खेळ ऊन-सावलीचा (भाग - चार)

भूतकाळ अन् वर्तमानाची गाठ कायम पेचात पाडत असावी कदाचित...

थोड्या वेळानंतर ईशाने खोल श्वास घेतला अन् ती निर्भीड होऊन नम्रपणे नेत्राला उद्देशून म्हणाली, " हल्ली मला भूतकाळात डोकावताना भीती वाटत नाही नेत्रा! पण मला वर्तमान स्वीकारायला मात्र नक्कीच जड जातंय. मी भूतकाळाला हसत मिठी मारलीय खरं! अन् त्यामुळेच मला वर्तमानात स्वतःला वेळ द्यायचा आहे. मलाही माझा वर्तमान कवेत घ्यायचा आहे; पण त्यासाठी मला नक्कीच वेळ हवा आहे आणि तू या गैरसमजात नको जगू की, मी नवी सुरुवात करत नाहीये. मी नवी सुरुवात आधीच केलीय; त्यामुळेच मी आता स्वतःवर प्रेम करायला शिकलीय. इतरांपेक्षा स्वतःला प्राधान्य देऊ लागलीय अन् प्रेमाच्या भानगडीत स्वतःला गुंतवून घेणे कटाक्षाने टाळतेय. " 


" अगं, पण मल्हार अबीरसारखा मुळीच नाहीये; म्हणून अबीरने केलेल्या विश्वासघाताचं प्रतिफळ मल्हारला का मिळावं? " नेत्रा वैतागून बोलली. 


" नेत्रा, अबीरने माझ्याशी विश्वासघात केला; कारण मी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास केला होता. मला वाटतं माझ्या वाट्याला त्याचा विश्वासघात लाभला कारण कदाचित मीच त्याला ती संधी दिली होती स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊन, स्वतःपेक्षाही त्याला प्राधान्य देऊन अन् स्वतःपेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास केला होता; म्हणून मला आता भूतकाळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाहीये. अबीर आणि माझ्या नात्याची सुरुवात मैत्रीपासूनच झाली होती ना! मग हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालेलं आणि ह्याची साक्षीदार तू स्वतः आहेस; त्यामुळे आता मल्हारसोबत प्रेमाचं नातं गुंफण्याची मला भीती वाटते. किंबहुना, मला स्वतःलाच गृहीत धरले जाण्याची भीती वाटते. मला आता स्वतःच्या स्वाभिमानाची पायमल्ली होऊ द्यायची नाहीये! " ईशा तिचा भूतकाळ आठवून बोलली. 


" अगं पण.... " नेत्रालाही ईशाचा भूतकाळ आठवला अन् तिलाही पुढे काय बोलावे ते सुचेनासे झाले होते. 


" नेत्रा मी अनुभवलंय सर्व! मला आजही आठवतं की, कशाप्रकारे मी माझं नि अबीरचं नातं जपण्याचा प्रयत्न केलेला... कशाप्रकारे मी त्याच्या इगोखातर स्वतःला कमी लेखायची... कशाप्रकारे त्याच्या प्रत्येक चुकीला माफ करायची... कशाप्रकारे तो मुलींशी फ्लर्ट करायचा आणि तरीही स्वतःचीच दिशाभूल मी करत राहायची... कशाप्रकारे त्याचे नको ते रुसवेफुगवे दूर करायची... कशाप्रकारे त्याच्या मागेमागे फिरायची... कशाप्रकारे त्याला सर्वस्व अर्पण करून मी स्वतःला हरवून बसली... कशाप्रकारे मी माझ्या प्रेमाची उधळण त्या निष्ठूर अन् पाषाणहृदयी अबीरवर करायची... कशाप्रकारे मी एक कळसूत्री बाहुली बनून राहिली अन् कशाप्रकारे मी त्याच्यासाठी त्याच्या करमणुकीचा भाग म्हणून राहिली होती. तुला एकुण एक खबर आहे ना नेत्रा! 


                अबीरवर मी निर्व्याज प्रेम केलं होतं अन् मला भीती आहे की, मी दुसऱ्यांदा कुणाशी नातं जोडलं तर अबीरप्रमाणेच तो दुसरा व्यक्तीही माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेईल अन् यामुळे माझ्याच मनाचं खच्चीकरण होत राहील. त्यामुळे मी प्रेमाच्या वाटेवरून चालणे कधीचेच सोडून दिले आहे. अबीरसोबत जगलेले क्षण अन् ते सर्व अनुभव मला आता पुसता येणार नाहीत; पण हो! गतकाळाच्या अनुभवांवरून निदान आता मला माझ्यातलं 'मी'पण हरवायचं नाहीये कोणत्याही पुरुषाखातर!  


                मल्हारच्या पायाची धूळ जरी अबीरने त्याच्या अंगाला फासली तरी त्याची सर त्याच्या चारित्र्यात वा स्वभावात उतरणार नाहीच; पण आता मला मल्हारसोबतही नातं जोडण्याची रिस्क घ्यायची नाहीये. कदाचित ही माझ्यातली नकारात्मकता आहे असं तुला वाटेल पण माझ्या मते, हा माझ्या आयुष्याप्रती माझा सकारात्मक दृष्टीकोन आहे; कारण माझ्या एकटीची कंपनी मला पुरेशी आहे अन् यात मला माझं समाधान आणि माझा आनंद गवसला आहे नेत्रा! " ईशा बोलली. 


                ईशाच्या डोळ्यापुढून तिचा भूतकाळ भरभर निघून गेला. तिने तिच्या भावना नेत्राला सांगितल्या. भूतकाळ आठवून तिचे डोळे पाणावले होते पण स्वतःला सावरणे तिने शिकून घेतले होते; त्यामुळे तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या तरीही ओठांवर तिच्या हसू होतं. म्हणून नेत्राला सर्व स्पष्टीकरण दिल्यावर ईशाने परत कानात हेडफोन्स घातले अन् ती परत तिच्या वाटेने जाऊ लागली. नेत्रा मात्र ईशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक् होऊन पाहत राहिली. 


                पाहता-पाहता दिवस सरत गेले. नेत्रा, मल्हार अन् ईशाच्या वाटा कधी वेगळ्या झाल्या, हे धकाधकीच्या व्यापात त्यांना कळलंही नाही. पाहता-पाहता पंधरा वर्षे उलटून गेले. 


क्रमशः

............................................................ 


©®

सेजल पुंजे. 


🎭 Series Post

View all