May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग आठवा )

Read Later
अपहरण ( भाग आठवा )

गुरूनगर पोलीस स्टेशन. सकाळचे ११ वाजले होते. टीना गुरूनगर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाली. एका पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन ती साक्षी मॅडम पर्यंत पोहोचली.साक्षी मॅडम एका कार्यालयात हवालदार शिंदेंबरोबर चर्चा करत होत्या

" साक्षी मॅडम..! आत येऊ का?"

साक्षी मॅडमनी दरवाजाकडे पाहिलं. एक २०-२२ वर्षाची तरुणी उभी होती. वरती एक थोडाफार झगमगीत टॉप आणि खाली अंगाला चिकटलेली जीन्स घातलेली, केसांची एक बट थोडीफार रंगवलेली, ती बट तिच्या उजव्या डोळ्यासमोर झुलत होती, हातात एक छोटी पर्स आणि एक महागडा मोबाईल फोन. 

" टीना .! बरोबर..?"

" हो मॅडम..."

"ये ...! बस." साक्षी मॅडमनी तिला समोर बसायला सांगून केतकीच्या केसची फाईल उघडली.

" मला इथे का बोलावलंय मॅडम...?" टीना खुर्चीवर बसत बोलली.

" अगं. तुझ्या खास मैत्रिणीचं अपहरण झालं होतं ना..! मग तिच्या बरोबर असणाऱ्या लोकांचंही अपहरण होऊ शकतं म्हणून आम्हाला काळजी वाटते."

" माझं कोण अपहरण करणार..?"

" का..? केतकीच झालं ना? तुझं ही होऊ शकतं...?"

" पण माझं अपहरण कोण करेल..?"

"ज्यांनी केतकीच केलं ते.. आमच्या माहितीप्रमाणे सद्या ते आपल्या शहरातच आहेत. बाहेर गेलेले नाहीत."

" अच्छा..!"

" तुझं पूर्ण नाव सांग...!"

" टीना विजय जयस्वाल."

" जयस्वाल ..? " शिंदे मध्येच बोलले, " म्हणजे तू उडीसाची?"

" हो सर.."

" चांगलं मराठी बोलतेस की..!"

" हो. माझा जन्म इथलाच आहे. माझे आई वडील नाहीत. मी माझ्या काकांकडे राहते."

" ओहह .! तुझ्या आई वडिलांचं ऐकून दुःख वाटलं. "साक्षी मॅडम बोलल्या.

"इट्स ओके मॅडम.."

" मला सांग .! तू केतकीला कधी पासून ओळखतेस..?"

" ती आमच्या कॉलेजमध्ये आल्यापासून. ९ - १० महिने झाले."

" तुमच्या कॉलेज मध्ये केतकीच कोणाबरोबर भांडण.?"

" नाही मॅडम."

" तुला काय वाटतं. केतकीच अपहरण कुणी केलं असेल..?"

" मला कसं माहीत असेल मॅडम..!"

" मी फक्त शक्यता विचारली... म्हणजे तुला कोणावर संशय असेल तर सांग...!"

" नाही मॅडम.."

" केतकी काल घरी आली. तू कॉल केलास का तिला."

" नाही मॅडम. मला माहीतच न्हवतं तीच असं काही झालं आहे. "

" मग परवा ती कॉलेजला आली नाही, तेंव्हा तू तिला कॉल करून विचारलं नाहीस..? "

" नाही मॅडम. मला वाटलं ती आजरी असेल.."

" मग तुझी मैत्रीण आजारी असेल तर तू तीला भेटायला जाणार नाहीस..? जवळच राहते ना केतकी..?"

" मी तिच्या घरी नाही गेले असते. "

" का ग...?"

" तिचे वडील खूप कडक स्वभावाचे आहेत. "

" हे तुला केतकीने सांगितलं...?"

" हो..!"

साक्षी मॅडम आणि शिंदेनी एकमेकांकडे बघितलं. 

साक्षी मॅडम टीनाला बोलल्या, " चल..! तुझं हे म्हणणं आम्हाला पटलं, पण..... तू आता म्हणालीस की केतकी कॉलेजला आली न्हवती,त्या दिवशी तू तिला कॉल केला नाहीस. बरोबर..?"

" हो..."

" मग तू तुझ्या कॉलेज मधील मैत्रिणीला असं का सांगितलंस , की तू केतकीला कॉल केला होतास. पण केतकीचा नंबर ऑफ येतोय.?"

ह्या प्रश्नाने टीनाला घाम फुटायची वेळ आली. हवालदार शिंदे आणि साक्षी मॅडमनी ते लगेच हेरलं. टिनाचे ओळखलं की त्या दिवशी तिची एक कॉलेज मधील मैत्रिण तिला केतकीबद्दल विचारत होती. ते सगळं पोलिसांनीच घडवून आणल होत. म्हणून ती सावध होऊन बोलली. 

" मी तिला सहज असं बोलले."

" सहज...?" शिंदे बोलले, " मग काल किंवा आज तरी तू तिला कॉल केला होतास का..?"

" ना... नाही . नाही सर.." केतकीची बोबडी वळली आणि साक्षी मॅडम त्यांच्या खुर्चीवरून उठल्या. तशी टीना अजूनच घाबरली.

" बघ टीना. तुला काही माहीत असेल तर आत्ताच सांग.!"साक्षी मॅडम टीनाच्या खांद्यावर हात ठेवून बोलल्या.

" नाही... मी काही नाही केलं..!"

" मी कुठे बोलतेय तू काही केलंस..? तू कशी तुझ्या खास मैत्रिणीबरोबर असं करशील. पण दुसरं कुणी केलं असेल आणि त्याची तुला माहिती असेल तर आताच सांग..!"

" मला नाही माहीत मॅडम..!"

" ठीक आहे."

साक्षी मॅडम थोडावेळ थांबल्या. शिंदे आणि साक्षी मॅडमची नजरानजर झाली. काही खाणाखुणा करून झाल्यावर साक्षी मॅडम बोलल्या, 

" टीना.! जा तू..! थॅंक्यु इथे येऊन माहिती दिल्याबद्दल. तुला काही आठवलं तर मला कॉल करून सांग."

" हो मॅडम.."

" स्वतःहून कॉल केलास तर चांगलं आहे. कारण आम्हाला तुझ्याबद्दल काही समजलं तर आम्ही तुझ्या घरीच येऊ." शिंदेंनी दरडावल्यासारखा आवाज काढला.

टीना खुर्चीवरून उठली आणि निघाली. ती बाहेर गेली आणि साक्षी मॅडम शिंदेंना बोलल्या,

" काय वाटतं शिंदे...?"

" ह्या पोरगीला काहीतरी माहीत आहे हे नक्की. जर हीचा काही हात नसेल तर ही काही करणार नाही, घाबरून राहील. पण हीचा हात असेल तर ही बाकीच्या साथीदारांना कॉल करून नक्की अलर्ट करेल."

" मला वाटतं ही जर हुशार असेल तर नक्की उलट करेल..! कारण मला ही जरा अति शहाणी वाटतेय.!"

" पण आपण कसं ओळखायचं की तीने कॉल केल्यापैकी कोण हिच्या बरोबर असेल..?"

" ते अवघड आहे. काम करूया. हिचे आधीचे कॉल रेकॉर्ड काढुया.! आताच्या आणि आधीच्या कॉल रेकॉर्ड मध्ये काही नंबर नव्याने ऍड झालेत का ते बघूया..!"

" ठीक आहे मॅडम..! मी एक कॉन्स्टेबल हिच्या मागावर ठेवतो. "

" ओके..! "  

" आणि मॅडम..! ही पोरगी असं का बोलली कीं केतकीचे वडील कडक स्वभावाचे आहेत.? हिला काही अनुभव आला असेल का...?"

"हं... ही केतकीच्या घरी कधी गेली असेल अशी शक्यता वाटतं नाही. केतकीच्या वडिलांबद्दल हिला केतकीच अस सांगू शकते. दुसरं कुणी नाही. "

" हो बरोबर..!"

" पण केतकीच्या वागण्यातून किंवा केतकीच्या वडिलांच्या वागण्यातून असं काही जाणवलं नाही..! इंटरेस्टिंग..!"

"मॅडम.. मला वाटतं गुन्हेगार ह्यांच्या जवळचे आहेत. त्यांना केतकी आणि तिच्या घरातल्यांबद्दल पूर्ण माहिती आहे. केतकीची खास मैत्रीण म्हणून ते टीनाला पण ओळखतात किंवा टीनाने त्यांना ओळखल आहे. पण ती घाबरून सांगत नाही आहे."

" केतकीच्याजवळचे असे कोण आहेत ज्यांना केतकी ओळखते...?" साक्षी मॅडम खोल विचारात गेल्या. काही वेळ असाच गेला आणि काही महत्वाचं सुचल्यासारखं साक्षी मॅडम बोलल्या,

" टिनाचे कॉलेज मधील मित्र...!  तुम्हाला काय वाटतं शिंदे?"

" शक्यता आहे मॅडम."

"शिंदे..! केतकी, टीना आणि त्यांचे २-३ मित्र. यांचं काही खाजगीत बोलणं चालू असायचं अस जे आपले कॉन्स्टेबल केतकीच्या कॉलेज मध्ये चौकशी गेले होते ते बोलले होते..! आठवलं..?"

" हो.. ! हो मॅडम..!"

" हं.. त्यांना परत कामाला लावा..! केतकी आणि टीनाकडून 
त्यांनी काय काय माहिती मिळवली होती आणि त्याचा कसा वापर केला."

" हो..! नक्की मॅडम."