खेळ ऊन-सावलीचा (भाग - तीन)

काय असेल वर्तमान? कुणास ठाऊक!


ईशाचं मत ऐकताच सर्व थक्क झाले होते. नेत्राचेही डोळे अगदी विस्फारले होते. ती ईशाला काही बोलणार त्याआधीच मल्हार हलकेच स्मित करत ईशाला म्हणाला, " ईशा, तू तुझं प्रामाणिक मत व्यक्त केलंस, हे कौतुकास्पद आहे. शिवाय तुझ्या मताचा मी आदर करतो. तुला गतकाळात आलेले अनुभव अन् त्यानंतर आता वर्तमानात नव्याने सुरुवात करणं अन् नव्या नात्यात गुंतताना वाटणारी धाकधूक मी समजू शकतो; त्यामुळे आय रिस्पेक्ट की, तुला तुझा आनंद तुझ्या एकांतात मिळालाय अन् आता तुला तिसऱ्या व्यक्तीची मध्यस्थी नकोय; पण तुझ्या नकारावर मी काय निर्णय घ्यावा, हे मीच ठरवणार.  


                थोडक्यात, जरी तुला वाटतं की, मी परफेक्ट आहे अन् तू इम्परफेक्ट! तसेच माझ्या प्रेमाच्या पात्र तू नाहीस वगैरे... तर हे तुझे गोड गैरसमज आहेत. ह्या गैरसमजुती तुझ्या तूच दूर कर; पण हो! एक मात्र खरं की, माझं तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे. त्यामुळे जरी तुझा नकार असेल तरी मान्य आहे मला अन् तुझा नकार असतानाही माझं प्रेम कायम शाबूत राहणार आहे. माझं जसं आज तुझ्यावर प्रेम आहे ते उद्याही तसंच असणार अन् दहा-पंधरा वर्षानंतरही अगदी असंच असणार आणि मी अगदी तिरडीवर पडून मरणासन्न अवस्थेत असतानाही तसेच असणार! तुझा होकार मिळविण्यासाठी मी ही पोकळ वचने देत नाहीये. मी माझा निर्णय तुला सांगतोय. आय लव्ह यू ऍंड आय विल ऑल्वेज लव्ह यू! " 


" मल्हार, तू घाईघाईत हा निर्णय घेतोय असं मला वाटतं. " ईशा बोलली.


" ईशा, मी कसलीच घाई केलेली नाही. मला तुझा ना होकार अपेक्षित होता ना नकार! मला तुझ्यापुढे फक्त व्यक्त व्हायचं होतं. माझ्या प्रेमाची प्रामाणिक कबुली द्यायची होती अन् त्यात मला यश आलंय! बाकी तुझ्यावर आजीवन प्रेम करण्याचा निर्णय मी आधीच घेतला होता म्हणून तुझा नकार मिळताच मी माझा निर्णय बदलून घ्यावा, एवढीही डगमगती निर्णयक्षमता नाहीच माझी! मी तुझा नकार स्वेच्छेने मान्य केलाय अगदी हसत-खेळत; म्हणून तू माझ्या या निर्णयाला स्वीकारावं मनात कोणतेही किंतुपरंतू न बाळगता, असं मला वाटतं. " मल्हार त्याचं मत अगदी नम्रपणे मांडत बोलला. 


" मल्हार पण मला वाटतं की, जिथे आऊटपुट मिळणार नसेल तिथे भावनांची इन्व्हेस्टमेंट न केलेलीच बरी... किंबहुना, भविष्यात होणारा असह्य त्रास तरी टाळता येईल... अन् महत्त्वाचं म्हणजे, तू हा खूप मोठा निर्णय घेऊन बसलाय! " ईशा बोलली. 


" प्रेम केलंय मी व्यवहार नाही! त्यामुळे मला ना तमा आऊटपुटची आहे ना मी केलेल्या भावनेच्या इन्व्हेस्टमेंटची! शिवाय तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्यातही मला असह्य त्रास नव्हे तर अनंत समाधान मिळणार, मला खात्री आहे; म्हणून माझ्या मनात या 'पण'ला जराही थारा नाहीये. " मल्हार शांत स्वरात गालातल्या गालात मंद हसून बोलला. 


" बरं! जशी तुझी इच्छा! जसा तू माझ्या निर्णयाचा स्विकार केलाय अगदी त्याचप्रमाणे मलाही तुझ्या निर्णयाचा आदर आहे. म्हणून आपली मैत्री अशी अखंड अन् अबाधित ठेवूया! मनात कसलेही ग्रह न बाळगता! " ईशा मंद हसून बोलली. त्यावर मल्हारनेही दुजोरा दिला. त्यानंतर ईशा गपगुमान तिच्या कानात हेडफोन्स घालून ती तिच्या वाटेने जाऊ लागली. 


                ईशा तिच्या मार्गी लागताच तिला जाताना बघून मल्हार मंद हसला अन् तो सुद्धा त्याची बाईक घेऊन त्याच्या मार्गाने निघून गेला. ते दोघेही तिथून निघून जाताच हळूहळू गर्दी कमी झाली. नेत्रा मात्र पळतच ईशाच्या मागोमाग गेली अन् तिने ईशाला गाठलं. 


ती ईशाला उद्देशून म्हणाली, " ईशा, आर यू सिरियस? तू खरंच मल्हारला नकार दिलास? "


" नेत्रा, तू तिथेच होती ना! म्हणजे तू सगळं ऐकलंय मग आता तुला कशाची शहानिशा करायची आहे? " ईशाने कानातून हेडफोन्स काढले अन् ती नेत्राकडे पाहून नजर रोखून बोलली. 


" मी कसलीच शहानिशा करत नाहीये; पण मी कन्फ्युज्ड आहे. " नेत्रा बोलली. 


" का आणि कशामुळे? " ईशा न कळून उत्तरली. 


" तुझ्या निर्णयामुळे... " नेत्रा सूचक बोलली. 


" माझ्या निर्णयामुळे म्हणजे? " ईशाने परत प्रश्न विचारला. 


" ओह कम ऑन यार ईशा! तुला कळतंय की, मला काय बोलायचंय ते! मी मल्हार आणि तुझ्याबद्दल बोलतेय. मला वाटतं तू त्याला नकार देऊन चूक केलीय. आय गेस, तू भूतकाळाला घट्ट मिठी मारलीय त्यामुळे तुला मुव्ह ऑन करता येत नाहीये. " नेत्रा एका दमात बोलली अन् नंतर तिने जीभ चावली. दुसरीकडे तिचं वाक्य ऐकून ईशा जरा वेळ गप्प राहिली. 


क्रमशः

............................................................. 


©®

सेजल पुंजे.


🎭 Series Post

View all