खुपलेल्या गोष्टी

A collection of True Events

प्रसंग पहिला .

रश्मी खांद्यावरची पर्स अन् हातातली बॅग सांभाळत बसमध्ये चढली. तिनं पाहिलं..एका सीटवर पन्नाशीची  एक महिला एकटीच बसलेली..बाजूच्या सीटवर एक लहानशी कापडी पिशवी.. रश्मीनं खुणेनंच सीट रिकामी आहे का विचारलं .

रश्मीला नखशिखांत न्याहाळत त्या बाईंनी आपली कापडी पिशवी उचलली अन् तिला बसण्याची खूण केली. रश्मीनं आपली हँडबॅग सीटवरच्या रॅकवर सरकवत स्वतःला कंफर्टेबल करून घेतलं.

"कुठे निघालीस ?" त्यांनी रश्मीला विचारलं ..
"नागपूरला!" रश्मीनं जेवढ्यास तेवढं उत्तर दिलं.
"माहेर आहे का नागपूरला ?" बाईंचा पुढचा प्रश्न..
"नाही, ऑफिसचा दौरा आहे .." रश्मीचं तुटक उत्तर!
"घरी कोण कोण असतं?" बाईंना उत्सुकता होती .
"मी आणि आईवडील! काय उकडतंय नाही ? पावसानं अगदी दडीच मारलीय .." रश्मीनं थोडक्यात उत्तर देत विषय पालटला..
"कां ! लग्न नाही झालं ?" बाईंनी मुद्दा रोखून धरला.
रश्मीनं न ऐकल्यासारखं करत कानात इअरफोन घातले.

काय बाई, आजकालच्या मुली! बसतात कानात बोळे खुपसून ..जरा म्हणून कुणाशी बोलायला नको ह्यांना.." बाईंचं पुटपुटणं इअरफोन ओलांडून रश्मीचे कान चिरत मेंदूपर्यंत पोहोचलं !

                         *******

प्रसंग दुसरा .

रितेशच्या घरी त्याचे लांबचे काका आणि काकू भेटायला आलेले ..गावातच एक लग्न होतं.. ते उरकून घाईगडबडीत इकडे घर पाहायला आलेले...

रितेशची अन् काकांची ही पहिलीच भेट. बाबांनी रितेशची ओळख करून दिली अन् काकांच्या पाया पडून रितेश समोरच सोफ्यावर बसला .

"काय करतोस ?" काकांनी विचारलं.
"बीई झालोय.. इलेक्ट्रिकल.." रितेशनी नम्रपणे उत्तर दिलं .
"मग काय ठरवलंय ? नोकरी की व्यवसाय ?"
"नोकरीच करेन म्हणतो..प्रयत्न चालू आहेत .." रितेशनं सांगितलं.
"अजून किती प्रयत्न करणार? लवकर पोटापाण्याचं बघा आता..! किती दिवस बापाच्या जीवावर जगणार ? काकांनी त्यांच्या वयाच्या अधिकारानं रोखठोक सांगितलं.

रितेशनं आधी बाबांकडे बघितलं ..मग काकांकडे .. अन् तो सरळ उठून आतल्या खोलीत निघून गेला .

"उर्मट मुलं हो, आजकालची ..जरा काही उपदेश दिला की गेले उठून .. रीतभात नाहीच .." काका बाबांना म्हणत होते.

                             *******

प्रसंग तिसरा .

नीलिमा आणि तिची मैत्रीण फिरायला म्हणून बाहेर पडल्या..सहजच.. कंटाळा आला म्हणून .. येताना पाणीपुरी खाऊ अन् जमलं तर आइस्क्रीमही..

वाटेत साड्यांचं दुकान लागलेलं..नवीनच ..कालच उद्घाटन झालेलं दिसत होतं. काउंटरवर पंचविशीचा तरुण एकटाच बसला होता.. दुकानात ग्राहक नव्हतं अन् अठरा एकोणीस वर्षांची मुलगी काय करायचंय हे न समजून नुसतीच उभी ..ग्राहकांची वाट बघत ..!

"चल.. चल.. साड्या बघू या .." नीलिमानं मैत्रिणीला आग्रह केला.
"तुला घ्यायच्यात का ? पैसे आणलेस की कार्ड आहे पर्समध्ये?" मैत्रिणीनं विचारलंच.
"ते बघू नंतर ..तू चल तर खरं.." नीलिमानं मैत्रिणीला जवळजवळ ओढतच दुकानात नेलं.

दोघींना दुकानात शिरलेलं बघून \"ती\" मुलगी अदबीनं समोर झाली. काउंटरवरच्या तरूणानंही हातातला मोबाईल बाजूला ठेवला.

"साड्या दाखवा !" नीलिमानं अधिकारवाणीनं सांगितलं.
"कोणत्या दाखवू?" त्या मुलीनं नम्रपणे विचारलं.
"चंदेरी आहे का तुमच्याकडे .. नारायणपेठ दाखवा ..शिफॉन पण काढा ..हा रंग नको ..तो पोत नको ..!" नीलिमानं जवळपास पन्नासएक साड्या काढायला सांगितल्या.

काउंटरवरचा तरुण उठून निलीमाजवळ जात आदराने म्हणाला, "ताई, कशा साड्या हव्यात तुम्हाला ?" मी बोलावून देतो. .उद्याच ..! तुम्ही मोबाईल नंबर देऊन ठेवा.. साड्या आल्या की लगेच कळवतो."

"नकोत आम्हाला साड्या ..नुसत्याच बघायच्या होत्या .." नीलिमानं सांगितलं अन् "चल ग .." असं म्हणत मैत्रिणीचा हात धरून ती तिला घेऊन बाहेरही पडली .

"अगं, तुला घ्यायच्या नव्हत्या साड्या ..तर काढायला कशाला लावलास पसारा ? मैत्रिणीनं विचारलं .

"अं..नाहीतरी उद्योग काय होता दोघांना ? माश्या मारत तर बसले होते !" नीलिमा बेफिकिरीनं म्हणाली अन् दोघीही पाणीपुरीच्या गाडीच्या दिशेने चालू लागल्या .

                          *******

मैत्रिणींनो, मला वरच्या प्रत्येक प्रसंगात काहीतरी खुपलंय.. तुम्हाला खुपलंय का ? असेल तर काय खुपलंय हे कमेंट करून नक्की सांगा ...

©कल्याणी पाठक