Jan 19, 2022
नारीवादी

खरा साथीदार हवा, फक्त नावापुरता नको....

Read Later
खरा साथीदार हवा, फक्त नावापुरता नको....

आज विणाला बघायला पाहुणे येणार होते. घरात सगळीकडे धावपळ चालू होती.

 

विणा दिसायला सावळी पण नाकी गोळी छान होती. विणा ने मास्टर्स कम्प्लीट केलेले असून ती एका मोठ्या कंपनी मध्ये उच्च पदावर कामाला होती. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या विणाला स्वयंपाक करायची फारशी आवड न्हवती. तरीही ती घरच्यांच्या आग्रहाखातर ती थोडाफार स्वयंपाक शिकली होती. तिच्या घरात मुला मुलींना समान वागणूक दिली जात असे. विणा सोबत विणाच्या भावाला देखील स्वयंपाक शिकवला गेला. विणा च्या आईचे असे मत होते की ज्याला भुक भागविण्यासाठी अन्नाची गरज पडते, त्यांनी सर्वांनीच थोडाफार का होईना स्वयंपाक शिकायला हवा, मग तो मुलगा असो वा मुलगी. 

 

बघायला येणाऱ्या मुलाचे नाव अमेय होते. तो देखील विणा एवढाच शिकलेला होता. विणापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. अमेयला देखील भरमसाठ पगाराची नोकरी होती. अमेयच्या आईचा तोरा मुलगी बघायला गेला की नेहमीच वाढत असे. तिला अमेयच्या यशाचा गर्व झाला होता. 

 

अमेय व त्याच्या घरचे विणा च्या घरी येतात. इकडचे तिकडचे बोलणे होते. मग विणाला अमेयच्या आई स्वयंपाक करता येतो का? असे विचारतात. त्यावर विणा बोलते हो चपाती, भाजी, वरण भात, भाकरी रोजचा स्वयंपाक करता येतो. 

 

मग विणा आणि अमेयला बोलण्यासाठी एकटे सोडण्यात येते. त्या दोघांच्या छान गप्पा होतात. करिअर विषयी, भविष्याच्या दृष्टीने दोघांना एकमेकांचे विचार पटले. त्यामुळे दोघांनाही एकमेकांसाठी परफेक्ट वाटू लागलो. 

 

अमेय आणि विणा दोघेही बोलणे उरकून सर्वांसोबत येऊन बसतात. दोघेही आपआपली पसंती सांगतात. 

इतर गोष्टी वरून चर्चा होत असताना अमेयच्या आई विणाला म्हणतात, "तु आता इतर पदार्थ पण छान छान शिकून घे, आमच्या अमेयला सतत नवनवीन चटपटीत खायला लागते. ह्याचा सुट्टीचा दिवस असला की, ह्याच्या खाण्याच्या फर्माईश पुर्ण करण्यात जातो, आता तु आल्यावर तुलाच करावे लागेल हे. मला तर आमच्या अमेयसाठी सुगरणच मुलगी हवी. पण आता तुम्ही पसंत केल आहे एकमेकांना तर आम्ही समजून घेतोय, पण तु पण नवनवीन पदार्थ शिकुन घे, लग्नाच्या आधी. " 

 

विणा त्यावर बोलते," शिकेन की, मी आणि अमेय, आम्ही दोघे शिकून घेऊ. लग्नाच्या आधी किंवा नंतर दोघेही सुगरण होऊ. "

 

विणा च्या या वाक्यावर अमेय च्या आईच्या चेहर्यावरचे हावभाव बदलले, अमेय देखील हे ऐकून गडबडला. 

 

अमेय च्या आई विणाला बोलल्या, तो काय करेल स्वयंपाक शिकून, त्याला बाहेरची कामे असतात ना. 

 

विणाला अमेय आणि त्याच्या आईची मानसिकता कळून चुकली, त्यांना शिकलेली, नोकरी करणारी पण उत्तम गृहिणी व सुगरण देखील हवी होती. तिने त्यांची फिरकी घेण्याचे ठरवले, व बोलली कि, "चालेल मग, मी नोकरी सोडेल आणि घर सांभाळेल फक्त, मग अमेयला स्वयंपाक शिकण्याची गरज नाही,मी त्याला नवनवीन पदार्थ करून देईन." 

 

तिच्या या बोलण्यावरून अमेयला परफेक्ट वाटणारी विणा वेडी आहे की काय वाटू लागली. तो बोलला, "अगं पण मला नोकरी करणारी मुलगी हवी आहे." 

 

त्यावर विणा बोलली,"हे बघा, मला तुमचे विचार समजले, येणाऱ्या नवीन मुलीने नोकरी करून आर्थिक हातभार लावला पाहिजे, पण तिने नोकरीवरून घरी आल्यावर उत्तम गृहिणी प्रमाणे घर पण सांभाळले पाहिजे, चविष्ट स्वयंपाक देखील करावा. तुम्हाला नक्की काय हवे आहे ते सांगा, एकटी मी दोन्ही ठिकाणी उत्तम नाही होऊ शकत. माझा रोजची घरची कामे नोकरी सांभाळून करण्यासाठी नकार नाही, पण त्यात अमेयचा हातभार असावा, एवढेच वाटते. जर मी नोकरी करता करता त्याला त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून द्यावा, ही अपेक्षा असेल तुमची, तर अमेयने जास्त काही न करता भाजी निवडून देणे, एक दोन सोप्या भाज्या शिकणे, स्वयंपाकाची पूर्व तयारी करण्यात मदत करणे, एवढीच माफक अपेक्षा आहे. "

 

अमेयची आई यावर ठेक्यात बोलते," मी माझ्या मुलाला लाडात वाढवला आहे, त्याला कधी चहा करायला नाही लावला, आणि तु त्याला स्वयंपाक शिकवायचे बोलते. नको बाई हि सोयरीक, खुप चांगल्या मुली मिळतील आमच्या अमेयला. "

 

विणा अमेय आणि अमेय च्या आईला शांतपणे बोलते," मुळात मलाच लग्न नाही करायचे हे, मुलाला करीअर ओरीएंटेड मुलगी हवी, स्वयंपाक उत्तम करणारी पण हवी, घर पण नीट सांभाळायला हवे, तो स्वतः काय करणार जॉबच फक्त, त्यात त्याचे स्वतःचे घर असेल त्यामुळे त्याला आडकाठी नसणार आहे कसली आणि माझ्यासाठी सर्व काही नवीन, त्यात एवढ्या जबाबदाऱ्या, शिवाय ज्याच्या भरोश्यावर त्या घरात येणार त्याचाच हातभार नसणार मला. मी मशीन तर नाही आहे हे एकटीने करायला. मला जबाबदाऱ्या वाटून घेऊन बरोबरीने संसार करणारा साथी हवा आहे, जे एकतर अमेय करणार नाही, त्याने करायचे ठरवले तरी तुम्ही त्याला करू देणार नाही.

आणि हो तुमच्या अमेयला तुम्हाला हवी तशी मुलगी मिळेल नक्की, कारण सगळ्याच मुलींना विरोध करणे जमत नाही अजूनही. 

मिळू दे, तुम्हाला हवी तशी मुलगी, पण मी ती मुलगी नक्कीच नाही आहे. "

 

समाप्त............ 

 

©निकिता चौधरी 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now