May 15, 2021
रहस्य

अपहरण ( भाग पहिला )

Read Later
अपहरण ( भाग पहिला )

 " अपहरण "

गुरूनगर पोलीस स्थानक. गजबजलेल्या  गुरूनगर शहराच पोलीस स्थानक. तसा क्राईम रिपोर्ट इथे नगण्यच. लहानश्या चोऱ्या माऱ्या सोडल्या तर मोठी घटना सद्या तरी ह्या पोलीस स्थानकात नोंद झाली न्हवती. कित्येक वर्षांपूर्वी झाली असेल तर ती केस ही सुटलेली. त्यामुळे ह्या पोलीस स्थानकातील पोलीस जरा कमी तणावाखाली असतं. दररोज काही पाकीट हरवलं, घर मालक त्रास देतोय अशा अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होत असे आणि ती प्रकरण सुटतं. गुरूनगर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदी होते उमेश शिर्के. काही महिन्यांपूर्वी ह्याच पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून साक्षी विचारे ह्यांनी पदभार स्वीकारला होता. आज त्यांची रात्रपाळी होती. सोबतीला उपनिरीक्षक होते कदम साहेब.

संध्याकाळी पोलीस स्थानकात हजेरी लावून साक्षी मॅडम गस्तीवर जाऊन आल्या होत्या. आज दाखल झालेल्या गुन्ह्यांनविषयीची हवालदार शिंदे माहिती देत होते.
घड्याळात रात्रीचे ११ वाजून २५ मिनिटे वेळ दाखवत होती आणि पोलीस स्थानकातील दूरध्वनी वाजला. शिंदेंनी फोन उचलून कानाला लावला.

" नमस्कार..! गुरूनगर पोलीस स्टेशन. मी हवालदार शिंदे बोलतोय..!"

समोरून व्यक्ती," साहेब... माझी मुलगी. आता जेवल्यावर चालायला म्हणून घराबाहेर पडली होती. ती अजून परत आली नाही. आम्ही सगळीकडे शोधलं. तिचा मोबाईल ही स्विच ऑफ येतोय..." समोरील व्यक्ती धडाधड बोलत होती.

शिंदेंनी त्यांचं संभाषण मध्येच थांबवण्यासाठी स्वतःचा आवाज वाढवला आणि बोलले, " साहेब...! जरा शांत व्हा..!" तसा समोरील आवाज शांत झाला.

" तुमचं नावं सांगा..?"

" सदाशिव गणपत थोरात."

" राहणार कुठे...?"

" हं...?! हे गुरूनगर नंबर २."

" पूर्ण पत्ता सांगा.."

" गणेश अपार्टमेंट, रूम नंबर ४०१, गुरूनगर नंबर २."

" तुमच्या मुलगीच नावं काय..?"

" केतकी..."

" वय...?"

" २१. "

" किती वाजता बाहेर गेली होती...?"

" साधारण १०.१५ ला..."

" थोडा वेळ वाट पहा...! तिच्या मित्र-मैत्रिनींना फोन करून पहा आणि आम्हाला कळवा..!"

" साहेब...! सगळीकडे फोन केले. कुणाला तिच्याबद्दल माहीत नाही...!"

" ठीक आहे. आम्ही तिथे येतो...!"

शिंदेंनी फोनचा रेसिव्हर खाली ठेवला. साक्षी मॅडमना नमूद केलेली आणि कॉलबद्दल सविस्तर माहिती दिली. 

" चला शिंदे..! बघून येऊ काय प्रकरण आहे...!" ,साक्षी मॅडम बोलल्या.

" तुम्ही राहुद्या मॅडम..! मी, दोन शिपाई आणि बरोबर कॉन्स्टेबल मॅडमना घेऊन स्पॉटवर जातो. " 

" मी ही येते..! कॉन्स्टेबल मॅडमला इथे राहूदे..!"

" ठीक आहे मॅडम..! मी गाडी काढायला सांगतो..!"

शिंदेंनी लगेच सॅल्यूट ठोकला आणि इतरांना पुढील सूचना द्यायला निघाले. साक्षी मॅडमनी गस्तीवर गेलेल्या कदम साहेबांना कॉल करून ह्या केसची माहिती दिली आणि त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. कदम साहेब पोलीस स्टेशनला येताच साक्षी मॅडम हवालदार शिंदे आणि टीम बरोबर घटनास्थळी जायला निघाल्या.

गुरूनगर नंबर २ म्हणजे गुरूनगर पोलीस स्टेशनपासून जवळपास १ किलोमीटर अंतरावर. इथे काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारती होत्या. ह्या इमारतीच्या पुढे काही खाजगी इमारती होत्या. रस्त्याला बरीच मोठी जुनी झाडे होती. इमारतीतून बाहेर पाहिलं तर झाडांमुळे इमारतीच्या समोरील थोडंफार व्यवस्थित दिसेल, पण आजूबाजूच दिसणार नाही. रस्त्याला जुने पिवळे दिवे जे अंधारात थोडाफार उजेड देत होते. शहरापासून हा परिसर जरा अलिप्त वाटायचा. जास्त कुणाची येजा नाही आणि जवळपास दुकाने, मार्केट नाही.

पोलिसांची गाडी गणेश अपार्टमेंटच्या गेट मधून आत आली. केतकी हरवली आहे हे समजल्यामुळे त्यांच्या बिल्डींगमधील बरीचशी मंडळी केतकीच्या आई वडिलांबरोबर बिल्डींगच्या आवारात केतकीचा शोध घेत होती. पोलिसांची गाडी पाहताच सगळे जमा झाले. साक्षी मॅडम आणि त्यांची टीम गाडीतून खाली उतरली. हवालदार शिंदेंनी केतकीच्या वडिलांना हाकमारून गाडीजवळ बोलावलं. इतर पोलीस कर्मचारी जमलेल्यांकडे चौकशी करू लागले. 

सदाशिव आणि त्यांची पत्नी गाडीजवळ आले. हवालदार शिंदे साक्षी मॅडमकडे नजर दाखवून सदाशिवना बोलले,

 " ह्या आमच्या मॅडम आहेत. ह्यांना सगळं सविस्तर सांगा.!"

केतकीची आई रडत रडत बोलू लागली, " आमची मुलगी केतकी..! बाहेर चालायला म्हणून आली होती. पण परत घरी आलीच नाही...! रात्रीची वेळ....!"

पुढे काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं . सदाशिव यांनी तिला जवळ घेतलं. मग सदाशिव सांगू लागले,

" केतकी आमची एकुलती एक मुलगी. आम्ही जेवल्यावर गप्पा मारत होतो. काही वेळाने केतकी बोलली, मी जरा खाली चालून येते...! अर्धा तास झाला. ती परत आली नाही. आम्ही तिच्या नंबरवर कॉल केला. पण नंबर स्विच ऑफ आला. म्हणून आम्ही खाली सगळी कडे शोधलं. ती कुठेच न्हवती. शेजारच्यांकडेही चौकशी केली ." 

साक्षी मॅडमनी बिल्डींगभोवती नजर फिरवली आणि बिल्डिंच्या टेरेसकडे पाहून म्हणाल्या, " टेरेसवर चेक केलं का..?" 

" हो.." ,सदाशिव बोलले.

" शिंदे..! आपले शिपाई टेरेसवर पाठवून चेक करायला सांगा. वरून जवळपासच काही दिसत का ते पहायला सांगा..!"

" हो मॅडम..!" शिंदेंनी लगेच दोन शिपाई टेरेसवर पाठवले. बरोबर एक टॉर्च ही घेऊन जायला सांगितला. दोघे टेरेसवर गेले. टेरेस आणि बिल्डींगच्या समोरील बाजूस सोडून तिन्ही बाजूस उजेड मारून व्यवस्थित बघितलं. केतकी कुठेही न्हवती किंवा काही त्यांच्या दृष्टीने संशहित न्हवत. दोघेही खाली आले. साक्षी मॅडमनी सदाशिव यांच्याकडून केतकीचा नंबर घेतला. मॅडमनी त्या नंबरवर कॉल लावला. नंबर ऑफ येत होता. मॅडमनी लगेच तो वायरलेसवर खबर देऊन केटकीचा नंबर ट्रेस करण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत शिंदेंनी सदाशिव यांच्याकडून केतकीच्या जवळच्या मैत्रिन्नींचे मोबाईल नंबर घेतले. 

साक्षी मॅडम सदाशिव यांना उद्देशुन बोलल्या," आम्ही तपास चालू केला आहे. केतकीचा नंबर चालू झाला की तो ट्रेस होईल. त्या आधी तुम्हाला तिचा किंवा इतर कुणाचा कॉल आला तर लगेच आम्हाला कळवा..!तुम्हाला कोणावर संशय..?" 

सदाशिव नकारार्थी मान हलवत नाही म्हणाले.

" शिंदे..! यांच्याकडून केतकीचे फ़ोटो घ्या  आणि आताच पुढे पाठवा..!"

" हो मॅडम..!"

साक्षी मॅडम बिल्डिंच्या समोरील रस्त्याकडे चालत जाऊ लागल्या.त्यांना बिल्डिंच्या गेटच्या बाजूला असलेली सेक्युरिटीची जागा दिसली. तश्या त्या मागे फिरून बोलल्या, 

" बिल्डिंचा सेक्युरिटी कुठे आहे..?"

बिल्डींगमधील काही रहिवाशी बोलले. कित्येक वर्ष सेक्युरिटी नाहीच ठेवला आहे. त्यावरून त्यांच्यात बोलणं चालू झालं. तसे शिंदे ओरडले,

" गप्प बसा."

तसे सगळे शांत झाले. साक्षी मॅडमच्या मागून शिंदे आणि दोन पोलीस कर्मचारी बिल्डिंच्या गेट मधून बाहेर पडून रस्त्यावर काही संशयास्पद सापडत का पाहू लागले. काही वेळ गेला तसे शिंदे बोलले ,

" चला मॅडम.! आता इथे या असल्या उजेडात काही  सापडणार नाही. उद्या सकाळीच इथे माणस पाठवू चौकशीसाठी. ती तपास करतील."

तशा मॅडम निघाल्या. सगळे पोलीस कर्मचारी गाडीत बसले आणि गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली. शिंदेंनी मिळालेली माहिती नोंद केली. उद्या सकाळी रीतसर गुन्हा नोंद होणार होता.