खोबऱ्याची वडी..

खोबऱ्याची वडी

#कथा

#खोबऱ्याची वडी

©स्वप्ना...

     तीनच्या ठोक्याला ती पळत माडीवर जायची,..दरवाज्यातुन डोकावून बघायची,..तर लगेच आवाज यायचा ,"हम्म ये ये वेळेत आलीस,.."

             ती चोरट्या अंगाने आत शिरायची,..अक्का लगेच चटई टाकून पालथ्या झोपायच्या बाजूला रॉकेलची वाटी ठेवलेली असायची,..अक्का म्हणायच्या ,"घड्याळाकडे बघ बरोबर तीन वर काटा इथून पुढं वीस मिनीट पाय चोळलेस तर दोन वड्या मिळतील आणि आधीच पळालीस तर एकच वडी मिळेल,.."

         वडी तिच्या आवडीचा पदार्थ आणि तो ही खास अक्कांच्या हातची वडी तर अगदीच पोटातून आवडत होती,..

       खुप कष्ट केल्याने आता उतारवयात अक्कांचे पाय दुखायचे मग ते असे रॉकेलने चोळले कि जरा शांत व्हायचे,...पण रोज चोळून देईल कोण?म्हणून अक्कांच्या ह्या योजना चालत होत्या,..वाड्यातल्याच भाडेकरूंच्या पोरी त्यासाठी येत शिवाय अक्काची नातवंड देखील होती,..पण काहींना ते वीस मिनटं देखील कंटाळा येत होता,..

              मनी मात्र आवर्जून जात होती आधीच सावत्र आईच्या हाताखाली कामं करून,शिव्या खाऊन,कधीतरी मार खाऊन भेदरून गेलेली ती हरणी तिला अक्काचा आधार वाटायचा ते वीस मिनीट दिवसभरातले सुंदर क्षण असायचे मनीचे,..

     कधी अक्का भजन म्हणत,कधी गोष्ट सांगत तर कधी नुसत्याच गप्पा आणि कधी भयाण शांतता,...पण त्या वीस मिनिटानंतर स्वच्छ हात धुतल्यावर मिळणारी खोबऱ्याची वडी तोंडात टाकली कि त्या चवीचं जे नातं मनाशी,पोटाशी व्हायचं त्यात मनी खुश असायची,...

       हा असा काळ जात होता आणि एकदिवस मनीच्या वडिलांची बदली झाली,...मनी सगळ्यात जास्त रडत होती,..अक्का देखील खुप नाराज झाल्या होत्या,..पाय तर कोणीतरी दाबेलच पण त्या लेकराशी अक्काची वेगळीच नाळ जुळली होती,..अक्का मनीला जाणून होत्या मनी खुप कष्टाळू आणि प्रामाणिक होती,..निघताना मनी अक्कांच्या पायापडली तेंव्हा अक्कांनी डबाभर वड्या मनीसाठी दिल्या,.. मनी म्हणाली,"अक्का त्या वडीसाठी मला तुमच्यासोबत जो वेळ मिळाला आणि त्यात तुम्ही माझ्या मनात जी तत्व पेरली ती मी नक्की लक्षात ठेवेल."

अक्कांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला,.."खुप मोठी हो"असा आशीर्वाद देखील दिला.

   काळ बदलला अचानक नातसुनेला बरं नाही म्हणून अक्कांच्या नातवाने अक्काला त्याच्या नोकरीच्या गावी नेलं,..नातसून दुसऱ्यांदा गरोदर होती,..सगळ्या कामाला बायका होत्या फक्त घरात कोणी मोठं असावं म्हणून अक्काला आणून ठेवलं होतं,..अक्काचा स्वभाव बोलका असल्याने शेजारी पाजारी ओळखी झाल्या होत्या,..एकदिवस अचानक पलीकडची सोनी आईला समजावत होती,"अग ती काकु मला काही वाईट काम नाही सांगत त्यांच्या सासुबाई आहेत ,त्या आजीचे पाय दाबतो आम्ही,..आणि मला आवडतं तिच्याकडे जायला आणि तिच्या हातची ही वडी तर बघ किती छान लागते,.. आम्ही चौघी जातो तिच्याकडे,..खुप चांगल्या गोष्टी शिकवते ती आम्हाला,..आणि कामं अगदी सोपे जमतील असेच सांगते.

    अक्काने सगळं ऐकलं आणि त्यांना वाडा आठवला,मनी आठवली,..त्या सहजच म्हणाल्या सोनीला,"मला नेतेस तुझ्यासोबत.."सोनीची आई हसत म्हणाली,"तुम्हाला हवी का खोबऱ्याची वडी..?"अक्का म्हणाल्या,"बघू तर द्या ती कोण काकु आहे,आणि काय सांगते लेकरांना.."

      त्यादिवशी अक्का गेल्याच सोनीसोबत,..एका वयस्कर बाईने दार उघडलं,..सोनी म्हणाली,"ह्या त्या काकूंच्या सासुबाई आहेत.."अक्काने हात जोडले,..सासुबाईने त्यांना आत घेतलं,.. अक्काने सहज चौकशी सारखं विचारलं,.."ह्या मुली येतात तुमच्याकडे आमच्या शेजारच्या म्हंटल बघावं काय आहे नेमकं.."त्यावर हसत सासुबाई म्हणाल्या,"अहो फार काही नाही, माझी सुन चांगल्या नोकरीवर आहे,..दिवसभर मी घरी एकटी असते,..वयाने हातपाय दुखतात तर सूनबाईने नवीनच योजना काढली,..एकदिवस छान खोबऱ्याच्या वड्या केल्या आणि ह्या खेळणाऱ्या मुलींना बोलावलं,.. म्हणाली,"दोघी दोघींनी मिळून आजीचे पाय दाबून दयायचे दहा दहा मिनिटं बदल्यात वडी मिळेल,..आधी मुलींनी जरा नाखुशी दाखवली वडी कशाला,..?आम्हाला नाही आवडात,..पण त्यांना पहिल्या दिवशी पाय न दाबताच वडी दिली तर त्या एकदम खुश,..आल्याना लगेच दुसऱ्या दिवसापासून पाय दाबायला आणि वडी खायला,..माझा वेळ छान जातो,..माझी सून त्यांना कामं करता करता गोष्टी सांगते..पोरी अगदी खुश होतात,.. सोनी म्हणाली,"हो आजी खुप छान छान गोष्टी असतात काकूंच्या..आणि वडीसुद्धा.."

    सासूबाईंनी वाटीत वडी आणली,..अक्काने वडी तोंडात टाकली,अगदी तिच चव जी आपल्या वडीला होती,..अक्कांचे डोळे पाणावले..

   तेवढ्यात दारात मनी उभी राहिली,.."थकलेल्या अक्का तिने लगेच ओळखल्या,..किती वर्ष लोटली पण त्या तश्याच होत्या,..पांढऱ्या केसांचा अंबाडा,.. बारीक काठच नऊवारी,..चेहरा थोडा थकेलला..

     मनी काहीच बोलू शकली नाही तिने पटकन जाऊन खोबऱ्याच्या तेलाची वाटी आणली आणि अक्कांच्या पाय दाबायला सुरुवात केली,... अक्कांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं,..मनी म्हणाली,"अक्का वीस मिनीट झाले द्या माझी वडी.."

मनीच्या वाक्यावर दोघी हसल्या,..मनी सासूबाईंना म्हणाली,"हा वडीचा गोडवा अक्कानी तेंव्हा मनात पेरला म्हणून तो वसा आज मला चालवावा वाटला,..समाजात कुटुंबाशिवाय सभोवतालची माणसं अशी असावी जगण्यात म्हणजे वडीचा गोडवा आयुष्यभर पुरतो हो ना अक्का म्हणत मनी अक्कांच्या गळ्यात पडून रडायला लागली."

            वाचकहो असेच ब्लॉग्स वाचण्यासाठी swpana blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा...अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा.

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद.