खिडकी @राधिका कुलकर्णी.

थोडेसे मनातले वैचारिक आत्मविश्लेषण..

खिडकी

©®राधिका कुलकर्णी.

खिडकी म्हणले की डोकवणे आलेच.

सहज स्वाभाविक गुणच आहे मानवी मनाचा काही उघडे दिसले की त्यात वाकून बघायचे.

घराला खिडकीची योजना का?

तर घरात हवा खेळती रहावी.घरातले वातावरण शुद्ध आणि प्रसन्न व्हावे.

पण खिडकीचे इतकेच उपयोग आहेत का मित्रहो??

तरऽऽऽ तसे मुळीच नाहीये.

लोकांनी सोयी सवडी आणि गरजेनूसार ह्याचे अनेक फायदे शोधुन काढलेत.

म्हणुन तर गाणे पण फेमस झालेय जुन्या काळात..

"शाम ढले खिडकी तले

तूम सिटी बजाना छोड दो।"

प्रेमी युगुलांनी तर ह्या खिडकीचा किती विविध रूपांनी फायदा घेतलाय ते आपण चित्रपटांमधुन आणि कित्येकदा प्रत्यक्षदर्शी ही बघितलेच असेल.

खिडकीतुन चिठ्ठ्या पोहोचवणे,दार उघडे असुनही गुपचूप तासनतास खिडकीतुन गप्पा मारणे तर मैत्रीची पर्वणीच जणू.

"घे ग,तुझी दुधाची पिशवी बाहेरच टाकुन गेला बघ दूधवाला..."असे सांगत खिडकीतुन जाता जाता शेजारधर्म पाळणारी आईची प्रेमळ मैत्रिणही ह्याच खिडकीचा वापर करते.

कधी चाळीतील घरांमधे पाहुणे अचानक आले आणि दूध,चहा पावडर किंवा साखर संपली तर त्यांना नकळत रसद पुरवठ्याची हमखास सोय म्हणजे हिच खिडकी.

पण काय हो हीच खिडकी जर आपल्या शरीरावर असती तर!!

म्हणजे,

उदा: जर एखाद्या जाड्याच्या ह्रदयाला ही खिडकी असती तर??

तर त्याला दिसले असते ना की त्याच्या अवास्तव पसरलेल्या देहाला रक्त पुरवठा करता करता बिचाऱ्या ह्रदयाची किती त्रेधा उडतीय.ते शिव्या घालुन धापा टाकत सांगेल,"अरेऽऽ जरा ह्या देहाला आवर घाल...किती उधळलाएस चौखूर गूरासारखा?"

"आता तु जर वेळेवर थांबला नाहीस ना तर मीच थांबेन एक दिवशी."

जर हिच खिडकी एखाद्याच्या पोटावर असती तर!!

अरेरेऽऽऽ..!!

तिथली गटार बघुन तर आपणच आपल्या नाकावर हात ठेवला असता.स्वत:च माजवलेल्या घाणीची किळस करून तोंड फिरवले असते.

मग कळले असते की बकाबका अद्वा-तद्वा चरून आपणच आपल्या शरीराची काय दुर्दशा करून ठेवलीय ते.

कदाचित ते पाहुन तरी आरोग्याचे महत्त्व पटून लोक "नियमीत व्यायाम आणि संतुलित आहार" 

ह्या संकल्पनेला राबवते झाले असते.

वरून नुसते सुंदर दिसणारे शरीर आतुनही स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले असते नाही का!!

तशीच एक खिडकी मनालाही असती तर !!!

अंतरंगात प्रत्येका विषयी वर्षानुवर्षे जतन करून  पाळून ठेवलेली आसूया,अढी,राग,संताप,

लोभ,मद,मोह,मत्सर,द्वेष,इर्षा ह्या षङरिपूंमुळे ते किती मलीन आणि काळे कभिन्न झालेय हे दिसले असते.

कदाचित ते अंतरंग रडताना दिसले असते.

म्हणाले असते,"अरेऽऽऽ चढाओढीच्या स्पर्धेत पळता पळता माझी काय वाईट अवस्था करून ठेवलीएस तूऽऽ!!! "

"का? कशासाठी?"

"शेवटी काय नेणारेस सोबत?"

"मग का एवढी आसक्ती मोह अन् मायेची भूक तुला?"

"तुझ्या आसुरी भुकेला कोंबुन कोंबुन मी पार मरून गेलोय रेऽऽऽ!"

"गुदमरतोय माझा आत्मा."

"माझी ह्यातुन सोडवणूक कर."

"माझी ही अमानूष पिळवणूक थांबव रे मनुष्या थांबव. !!"

नाहीतर एक दिवस तो असेल की मी उरणार नाही.

मी नसेल तर तू ही नसशील.असून नसल्या सारखा भीक मागशील मन:शांती साठी पण ती ही मिळणार नाही आणि तडफडुन मरशील तु आणि तुझ्यासहित मी ही..!!!

म्हणुन एकदाऽऽ फक्त एकदा तरी ह्या खिडकीत वाकुन बघऽऽ....!

एकदाच बघ....!!!

अंतरंगावरची ती काजळी पुसुन तर बघ...!!

मग दिसेल चहुकडे पसरलेला प्रसन्न धवल,उज्वल प्रकाश आणि तिच निरामय शांतताऽऽ…!!

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात त्याप्रमाणे

मन करा रे प्रसन्न।

सर्व सिद्धिंचे कारण।

मोक्ष अथवा बंधन।

सुख समाधान इच्छा ते।

~~~~~~~~~~~~~(समाप्त)~~~~~~~~~~~~~~                 

©®राधिका कुलकर्णी..

🎭 Series Post

View all