉलेजमध्ये कुणाबरोबर भांडण..?"

" नाही."

" तू राहतेस तिथे तुझं किंवा तुझ्या आई वडिलांचे कोणाबरोबर भांडण...?"

" नाही.."

" तुझं दररोजच रुटीन कसं असतं..? म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तू काय काय करतेस ते सांग..!"

" मी सकाळी ८ वाजता कॉलेजला जाते. ३ वाजेपर्यंत परत घरी येते. त्या नंतर घरीच असते."

" म्हणजे घरातून बाहेर गेलीस तर फक्त कॉलेजमध्ये ..?"

" हो.."

" तुझ्या मित्र मैत्रिणींकडे कधी जातेस..?"

" हं... म्हणजे कधी कधी..."

" कोणाकडे ..?"

" हं...? माझी मैत्रीण..."

" नाव काय तिचं..? कुठे राहते..?"

" टीना. गुरूनगर २ मध्येच राहते."

" टीना तुझी कधीपासूनची मैत्रिण आहे.?"

" ती माझ्या नवीन कॉलेज मधील वर्ग मैत्रिण आहे. १० महिन्यापासून मी तिला ओळखते."

" ओके. अजून कुणीही मित्र मैत्रिण नाही...?"

" नाही.."

" मला टीनाचा नंबर लिहून दे..!" 

 केतकीने टीनाचा नंबर लिहून दिला.

" केतकी.! तू दररोज रात्री जेवल्यावर बाहेर चालायला जातेस..?"

" हो..."

" किती वेळ बाहेर घालवतेस ...?"

" हं... १०-१५ मिनिटे.."

" मग तुमच्या बिल्डिंगपासून किती अंतरापर्यंत जाऊन येतेस..?"

" जवळच..."

" मग काल काय घडलं ते सविस्तर सांग...!"

" काल मी गेटमधून बाहेर पडली आणि थोडं पुढे गेल्यावर..."

"थांब... " साक्षी मॅडम मधेच बोलल्या," कोणत्या बाजूस जात होतीस...? मेन रोडकडे की सोसायटीकडे..?"

" मेन रोडकडे.." 

" ओके.. सांग आता."

" मी थोडं चालली आणि तेवढ्यात एक गाडी माझ्या जवळ येऊन थांबली. मी गाडीकडे बघितलं पण कोणीतरी माझ्या डोक्यावरून एक कापडी पिशवी घातली. मी ओरडले. पण त्यांनी मला उचलून गाडीमध्ये टाकलं."

" कोणत्या रंगाची गाडी होती..?"

" रंग...! काही आठवत नाही. सगळं पटकन घडलं...!"

" ठीक आहे. तुला काही आठवतंय की गाडीमध्ये त्यांच्यात काही बोलणं झालं का..? " 

" नाही मॅडम! त्यांनी मला बेशुद्ध केले होते. मला जाग आली तेंव्हा मी एका छोट्या बंद रूममध्ये होती."

" तुझ्यासमोर कुणी आलं होतं...?"

" नाही. "

" त्यांनी तुला सोडायला आणलं तेंव्हा तू काही पाहिलंस का..?तुझ्या रूममध्ये कोणी आलंच असेल?"

" नाही. त्यांनी मला पियायला पाणी दिल होत. मी पाणी पियाले. त्यानंतर मी गाडीमध्ये होते.."

" ओहह..! म्हणजे तुला सोडायला आलेली गाडी तू पाहिली असणार...?"

" नाही. त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्यांनी मला गाडीतून बाहेर उतरवलं आणि गाडी लगेच निघून गेली. मी डोळे उघडले तेंव्हा मला काहीवेळ धुरकट दिसत होतं. मी बिल्डिंगजवळ जात असतानाच समोर पोलीस आले आणि त्यानंतर लगेच तुम्ही आलात."

" तुला काही अजून आठवलं तर मला सांग.." साक्षी मॅडमनी केतकीला बाहेर जायला सांगितलं. केतकीच्या चौकशीतुन काही सापडलं न्हवतं. 

केतकीची चौकशी चालू असताना केतकीच्या वडिलांची आणि आईचीही चौकशी चालू होती. त्यांच्याकडून ही काही क्लू मिळाले न्हवते. शिर्के सरांची परवानगी घेऊन काही वेळाने केतकी आणि तिच्या आई वडिलांना घरी जाण्याची परवानगी दिली गेली.