Login

खेळ नशिबाचा भाग 4

एका आगळ्या वेगळ्या नात्याची कहाणी

शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

खेळ नशिबाचा.... (भाग 4)

मागील भागात आपण पाहिले.... 

सकाळ पासून सुशांत शांत शांत आहे हे पाहून काकूंना ही समजेना सुशांत च्या मनात काय आहे… त्यात रात्री त्याने वेळ मागितला होता… त्यामुळे आता लगेच त्याला लग्नाबद्दल विचारणं ठीक नाही… म्हणून काकू ही शांत बसल्या..

नाश्ता आटपून आपली तयारी करून सुशांत निघाला… त्याने आपला टिफिन बॅग मध्ये भरला… शूज घातले… दारापर्यंत पोहचला… मागे वळत म्हणाला… तसं या रविवारी मी घरीच आहे… काहीच काम नाही…

मायाकाकू समजून गेल्या सुशांतला काय म्हणायचं आहे… मी आजच सुमनवहिनींकडे जाते आणि रविवारचा कार्यक्रम
ठरवून येते…

आता पुढे..... 

सुशांत कामावर जाताच घाईगडबडीत मायाकाकूंनी आपलं काम आटपलं... कधी एकदा सुमन वहीनी कडे जाते आणि रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नक्की करते असं झालं होतं... आज त्या खूपच आनंदी होत्या... इतके दिवस सुशांतच्या लग्नाची फक्त स्वप्नं पाहत होत्या पण आता हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरणार होतं... 

सुमनवहिनींकडे जाऊन त्यांनी सुशांतला मुलगी पसंत आहे आणि त्याने रविवारीच पाहण्याचा कार्यक्रम ठरवायला सांगितला आहे ही  आनंदाची बातमी सांगितली... 

सुमनवहीनी ही खुश झाल्या... मायाकाकू समोरच त्यांनी आपल्या मावस भावाला दिनेशला फोन केला... सुशांतचं स्थळ नीता  साठी चालून आलं आहे... मुलगा आणि त्याचं कुटुंब माझ्यामाहितीतीलच आहेत...एकुलता एक  मुलगा आहे... आणि कामालाही चांगला बँकेत आहे.... दोघांचा जोडा अगदी  शोभून दिसेल.... तू म्हणत असशील तर येत्या रविवारी मुलाकडची मंडळी पाहण्याचा कार्यक्रम करू म्हणतात... 

दिनेश म्हणाला... तू नीता साठी स्थळ सुचवलं आहॆस म्हटल्यावर मला पुढे काही चौकशी करायची गरजच नाही... मी रविवारच्या तयारीला लागतो... 

सुशांत आणि नीताच्या दाखवण्याचा कार्यक्रम ठरला... ठरल्याप्रमाणे रविवारी सुशांत, त्याची आई मायाकाकू आणि सोबत सुमनवहिनी दिनेशच्या घरी पोहचले... 

दिनेशने पाहुण्यांच्या स्वागताची तयारी उत्तम केली होती... आर्थिक स्थिती बेताची असली तरी घरात नावं  ठेवावं असं काही नव्हतं... पैश्यांनी नसलं तरी संस्कारानी घर समृद्ध होतं...

नीता ची आई नीताला बाहेर घेऊन आली... निळसर रंगाची साधीच साडी पण नीताच्या गोऱ्या रंगावर अगदी खुलून दिसत होती... चेहऱ्यावर कसलाही मेकअप चा थर नाही.... त्यामुळे तिचं खरं सौन्दर्य खुललं होतं... लांब केसांची सैलसर वेणी.... सुशांत निताकडे फक्त पाहतच राहिला... साधेपणातही इतकं सौन्दर्य असू शकतं हे त्यानं आज पहिल्यांदाच पाहिलं... फोटोत पाहिलेली आणि आता समोर दिसत असलेली नीता यात तसूभरही फरक नव्हता... 

वडिलांनी इशारा करताच नीताने सगळ्यांना नमस्कार केला... मायाकाकूनी सुमनवहिनी करवी नीताची ओटी भरली... सोबत आणलेली साडी, नारळ, पेढे देऊन मुलगी पसंत असल्याचं जाहीरच केलं... 

दिनेशला नीता साठी सुशांत चं स्थळ पसंत पडलं... आपल्या पोरीने नशीब काढलं... माणसंही चांगली आहेत त्यामुळे त्याने या लग्नाला लगेच होकार दिला... 

पण तेवढ्यात सुशांत ने अट घातली... निताशी त्याला एकांतात बोलायचं होतं... पण ते ही सगळ्यांची संमती असेल तरच.... यावर काय बोलावं कोणालाच काही समजेना... मायाकाकूना ही ह्याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्याही अवाक झाल्या... शेवटी सुमानवहिनींनी पुढाकार घेतला... नवी पिढी आहे... नवे विचार आणि तसंही संसार त्यांना करायचा आहे तर आपणही त्यांना बोलायची संधी देऊयात असं म्हणून सगळ्यांना मनवलं... 

सुशांत आणि नीता ला बोलण्यासाठी एकांत देण्यात आला... बाहेर असणाऱ्या बागेत दोघानाही पाठवण्यात आलं... नीता चा स्वभाव शांत लाजराबुजरा त्यात पहिल्याच भेटीत लग्नाला होकार मिळाला आणि आता हा मुलगा माझ्याशी एकांतात बोलायचं म्हणतोय... या विचारांनी ती चांगलीच भाम्बावली होती... 

थोडा वेळ शांततेत गेला... आणि सुशांत नेच बोलायला सुरुवात केली... मी सुशांत... बँकेत कामाला आहे... पगारही चांगला आहे... बाबा मी  लहान असतानाच देवाघरी गेले... मी आज जो कोणी आहे ते फक्त माझ्या आईमुळे... माझी आई माझं सर्वस्व आहे... तिला त्रास होऊ नये म्हणून आजवर मी लग्नाला तयार नव्हतो...माझ्याशी जी मुलगी लग्न करेल तिला माझ्या आईची जबाबदारी स्वीकारावी लागेल....तिच्याशी जुळवून घ्यावं लागेल... माझ्या मित्रांचे संसार पाहिलेत मी फक्त वाद आणि वादच... मला ते नको आहे म्हणून मी कधी कोणाच्या प्रेमातही पडलो नाही... कारण प्रेमात पडलो तर लग्न करावं लागेल....  पण तुझा फोटो पाहिला अन माझ्याही नकळत  मी तुझ्या प्रेमात पडलो... तू विचार करत असशील असं कोणी प्रेमात पडतं का??? 

पण मी पडलो... तुझ्या साधेपणाच्या  प्रेमात... तुझ्यातला तो साधेपणा मला भावला.... आणि आज तुला प्रत्यक्षात पाहिलं... तू अगदी तशीच आहॆस... जसा मी विचार केलेला... 

सुशांत बोलत होता अन नीता खाली मान घालून ऐकत होती... त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी तिला कळेचना... 
,  
हे बघ नीता मला तू आवडली म्हणून मी इथवर तुला पाहायला आलो... ही झाली माझी पसंती... माझ्या आईलाही तू पसंत आहॆस... तुझे बाबा ही या लग्नाला तयार झालेत.. पण मला तुझं मत हवंय... तू या लग्नाला तयार आहॆस का??... फक्त आईवडिलांनी ठरवलं म्हणून या लग्नाला होकार देऊ नको... मी तुला पसंत असेन आणि माझ्या आईची जबाबदारी मान्य असेल तरच या लग्नाला होकार दे.... 

नीता सुशांत चं बोलणं ऐकण्यात इतकी गुंग झाली होती की त्याच बोलणं संपलं तरी ती त्याच्याकडेच एकटक पाहत होती... सुशांतने तिला पुन्हा आवाज दिला... नीता ऐकते आहॆस न मी काय म्हणतोय... त्याच्या आवाजाने नीता भानावर आली... 

हो ऐकलं मी सर्व... तुम्ही जे बोललात त्यातला शब्द न शब्द ऐकला... आणि असं वाटलं ऐकतच राहावं...तुम्हाला मी पसंत आहे.... पण तुम्ही माझ्या पसंतीचाही विचार केलात... ऐकून फार बरे वाटले... तुमचे विचार ऐकून तुम्हाला नाही म्हणणारी मुलगी वेडी ठरेल...मुलीच्या मतालाही मान देणारा नवरा कोणाला नको असेल... माझा या लग्नाला होकार आहे... राहिला प्रश्न तुमच्या आईचा... माझ्या आई बाबांच्या संस्कारांना गालबोट लागेल असं वर्तन मी कधीच करणार नाही... 

सुशांत आणि नीता दोघांचाही लग्नाला होकार मिळताच... दोन्ही कडील मंडळी खुश झाली... जवळचाच मुहूर्त पाहायचा आणि लग्नाचा बार उडवायचा असं ठरलं... मायाकाकूंनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची सगळी जबाबदारी स्वतः वर घेतली... नवऱ्या मुलीसोबत शकुनाचा सवा रुपया आणि नारळ फक्त द्यायला सांगितले...

दोन्हीकडची मंडळी लग्नाच्या तयारीला लागले... दिनेश ने मायाकाकू आणि सुशांत ला सांगितले... मान्य आहे आमची आर्थिक स्थिती बेताचीच आहे पण तरीही नीताच्या लग्नाची आम्ही ही काही स्वप्न पाहिली आहेत... आणि त्याची सोय आम्ही आधीच केली आहे... आमच्या कडून जेवढं जमेल तेवढं आम्ही करू... नाही म्हणू नका.. 

मायाकाकू आणि सुशांत ने दिनेशचा हा प्रस्ताव स्वीकारला... खरेदी, नातेवाईकांची यादी, जेवणाचा मेनू सगळ्याचं गोष्टींची जय्यत तयारी सुरु झाली... 

सुशांत आणि नीताच्या मनात प्रेमाचा अंकुर आधीच उमलला होता... आता हा अंकुर हळूहळू विस्तृत रूप घेऊ लागला.. दोघांचे फोनवर बोलणे सुरु होते... त्यामुळे एकमेकांचे विचार, आवडीनिवडी समजत होत्या... दोघेही एकमेकांत गुंतत चालले होते.... लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तशी... दोघांच्याही मनाची आतुरता वाढू लागली... इतक्या वर्षात एकमेकांना न ओळखणारे, न भेटणारे ते  दोन जीव... पण काही दिवसातच एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्यासारखे वाटत होते... 

सुशांत आणि नीताचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं... बऱ्यापैकी लग्नाची तयारी झाली होती.... आणि तेव्हाच नेमके 

सुशांत आणि निताचं लग्न होण्यापूर्वी नेमकं काय घडलं... या दोघांचं लग्न होईल का??  जाणून घेऊयात पुढच्या भागात 

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

🎭 Series Post

View all