खुशाली....

चिमुकल्या मुलीला टपाला मार्फत मिळणारी खुशाली... हळवी कथा


गोष्ट छोटी डोंगराएवढी.... टपाल!

"सुमे ऐकलं का उद्या रविवार. माझा सगळ्यांत आवडता वार. फक्त शाळेला सुट्टी असते म्हणून नाही पण रविवारी गावाकडून आलेलं पत्र वाचायला मिळतं ना म्हणून..." दीपा शाळेच्या ओसरीवर बसून पाय हलवत हलवत शाळेत नवीन आलेल्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती.
दीपा! एक गोड लोभस चिमुकली. सितापूर नावाच्या छोट्याश्या खेडेगावात राहणारी. पण खूप हुशार. कायम पहिला नंबर काढणारी. एकपाठी. आईवडिलांना फार वाटे आपल्या मुलीने शिकून मोठं व्हावं. वडिलांना जेमतेम का होईना पण लिहिता वाचता येत होतं पण आई अगदीचं अडाणी होती. पण मोठ्या धैर्याची. मुलीने शिकावं ह्यासाठी आग्रही असायची. दीपाच्या गावातील शाळेच्या गुरूजींनीही वेळेत तिच्या बुद्धीची चमक ओळखली आणि गावातल्या सरपंच आणि वडीलधारी मंडळींनी स्वतःच्या खर्चाने तिला जवळच्या अंगणवाडीत शिकायला पाठवलेले. गाव आणि अंगणवाडी ह्यातले अंतर तसे बऱ्यापैकी होते. बैलगाडी केली तर साधारण तासाभरात अंगणवाडी पर्येंत पोहचता येई. पण रोज शाळा ते घर येणं जाणं तिच्या गरीब आई वडिलांना कुठे परवडणार होतं. ह्या सगळ्याचा विचार करून तिला निवासी शाळेत दाखल केलं. पण तिचे वडील नं चुकता दीपाला पत्र पाठवत. तिची ख्याली खुशाली विचारत. घरी काही नवं जुनं घडलं तर तेही दीपाला कळवत. मग दीपाही आठवडाभर चातकाप्रमाणे "टपालाची" वाट पाहत असे.
बघता बघता रविवारची सकाळ उजाडली. दहा वाजता शिपायाने शाळेतील घंटेचा टोला दिला. त्या आवाजाबरोबर दीपा धावत वडाच्या झाडाखाली आली. अजूनही इतर मुलं मुली झाडाखाली जमली होती. सारे निवासी शाळेतील विद्यार्थी. डोळ्यात प्राण आणून दीपा शिक्षकांच्या हातातील पत्रांच्या गठ्याकडे पाहत होती. एक एक नाव उच्चारत शिक्षक पत्र वाटप करत होते. आपला नंबर कधी येणार आणि आज बाबांनी पत्रात काय बरं लिहिले असावे ह्याचा विचार दीपा करत होती. उत्साह तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. एवढ्यात शिक्षकांनी तिचं नाव उच्चारलं आणि तिने धावत जाऊन पत्र हातात घेतलं. पत्र मिळाल्याचा कोण आनंद तिला झाला होता. तिने ते पत्र उराशी कवटाळले, जणू बाबांना प्रेमानं मिठी मारल्यासारखे तिला वाटले.
दीपा पत्र घेऊन पळत पळत आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. पत्र वाचण्यासाठी तिची ही आवडती जागा. आजूबाजूला कोणी नाही ना हे पाहून तिने उत्सुकतेने पत्र उघडलं. पत्र उघडताचं वडीलांचं मोत्यासारखं अक्षर पाहून तिला भरून आलं.
"आपल्या गौरी ताईचं लग्न जमलं आहे तू सुट्ट्या लागल्या की लगेचं गावाला ये." अशा आशयाचा मजकूर पत्रात होता. आपल्या बहिणीचं लग्न जमल्याचं वाचून दीपा आनंदानं नाचू लागली. कागदाचा एवढासा खुशालीचा तुकडा तिला लाखमोलाचा आनंद देऊन गेला......

©️®️सायली पराड कुलकर्णी