खेळ दि गेम ऑफ लव अँड हेट (भाग ६)

This is suspense story

आरण्यक घरी गेला तर स्मिता त्याचीच वाट पाहत होती.ती ही चिंतीत दिसत होती.अरण्यकला पाहून ती त्याला म्हणाली.

स्मिता,“ जा आधी फ्रेश होऊन ये मग ब्रेकफास्ट करत आपण बोलू!

      अरण्यकने नुसती मान डोलावली आणि तो त्याच्या रूममध्ये गेला.तो ही खूप थकलेला आणि चिंतीत दिसत होता.तो फ्रेश होऊन आला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. स्मिता त्याचीच वाट पाहत होती. तिने अरण्यकला नाश्ता सर्व्ह केला आणि बोलू लागली.

स्मिता,“ अरु काय आहे हे सगळं तुझी आणि रावीची न्यूज ब्रेकिंग न्यूज झाली आहे.तू तर रात्रीच घरी येणार होतास ना? आपल्याला या गोष्टींची सवय आहे नाही तरी तुझी इमेज  प्ले बॉयचीच आहे! पण रावीची हकनाक या मध्ये बदनामी होत आहे.असं ही या मध्यम वर्गीय लोकांना त्यांनी इमेज आणि प्रतिष्ठा खूप प्रिय असते पण आज तुझ्यामुळे तिच्या इमेजला धक्का लागला.तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात आहे.ती हे सगळं कसं फेस करणार आहे?” त्या थोड्या नाराजीनेच बोलत होत्या.

अरण्यक,“ तुझं बरोबर आहे मम्मा माझ्यामुळेच तिची बदनामी होत आहे आजपर्यंत माझ्या प्ले बॉयच्या इमेजचा मला कधीच फरक पडला नाही पण आज मला खरंच वाटतंय की माझी इमेज आणि मी खूप चुकीचे होतो.माझ्यामुळे एका चांगल्या मुलीची बदनामी होत आहे.तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात आहे!” तो रडकुंडीला येऊन बोलत होता.

स्मिता,“ ,पण तू तर लगेच लोणावळ्यावरून परत येणार होतास ना मग हॉटेलवर का थांबलास?” त्यांनी विचारले.

अरण्यक,“ हो आम्ही मिटींग झाली की मुंबईकडे निघालोच होतो पण लोणावळ्याच्या दोन तीन किलोमीटर बाहेर माझ्या कारचे टायर पंचर झाले पाऊस तर नुसता थैमान घालत होता.थोड्याच अंतरावर एक हॉटेल दिसले.पण मेकॅनिक इतक्या रात्री आणि पावसात येणे शक्य नव्हते आणि त्या हॉटेलमध्ये एकच रूम अव्हेलेबल होती तरी मी मिस चव्हाणला म्हणालो की तुम्ही रूममध्ये झोपा मी लॉबीत थांबतो पण थंडी खूप असल्याने त्या म्हणाल्या आपण ऍडजस्ट करू आणि हे सगळं झालं! मी नसत त्यांचं ऐकलं तर बरं झालं असत मम्मा त्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला आणि आज माझ्यामुळे त्यांची बदनामी होत आहे!” तो नाराजीने बोलत होता.

     स्मिता काही बोलणार तर तो पर्यंत अरण्यकचा फोन खणखणला.फोन सीमाचा होता त्याने फोन उचलला तर सीमा घाबरून बोलत होती.

सीमा,“A. V.सर रावीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले आहे तुम्ही लवकर या मला खूप भीती वाटतेय ती स्वतःच काही बरं वाईट करून घेईल!” ती रडत बोलत होती.

अरण्यक,“ मी आलोच!” असं म्हणून तो ब्रेकफास्ट करता करता उठून जाऊ लागला तर स्मिताने त्याला घाबरून विचारले.

स्मिता,“ काय झालं अरु कोणाचा फोन होता इतक्या घाईने कुठे निघालास?”

अरण्यक,“ मम्मा रावीच्या रूममेट सीमाचा फोन होता.रावीने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले आहे कदाचित ती….” त्याचे पुढचे शब्द घशातच राहिले आणि तो घाई घाईने निघाला. 

       अरण्यक होस्टेलवर पोहोचला तर रावीच्या रूम बाहेर मुलींची गर्दी होती. हॉस्टेलची रेक्टर ही तिथे उभी राहून दार वाजवत होती. सीमा अरण्यकच्या समोर रडत आली आणि म्हणाली.

सीमा,“A. V.सर अहो किती वेळ झालं रावी दारच उघडत नाही मी तिचा आणि माझा नाश्ता आणायला खाली गेले होते तर येऊ पर्यंत रावीने आतून दार लावून घेतले होते. मला तिची खूप काळजी वाटते सर ती स्वतःच काही तरी बरं वाईट करून घेईल!” ती रडत बोलत होती.

अरण्यक,“ घाबरू नका सीमा तुम्ही! मिस चव्हाणला काही नाही होणार( असं म्हणून तो दारावर थाप मारत बोलू लागला)मिस चव्हाण हे बघा दार उघडा उगीच मुर्खा सारखे वागू नका. आयुष्य संपवण्यासारख इतकं काही ही झालेलं नाही!” तो तिची समजूत घालत बोलत होता

              पण आतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी त्याने दार उघडण्यासाठी दाराला  जोरात धडका मारायला सुरुवात केली आणि चार-पाच  धडकानंतर  आतील दाराची कडी सटकली आणि दार उघडले.समोरचे दृश्य पाहून सगळेच भेदरले होते. कारण रावीने स्वतःला फॅनला ओढणी बांधून लटकवून घेतले होते आणि तिच्या गळ्याला फास बसला होता ती तडफडत होती.ते दृश्य पाहून सगळे जागेवर थिजले होते पण अरण्यक मात्र भानावर होता त्याने पळत जाऊन रावीचे पाय धरून तिला वर अलगद उचलून धरले जेणे करून तिच्या गळ्याचा फास सैल झाला आणि तो सीमाला ओरडून म्हणाला.

अरण्यक,“ सीमा खुर्चीवर चढून त्यांच्या गळ्याचा फास सोडावा.” 

     सीमा भानावर आली आणि तिने खुर्चीवर चढून रावीच्या गळ्या भोवतीचा फास सोडवला. अरण्यकने रावीला उचलून बेडवर बसवले. रावी खोकत होती. तिला सीमाने पाणी पाजले. अरण्यक मात्र खूपच चिडला होता. तो काही रावीला  बोलणार तर हॉस्टेलची  रेक्टर  रावीला म्हणाली.

रेक्टर,“ हा काय तमाशा आहे रावी! बास झाले आता तू होस्टेलमध्ये राहू शकत नाही” त्या रागानेच म्हणाल्या.

सीमा,“ हे काय बोलताय मॅडम तुम्ही? आहो तिची अवस्था तरी बघा! अशा अवस्थेत कुठे जाणार आहे ती?” ती विनवत म्हणाली.

रेक्टर,“ का? हे आलेत की मिस्टर A.V. रावीला वाचवायला!  नाही तरी हिचे नाव यांच्याशी जोडले गेले आहेच की घेऊन जातील ते रावीला!” त्या फंकाऱ्याने  अरण्यककडे पाहत म्हणाल्या.

अरण्यक,“ हो घेऊन जातो मी त्यांना!” तो रागानेच म्हणाला आणि सीमाला रावीची बॅग भरायला सांगितली.

       रावी अजून ही काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सीमाने तिची बॅग भरली आणि अरण्यक रावीला घेऊन गाडीत येऊन बसला.रावी ड्रायव्हिंग सीट शेजारी डोळे झाकून बसली होती. अरण्यकने गाडी सुरू केली आणि काही अंतर गेल्यावर रावी अरण्यकला म्हणाली.

रावी,“ सर गाडी थांबवा मी इथेच उतरेन!” ती सीट बेल्ट काढत स्वतःला सावरत म्हणाली.

अरण्यक,“ इथे कुठे मिस चव्हाण? तुम्ही कुठे जाणार आहात आता?” त्याने बुचकळ्यात पडून विचारले.

रावी,“ ते पाहीन माझं मी आणि माझ्यासाठी जे केलं त्यासाठी thanks!” ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली.

अरण्यक,“ तुमचं तुम्ही पाहणार म्हणजे? तुमच्या बाबतीत जे काही घडले त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे म्हणून इथून पुढे तुमची जबाबदारी माझ्यावर! तुम्ही माझ्या घरी चला!” तो तिला हक्काने म्हणाला.

रावी,“ तुमच्या घरी? कोणत्या अधिकाराने येऊ मी? आधीच माझी बदनामी कमी झाली की काय म्हणून मी तुमच्या घरी राहायला येऊन ती खरी ठरवू! सर लोक मला तुमची  रखेली समजतील आणि ते मला सहन होणार नाही. तुम्ही जा मी माझं पाहून घेईन आणि मी उद्या येऊन माझा राजीनामा ही देऊन जाईन ऑफिसमध्ये! तुमच्या मागे माझी नसती ब्याद कशाला?” ती तटस्थपणे म्हणाली.

अरण्यक,“ पण कुठे जाणार आहात तुम्ही की मघाशी केला तसा मूर्खपणा करणार आहात?” त्याने रागाने विचारले.

रावी,“ हे पहा सर ते माझं मी पाहून घेईन! तुम्ही यात पडू नका! असं ही इतकी बदनामी झाल्यावर माझ्या सारख्या मुलीने काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? तुमच्यासाठी या गोष्टी रोजच्या आहेत सर तुम्ही मोठी माणसे पैसेवाल्यांचे सगळे चालून जाते पण आमच्या सारख्या मध्यम वर्गीय लोकांकडे अब्रू आणि स्वाभिमाना शिवाय काहीच नसते गमावण्यासाठी आणि ते दोन्ही ही मी गमावले आहे!” ती रडत बोलत होती.

अरण्यक,“ हे बघा मिस चव्हाण तुम्ही असा भलता सलता विचार करू नका! तुम्हांला आणि मला ही माहीत आहे की आपण चुकीचे काहीच केले नाही मग तुम्ही का घाबरून अशी निर्वानीची भाषा करत आहात? तुम्ही माझ्या बरोबर चला मी सगळं ठीक करेन” तो काकुळतीला येऊन बोलत होता.

रावी,“ आपण काही चुकीचे केले नाही सर पण हे जग आपल्याला चुकीचे ठरवत आहे. माझी हकनाक बदनामी झाली आता मला कुठेच तोंड दाखवायला जागा नाही उरली माझ्या गावी आत्याला हे सगळं कळले तर ती तर जीव देईल सर!आणि मी तुमच्या बरोबर कोणत्या नात्याने कोणत्या अधिकाराने येऊ? मी तुमच्या बरोबर आले तर लोक मला तुमची रखेल म्हणतील त्या पेक्षा निघा तुम्ही माझं मी पाहून घेईन. तुम्ही काहीच ठीक करू शकत नाही सर ना माझी झालेली बदनामी ना माझ्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे!” ती डोळे पुसत म्हणाली. अरण्यक थोडावेळ विचारात पडला आणि त्याने मनाशी काही तरी ठरवले आणि तो रावीला म्हणाला.

अरण्यक,“मिस चव्हाण तुम्हाला माझी पत्नी म्हणून तर माझ्या बरोबर माझ्या घरी यायला काहीच हरकत नसेल ना?” तो ठामपणे म्हणाला

रावी,“ काय? सर तुम्ही कुठे मी कुठे काय बोलताय तुम्ही?” ती आश्चर्याने म्हणाली.

अरण्यक,“ का नाही मिस चव्हाण? मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आज आत्ता! त्यामुळे तुमच्यावर उडणारी राळ थांबेल आणि  हे सगळं शांत झाल की तुम्ही तुमच्या मर्जीने  वेगळं होऊ शकता!” तो ठामपणे म्हणाला. 

रावी,“ पण सर…!” ती पुढे बोलणार तर अरण्यक तिला थांबवत म्हणाला.

अरण्यक,“माझ्यावर विश्वास आहे ना? मग चला!” रावीने होकारार्थी मान हलवली आणि अरण्यक तिला एका मंदिरात घेऊन गेला.

      अरण्यकने रावीशी जवळच असलेल्या मंदिरात जाऊन विधिवत लग्न केले आणि तो रावीला घेऊन घरी पोहोचला. स्मिताने दोघांच्या गळ्यात हार पाहिले आणि ती काय समजायचे ते समजून घेतले.तिने आरतीचे ताट मोलकरीनिला  तयार करायला सांगितले आणि दोघांना दारातच अडवले.ते पाहून अरण्यक जरा मनातून चरकला होता.पण स्मिता धान्याचे माप घेऊन हसत आली तेंव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. स्मिताने दोघांना ही ओवाळले आणि माप ओलांडून रावीचे विधिवत हसत मुखाने स्वागत केले. रावी मात्र अगदी शांत होती तिला स्मिताने स्वतःच्या  रूममध्ये नेले आणि तिला फ्रेश व्हायला सांगितले.तो पर्यंत अरण्यक तयार होऊन आला.अरण्यक स्मिताला बोलू लागला.

अरण्यक,“ मम्मा thank you so much! मला भीती होती की तू कशी रियाक्ट होणार पण तू सगळं सांभाळून घेतलंस!” तो म्हणाला.

स्मिता,“ गधड्या तू आता मला thanks म्हणणार!” त्या त्याला एक धपाटा देत म्हणाल्या.

अरण्यक,“ मम्मा प्लिज रावीला समजावून सांग तिने या सगळ्यामुळे फास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या सगळ्याला जबाबदार कुठे तरी मीच आहे. म्हणून तिच्याशी लग्न करून मी तिची सगळी जबाबदारी उचलली! sorry मम्मा मी माझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय तुला न विचारता न सांगता घेतला!” तो खाली मान घालून म्हणाला.

स्मिता,“अरु! बच्चा sorry काय म्हणतोस! I am proud of you!तू आज एका मुलीला आत्महत्या करण्या पासून तर वाचवलसच पण तिच्याशी लग्न करून तिचे उध्वस्त होणारे आयुष्य ही सावरलेस! पण लग्न म्हणजे जबाबदारी आहे अरु आता बाहेरचे धंदे बंद तू लग्न करून  रावीशी कमिटेड झाला आहेस! बाकी मी रावीला समजावीन आणि समजून घेईन तू नको काळजी करू!” त्या हसून म्हणाल्या.

अरण्यक,“ तू खूप मोठे टेन्शन कमी केले माझे मम्मा! बरं मी ऑफिसला जातो आहे आणि परवा दिवशी रिसेप्शन आणि रावी  आणि माझ्या लग्नाची ऑफिशियल घोषणा करू तशी तयारी सुरू कर मम्मा! आणखीन एक  रावीला कपडे, ज्वेलरी सगळं खरेदी करून दे!” तो गांभीर्याने बोलत होता.

स्मिता,“ हो अरु मी करते सगळं आणि सगळी अरेंजमेंट ही! आणि रावीला ही सावरते तू निर्धास्तपणे ऑफिसला जा आणि लंच मात्र वेळेवर कर ब्रेकफास्ट ही तू केला नाहीस आज नीट!” त्या म्हणाल्या.

अरण्यक,“  हो करतो मी लंच वेळेवर ok by!” असं म्हणून तो ऑफिसला गेला.

      इकडे रूममध्ये रावी कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात  बोलत होती.

रावी,“ वाटलं नव्हतं की मासा इतका सहजासहजी गळाला लागेल पण लागला आहे स्वतःला खूप हुशार समजतो तो! सगळ्यात मोठा मूर्ख आहे तो!” ती विजयी आविर्भवात बोलत होती.

व्यक्ती,“ सहजासहजी नाही रावी तू तुझ्या जिवावर उदार होऊन त्याला गळाला लावला आहेस! आता खरा खेळ सुरू झाला!” तिकडून हसून उत्तर मिळाले.

रावी,“ हो आता खरा खेळ सुरू झाला आहे! Welcome to hell A.V.! आज पासून अरण्यक वीरशैव याच्या  नरक यातना सुरू झाल्या.” ती त्वेषाने म्हणाली.तो पर्यंत तिला आरशातून स्मिता रूमच्या दारात पोहोचलेली दिसली आणि रावीने फोन कट केला.

         म्हणजे रावीने आणि त्या फोन वरील व्यक्तीने रचलेला हा कट होता का? पण रावी हे सगळं का करत असावी? स्वतःच्या  जीवाची आणि चारित्र्याची ही पर्वा न करता! 

या कथेचे सगळे अधिकार लेखकाकडे राखीव आहेत.

©swamini chougule

          

         

🎭 Series Post

View all