खेळ दि गेम ऑफ लव अँड हेट (भाग ५)

This is a suspense story

      आज दुपारी पर्यंत ऑफिसचे कामकाज नेहमी प्रमाणे सुरू होते. सगळे आपल्या कामात गढले होते पण रावी मात्र वरून नॉर्मल दिसत असली तरी तिच्या मनात आज खूप उलथापालथ सुरू होती.ती आज खूप मोठे पाऊल उचलणार होती.ज्यामुळे अरण्यकच्या आयुष्यात खूप मोठे वादळ निर्माण होणार होते.त्याच बरोबर रावी ही आता एका वेगळ्या टप्प्यात पोहोचणार होती.जिथून तिचा खरा खेळ सुरू होणार होता.पण अरण्यकला मात्र याची पुसटशी ही कल्पना नव्हती.तो त्याच्या कामात नेहमी प्रमाणे गढून गेला होता.लंच ब्रेक झाला. अरण्यकने लंच घेतले आणि त्याने रावीला इंटर कॉम केला.

अरण्यक,“मिस चव्हाण तुमचा लंच झाला का?”

रावी,“ हो सर!”ती म्हणाली.

अरण्यक,“ ठीक मग निघायचे का?सगळे पेपर्स नीट अजून एकदा चेक करून घ्या! मी तुम्हाला p.d दिला आहे प्रेझेन्टेशनचा तो ही लॅपटॉपला लावून एकदा चेक करून घ्या! आपण पंधरा मिनिटात निघत आहोत!” त्याने सूचना दिल्या.

रावी,“ हो सर सगळं तयार आहे आपण निघू!” ती म्हणाली.

      साधारण तीन वाजता अरण्यक आणि रावी लोणावळ्यासाठी निघाले.अरण्यक स्वतः ड्राइव्ह  करणार होता.त्यामुळे ड्रायव्हरचा प्रश्न नव्हता.मुंबई मधून लोणावळ्याला पोहोचण्यासाठी साधारण दोन तास लागणार होते आणि मिटींग तिथे एका हॉटेलमध्ये पाच वाजता सुरू होणार  होती.त्यानंतर मिटींग संपायला साधारण दोन तास म्हणजेच साधारण सात वाजता मिटींग संपवून मुबंईमध्ये रात्री नऊ पर्यंत  पोहोचण्याचा अरण्यकचा प्लॅन होता.नऊ वाजता रावीला होस्टेलवर सोडून तो घरी जाणार होता.

          

      पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे हवेत बराच गारवा होता आणि थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या.रावी आणि अरण्यक लोणावळ्यासाठी निघाले होते.वातावरण तसे आल्हाददायक होते.रावी बाहेरील निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होती.जिकडे तिकडे हिरवा शालू लेवून नटलेली वसुंधरा लाजत होती. डोंगर आणि घाटमाथे ढग खाली उतरल्याचा भास निर्माण करत होते.संध्याकाळची वेळ असल्याने पक्षांचे थवेच्या थवे आकाशातून त्यांच्या घरट्याकडे जाताना दिसत होते. ऊन पाऊस आणि सावली यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता आणि त्यामुळेच अधेमधे इंद्रधनणुष्य  दिसत होते.रावी मात्र शांत राहून सृष्टीचा हा अनुपम सोहळा निहाळत होती.अरण्यकने fm लावले होते आणि तो ड्रायव्हिंग करण्यात मग्न होता.मध्येच तो रावीकडे पाहत होता पण रावीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं.ती आतून खूपच बेचैन होती तरी थोडावेळ का होईना सृष्टी सौंदर्य पाहण्यात ती सगळं विसरून गेली.अरण्यकने ब्रेक लावून गाडी थांबवली आणि रावी गाडी थांबल्यामुळे भानावर आली.ते मिटींग व्हेन्यूवर पोहोचले होते. सन शाईन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिटींग होती.दोघे ही हॉटेलच्या प्रायव्हेट एरियामध्ये जाऊन पोहोचले तर क्लायंट तिथे आधीच हजार होते.मिटींग सुरळीत पार पडली पण अंदाजा पेक्षा जास्त वेळ लागला त्यात पाऊस ही धो-धो कोसळू लागला.रावी आणि अरण्यकला लोणावळ्यातुन निघायलाच  नऊ वाजून गेले होते.बाहेर पाऊस नुसता मी म्हणत होता आणि अरण्यक नेटाने गाडी चालवत होता.रावीच्या मनाची मात्र घालमेल होत होती.जणू काही आता येणारा प्रत्येक क्षण तिची परीक्षा घेणार होता. अरण्यकने तिची घालमेल ओळखली आणि तो म्हणाला.

अरण्यक,“ काळजी नका करू मिस चव्हाण आपण अकराच्या आत मुबंईमध्ये पोहोचू!”

रावी,“ हो सर” इतकच म्हणाली.

     आरण्यकला वाटत होतं की उशीर झाला आहे म्हणून रावीची घालमेल होत आहे पण रावीच्या घालमेली मागे वेगळेच कारण होते.जे अरण्यकला माहीत नव्हते.लोणावळ्याच्या बाहेर काही किलोमीटरवर फट्ट असा फटका फुटल्या सारखा आवाज आला आणि गाडी थांबली.अरण्यक आता काय झाले अशा त्रासिक अविर्भावात छत्री घेऊन गाडीतून उतरला आणि त्याने गाडीच्या हेडलाईतच्या प्रकाशात पाहिले तर गाडीचे टायर फुटले होते.वरून पाऊस नुसता बेभान होऊन बरसत होता. रावीने गाडीत बसूनच अरण्यकला विचारले.

रावी,“ काय झाले सर?”

अरण्यक,“ गाडीचे टायर फुटले आहे त्यात आपण लोणावळ्याच्या चांगले दोन तीन किलोमीटर बाहेर आहोत! मोबाईलला नेटवर्क नाही आणि जवळ पास गॅरेज ही दिसत नाही त्यातून हा पाऊस थांबायचे नाव घेत नाही!” तो वैतागून म्हणाला.

      रावी छत्री घेऊन  गाडीतुन उतरली आणि इकडे तिकडे पाहत त्याला चिंतीत स्वरात  म्हणाली.

रावी,“ आता काय करायचे सर आपण?”

     सगळी कडे काळोख दिसत होता आणि पावसाची रिप-रिप तर सुरूच होती.अरण्यक ही आता काळजीत पडला होता पण रावीला तसं न दाखवता तो सगळीकडे नजर फिरवत होता त्यातच त्याला  पंधरा फूट लांब एक लाईट असलेला बोर्ड दिसत होता.बहुदा तो एखाद्या लॉजचा किंवा हॉटेलचा बोर्ड असावा असा अरण्यकने कयास बांधला आणि तो रावीला म्हणाला.

अरण्यक,“ मिस चव्हाण तो बघा तिकडे एक बोर्ड दिसत आहे कदाचित ते एखादे हॉटेल किंवा लॉज असावे आपण गाडी इथेच सोडून जाऊ या तिथे नक्कीच आपल्याला हेल्प मिळेल!” 

रावी,“ ठीक आहे सर!” ती म्हणाली.

 आणि दोघे त्या उजेडाच्या दिशेने निघाले. पंचवीस मिनिटात ते तिथे पोहोचले तर अरण्यकचा अंदाज बरोबर निघाला होता. ते एक छोटे से लॉज होते.अरण्यकला ते पाहून जरा हायसे वाटले दोघे ही लॉजमध्ये गेले.अरण्यक रिसेप्शनला विचारले.

अरण्यक,“इथे जवळपास कोणी मेकॅनिक मिळेल का? त्यांचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल माझ्या कारचे टायर रस्त्यावर पंचर झाले आहे! सो प्लिज!” तो म्हणाला.

मॅनेजर,“ साहेब गॅरेज तर इथं कुठं नाही हा पण  मेकॅनिकचा नंबर आहे पण  तो इतक्या रात्री येणार नाही इथल्या एका खेड्यात तो राहतो! उद्या सकाळी येईल तो! तुम्ही असं करा आज इथेच लॉजवर मुक्काम करा सकाळी मी मेकॅनिक बोलवून घेतो आणि तुमची कार दुरुस्त करून घेतो!” तो म्हणाला.

   अरण्यक बरोबर रावी ही हे सगळं ऐकत होती त्या व्यक्तीचे बोलून झाल्यावर अरण्यकने रावीला विचारले. 

अरण्यक,“मिस चव्हाण आपण आज लॉजवर राहू या का?कारण दुसरा पर्याय ही नाही आपल्याकडे!”

रावी,“ आता काय करणार सर दुसरा पर्याय नाही आपल्याकडे! राहुयात इथेच नाही तरी पावसात आपण कुठे आणि कसे जाणार आहोत!” ती थोड्याशा नाराजीने म्हणाली.

अरण्यक,“ ठीक आहे!( मॅनेजरकडे पाहत) दोन रूम द्या आम्हाला!” तो म्हणाला.

मॅनेजर,“ सर सगळ्या रूम फुल्ल आहेत एकच रूम शिल्लक आहे!सॉरी बट मी तुम्हांला एकच रूम देऊ शकतो!” तो म्हणाला.

अरण्यक,“ ठीक आहे एक तर द्या!( असं म्हणून त्याने पैसे दिले नाव लिहून  रजिस्टरवर सही केली आणि तो रावीला पाहून म्हणाल) मिस चव्हाण तुम्ही जा रूममध्ये झोपा मी इथेच लॉबीमध्ये आहे सकाळी गाडी दुरुस्त झाल्यावर मी फोन करेन मग तुम्ही या! असं ही डिनर तर आपण घेतलाच आहे!” तो म्हणाला.

रावी,“मी रूममध्ये जाऊन  निवांत झोपणार आणि तुम्ही इथं लॉबीत बसणार! बाहेर इतका पाऊस आहे हवेत किती गारवा आहे सर! तुम्ही कसे थांबणार लॉबीत!” ती काळजीने म्हणाली.

अरण्यक,“ don't worry! I can manege!तुम्ही जा रूममध्ये  झोपा ही घ्या की!” तो रावीच्या हातात रूमची चावी  देत म्हणाली.

रावी,“ तुमची तब्बेत खराब होईल सर! आणि तुमच्यावर इतका तर विश्वास आहे माझा चला रूममध्ये आपण ऍडजस्ट करू!” ती अजिजीने म्हणाली.

अरण्यक,“ अहो पण मी थांबेण लॉबीमध्ये!” तो संकोचून म्हणाला.

रावी,“ठीक आहे! मग द्या ही रूमची चावी परत आपण दोघे ही इथेच लॉबी मध्ये थांबू!” ती नाराजीने म्हणाली.

अरण्यक,“ बरं चला!” तो हसून म्हणाला.

                रावी आणि अरण्यक हॉटेल रूममध्ये गेले. रूम तशी छोटीच होती. पण व्यवस्थित होती.एक बेड आणि एक टीपॉय-खुर्ची तिथे होती. अरण्यकने आणखीन एक ब्लॅंकेट मॅनेजरकडून मागून घेतले. रावी बेडवर झोपली आणि अरण्यक खुर्चीवर बसून टीपॉयवर पाय ठेवून झोपला.सकाळी अरण्यकला जाग आली ती कसल्या तरी कलकलाटाने आणि दारावर जोरजोरात पडणाऱ्या थापांनी! त्या आवाजाने रावी ही जागी झाली होती. अरण्यकने अर्धवट झोपेतून  उठून दार उघडले तर कसल्याशा फ्लॅशने त्याचे डोळे दिपले त्याने डोळ्यावर हात ठेवून नीट पाहिले तर  मीडिया उभी! दहा-बारा पत्रकार माईक कॅमेरा घेऊन उभे होते. तेव्हढ्यात रावी कसला आवाज आहे म्हणून दारा जवळ आली तर तिचे ही फोटो पत्रकारांनी टिपायला सुरुवात केली.अरण्यकने प्रसंगावधान दाखवून रूमचे दार लावून घेतले. त्याच्यासाठी ही पत्रकार असे अचानक येणे मोठा धक्काच होता आणि रावी आणि तो असे लॉजच्या एका रूममध्ये झोपले होते याचा अर्थ मिडियावाले काय काढणार हे त्याला चांगलच माहीत होतं.म्हणून प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याने इंटरकॉमवरून  मॅनेजरला फोन करून मेकॅनिकला बोलवून गाडी दुरुस्त झाली का विचारले? कारण रात्रीच त्याने तशा सूचना मॅनेजरला देऊन कारची चावी त्याला दिली होती. मॅनेजरने अजून थोडा वेळ लागेल असे सांगितले कारण  मेकॅनिक आत्ताच आला होता.रावी मात्र या सगळ्या मीडिया प्रकरणामुळे सुन्न झाली होती.तिला काय बोलावे आणि काय करावे हेच सुचत नव्हते. अरण्यक मात्र पूर्णपणे भानावर होता. त्याने रुममध्ये बसुनच कार दुरुस्त करवून घेतली आणि तो रावीला म्हणाला.

अरण्यक,“तोंडाला स्कार्प बांधा मिस चव्हाण आपल्याला निघायचे आहे!” तो म्हणाला आणि रावीने काही न बोलता यांत्रिकपणे स्कार्प बांधला. 

       अरण्यक रूम मधून रावीला घेऊन निघाला तर त्यांच्या भोवती मीडियाने गराडा घातला. प्रत्येक जण वेगवेगळे प्रश्न विचारत होता.

एक पत्रकार,“ A. V सर तुमचे तर अफेर सिया शर्मा बरोबर सुरू होते ना? मग तुम्ही इथे तुमच्या पर्सनल सेक्रेटरी बरोबर?” तो रावीकडे कुच्छितपणे पाहत म्हणाला.

दुसरा पत्रकार,“ A. V. सर ये आपकी लेटेस्ट गर्लफ्रेंड है या फिर बस उसके साथ रात बिताने के लिये यहाँ आए थे  आप?” तो हसून म्हणाला.

अरण्यक,“ will you please shut up!” तो ओरडला आणि रावीचा हात धरून तो कारमध्ये जाऊन बसला कार वेगाने मुंबईकडे निघाली.

      रावीच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते आणि ते तिचा तोंडाला बांधलेला स्कार्प भिजवत होते.रावीच्या कानात पत्रकारांनी विचारलेले प्रश्न शिस्याचा रस ओतावा तसे घूमत होते. अरण्यकला हे सगळं नवीन नसलं तरी तो रावीसाठी चिंतित दिसत होता. त्याने रावीला होस्टेलवर सोडलं आणि तो घरी निघून गेला. होस्टेलमध्ये सगळ्या मुली रावीकडे संशयाने पाहत होत्या कारण आत्ता पर्यंत अरण्यक आणि तिची न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून सगळ्या tv चैनलवर दाखवली जात होती. जरी रावीचा चेहरा ब्लर  केला होता आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर स्कार्प होता आणि तिचे नाव घेतले जात नव्हते  तरी न्यूजमध्ये  A. V. त्याच्या पर्सनल सेक्रेटरी बरोबर लोणावळ्याच्या  एका लॉजवर आढळून आला! ही ब्रेकिंग न्यूज सतत फ्लॅश होत होती.  रावी ही A. V.ची पर्सनल  सेक्रेटरी आहे हे जवळ जवळ सगळ्यांना माहीत होते. मुलींच्या त्या नजरा रावीला खूप छळत होत्या. रावी हातपाय गाळून अगदी मंद गतीने तिच्या रूमकडे निघाली होती. तिला सीमानी पाहिले आणि तिचा हात धरून ती तिला रूममध्ये ओढतच घेऊन गेली आणि दार लावले. सीमाने तिला पाणी दिले आणि ती म्हणाली.

सीमा,“ हे सगळं काय आहे रावी? अग मीडिया तुझे नाव A. V सरांशी जोडत आहे आणि रात्र भर तू खरच A. V सरांबरोबर होतीस? मला खरंच या गोष्टीवर विश्वास नाही! अग काही तरी बोल ना!” ती रावीला बोलत होती पण रावी मात्र पुतळ्यासारखी बसून होती. ती सीमाला काहीच प्रतिसाद देत नव्हती.

       आता हे वादळ रावी आणि अरण्यकच्या आयुष्याची नौका कोठे घेऊन जाणार होते. याचा मात्र कोणालाच अंदाज बांधता येत नव्हता. या सगळ्याचा  वरवर पाहता रावीवर खूप खोल परिणाम झालेला दिसत होता.



 

रावीचा प्लॅन काय होता? मीडियाला कोणी सांगितले असेल की अरण्यक आणि रावी एकाच रूममध्ये आहेत?या सगळ्या गोष्टीचा रावी आणि आरण्यकच्या आयुष्यात काय परिणाम होणार होता?

या काढेचे सर्व अधिकार लेखिकेकडे  राखीव आहेत!

©swamini chougule






 

       

       

🎭 Series Post

View all