Jun 15, 2021
ललित

खुट्टा - भाग २

Read Later
खुट्टा - भाग २

आता पुढे...कथेचा दुसरा भाग

खुट्टा - भाग २    
                दोन आठवड्यानं मेडिकलची तारीख पोस्टानं आली. सोन्या गेला तिथं बिंदास. रानामाळात कामं करून ऱ्हाळंल्याला ह्यो गडी त्येला कसलं आलंय टेन्शन तवा. पार उघडं नागडं करून चेकिंग झालं. आगदी ढुंगणाला मूळव्याद हाय का त्ये बी बगितलं. त्येला खोकायं बिकाय लावून.  समदं ओके चालल्यालं. पर मदीचं यक माशी शिकली. त्येज गुडगं यकामेकाला चिकटत व्हतं. ‘नॉक नी’ आसा काय तरी शेरा मारून आरमीच्या डाक्टरनं त्येला मेडिकल मदी नापास केला. ही गोष्ट त्येज्या लय जिव्हारी लागली. आता गावात काय म्हणून त्वांड दावायचं ह्या इचारानं यकदा त्येला गहिवरुन बी आलं. पर तरी काळीज मोठं करून त्यो गावात आला. इन मिन पन्नास घराचं गाव. समद्या गावात ही बातमी फिरली का सोन्याला मेडिकल मधी काढला म्हणून. सोन्या पुरता खचून गेल्याला. त्याला गावातनं चालायची बी लाज वाटू लागली. मान खाली घालून आपलं गपचूप रानातनं घरी आन घरंन रानात यवढीचं य जा करायचा त्यो. पोंरांच्यात बी पयल्यासारखा जास्त मिसळायचा न्हायी. पावण्यां रावळ्यांच्यात तर आजिबात जायचा न्हायी. 
              त्येज्या आयनं मंग यकदा त्येजी समजूत काढली तवा त्येज्या जीवात जीव आला. मंग पुना त्येनं जोमानं यायाम चालू केला. गुडग्यात आंतर पडावं म्हणून झोपताना रोज गुडग्यांमधी आडशिरी बांधून झोपू लागला. यक म्हैना काढला पर गुडग्यांत काय आंतर पडंना. आवं सोप्पं हाय का त्ये हाडकं वाकवायची म्हंजी. बैठका मार, कुठं यडवाकडं जॉरं मार आसं बरंच उद्योग चालू व्हतं त्येज. परत कुणाच्या तरी सांगण्यावरंन त्येनं गुडग्याच्या मधी इटकारं बी बांधाय सुरवात केली. टावेलानं बांदल्याली ती इटकारं रातचीचं घसरून पडायची. मंग त्येनं ती दाव्यानं आवळायं सुरवात केली. रातचं आवळून दावं बांदलं तर सकाळ पातूर गुडग्याच्या खालची जागा काळीनिळी पडायची. रगात आळून बसायचं समदं. पायाला मुंग्या यच्या. पर त्येनं हार मारली न्हायी.
             लय म्हयनत घितली गड्यानं पर गुडग्यात काय आंतर पडलं न्हायी. तिथनं पुना तीन वरसांत त्येनं आरमीच्या आन पुलीसच्या मिळून चवदा भरत्या केल्या पर पदरी त्या चिकाटणाऱ्या गुडग्यांमुळं निराशाचं आली. त्येज आरमीत भरती व्हयाचं सपानं आता फकस्त सपानंचं ऱ्हातंय का काय ह्येजी त्येला भीती वाटायं लागल्याली. कारण भरती न्हाय झालो तर आविष्यात पुढं काय ह्या दुसऱ्या पर्यायाचा त्येनं सादा इचार बी केला नव्हता. गावात जी दुसरी पोरं व्हती त्यांनी आयट्या बियट्या केल्याला. कुणी काय इंजनियरींग बिंजनियरींग केल्यालं. ती पोरं चांगल्या चांगल्या कंपनीत कामाला बी लागली. मंग सोन्यासारखी तिगं चवगं फकस्त पंधरावी करून गावातनं बोंबलत हिंडताना दिसू लागली ती  बी बिना कामाधंद्याची. 
             परत परत तर त्येंनी दहावी पास, आठवी पास, आन एकांद बारीला तर साव्वी पासच्या बी भरत्या केल्या. संडास साफ करायच्या पदाचं बी फ़ॉम भरलं पर तिथं बी निराशाचं. वशिला बिशीला लावून त्या जाग्या तिसऱ्याचं कुणाला तरी दिल्या जायाच्या. घरांत बी कुणी आंदी शिकल्यालं नसल्यामुळं नुकरीसाठी नक्की काय काय करायचं आसतं त्येज मार्गदर्सन योग्य टायमात कुणी केलं न्हायी. सोत्ताला म्हायीत पडल तसं शिकत शिकत गेल्याली ही समदी भाबडी पोरं. 
        पर आता दुनिवेची समदी पोरं पुढं जायाला लागली म्हणल्यावं सोन्या सारख्या पोरानला गावात फिरायची बी लाज वाटायं लागली. सोन्याबरची आन त्येज्या मागची बी कित्येक पोरं मंग ती गावातली आसू निदान गावाबाह्यरची आरमीत निदान पुलीसमदी भरती झाली व्हती. फकस्त मेडिकलला ओके व्हती म्हणून. कायकायांनी तर पैसं बियसं दाबून, येजंट बीजंट लावून त्येपलं मेडिकल क्लियर करून घितलं. पण सोन्या सारख्यांच्या घरी बारा म्हैने आठरा काळ पैशाचा दुस्काळं. समद्या बाजूनं नुस्ता ठणठण गोपाळ. कधी काळी सोन्याला लाडीगुडी लावून सोन्याचं पेपर बिपर बगून पन्नास पंचावन्न टक्के पाडणारी पोरं गावांत सुट्टीला यिवून, गाड्या घिवून धुरळा उडवाय लागली तरी सोन्या आजून गावातचं. ह्या गोष्टीचा त्येला लय तरास व्हयाचा. त्यो कुणाला बोलून दाखवायचा न्हायी पर यकटा रानात आसला की त्याला रडू आवरायचं न्हायी. जिंदगी कुठंन कुठं आली ह्या इचारानं त्येला कधी कधी तर जीव बी दिव वाटायचा. पर आयचा आन बापाचा चेहरा आठवून त्यो समदं दुःख निमुटपणानं गिळायचा. 
              मागं यक धा म्हैन्यापुरवी त्येजा बाप ममयत जिथं नुकरी करायचा का न्हायी त्येला तथं घिवून गेला. त्येजा बाप वाचमेनची नुकरी करायचा तिथं. चार वरंस सलग म्हागाई धा पटीनं वाढली पर त्येज्या बापाचा पगार काय यका रूपयानं बी वाढला न्हायी त्या नुकरीत. सोन्याला बी तेचं काम लावून दिलं त्येज्या बापानं. दोन शिपात काम हुतं. बारा तासाची डुटी. सकाळी आठ त्ये संध्याकाळी आठ आणि संध्याकाळी आठ त्ये सकाळी आठ. काम चालू झालं. यक हाफ्ता सकाळच्या शिपचा चांगला गेला. पर जशी नाईट शिप लागली तशी त्येला ह्या कामातली खरी गोम कळली. झोपचं पार खोबरं व्हयाला लागलं. त्यो मस्त इचार करून ममयला आल्याला का आसं आसं काम करायचं आन आसा आसा यळं काढून भरतीचा आब्यास बी करायचा. पर न्हायी समद्या ठरीवल्याल्या गोष्टींवं पाणी पडलं. 
                जवा जवा त्येला नाईट शिप आसायची तवा तवा त्येला ह्या इचारानं रडू कोसळायचं का गेली इस वरंस माज्या बापानं ह्ये काम कसं केलं आसलं म्हणून. जागून जागून लालभडक झाल्यालं डोळं, डोळ्यांनखाली पडल्यालं काळं काळं गोल डाग, आपुऱ्या झोपंआबावी सबावात आल्याला चिडचिडेपणा, गळून पडल्यालं क्यास ही बापाच्या कामाची इस वरसाची कमाई बगून त्येला ऱ्हावून ऱ्हावून रडायला यचं. पर मनाची समजूत काढत त्येनं सा म्हैनं कसंतरी त्ये काम रेटलं. पर रोज रातच्याला त्येला गावातली ती पन्नास पंचावन्न टक्के पडल्याली पोरं जी भरती हुन आता पन्नास पंचावन हजार पगार घेत हुती ती आठवायची आन त्येला सोत्ताचा राग यचा. नव्वद टक्के पाडून मंग आपला काय उपेग ह्या यका प्रश्नाचं उत्तर त्येला रातभर सुईसारखं टोचायचं. गावातनं जाताना पासठ किलोचा असणारा ह्यो  गडी आता इचार करून करून पार पंचावनचा पालापाचूळा झाला हुता. फुकलं तर उडून जाईल आसा. पुना पुना तर त्येला ह्ये समदं सोसवना झालं. मंग त्येनं मनाशी यक पक्का निर्णव केला आन बापाला भरतीचा फ़ॉम भरायचाय आसं सांगून त्यो गावाला निगुन आला त्ये परत ममयला गेलाचं न्हायी.
                गावात ऱ्हावून मंग मिळलं ती रोजनदारीचं काम करून त्यो पैक कमवाय लागला. घरची जमीन कसायं लागला. गुरं बिरं पाळायं लागला. हो... समदी... इज्जत बिज्जत सोडून. कारण कधीकाळी गावात भरती हुणारा त्यो पयला पोरगा ठरणार व्हता. पण नशिबानं त्याला आसा कायी खुट्टा मारला की त्येला आता आपल्या आब्रूची लखतरं यशीवं टांगून काम करण्याबगर दुसरा पर्यायचं शिल्लक ऱ्हायला नव्हता. कधी कधी त्येज्याबरं फिरणाऱ्या बारक्या पोरांस्नी तेवढा आतडी आकसून जीवनाचं ह्ये तत्वज्ञान सांगायचा त्यो. म्हणायचा, “ ह्ये बगा रताळ्यानो... योग्य यळंत योग्य माणसांकडनं योग्य मार्गदर्सन भेटलं कनाय तरचं आपली म्हयनत योग्य कामात खर्ची हुती आन मंग आपली जिंदगानी योग्य मार्गानं चालती. त्येज्यामुळं आतापास्नं इचार करून पावलं टाका. निदान बसा आमच्यागतं बिनाकामाचं न बिनालग्नाचं. दुसऱ्यांच्या वरातीत ढुंगाण नाचवत. जवर बापाच्या पैशानं तुमचं नशीब आन तुमचं आविष्य पळतंय कनाय तवर योग्य मार्गानं पळून घ्या निदान मंग यकदा का ह्या नशिबाला खुट्टा बसला... का मंग पुना काय माणूस लवकर उपजार यत न्हायी बाबांनो.”

----- विशाल घाडगे ©™✍️

Circle Image

विशाल घाडगे

Student

Writer, Poet, Storyteller, Lyricist, Author, Rapper. I write the stories about village and its rural culture.