खिडकी..

खिडकी.. मनाच्या आत डोकावणारी..



खिडकी.
©स्वप्ना...
रिक्षावाल्याने बरोबर स्टेशनच्या दारासमोर रिक्षा उभी केली. त्याला हातात चुरगाळत घेतलेल्या नोटांपैकी एक नोट देत पळतच ती तिकीट खिडकीकडे पळाली.
“आता कोणती ट्रेन उभी आहे?”
तिचा प्रश्न ऐकून आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघत तो म्हणाला,
"तासाभराच्या प्रवासाची ह्या पुढचा ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे.”
ती म्हणाली,
"मला ना प्रवासाला जायचंय. मला द्या ह्याच ट्रेनच तिकीट."
त्याने हसत पिसीवर टायपिंग केली,

“मॅडम हीच ट्रेन परतीची आहे तासाभरात ते पण देऊ का?”
त्याच्या ह्या प्रश्नावर ती म्हणाली,
"म्हणजे परत येऊच का? तिथून पुढे दूर निघून जाणारी ट्रेन असेल ना?”
तो हसला.

"किती दूर जाता मॅडम? कुठेही जा पळसाला पान तीनच."

ती आणखीनच चिडली.

“कुठे तरी सापडेल एक पानाचं पळस.."

तो म्हणाला,
"काय कामाचं ते एका पानाचं पळस? एखादा दिवस आवडेल तुम्हाला. परत वाटेल नकोच आपलं साधंच बरं नेहमीच..”

एवढं बोलत त्याने तिकीट तिच्या हातात देत म्हणाला,
"खास विंडो सीट येता जाता.. अशी खिडकी जी बाहेर डोकवता डोकवता आतही डोकवायला लावते.. प्रवासातली खिडकी.."

त्याच्या बोलण्यावर डोळ्याच्या कोपऱ्यातून रागाचा कटाक्ष टाकत ती पळली. दादर चढताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे बघतच होता. त्याने बदमाशपणाने अभिमान मधल्या अमिताभसारखं बोट ओठाजवळ नेत तिला डोळ्याने खुणावलं. तशी ती चिडून हात उगरत पळाली. हे सगळं बघणारा शेजारचा पाटणकर उठून त्याच्या जवळ आला. त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला,

"काय हो ओळखीची आहे का?"

हसत चष्मा नाकावर सरकवत तो म्हणाला,

"शी इज मिसेस माने."

पाटणकर आ करून बघत राहिला.

“अरे तेच म्हणतो मी तू त्यांना नाव न विचारता तिकीट दिलं.. तेंव्हाच वाटलं.. पण अरे त्या गेल्या कुठे?”

“खिडकीशी भेटायला..”
असं माने म्हणताच पाटणकर ओरडला.
व्हॉट..? काय म्हणालास? खिडकीला भेटायला? म्हणजे काय?”
“चल कॉफी घेऊ आपण.. ए जोशी जरा काऊंटरवर लक्ष दे आम्ही आलोच.. तसंही आता तुम्ही तिघे आहात..”

माने आणि पाटणकर कॉफी घेण्यासाठी आले. माने म्हणाले,
"कसं आहे ना दोस्ता, आपण ह्या आयुष्याच्या प्रवासात पळत असतो. .जे वाट्याला आलं ते आपल्या परीने रडत,कुढत, स्वीकारत,चिडत आयुष्य जगत असतो..खरंतर प्रत्येकाला गरज असते.रेल्वेची खिडकी पकडून मागे पळणाऱ्या झाडासोबत आपलं आयुष्य मागेही कसं होतं हे कधीतरी बघण्याची.. म्हणजे त्या खिडकीत बसून आपल्या मनाच्या आतल्या खिडकीत डोकावण्याची.. कधीतरी असं वाटलं की हे असं करायचं,..मग ती जरा रिलॅक्स होते.. मुळात तिला आयुष्याने फार त्रास दिला आहे.. तरीही मनाला सावरत ती आज इथपर्यंत आहे. मला साथ देते मग मलाही तिला अश्या प्रवासाला जाऊ द्यावं वाटतं. म्हणजे आम्हीच हा मार्ग शोधलाय आमच्या जगण्यात कारण दुःखाची तीव्र किनार आहे आयुष्याला.. मग त्यासाठी स्वतःला खंबीर करत राहायचं. डोकवायच शांत होऊन आतल्या आत,..कसं असतं आयुष्य आणि कसं बदलत जातं ह्याचा एकटेपणाने विचार करायचा."
हे सगळं बोलताना नकळत पाणी आलं मानेच्या डोळ्यात त्याने ते पुसण्यासाठी चष्मा काढला. रुमालाने डोळे पुसताना तो म्हणाला,

"तुला माहीत आहे ना हे माझं दुसरं लग्न..पहिल्या बायकोपासून मला मुल झालं पण ते मतिमंद जन्माला आलं आणि तिने चक्क मला घटस्फोट दिला,..असलं मुल असलं आयुष्य मी जगूच शकत नाही म्हणत तिने त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी मी तिला मोकळं केलं. आता फार मोठा प्रश्न माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांचा होता. तो मतिमंद नातू,घटस्फोटित मुलगा सगळंच त्यांच्या इझी गोईंग आयुष्याच्या विरुद्ध होतं. त्यांना हे सगळं वेगळंच वाटू लागलं त्यामुळे ताण घेऊन त्यांना आलेले अटॅक.. त्यांची उतारवयात वेगळीच परीक्षा.. पहिल्यांदा मला जाणवलं फक्त पैसा असून उपयोगाचा नाही. खंबीर साथ आवश्यक आहे जगण्यात पण लग्नाच्या बाजारात आता माझ्याशी, माझ्या पैश्याशी,नोकरीशी लग्न करायला बरेच जण तयार होते पण ह्या मतिमंद मुलाच्या बापाशी कोणाला लग्न करायचं नव्हतं.. मला आता फक्त मला सुख देणारी बायको नाही तर माझ्या आई वडिलांची आणि माझ्या मुलाची आई होईल अशी जोडीदारीण हवी होती.. माझी ही अपेक्षा अवास्तव होती पण मन कुठेतरी शोधत होतच कारण हे सगळं आयुष्य एकट्याने जगण्याची हिंमतच नव्हती माझ्यात.. मध्यंतरी असाच माझ्या मावशीकडे कार्यक्रमात गेलो होतो. तिथे ही भेटली.. मनाने उगाच कौल दिला हीच जिला आपण शोधतोय. मावशीकडे पोळ्या करायला येत होती. सहज चौकशी केली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यावर रेप झाला होता. कॉलेजमधल्या मुलांचं कृत्य.. प्रेम म्हणत फसलेली ती.. रेप झाला म्हणताच घरच्यांनी गदारोळ केला. लगेच जख्खड म्हाताऱ्यासोबत लग्न ठरवलं. तो पैसे देणार होता म्हणून घरच्यांनी तिला विचारलं नाही. तिची आईच तिला म्हणाली,
"रेप झाल्यावर आता दिवसही राहिलेत कोण स्वीकारतील तुला? हे लग्न कर म्हणजे तू सुखी आणि आम्ही सुखी.."

आपली आईच असं म्हणते म्हंटल्यावर पाठिंबा आता कोणी देणार नाही तिने निर्णय घेतला आणि ती घरातून पळाली स्टेशन गाठलं. मिळेल त्या रेल्वेने नव्या शहरात आली. रेल्वेच्या खिडकीत बसून आयुष्याच्या फ्लॅशबॅक परत उजळणी करून घेतला. तिला आपल्या नात्यातले बरेच जण आठवले जे लेकरू व्हावं म्हणून नवस, ट्रीटमेंट सगळं करतात आणि आपल्याला का ही शिक्षा? खिडकीतून उदास होऊन ती सगळं आठवत होती पण हीच खिडकी तिला नवं आकाश,नवे किनारे दाखवत होती. रेल्वेत आलेले अपंग,आंधळे तिला संघर्ष असून जगण्याची आस बाळगून कस जगावं हे शिकवत होते. तिने ठरवलं. नव्या शहरात मोठ्या घरांसमोर पोळ्याची कामे मागितली दिवसात वीस तीस घर फिरली तेंव्हा कुठे दोन काम मिळाले. हळूहळू जम बसला नंतर दहा घरच्या पोळ्या करते शिवाय शिक्षण पूर्ण केलंय. मावशीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी मावशीला हिंमत करून म्हणालो,

"माझ्यासोबत लग्न करशील का विचार तिला?"

माझ्या प्रश्नावर मावशीने आ केला.

“अरे जात पात माहीत नाही आणि रेप झालाय तिच्यावर हे ऐकलं ना तू?

मी उदास हसत म्हणालो,
"माझी पहिली बायको जातीतली,रेप न झालेली होती पण पवित्र बंधातून जन्म दिलेल्या माझ्या मुलाला सांभाळलं नाही,..हिने वाईट कृत्यातून झालेलं मुल आईच्या मायेने सांभाळलं ना,..हिच्या मनाची खिडकी मजबूत आहे.. मावशी तू विचार तिला मी तिच्या मुलीसह स्वीकारतो तिला.."

मावशीने विचारलं ती भेटायचं म्हणाली,भेटीत एवढंच म्हणाली.
"मी स्वीकारेल तुमच्या मुलाला पण हा नवा संघर्ष मला पेलवेल अस नाही तुमची साथ लागेल.”
मी चटकन म्हणालो,
"माझी साथ तर असणारच.."
ती हसून म्हणाली,
"एक वेगळी साथ.. आयुष्याच्या प्रवासात मला रेल्वेच्या खिडकीत बसून मनाच्या आतली खिडकी उघडता आली. आपल्या ह्या संसारात मी कधी उबगले तर मला आवडेल त्या खिडकीत बसून एक असा प्रवास करायला जो परत मला माझ्यातली मी शोधून देईल.”
तिच्या वाक्यावर मी म्हटलं,
“आणि तू हे सगळं सोडून दूर कुठे निघून गेलीस तर?”
ती खळखळ हसत म्हणाली,
“अहो नाही जाणार मनाची खिडकी एक चौकट बाळगून असते आपल्या भोवती. ती असते जबाबदारीची.. त्या जबाबदारीचा कधीतरी शीण आला की अश्या प्रवासाच्या खिडकीतून त्या चौकटीला बघायचं मग ती आपल्याला तो निसर्ग दाखवते जो सतत संघर्ष करत जगत असतो..ते अवकाश दाखवते जे आपल्यावर आशीर्वादाची शिंपण करत असतं..फक्त गरज असते नवं होऊन त्या खिडकीत जाऊन डोकावण्याची,..जबाबदाऱ्या टाळायच्या नसतात फक्त त्या स्वीकारायला आपली ताकद अश्या प्रवासाने वाढवायची असते,..मला हा प्रवास कुठलंही कारण न विचारता तुम्ही करू देणार आहात का माने? मग मी तयार आहे.. तुमच्या आयुष्याच्या खिडकीत माझ्या लेकीसह येण्यासाठी.."
कॉफी संपली होती. मानेची लव्ह स्टोरी संपली. पाटणकर आश्चर्याने बघत होता.
“असंही जगतात माणसं?”
त्याच्या प्रश्नावर हसत माने म्हणाले,

"आम्ही तर जगतोय. आता तूच विचार कर,..स्वतःवर झालेला अत्याचार,त्यातून झालेलं लेकरू,त्यात माझं मतिमंद मुल ,माझे आई बाबा,..हे सगळं ती आता समर्थपणे पेलते.. अशीच कधीतरी चिडते,उबगते आणि मग तास,दोन तास सगळं सोडून निघून जाते आज गेली तशी..”
त्यावर पाटणकर म्हणाला,
"मग घरी सगळे विचारात पडत असतील ना?"
माने म्हणाले नाही तिने सगळ्यांना अश्या खिडक्या शोधायला शिकवलं आहे. माझा मुलगा चित्रात अश्या खिडक्या शोधत बसतो,..मुलगी गाण्यात शोधते,.. आई बाबा घराच्याच खिडकीतून त्यांच्या विचारांची खिडकी शोधतात आणि त्यांना सगळ्यांना हिची खिडकी माहीत आहे,त्यामुळे तेवढा वेळ सगळे ऍडजस्ट करतात.”
पाटणकर म्हणाला,
"आणि माने तुमची खिडकी.?
"माने हसत म्हणाले,
"अरे ही माझी बायकोच माझी खिडकी आहे.. तिने तिचं माझं नातं इतकं छान जोपासलय की मला तिच्या डोळ्यात माझी खिडकी सापडते. अरे तुटून गेलेली स्त्री जर एवढया ताकदीने जगते तर आपण काय?”
अस म्हणत माने निघाले. काही वेळात परतीच्या ट्रेनने मिसेस माने उतरल्या. खरंच दोघांचं बॉंडिंग जबरदस्त होतं. दोघांनी फक्त डोळ्यात बघितलं.त्यांनी हात पुढे केला तिने तो पकडला.. तिकडे ट्रेन निघाली इकडे ही जोडी निघाली.
कलिग मनोमन म्हणत राहिला..
“मनाच्या खिडक्या योग्य मिळाल्या की रेल्वेच्या सुखकर प्रवासासारखा आयुष्याचा प्रवास सुखकर होत असेल ना,..”
©स्वप्ना अभिजीत मुळे(मायी)औरंगाबाद