खेळ नशिबाचा भाग 5

कथा एका आगळ्या वेगळ्या लग्नाची

शितल ठोंबरे... ( हळवा कोपरा )

खेळ नशिबाचा (भाग 5)

मागील भागात आपण पाहिले.... 

सुशांत आणि नीताच्या मनात प्रेमाचा अंकुर आधीच उमलला होता... आता हा अंकुर हळूहळू विस्तृत रूप घेऊ लागला.. दोघांचे फोनवर बोलणे सुरु होते... त्यामुळे एकमेकांचे विचार, आवडीनिवडी समजत होत्या... दोघेही एकमेकांत गुंतत चालले होते.... लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तशी... दोघांच्याही मनाची आतुरता वाढू लागली... इतक्या वर्षात एकमेकांना न ओळखणारे, न भेटणारे ते  दोन जीव... पण काही दिवसातच एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्यासारखे वाटत होते... 

सुशांत आणि नीताचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं... बऱ्यापैकी लग्नाची तयारी झाली होती.... आणि तेव्हाच नेमके

आता पुढे.... 

सुशांत बँकेत कामाला होता... आर्थिक स्थिती ही चांगली होती पण तरीही त्याची स्वतः ची गाडी नव्हती... तो पब्लिक ट्रान्सपोर्ट नेच प्रवास करायचा... त्याने बऱ्याचदा गाडी घेण्याचा प्रयत्न केला पण मायाकाकूनी त्याला गाडी घेऊ दिली नाही.... त्याला कारणही तसेच होते... 

सुशांत 5वर्षांचा असताना एका बाईक अपघाताने त्याच्या बाबांचे प्राण हिरावून घेतले....त्याघटनेचा मायाकाकूनी चांगलाच धसका घेतला होता.. बाईक म्हणजे अपघात हेच समीकरण त्या जुळवून बसल्या होत्या.... त्यामुळे सुशांत ची इच्छा असूनही केवळ आईच्या प्रेमापोटी त्याने गाडी घेण्याचा विचार सोडून दिला... आणि बसनेच प्रवास करू लागला... 

त्यादिवशीही  सुशांत नेहमीप्रमाणे संध्याकाळी बँकेतून बाहेर पडला... आपल्या नेहमीच्या बस स्टॉप वर येऊन तो बसची वाट पाहू लागला... दिवस भराच्या कामाने तो चांगलाच थकला होता... लग्न आठ दिवसावर आलं होतं... त्याने बँकेतून आठ दिवसांची रजा घेतली होती... आज बँकेतील शेवटचा दिवस... आपण नसताना कोणत्याही गोष्टीसाठी कामाचा खोळंबा नको म्हणून त्याने आपली सर्व कामं आजच संपवली... 

त्यात अनेक दिवसापासून लग्नाची तयारी करण्यासाठी त्याची चांगलीच धावपळ होत होती... घरात इतर कोणी पुरुष मंडळी नसल्याने सर्व काही सुशांतलाच पहावं लागत होतं... या सगळ्याचाच थकवा त्याच्या चेहर्यावर आणि शरीरावर दिसत होता... 

सुशांत विचार करीत होता... उद्यापासून रजेवर आहे तो थोडा आराम मिळेल अन उरलेली कामे ही करता येतील... तेवढ्यात बस चा हॉर्न वाजला आणि सुशांत विचारांच्या तंद्रीतून जागा झाला... बस आधीच प्रवाश्यांनी खचाखच भरली होती... त्यात बस स्टॉप वरही तोबा गर्दी होती... पण सुशांत ला बस मध्ये चढण्याशिवाय पर्याय नव्हता... कारण तो ज्या मार्गावरून प्रवास करायचा तिथे एक बस गेली की पुन्हा अर्ध्या तासानेच बस असे... सुशांत खूप थकला होता.... ही बस सोडून पुन्हा अर्धा तास दुसऱ्या बसची वाट पाहण्याची त्याची मुळीच तयारी नव्हती....आणि म्हणूनच मनाचा हिय्या करून तो बसमध्ये चढला... 

बसचा दांडा धरून तो अर्धवट लोम्बकळलेल्या स्थितीतच होता की बस सुरु झाली... बस काही अंतरावरच गेली असेल... स्पीड ब्रेकर वरून जाताना बसला जोरात धक्का बसला त्या धक्क्यासरशी सुशांत ची बसच्या दांड्यावरची पकड सैल झाली... वरच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या माणसाचा धक्का सुशांत ला लागला आणि तो बस च्या बाहेर फेकला गेला... बसच्या मागील दारातून सुशांत खाली पडला...तो उठण्याचा प्रयत्न करणार तोच मागून येणार्या कार ची जोरदार  धडक सुशांतला बसली...सुशांतच्या दोन्ही  पायावरून कारचे पुढील चाक गेले... 

बस ड्रॉयव्हर ने बस थांबवली... बस मधील सगळे प्रवासी ही धावत आले... कारवाल्याने आपली कार थांबवली... लोकांच्या मदतीने सुशांत ला कार मध्ये बसवलं... आणि जवळच्याच हॉस्पिटल मध्ये भर्ती केलं... त्याच्या डोक्याला मार लागला होता... रक्तस्त्राव ही होत होता... 

डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरु केले... पायावरून कार चे चाक गेल्याने.. सुशांत चे दोन्ही पाय जखमी झाले होते... दोन्ही पायाचे हाड मधेच क्रॅक झाले होते... वेदनांनी सुशांत विव्हळत होता... डॉक्टरानीं तातडीने उपचार सुरु केले... त्यामुळे रक्तस्त्राव थांबला... 

सुशांत ला हॉस्पिटल मध्ये भरती करणाऱ्या पैकी एकाने सुशांत चं सामान चेक केलं... त्याचा पत्ता मिळवला... त्याच्या घराचा फोन नंबर ही मिळाला... सुशांतचा फोन तर आपटला गेल्याने फुटला होता... मिळालेल्या नंबर वर त्या व्यक्तीने कॉल केला... तो नंबर सुशांत च्या आईचाच होता... 

फोन वरच सुशांतच्या अपघाताची बातमी मिळाली अन मायाकाकू पुरत्या कोसळल्या... ज्या गोष्टीची भीती घेऊन आजवर त्या जगत होत्या तेच त्यांच्या आयुष्यात पुन्हा घडलं होतं... त्यांनी कसबसं स्वतः ला सावरलं आणि सुमनवहिनीना फोन केला... त्यांना घेऊन त्या तातडीने हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या... सुशांत ला त्या अवस्थेत पाहिलं आणि मायाकाकूना भोवळच आली... सुमनवहिनीची धांदल उडाली... मायाकाकूना पाहू की सुशांत च्या ऑपरेशनचे पेपर वर्क पूर्ण करू... 

डॉक्टरानी सुशांतचं  ऑपरेशन तातडीने करावं लागेल असं सांगितले... अन्यथा तो आपले दोन्ही पाय गमावून बसेल त्यातही ऑपरेशन किती यशस्वी होईल सांगता येत नाही... हॉस्पिटल स्टाफ च्या मदतीने सुमनवहीनी नी  आधी मायाकाकूना ऍडमिट करून घेतलं... कारण सुशांत ला या अवस्थेत पाहून  त्यांचीही  तब्बेत बिघडली... 

डॉक्टर ला भेटून सुशांतच्या ऑपरेशनची सगळी प्रोसिजर पार पाडली... डॉक्टरानी ऑपरेशन ला सुरुवात केली... सुमनवहीनी देवाला हात जोडत होत्या... इतक्या गुणी मुलाच्या आयुष्यात हे असं घडावं... त्यातही लग्न आठ दिवसावर आलेलं असताना.... का रे देवा ही अशी शिक्षा देतो आहॆस... आता कुठे सुशांत च्या आयुष्याला सुरुवात होणार होती... त्यात हा इतका मोठा आघात दिलास... इतका रे कसा निष्ठुर तू.... त्याच्या माउलीने आधी आपलं सौभाग्य गमावलं... आपल्या माणसांची साथ सुटली... ज्याच्या साठी आयुष्य भर खस्ता काढल्या त्यांच्या नशिबी का हा त्रास दिलास... 

आणि नीता तिचा काय बरं दोष डोळ्यात भावी आयुष्याची स्वप्नं घेऊन ती सुशांत ची वाट पहात असेल..... काय सांगू तिला??? 

सुमनवहीनीना अश्रू अनावर झाले होते... मायाकाकू शुद्धीवर आल्या तश्या आपल्या खोलीच्या बाहेर पडल्या सुशांत चं ऑपेरेशन सुरु होतं त्या ऑपरेशन थेटर बाहेर येऊन उभ्या राहिल्या... सुमन वहिनींनी त्यांना धीर दिला... काळजी करू नको सगळं काही ठीक होईल पण तू धीर सोडू नकोस आता या क्षणाला तुझ्या धीराची सुशांत ला गरज आहे... तूच कोलमडलीस तर त्याला कोण सावरणार... मायाकाकूचे अश्रू काही केल्या थांबेनात... 

काही तासातच डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी झालं होतं... दोन्ही पायात रॉड टाकले होते... सुशांत चालू शकणार होता मात्र पूर्वीसारखा नाही... आणि त्यातही त्याला पूर्णपणे बरे व्हायला किती वेळ लागेल सांगू शकत नाही महिना, सहा महिने की वर्ष... 

मायाकाकू आणि सुमानवाहिनींना काय बोलावे सुचेना... आठ दिवसावर सुशांत चं लग्न आलं आहे... आणि तो कधी पूर्णपणे बरा होईल हे डॉक्टर ही धड सांगत नाहीत आता करायचं तरी काय???... नीता आणि तिच्या कुटुंबाला अजूनही सुशांत च्या अपघाताची बातमी दिली नव्हती... काय होईल त्यांची अवस्था??  काय निर्णय घेतील??? ... दोघीनाही प्रश्न पडले... 

सुमन वहिनींनी हिम्मत एकवटून नीताच्या घरी फोन केला... आणि त्यांना सुशांतच्या अपघाताची बातमी दिली... लग्नाच्या तयारीत असणारे सगळ्यांनाच धक्का बसला.. नीता आणि तिचे आईबाबा लागलीच गाडीला बसले आणि सुशांतला हॉस्पिटलला भेटायला आले...

तोपर्यंत इकडे सुशांत शुद्धीवर आला होता आपल्या पायांची ही अवस्था झालेली पाहून तो मानसिकरित्या खचला... कोणालाही भेटण्याची त्याची इच्छा नव्हती... नीताला आणि तिच्या कुटुंबाला भेटायला त्याने साफ नकार दिला....आपल्या या अवस्थेत तो कोणालाच सामोरं जाऊ इच्छित नव्हता... अगदी नितालाही... 

नीता मात्र त्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी तळमळत होती... पण सुशांतच्या या अवस्थेत त्याच्या मनाविरुद्ध वागणं पटत नव्हतं... त्यामुळे मायाकाकू आणि सुमनवहिनींशी बोलून निताचं कुटुंब निघालं ... पण नीताने मात्र आपल्या आई बाबांसोबत परत घरी जायला नकार दिला... 

मायकाकूंना आधाराची गरज आहे... सुशांत ला ही माझी गरज आहे.. तो आता मला भेटत नाही पण कधीतरी तो मला नक्कीच भेटेल... इथे थांबून किमान मी त्यांच्या दुःखात सहभागी तरी होते... तसंही घरी आल्यावर माझं लक्ष इकडेच असेल... आणि अडचणीच्या काळात आपल्या कुटुंबाला असं एकटं सोडणं मला मुळीच पटत नाही आहे... 

नीताच्या या निर्णयाचा सगळ्यांनी स्वीकार केला... नीताला मायाकाकू आणि सुमनवहिनी च्या स्वाधीन करून नीताचे आई बाबा घरी परतले.... 

नीता सुशांत ची काळजी घेण्यासाठी थांबली खरी पण सुशांत नीताला भेटेल का??... आठ दिवसांवर आलेलं दोघांचं लग्न होईल की हे नातं या अपघाताचं बळी पडेल...??? 

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हांला पुढच्या आणि शेवटच्या भागात नक्कीच भेटतील.... 

तुम्ही कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... काही वैयक्तिक कारणास्तव हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे पण पुढील भाग घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल... 
धन्यवाद...

🎭 Series Post

View all