खोटं बोलणं - एक आजार

Telling lies ....yes Papa....a kid lies and gets used to lying always

"अरे, अभ्या काय भारी सायकल आहे राव, एक नंबर भाऊ, मस्तच" प्रणव बोलला.

"माझ्याकडे पण आहे सायकल, गियर वाली सायकल आहे,पण मी ती शाळेत नाही घेऊन येत. बाबा सोडतात मला शाळेत" सुमित ने आपल्या सायकलीच कौतुक मित्रांना सांगितले

" हो का रे सुम्या? गियर वाली सायकल, ए भावा, आण की राव एकदा शाळेत, आम्ही पण बघू की चालवून तुझी गियर वाली सायकल" राघव बोलला.

" हो, घेऊन येईन एकदा..." सुमित ने उत्तर दिले.

आपल्या मित्रांच्या गप्पा ऐकत ,घोळक्यात उभा असलेल्या आनंदला प्रश्न पडला ह्या सूम्या ने सगळ्यांना सांगितलं गियर वाली सायकल आहे त्याच्याकडे, पण खरं तर सुमितकडे गियर वाली काय साधी सायकल पण नाहीये!

"काय रे सुमित...काय बिनधास्त खोटं बोललास तू? असं कसं सांगतो रे सरळ थापा मारल्या तू" आनंद ने शाळेतून घरी चालत जाता जाता सुमितला विचारले.

" अरे, काय तो अभ्या, सारखं काय ना काय नवीन वस्तू आणून शाळेत शायनिंग मारतो, म्हटलं आज आपण पण त्याला उत्तर देऊ, म्हणून मारली थाप की माझाकडे गियरची सायकल आहे!"

" आरे पण खोटं कशाला बोलायच?"

"आरे तो अभ्या कुठे माझ्या घरी येऊन बघणारे माझ्या कडे सायकल आहे की नाही ते?आनंद, अरे मित्र ज्या खोट बोलण्याने कोणाला त्रास होत नसेल, कोणाचं नुकसान होणार नसेल तर ते खोटं बोलणं वाईट नसतं रे"

अवघ्या १४ वर्षांचा सुमित आपल्या खोटं बोलण्याचे सविस्तर स्पष्टीकरण अगदी सफाईने देत होता!

ह्या अश्या खोटं बोलण्याची त्याला जणू सवय लागली होती. थापा मारणे, बोल बच्चन गिरी त्याला आवडू लागली. कॉलेज सुरू झाले आणि त्याला अजून नवीन मित्र मिळाले जे त्याचे बढाया ऐकुन भारावून जात.  त्याच म्हणणं तेच, नुकसान तर करत नाही मी कोणाचे तर मग काय हरकत आहे खोटं बोलायला.

सुमितची ही सवय त्याच्या जवळच्या मित्राला आनंदला चांगलीच ठाऊक होती. शाळे पासूनचे दोघे मित्र, आता दोघे एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. आनंदने बऱ्याच वेळा सुमितला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच बोलणं सुमितच्या काना जवळ ही पोचत नव्हते!खोटं बोलण्यात त्याचा हात कोणी धरणार नाही, अश्या गतीने तो खोट बोलत सुटला होता.

आता फक्त मित्रांन मध्येच नाही तर घरी आई वडिलांशी देखील खोटं बोलू लागला. कॉलेजला जातो सांगून पिक्चर बघायला जाणे, परीक्षेत नापास होऊन पण पास झालो हे सांगणे. घरी आईला खोटं सांगून पैसे मागून घेणे, ह्या अश्या अनेक गोष्टीत खोट बोलून तो सहज समोरच्याला गुंडाळत असे!

कसें तरी जेमतेम ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्याने पुढे शिकावं असे आई वडिलांना वाटे. त्यांनी सुमितला त्याच्या आवडीचे काही पुढील कोर्स करावे असे सुचवले! सुमितला ही एक आयती संधी आहे असं वाटलं. त्याने आई बाबांकडून पैसे घेतले, कॉम्प्युटर कोर्स करायचा आहे सांगून. पण प्रत्यक्षात तो कुठलाच असा कोर्स करत नव्हता.

सहा महिन्यांनी त्याने घरी एक छान सर्टिफिकेट आणि ट्रॉफी आणून दाखवली. आई वडिलांना त्याचं यश पाहून खूप आनंद झाला! आपला मुलगा हुशार असून किती छान प्रगती करत आहे, हे पाहून दोघांना खूप समाधान वाटले.पण वास्तव त्यांच्या मैलो दूर होते. सुमित ने कुठला ही कोर्स केला नसून नकली सर्टिफिकेट आणि ट्रॉफी दाखवून आई वडिलांना फसवले!

कोर्स साठी घेतलेल्या पैशातून त्याने मित्रांना पार्टी दिली, नवीन महागडा मोबाईल घेतला. शायनिंग मारायला नावे कपडे,बूट, निर-निराळी परफ्युम्स विकत घेतली! त्याला आता 'खोटं बोलणं' ही कला वाटू लागली. त्याच्या नकळत दिवस भरात तो अशी किती खोटं बोलत असेल त्यांचे त्यालाच भान उरले नाही!

काही कालांतराने ह्या खोटं बोलण्याचा त्याला आणि त्याच्या परिचितांना भयंकर त्रास होऊ लागला.जेव्हा घरी सुमितचे सत्य घरी कळले, तेव्हा त्याने कबूल केले, की तो असच बऱ्याचदा खोटं बोलत असे! का करायचा? खरं तर ह्या प्रश्नाचे सुमितकडे ही उत्तर नव्हते! जवळच्या मित्रांनी/ लोकांनी, सुमितला डॉक्टरांची गरज आहे, त्याला डॉक्टरला दाखवा असा सल्ला दिला.

आई वडील सुमितला घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुमितला खोटं बोलण्याचा आजार होता. तो औषधांनी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने बरा होऊ शकतो.सहज थापा मारण्याने सुरुवात करत, सुमित आता नुकसान दायक खोटं बोलण्या पर्यंत ठेऊन ठेपला होता!

नशिबाने सुमित मध्ये चांगला परिणाम दिसून आला.
त्याने डॉक्टरांना चांगला प्रतिसाद दिला. औषधे देखील आपलं काम करू लागले, अन् काही महिन्याच्या उपचारा नंतर एक वेगळा सुमित सगळ्यांना भेटला!

©तेजल मनिष ताम्हणे