नमस्कार मंडळी...! सदर कथा मोठी असल्याने दोन भागात अपलोड केली जाईल.
खुट्टा -- भाग १
आज सकाळच्या पारीचं सोन्याच्या आयनं हाताला यिल ती भांडी आपटत धपटत सोत्ताच्याचं तंद्रीत सयपाक घरात बोलणं चालू केलं, “ साळा हुन चार वरसं झाली तरी आजून आमच्याचं उरावं बसून खातुय ह्यो भाड्या...काय कामाधंद्याचं काय बगायचं आसतं का न्हायी.... का माणूस काय बोलंना म्हणून आपलं यिल त्यो दिस निस्ता खाऊन गु करून घालवायचा... आं... रानात वायीचं हातभार लावला आन गावात पुढं पुढं केलं म्हंजी झालं का सगळं... रानातलं काम म्हंजी का काम आसतं का तवा ?... आं... नुकरी बिकरी करून काय करतुत बिरतुत करायचा इचार हाये का न्हायी भाड्याचा. त्यो बाप तिकडं ममयत पार किकुन गेलाय समद्या घरादाराचं करता करता... आं... कुणाकुणाला म्हणून पुरायचं त्येनं. गुडघं गळ्यात आलं त्येज करता करता तरी पळतुयचं बिचारा... आन ह्ये धेंडाक ?... शिकून सवरून म्हणलं बापाला वायीचं हातभार लावंल तर कशाचं आलंय... ह्या बैलाला काय ही गाव सुटंना झालंय.”
“ ममयत चांगली बापानं धा हजाराची नुकरी लावून दिल्याली तर उधाळला ढुंगाण वर करून गावाला लगीचं सा म्हैन्यात... का ?... तर ह्येज्या गांडीला तिथं झॉप भेटंना झाली म्हणं... समदी दुनव्या तथं दिस काढतीया बिना झोपची, बिन आनपाण्याची... पैक्यासाठी... आन ह्येजीचं गांड दुखतीया व्हय रं ?... आं...तुला आला मंग फोड यकदाशी पटकीचा... सोत्ताचं नागडपणं झाकत न्हायी आन निघालाय गावचं उघडं झाकायला... पुढारक्या करतुय... चार बारकुल्या पोरांच्यात खेळतंय काय... उनाडतंय काय ? आता का वय हाय का भाड्याचं बॅट न बॉल खेळायचं... पर न्हायी... तिचं गांडीत घालायं पायीजे मुसळाला रोज. ह्येज्या बरंच्या निम्म्या पोरांची लग्न झाली... कायकायानला तर पोरं बी झाली तरी आजून ह्येज्या नुकरीचा पत्ता न्हायी... बया... काय यक यक दिस येत्यात माणसावं...आन ह्येला त्येज कायीचं कसं वाटंत न्हायी काय म्हायीत... सोकावलायं भाड्या निस्ता... हाकलून द्यावा तरीबी जीव तुटतुय म्येपला... यकुलत यक हाय म्हणून गप बसायं लागतंय... पर त्येला काय कदरचं न्हाय ह्या समद्याची.”
तिला वाटलं घरात तिजी ही वचवच आयकायला कुणीचं न्हायी. पर नुकतंच गुरांचं शाणपाणी करून आल्याल्या सोन्यानं ह्ये समदं बोलणं घरात यच्या आंदी बाहीर दारात उभं ऱ्हावून ऐकलं. टाचकन त्येज्या डोळ्यांत पाणी आलं. मंग त्यो तसाचं भरल्या डोळ्यानं हालमधल्या खाटंव जाऊन उताणा पडला. पत्र्याकडं डोळं लावून त्यो कंच्या तरी इचारात गुतला. डोळ्यांतनं आसवांचं वगुळ येतचं व्हतं. आन त्या वगुळा बराबर मागल्या चार वरसाची त्येजी जिंदगानी त्येज्या नजरं समुर उभी ऱ्हायली.
चार वरसा पुरवी नुकताचं बारावी पास झाला हुता सोन्या. त्येज्याबरं त्येज चार मैतर बी पास झाल्यालं. गावांत समद्या पोरांस्नी तवा यकंच याड हुतं. भरतीचं. मंग ती आरमीत आसू निदान पुलीसमधी. पण भरती म्हंजी जीव हुता समद्यांचा. त्येनला भरती बगर दुसरं कायी सुचायचचं न्हायी. सकाळ संध्याकाळ पार तिकडं म्हादेवाच्या डोंगराकडं पळायं बिळायं जायाच्या अवलादी समद्या. सोन्या तर समद्या पोरांत उजवा गडी. आख्ख्या गावात कुणाला पळायं आयकायचा न्हायी. अब्यासात तर पयल्यापास्नं हुशार व्हताचं गडी. कायम पयला नंबर काढायचा. समदी पोरं म्हणायची का बाकी कुणाचं म्हायती न्हायी पर सोन्याचं काम नक्की हुणार आरमीत.
झालं... यक दिस कोलापुरात आरमीच्या ओपन भरतीची तारीख डिकलेर झाली. समदी जमात पोचली तिथं. दोनशे जागा हुत्या सातारा जिल्ल्याला. पर त्यासाठी आडतीस हजार पोरं आल्याली. धक्काबुक्की खात खात, रेल्वेचा परवास करत करत समदी जणं कोलापुरात पोचली. बिना आनापाण्याचं, आनुश्यापोटी कडक उन्हात पळून गावातल्या धा पैकी सात जणांनी रनिंगचं मैदान मारलं. खुशीत घरला वापिस आली. यक म्हैन्यानं लेखी परीक्षा झाली. त्यांत फकस्त सोन्या यकटा पास झाला. आता मेडिकल तेवढं ऱ्हायलं हुतं. गावात समदीकडं चर्चा झाली का सोन्याचं काम झालं म्हणून. सोन्या आता फौजी हुणारं. गावातली जुनी खोडसाळ माणसं तेवढी म्हणली, “हंम लगीचं कुठं फौजी न काय... त्येला आजून सातपाणी उतरायच्याती. आत्ताशी कुठं परीक्षा पास झालायं त्यो... आता मेडिकल हुणार. समदं फिट आसलं तर मंग त्येज काम हुणार... तवर न्हायी."
पर सोन्याला खात्री हुती का आपलं काम नक्की हुणार म्हणून...
क्रमशः...!
------ विशाल घाडगे ©™✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा