खेळ दि गेम ऑफ लव अँड हेट (भाग ११)

This is a suspense story

    आता रात्रीचे दोन वाजत आले होते. विरेंद्र बाहेर बसून पेंगत होता तर आत स्मिता खुर्चीवर बसून आरण्यकच्या बेडवर डोकं ठेवून  झोपली होती. रावी मात्र जागीच  खुर्चीत बसून  होती.  अरण्यकला लावलेल्या ड्रीपकडे लक्ष  देत ती बसून होती कारण जर ड्रीप संपली तर पुन्हा रक्त उलटे ड्रीपमध्ये चढले असते. म्हणून ती काळजी घेत होती. असेच सकाळचे सहा वाजले सगळीकडे उजाडले होते आणि अरण्यक हालचाल करत असलेला रावीला दिसला. तो डोळे उघडून तो कोठे आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला शुद्धीवर आलेले पाहून रावीने स्मिताला उठवले आणि ती डॉक्टरला बोलवायला निघून गेली. स्मिताने अरण्यकच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला विचारले.

स्मिता,“ अरु बच्चा कसे वाटतय तुला आता?” त्यांनी विचारले.

अरण्यक,“ मी ठीक आहे! पण मी इथे?आणि रावी कुठे आहे?” त्याने क्षीण आवाजात  विचारले.

स्मिता,“ रावीच तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली बच्चा तुला शुद्धीवर येताना पाहून ती डॉक्टरांना बोलवायला गेली आहे!” त्या म्हणाल्या.

     तो पर्यंत रावी बरोबर डॉक्टर आणि विरेंद्र ही आले. डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितले आणि त्यांनी अरण्यकचे चेक अप केले आणि ते बाहेर आले.

स्मिता,“ डॉक्टर अरण्यक कसा आहे आता?” त्यांनी काळजीने विचारले.

डॉक्टर,“ he is all right now! तुम्ही संध्याकाळी त्यांना घरी घेऊन जाऊ शकता पण मिसेस वीरशैव तुम्ही जरा माझ्या बरोबर चला बाकी फॉर्मेलिटी  पूर्ण करा आणि काही  इंस्ट्रक्शन ही द्यायच्या आहेत तुम्हांला पेशंट बद्दल!” ते रावीला पाहून म्हणाले.

स्मिता,“ डॉक्टर रावी कशाला मी येते ना तुमच्या बरोबर! वीर बेटा चल आपण पाहू बाकीचे! रावी तू अरु जवळ थांब!” त्या म्हणाल्या आणि रावीच्या उत्तराची वाट ही न पाहता विरेंद्रला घेऊन डॉक्टर बरोबर निघून गेल्या.

     रावीला मात्र अरण्यकचा खूप राग आला होता. तिला त्याला टाळायचे होते पण आता तिला त्याच्या जवळ जाणे भाग होते. ती आत गेली आणि जाऊन खुर्चीवर बसली. अरण्यक  झोपल्या जागेवरून तिला पाहत होता. पण रावी मात्र खाली मान घालून बसली होती. शेवटी अरण्यकनेच बोलायला सुरू केलं.

अरण्यक,“ मिस चव्हाण! तुम्ही ठीक आहात ना? सॉरी मी तुम्हाला काल गाडीतून असं ढकलून दिले!” तो म्हणाला.

रावी,“ मी बाहेर आहे!” त्याचे बोलणे तिने ऐकून न ऐकल्या सारखे केले आणि ती उठून जावू लागली तर अरण्यकने तिचा हात धरला आणि तो पुन्हा बोलू लागला.

अरण्यक,“ सॉरी ना रावी! पण मी तरी काय करणार होतो! गाडीचा ब्रेक….” तो पुढे बोलणार तर रावीने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि ती रागाने बोलू लागली.

रावी,“ हो ना गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून दिले ढकलून मला गाडीतून पुढचा मागचा विचार न करता! आणि स्वतः गाडी सहित जाऊन धडकलात! मी पाहिलं तर बेशुद्ध होतात तुम्ही सर! मी कसं तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणले माझे मला माहित!” ती रागाने बोलत होती आणि स्वतःचा हात सोडवून  निघून जाऊ लागली तर अरण्यकने तिचा हात धरून तिला स्वतःकडे  ओढले रावी अचानक ओढली गेल्यामुळे अरण्यकच्या अगदी जवळ खेचली गेली तरी तिने स्वतःचा तोल सावरला पण ती अरण्यकच्या समोर झुकली गेली अरण्यकने तिचा हात अजून घट्ट धरला आणि तो बोलू लागला

अरण्यक,“ रावी सॉरी! माझ्यामुळे तुम्हांला खूपच त्रास झाला!” तो म्हणाला.

रावी,“ हो ना खूपच जास्त! तुम्ही कोण समजता वो स्वतःला? मला इतका राग आलाय ना तुमचा अरण्यक पण ना…!” ती पुढे बोलायची थांबली.

अरण्यक,“ पण काय?” त्याने हळूच तिच्या कानात विचारलं आणि ती शहारली. त्याला आणि स्वतःला तिला ही काही कळायच्या आधीच तिने त्याच्या ओठांचा ताबा घेतला त्याने ही तिचा हात सोडून तिच्या पाठीवर नेला आणि तिला मिठीत घेतले. रावी संमोहित झाल्यासारखी बराच वेळ अरण्यकच्या बाहू पाशात त्याच्या बरोबर वाहवत जात होती. ती तशीच त्याच्या मिठीत विसावली. थोड्या वेळाने भानावर आणि आणि तिने स्वतःला सोडवून घेतले व  स्वतःला सावरत उभ राहण्याचा प्रयत्न करू लागली पण अरण्यकने हसून तिला पुन्हा जवळ ओढले. तिने स्वतःला  त्याच्या पासून कसे बसे  सोडवून घेतले आणि त्याच्या पासून नजर चोरून ती  निघून गेली.ती स्वतःच्याच कृत्यावर स्वतःच चिडली होती.

          स्वतःशीच मनातल्या मनात  बडबडत होती.रावी तू काय केलंस हे!अग अशी कशी वागलीस. ज्या माणसाचा तू तिरस्कार करतेस त्याच्याशीच!आता हा A. V. या गोष्टीचा काय अर्थ काढणार देवा! तू खरंच तर त्याच्या प्रेमात पडली नाहीस ना? नाही मी A. V च्या प्रेमात नाही पडू शकत असा विचार करत ती बाहेर जाऊन बसली.

      इकडे अरण्यक गालातल्या गालात हसत होता. तो रावीच्या प्रेमात आधीच होता आणि आता रावीच्या अशा वागण्यामुळे त्याला खात्री झाली होती की रावी ही त्याच्या प्रेमात आहे.हा विचार करून तो मनोमन खुश होता.स्मिता आणि विरेंद्रने सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण केल्या.तेव्हढ्यात पोलीस अपघाताच्या चौकशीसाठी आले त्यांनी अरण्यक आणि रावीला जुजबी प्रश्न विचारले आणि गाडीचा ब्रेक फेल कसा काय झाला हे तपासण्यासाठी गाडी गॅरेजमध्ये पाठवून दिली.

    संध्याकाळी अरण्यकला सक्तीची विश्रांती घेण्याच्या अटीवर डॉक्टरांनी डिशचार्ज दिला आणि अरण्यकच्या फॅमिली डॉक्टरशी चर्चा करून त्याची केस त्याच्याकडे सोपवली.अरण्यक महिना भर घरीच बसून होता.रावी आणि स्मिताने त्याची काळजी योग्य रित्या घेतली त्यामुळे तो लवकर बरा झाला.

      त्या घटनेनंतर  अरण्यक रावीशी जास्त जवळीक आणि सलगी करण्याचा प्रयत्न करू लागला होता असं असलं तरी तो त्याच्या मर्यादा पाळून होता.रावीला ही त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते.पण ती एका वेगळ्याच मानसिक द्वंद्वात अडकली होती.ती ना अरण्यकचे प्रेम स्वीकारू शकत होती ना नाकारू शकत होती.अरण्यक मात्र शांत होता.असाच महिना उलटून गेला.

★★★

     अरण्यक नेहमी प्रमाणे ऑफिसला जाऊ लागला आणि रावी देखील! पण अरण्यकला आता त्याच्या आयुष्या संदर्भात तसेच बिझनेस संदर्भात काही महत्त्वाचे  निर्णय घ्यायचे होती. तो रावीला प्रपोज करण्याच्या आणि तिला स्वतःची पत्नी म्हणून दर्जा देण्याच्या विचारात होता.त्यासाठी त्याने प्लॅनिंग ही सुरू केले होते.तो तिला सरप्राईज करण्याच्या विचारात होता पण त्या आधी त्याला त्याच्या बिझनेस संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता आणि त्यासाठी स्मिता आणि रावीचा ही सल्ला त्याला हवा होता.म्हणून त्याने आज रविवार पाहून लंचच्या वेळी त्या संदर्भात दोघींशी बोलायचे ठरवले.स्मिताने मुद्दामच आज  अरण्यकच्या आणि रावीच्या ही आवडीचा जेवणाचा बेत केला होता. लंच झाले आणि तिघे हॉलमध्ये बसले आणि अरण्यकने हळूच विषयाला हात घातला.

अरण्यक,“ मम्मा मला तुमच्या दोघींशी जरा महत्वाचे बोलायचे आहे!” तो म्हणाला.

स्मिता,“ कशा संदर्भात?”त्यांनी विचारले.

अरण्यक,“मम्मा तुला तर माहीत आहे मी विचार करत आहे बरेच दिवस झाले की मी आणि वीर  बिझनेस पार्टनर आहोत पण आपली भागीदारी सत्तर टक्के आणि वीरची तीस टक्के आहे.म्हणजे डॅडने सत्तर टक्के भांडवल गुंतवले होते आणि अंकलनी तीस टक्के आणि हा बिझनेस सुरू केला पण डॅड बरोबर अंकलनी खूप मेहनत घेतली हा बिझनेस डेव्हलोप करायला किंबहुना जास्तच! डॅड गेल्यावर त्यांनी आपल्याला समजून घेतले मला बिझनेसच्या खाचाखोचा शिकवल्या म्हणून मला वाटत की त्यांचा पर्यायाने वीरचा ही या बिझनेसवर समान हक्क आहे म्हणून मी विचार करत होतो की त्याला फिफ्टी परसेन्टचा पार्टनर करून घ्यावे. तुझं काय मत आहे रावी!” तो म्हणाला.

रावी,“ माझं मत म्हणाल सर तर माणसाने स्वतः  समोरचे ताट एक वेळ दुसऱ्याला द्यावे पण बसायचा पाट नाही! कोण कधी आणि कसा तुमच्यावर उलटेल आपण नाही सांगू शकत!” असं म्हणून ती निघून गेली.

स्मिता,“ अरु रावी आणि वीरच फारसं पटत नाही हे तुला ही माहीत आहे! पण वीरला त्याचा हक्क दिला जावा त्याला तू बरोबरीचा पार्टनर कर मी आहे तुझ्या बरोबर आणि रावीला समजवायचे काम ही तुझेच आहे जा तिला समजाव!” त्या असं म्हणून हसल्या आणि त्यांच्या रूममध्ये गेल्या.

      अरण्यक त्याच्या रूममध्ये गेला तर रावी खुर्चीवर पुस्तक वाचत बसलेली त्याला दिसली.तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला.

अरण्यक,“ रावी अशी निघून का आलीस तू? मला माहित आहे की तुला वीर फारसा आवडत नाही तुझं त्याच पटत नाही पण तो माझा बाल मित्र आणि बिझनेस पार्टनर आहे तो! ” तो  तिला समजावत  होता.

रावी,“ हुंम! तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर! आणि असं ही बिझनेस तुमचा निर्णय तुमचा आहे! मी कोण आहे तुम्हांला सल्ला देणारी!” ती सहज म्हणाली.

अरण्यक,“तू जर माझी कोणी नसतीस तर मी तुला सल्ला विचारला नसता रावी!पुन्हा असं म्हणू नकोस!” तो तोंड फुगवून म्हणाला आणि लॅपटॉप घेऊन बेडवर  त्याच काम करत बसला.

       अरण्यक फुगला आहे हे रावीला लगेच कळले म्हणून ती त्याच्या जवळ बसत त्याचा हात धरत त्याला म्हणाली.

रावी,“ सॉरी ना सर! मी नाही म्हणणार परत असं!” ती म्हणाली.

अरण्यक,“ it's ok!” तो फुगलेल्या तोंडणानेच म्हणाला.

रावी,“ आता कान धरून उठाबशा काढू का मी?” ती कान धरत म्हणाली.

अरण्यक,“ बास झाली नौटंकी तुझी!” तो हसत म्हणाला आणि रावीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले.

       रावी अरण्यकच्या प्रत्येक कृती! त्याचे बोलणे आणि त्याच्या वागण्यामुळे कोड्यात पडत होती.ती विचार करत होती की  जो माणूस कोणाला तरी त्याचा  तसा हक्क नसताना स्वतःच्या बरोबरीचा पार्टनर करू शकतो.त्या दिवशी कारचा ब्रेक फेल झाला तर त्याने स्वतःच्या आधी माझा जीव वाचला आणि स्वतः मात्र मृत्यूच्या जवळ जाऊन पोहचला.जो माणूस मी त्याची हक्काची बायको असताना आणि मनात आणलं तर कधी ही मला मिळवू शकत असताना ही त्याने माझ्या मना विरुद्ध मला आठ-नऊ महिन्यापासून हात ही लावला नाही. तो माणूस कोणाला कसे फसवू शकेल आपण चुकत तर नाही ना अरण्याकला समजून घेण्यात किंवा त्याला ओळखण्यात!पुन्हा तिचे मन आणि बुद्धी द्वंद्व करत होते. तिचे  मन तिला अरण्यककडे खेचत होते तर बुद्धी तिला तिचा उद्देश दाखवत होती. ती या सगळ्या विचारात मग्न होती आणि तिचा फोन वाजला त्या आवाजाने ती भानावर आली तर अरण्यक काम करत तिथेच तिच्या मांडीवर झोपला होता. तिने हसून त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला आणि त्याचे डोके  उशी घेऊन अलगद त्यावर ठेवले. फोन कट केला आणि ती गॅलरीत गेली तो पर्यंत पुन्हा फोन वाजला.

रावी,“ हा बोल!” ती म्हणाली.

व्यक्ती,“ फोन का कट केलास  तो A. V. होता का जवळ? तू ना हल्ली मला बोलायचे टाळत असतेस काय चालले आहे रावी तुझ्या मनात?” ती व्यक्ती वैतागून बोलत होती.

रावी,“ असं काही नाही!  अरण्यक पन्नास टक्के पार्टनरशिप देतो आहे. मला तर काहीच कळत नाही. त्या दिवशी ही त्याने स्वतः आधी माझा विचार केला आणि मला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा केला आणि स्वतः मात्र गंभीर जखमी झाला. मी त्याची हक्काची बायको आहे पण त्याने माझ्या मना विरुद्ध मला अजून हात देखील लावला नाही. उलट माझी किती काळजी घेतो. असा माणूस कोणाला कसा फसवू शकेल मला खूप प्रश्न पडले आहेत.” ती संभ्रमित होऊन बोलत होती.

व्यक्ती,“ फायनली त्या A. V. ची जादू तुझ्यावर ही चालली म्हणायची! तू पण एक सामान्य मुलगीच म्हणा तू कशी अपवाद असशील रावी! अग तो मुखवटा घालून जगणारा माणूस आहे त्याने तुझ्या समोर चांगुलपणाचा मुखवटा धारण केला आहे.  A. V.ने तुझ्या बहिणीला नाही फसवले ना मग तुझी बहीण खोटे बोलत असेल ना! असं कर तू सगळं विसरून जा तुझी बहीण तुझा बदला आणि A. V. बरोबर सुखाने संसार कर पण त्या आधी तुझ्या मोबाईल मध्ये असणारा तो व्हिडीओ नक्की बघ!” असं म्हणून त्या व्यक्तीने चिडून फोन कट केला.

       रावी त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून गॅलरीत किती तरी वेळ  बसून राहिली तिची तंद्री अरण्यकच्या हाक मारण्याने भंगली.

★★★★


 

      दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे रावी आणि अरण्यक ऑफिसला गेले. अरण्यक रावीसाठी सरप्राईज प्लॅन करत होता. म्हणून त्याने तन्वीला कामाला लावले होते. अरण्यकने रावीला फोन करून बोलवून घेतले आणि आपण दोन दिवसांनी ऑफिसच्या कामा निमित्त गोव्याला जात आहोत असे सांगितले. रावीने नुसती होकारार्थी मान हलवली आणि  ती तन्वीकडे गेली.

रावी,“ तन्वी दोन दिवसाने मिटिंगसाठी सर आणि मी गोव्याला जात आहोत तर मला फ्लाईट कधीची आहे तिथे कोणत्या हॉटेलवर थांबायचे आहे आणि हो मिटिंग व्हेन्यू वगैरे डिटेल्स दे! म्हणजे मला स्केड्युल फिक्स करता येईल” ती म्हणाली.

तन्वी,“ काय ग रावी तुला माहीत नाही का A. V. सरांचे गोव्यापासून जवळच स्वतःचे आयलँड आहे आणि ही काही प्रोफेशनल ट्रिप नाही स्केड्युल फिक्स करायला तुम्ही दोघे…..” ती पुढे बोलणार तर काही तरी चुकीचे बोलून गेलो आपण अशा आविर्भावात  तिने जीभ चावली आणि  ती बोलायची थांबली.

रावी,“ काय म्हणालीस? प्रोफेशनल ट्रिप नाही? मला तर अरण्यक सर म्हणाले की मिटिंग आहे!” तिने आश्चर्याने विचारले.

तन्वी,“  मी पण ना! अग सर तुला सरप्राईज देणार आहेत म्हणून त्यांनी मला सगळं अरेंज करायला सांगितले! पण सरांना काही विचारू नकोस हा नाही तर माझं काही खरं नाही तुमच्या नवरा-बायको मध्ये माझा जीव टांगणीला!” ती वैतागून म्हणाली.

रावी,“ बरं बरं मी नाही विचारणार काही त्यांना!” ती असं म्हणून स्वतःच्याच विचारात जाऊन डेस्कवर बसली. 

        रावी  बराच वेळ विचार करत राहिली. जणू ती स्वतःच स्वतःशी भांडत होती. पण तिने स्वतःशीच काही तरी  निश्चय केला आणि डोळे पुसले. ती उठली आणि बाहेर जाऊन तिने कोणाला तरी फोन लावला आणि म्हणाली.

रावी,“ दोन दिवसांनी गोव्यात आपलं काम करू! मी तयार आहे आणि हो सगळं प्लॅंनिंग करून ठेव मी रात्री उशिरा फोन करेन तुला आयलँडचा पत्ता माहीतच असेल!” ती म्हणाली.

व्यक्ती,“That's like a good girl!मला माहित होतं रावी काही झालं तरी तू तुझ्या ध्येया पासून डळमळीत होणार नाहीस. मी करतो तयारी आणि तुला डिटेल्स सांगतो.” ती व्यक्ती खुश होत म्हणाली आणि फोन ठेवला. 

     तो पर्यंत लंच ब्रेक झाला आणि अरण्यक रावीला लंचसाठी शोधत आला. रावी त्याच्या बरोबर आत गेली पण ती आतून खूप अस्वस्थ होती.


 

अरण्यक रावीला काय सरप्राईज देणार होता? रावी कशाला तयार होती आणि ती फोन वरील त्या व्यक्तीला कशाचे आणि काय प्लॅनिंग करायला सांगत होती? 

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.

©swamini chougule





 

       



 

     

              


 

         

        

    

🎭 Series Post

View all