खव्याची पोळी

खव्याची पोळी

       खव्याची पोळी
                                                                      साहित्य :- ५०० ग्रॅम खवा , जेवढा खवा असेल त्याच्या निम्मी पिठी साखर ( दीड वाटी ) ,जायफळ व वेलची पूड , साजूक तूप , मैदा ३ वाटी , चिमूटभर मीठ .

कृती :- प्रथम एका कढईमध्ये खवा घेऊन मंद आचेवर तो भाजून घ्यावा . भाजून झाला कि तो थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यावा . आता मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे . भिजवताना फार घट्ट व फार सैल भिजवु नये . नंतर पीठ तेल लाऊन झाकुन ठेवावे . आता खवा थंड झाला असेल तर त्यात पिठी साखर वेलची व जायफळ पूड घालून छान मिक्स करून घ्यावे व हव्या तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे . खवा जर गरम असेल तर साखर विरघळल्यावर मिश्रण सैलसर होते अशावेळी न घाबरता ते परत गॅसवर ठेवून हलवत रहावे व थंड करण्यास ठेवावे . साधारणपणे १५ ते २० मिनिटांनी मिश्रण थंड होते मग भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पारी लाटावी व त्यात पुरण भरतो त्याप्रमाणे खव्याचा गोळा घेऊन पारी बंद करून थोडा मैदा लावून पोळी लाटावी व मंद आचेवर दोन्ही बाजूने साजूक तूप लावून भाजुन घ्यावी .
                                                                          टीप :- मैद्या ऐवजी कणीक वापरली तरी चालते .                                                              स्वस्थ राहा मस्त खा.