Jan 19, 2022
नारीवादी

खेळ नशिबाचा भाग 6 अंतिम

Read Later
खेळ नशिबाचा भाग 6 अंतिम

शितल ठोंबरे (हळवा कोपरा)

खेळ नशिबाचा भाग 6( अंतिम )


मागील भागात आपण पहिले... 

नीता मात्र त्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी तळमळत होती... पण सुशांतच्या या अवस्थेत त्याच्या मनाविरुद्ध वागणं पटत नव्हतं... त्यामुळे मायाकाकू आणि सुमनवहिनींशी बोलून निताचं कुटुंब निघालं ... पण नीताने मात्र आपल्या आई बाबांसोबत परत घरी जायला नकार दिला... 

मायकाकूंना आधाराची गरज आहे... सुशांत ला ही माझी गरज आहे.. तो आता मला भेटत नाही पण कधीतरी तो मला नक्कीच भेटेल... इथे थांबून किमान मी त्यांच्या दुःखात सहभागी तरी होते... तसंही घरी आल्यावर माझं लक्ष इकडेच असेल... आणि अडचणीच्या काळात आपल्या कुटुंबाला असं एकटं सोडणं मला मुळीच पटत नाही आहे... 

नीताच्या या निर्णयाचा सगळ्यांनी स्वीकार केला... नीताला मायाकाकू आणि सुमनवहिनी च्या स्वाधीन करून नीताचे आई बाबा घरी परतले.... 

आता पुढे..... 

नीता ने सुशांत च्या घरची सगळी जबाबदारी उचलली... मायाकाकू सुशांत सोबत हॉस्पिटल मध्येच थांबल्या... त्यांना जेवण पोहचवणे, घरातील कामे... नीता सगळं मनापासून करत होती... सुशांत बद्दल तिला वाटत असलेली तळमळ पाहून मायाकाकू निश्चिन्त झाल्या आपण आपल्या सुशांत साठी अगदी योग्य मुलगी निवडली... एवढया कमी वयात इतका समजूतदार पणा....खरंच कौतुक करण्यासारखंच आहे... 

दोन दिवस झाले तरी सुशांत मात्र नीता ला भेटायला तयार होईना... मायाकाकू आणि सुमानवहिनींनी त्याला खूप समजविण्याचा प्रयत्न केला... पण सुशांत कोणाचंच काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता... त्याच्या मनात वेगळेच विचार सुरु होतो... मी माझ्या पायांवर केव्हा उभा राहू शकेन माहित नाही... कदाचित पुन्हा कधीच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो नाही तर... माझ्या या अवस्थेत मी निताशी लग्न नाही करू शकत...तिचं आयुष्य माझ्यासाठी का उध्वस्त करू... तिला माझ्या पेक्षा ही चांगला आणि तिला  साजेसा असा मुलगा नक्कीच मिळेल... माझ्याशी लग्न करून तिचं फक्त हसचं होईल....

नीता मात्र सुशांत ला भेटण्यासाठी आतुर झालेली... कधी एकदा सुशांत नॉर्मल होतोय आणि आपण त्याला भेटतोय असं तिला झालेलं... ती मायाकाकू कडे सुशांत ची सतत चौकशी करायची.... सुशांत च्या बोलण्यात आपला उल्लेख आला का हे ऐकण्यासाठी तिचे कान आसुसलेले... पण सुशांत आपल्या मतावर ठाम होता... तो जाणून बुजून आपल्या आईसमोर नीता चा विषय टाळत होता..... 

नीता ची अवस्था न पाहावून... मायाकाकू नी सुशांत शी नोटा आणि त्याच्या बद्दल बोलायचं ठरवलं.... तसंही लग्नाला तीनच दिवस बाकी होते... काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं.. 

मायाकाकू :सुशांत मला तुझ्याशी बोलायचं आहे... मला माहित आहे... सध्या तुझी मनःस्थिती ठीक नाही.. पण आता माझं तुझ्याशी बोलणं खूप गरजेचं आहे... 

सुशांत : (दीर्घ श्वास घेत )मला माहित आहे... तुला माझ्याशी काय बोलायचं आहे... 

मायाकाकू : तुला काहीच माहित नाही सुशांत... अरे नीता तुझ्या साठी तुझ्या काळजी पोटी... आपल्या आई बाबांना सोडून इथे थांबली... तुझी इच्छा नाही म्हणून तुला हॉस्पिटल मध्ये भेटायला ही नाही आली... वाट पहात राहिली की तू कधी तिचं नावं घेतो आहॆस... तिची तळमळ नाही पाहवत रे मला.. का उगाच तिला छळतो आहेस... 

सुशांत :मी तिला छळत नाहीये.. उलट आयुष्य भराच्या त्रासातून तिची सुटका करतो आहे... 

मायाकाकू : अरे ! काय बोलतो आहॆस तू??

सुशांत : हो आई... मला नीताला या बंधनातून मुक्त करायचं आहे... जे नातं अजून जुळलंच नाही त्या नात्याला भावनांच्या बंधनात नाही अडकवायचं मला... तू नीता ला संग इथून निघून जा... चांगला मुलगा बघ आणि लग्न कर.. माझ्या सारख्या पायाने अधू झालेल्या मुलाशी लग्न करून आयुष्य भर दुःखच सहन करावं लागेल... आई प्लिज तू सांग तिला निघून जा म्हणून... प्लिज... ( डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा सुशांत ने प्रयत्न केला पण आईच्या नजरेतून ते सुटलं नाही)

इतक्यात इतका वेळ सुशांत आणि मायकाकूंचं बोलणं दारामागून ऐकणारी नीता आत आली... चेहऱ्यावर संताप तर डोळ्यात अश्रू.... ती सुशांत च्या समोर उभी राहिली... नीता ला असं अचानक समोर पाहून सुशांत चपापला... त्याला मुळी अपेक्षा च नव्हती की नीता त्याला अशी सामोरी जाईल... त्याने एकदा आपल्या आई कडे तर एकदा नीता कडे पाहिले.... 

मायाकाकू : तुला आता जे काही बोलायचं आहे ते निताशीच बोल.... तुझ्या समोरच आहे ती... तुमच्या दोघांमध्ये मी नाही पडणार.... मला डॉक्टर ला भेटायचं आहे... मी जाऊन येते... तोपर्यंत तुम्ही बोलून घ्या...

असं म्हणत मायाकाकू रूमच्या बाहेर पडल्या... 

इतका वेळ नीता शांत उभी होती... मायाकाकू जाताच तिने बोलायला सुरुवात केली.. बोल सुशांत काय बोलायचं आहे तुला... मला काही सांगायचं होतं ना... सांग न मग... बघ मी आता अगदी तुझ्या समोर उभी आहे.... बोल बोल लवकर... काय बोलायचं आहे तुला...(सुशांत नीता कडे पहाताच राहतो.. नीता ला अश्या पद्धतीने बोलताना तो पहिल्यांदाच पहात होता ) तू नाही बोलणार...  मीच सांगते... तुला हे लग्न नाही करायचं हो ना... मी इथून निघून जावं... दुसऱ्या कोणाशी लग्न करावं... हेच हवंय ना तुला... जे तू मला सांगू ही  शकत नाही आहॆस... त्यावर तू अंमल कसं करणार... मला इथून जा म्हटल्याने... मी दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने... सगळे प्रश्न सुटतील... सगळं ठीक होईल... होईल का??... बोल ना सुशांत.. असा गप्प का आहॆस... मी खरंच मूर्ख आहे तुझ्या काळजीपोटी इथे थांबले... तुला त्रास नको म्हणून भेटायला ही नाही आले... त्याची ही शिक्षा देतो आहॆस मला...

नीता ला आता आपले अश्रू अनावर झाले.. तीने आपल्या ओंजळीत आपला चेहरा लपवून ती रडू लागली... निताच्या रडण्याने सुशांत चे डोळे ही भरून आले... त्याला खूप वाटत होते नीताच्या जवळ जावे... तिच्या पाठीवरून हात फिरवावा तिला शांत करावे... पण तो असहाय्य्य पणे फक्त आपल्या पायांकडे पहात राहिला... 

थोड्या वेळाने नीता शांत झाली... तिने मान वर करून पहिले तो सुशांत तिला स्वतः च्या पायांकडे पाहताना दिसला... सुशांत काही न बोलता ही त्याच्या मनातले भाव तिला समजले होते... ती उठून सुशांत जवळ गेली... त्याच्या बाजूला बसली.... सुशांतचा हात आपल्या हातात घेत ती म्हणाली.... सुशांत तुला सोडून मी कुठेच जाणार नाही आहे समजलं... 

सुशांत : नीता भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नको.. ज्यासाठी तुला नंतर पश्चाताप करावा लागेल... आज कदाचित निर्णय घेताना त्रास होईल... पण माझ्याशी लग्न करून आयुष्य भर होणाऱ्या त्रासापेक्षा कमीच असेल... 

नीता : आणि मी त्यासाठी तयार नसेल तर... ज्यावेळी आपलं लग्न ठरलं तेव्हाच तुला स्वतः च आयुष्य मानलं... तुझ्या पेक्षा तुझ्या स्वभावावर भाळले मी.. तू आहे त्या स्थितीत मला मान्य आहॆस... कारण माझं भविष्य तुझ्या बरोबर उज्ज्वलच असेल याची मला खात्री आहे... सुशांत मला एक सांग जर हा अपघात आपलं लग्न झाल्यानंतर झाला असता... तेव्हा ही तू असंच म्हणाला असतास की मला सोडून जा... इतकं सोप्प असतं का रे एखाद्याला विसरणं... तू विसरू शकशील मला... आणि हा अपघात माझ्या सोबत झाला असता मग.... दिलं असतंस मला सोडून... 

आपला हात नीताच्या ओठांवर ठेवत चूप काहीहि काय बोलते आहॆस... एक तर तुला काही होणार नाही... आणि काही झालंच तर मी आहे सदैव तुझ्या सोबत... 

नीता : हो का आता तर म्हणत होतास जा निघून... लग्न कर वगैरे वगैरे.. मग आता कशाला काळजी दाखवतो आहॆस खोटी खोटी... 

सुशांत ने आपले दोन्ही कान पकडले... सॉरी नीता मॅडम.. चुकी झाली या पामराची... माफ नाही करणार का मला... 

नीता ने हसत हसत सुशांत चे हात बाजूला केले...आपल्या  हातात त्याचे हात घेत म्हणाली... सुशांत हा हात सोडण्यासाठी नाही मला आयुष्यभर साथ देण्यासाठी हवाय... आयुष्यात आलेल्या या संकटावर आपण दोघे मिळून मात करू... सुशांत ने ही डोळ्यांनीच नीताला आपली सहमती दर्शवली... 

मायाकाकूना ही सुशांत च्या मतपरिवर्तनाने आनंद झाला... नीताच्या आईबाबांना बोलावून घेण्यात आले... हॉस्पिटल च्या प्रमुख आणि स्टाफ शी बोलून घेण्यात आले... दोन दिवसातच सुशांत आणि निताचं लग्न होतं... सुशांत ला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळायला वेळ होता... त्यामुळे लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर हॉस्पिटल मधेच करायचे ठरले... हॉस्पिटलची परवानगी मिळताच मायाकाकू तयारीला लागल्या.... 

लग्नाच्या दिवशी मायाकाकू, सुमनवहिनी, निताचे आई बाबा, भटजीबुवा  आणि हॉस्पीटल चा काही स्टाफ यांच्या  उपथितीत नीता आणि सुशांत चा आगळा वेगळा लग्न सोहळा पार पडला.... नीता आणि सुशांत पतिपत्नी च्या बंधनात बांधले गेले कायमचे.... 

नशिबाने आपला डाव खेळला होता... पण नीता आणि सुशांत ने नशिबाचा हा डाव उधळून लावला... आणि आपल्या संसाराचा खेळ सुरु केला... 

( सत्यघटनेवर आधारित )


कथा आवडल्यास नक्की लाईक कर शेअर कर पण लेखिकेच्या नावासहित 
धन्यवाद 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते