खेळ नशिबाचा भाग 3

Katha eka aagalya wegalya natyachi

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

खेळ नशिबाचा (भाग 3)

मागील भागात आपण पाहिलं….

फोटो नीट निरखून पाहत.. वहीनी मुलगी चेहर्यावरून तर खूपच सालस आणि गुणी दिसतेय…

मी म्हटलं नव्हतं अगं मुलगी खूप चांगली आहे… घरातल्या कामातही हुशार आहे… अगदी तुझ्या घरात साखरेसारखी विरघळून जाईल बघ… सुशांत आणि नीताचा जोडा तर अगदी शोभून दिसेल… कोणाचीही दृष्ट लागण्यासारखा…

हो वहिनी… हे आपलं मत झालं पण या सुशांत ला ही पटायला हवं ना… मुलगी पहायला ही नकार देतो…. काय करायचं मग मी तरी पण आता नाही इतकी चांगली मुलगी मी हातची जाऊ देणार नाही बरं… आज रात्री आला की त्याला फोटो दाखवते… पाहू फोटो पाहून कसा नाही म्हणतो ते…

आता पुढे….

मायाकाकूंनी सुमनवहिनींचा निरोप घेतला… नीताचा फोटो घेऊन त्या घरी आल्या… आज दिवस भर राहून राहून त्या नीताचा फोटो पाहत होत्या… सुशांत आणि नीताला सतत आपल्या नजरेसमोर आणत… दोघांचा जोडा कसा दिसतोय ते पाहण्याचा प्रयत्न करत होत्या…प्रत्येक वेळी हीच ती मुलगी जी आपण आपल्या सुशांत साठी शोधत होतो असं त्यांना वाटे..

बस आता रात्री एकदा का सुशांत घरी आला की त्याच्या समोर हा फोटो धरते आणि त्याला लग्नाला तयारच करते… फोटो पाहून नाही कसा म्हणतोय तेच बघते… दिवस भरात त्यांनी कितीतरी वेळा देवाला प्रार्थना केली असेल… सुशांत लग्नाला हो म्हणावा म्हणून…

तिन्हीसांजेला त्यांनी देवाजवळ दिवा लावला… मनोभावे देवाची प्रार्थना केली… हे परमेश्वरा… माझा मुलगा माझ्या सुखासाठी लग्नाला नकार देतोय… लहानपणापासून एकच जिव्हाळ्याचं नातं त्याला माहीत आहे ते म्हणजे आईचं… इतर नाती तर त्याच्या लहानपणीच त्याच्या पासून दुरावली… आता या वयात त्याला सोबत हवी ती अश्या व्यक्तीची जी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याची कमी भरून काढेल… शेवटी आयुष्यात जोडीदार हवाच ना….. कृपा कर माझ्यावर आणि सुशांत ला या लग्नासाठी तयार कर…

दारावरची बेल वाजली… मायाकाकूंनी दार उघडले… आपल्या हसतमुख चेहऱ्याने सुशांतने प्रवेश केला…सुशांत घरात येण्यापूर्वीच मायकाकूंनी सुशांतला फोटो कसा दाखवायचा याची सगळी तजवीज केली होती… कारण तो फोटो पहायला सहजासहजी तयार होणार नाही हे त्यांना चांगलच ठाऊक होतं…

सुशांतला पाणी देऊन त्या चहा टाकायला किचन मध्ये गेल्या… तोवर सुशांतला फ्रेश व्हायला सांगितले… सुशांत फ्रेश होऊन येताच त्याच्या हातात गरमागरम चहा आणून दिला…

मी सुमनवहिनीकडे जाऊन आले सकाळी.. त्यांच्याशी बोलणं झालं माझं…

मायाकाकूच बोलणं मध्येच तोडत सुशांत म्हणाला… आई आपण या विषयावर नंतर बोलूयात का???... मी आज खूप थकलोय…

सुशांतच्या प्रतिक्रियेची आधीपासूनच कल्पना असल्याने मायाकाकूनी आपला प्लॅन बी आखूनच ठेवला होता…

ठीक आहे काही हरकत नाही तू म्हणतो आहॆस तर बोलूयात नंतर..

बरं ऐक वरण आणि भाजी, भात तयार आहे..  पोळ्या लाटायच्या तेवढ्या राहिल्यात… मी पटकन गरम पोळ्या करते तोवर तू टिव्ही पाहत बस… असं म्हणून मायाकाकू किचन मध्ये गेल्या… सुशांत टीव्ही पाहत निवांत बसला होता तोच आतून मायाकाकूंनी आतून आवाज दिला

अरे सुशांत दुपारी लाईट बिल आलय… टेबलवर ठेवलंय… बघशील का जरा…

सुशांतला घरातलं कोणतंच बिल थकलेलं आवडत नसे.. बिल आलं की सर्वात आधी ते भरून मोकळं होण्याकडे त्याचा कल असायचा… पाहतो म्हणत तो जागेवरून उठला… टेबल वरचा बिलाचा कागद हाती घेतला… तोच त्यातून खाली काहीतरी पडल्याचं जाणवलं… सुशांत ने खाली वाकून तो कागद उचलला… तोच त्याच्या लक्षात आलं… हा कागद नाही कोणाचातरी फोटॊ आहे… उलटा पडलेला फोटो त्याने सरळ केला आणि त्या फोटोकडे तो पाहतच राहीला…
त्याच्या नकळतच फोटोतल्या काळ्याभोर नजरेत आणि चेहर्यावरील गोड हास्यात तो हरवून गेला….

सुशांत अरे बिल सापडलं का??... पुन्हा किचन मधून आवाज आला..

भानावर येत अच्छा तर आईचा हा प्लॅन होता… मी फोटो पाहत नाही म्हटल्यावर तिने असा आणला काय हा फोटो माझ्या समोर… ठीक आहे…

सुशांतने पण शांतपणे म्हटलं… हो आई सापडलं… बिल किती आलं तेच पाहत होतो.. उन्हाळ्यामुळे लोड शेडींग होतं तरी बिल काही कमी नाही आलं गा आई आपलं नेहेमीप्रमाणेच आहे....

थोडं गोंधळून मायाकाकू… याला बिल सापडलं मग बिलात गुंडाळलेला फोटो कसा नाही पाहीला याने..

अरे सुशांत बिलासोबत दुसरं काही नाही का रे तिथे…

सुशांतने फोटो खिशात लपवला… आईची फिरकी घेण्यासाठी तो म्हणाला नाही गं इथे काही नाही… तू काही ठेवलं होतस का??? 

थोडं चाचपडत… नाही रे मी कशाला काही ठेवेन मी तर सहजच म्हटलं… आपल्याच मनाशी मायाकाकू बडबडल्या… अरे देवा पडला की काय मी फोटो कुठे … बिलात नाही? तर मग कुठे आहे गेला बरं फोटो … देवा कारे माझी अशी परीक्षा घेतोस आपले पीठाने भरलेले दोन्ही हात जोडत त्या म्हणाल्या… हात धुवून घाईघाईत बाहेर आल्या…

अरे सुशांत खरंच दुसरं काहीच नव्हतं का बिलासोबत…

नाही गं आई पण मला सांग तू का मला सारखं विचारते आहॆस… तू एवढ्या काळजीने विचारते आहॆस याचा अर्थ नक्कीच काही गडबड आहे…

मायाकाकू चाचरत म्हणाल्या… गडबड काहीही काय बोलतोस रे माझी कसली आलीय गडबड…
हो का मग एवढी अस्वस्थ का झाली आहेस काही हरवल्यासारखं…

काहीच नाही रे असंच आपलं… चल मी पटकन पोळ्या करते अन जेवण वाढते… विषय टाळत काकू म्हणाल्या

आपल्या हातातील फोटो आईच्या समोर धरत… हेच लपवलं होतंस न बिलात… मी पहावं म्हणून…

मग काय करू तू फोटोही  पहायला तयार नव्हतास .. मग मीच काढली युक्ती शोधून…

(हसत )...एकदम superb होती तुझी युक्ती… फोटो माझ्यापर्यंत पोहचवण्याची… आवडली बरं मला…

युक्ती आवडली आणि फोटोतील मुलगी… ती कशी वाटली… सांग ना रे सुशांत… मला तर मुलगी पसंत पडली… आता सगळं तुझ्यावर आहे… तू एकदा हो म्हणालास की लगेचच येत्या रविवारी पाहण्याचा कार्यक्रम उरकून टाकू….

आई इतकी घाई नको करू मला थोडा वेळ हवाय…
(नाराज होऊन )ठीक आहे तू म्हणशील तसं… इतके दिवस थांबलेच होते… अजून थोडं थांबते…

सुशांत आणि मायाकाकूनी जेवण आटोपलं… सुशांत आपल्या खोलीत झोपायला गेला… रोज कामाच्या दगदगीनं गादीवर पडल्या पडल्या निद्रेच्या अधीन होणारा सुशांत आज मात्र त्याचे डोळे त्याला दगा देत होते… डोळे बंद केले की फोटोत पाहिलेला चेहरा नजरे समोर येत होता… तिचे ते डोळे… काळेभोर…कोणीही त्या नजरेत सहज हरवून जाईल असे … सुशांतलाही त्या डोळ्यांनी आपलंस केलं… त्याचं हृदय जणू इतकी वर्ष तिचीच वाट पहात होतं…

इतक्या मुली असायच्या आसपास… कॉलेजात आणि आता बँकेत ही पण कधीच कोणाला पाहून हृदयाचा ठोका चुकला नव्हता… मग या फोटोतल्या मुलीत असं काय आहे बरं ज्याने माझ्या हृदयाचा नेमका ठाव घेतला…

सुशांत विचार करीतच झोपी गेला… सकाळी उठला खरा पण आज त्याला फारच वेगळं फील होत होतं… पण काय त्याचं त्यालाच समजत नव्हतं… रात्रीच्या फोटोतल्या मुलीची जादू तर नव्हती… आपला नायक नीताच्या प्रेमात पडला होता.. ते ही एका नजरेत.. आता आईला कसं सांगायचं… इतकं दिवस लग्न करायचे नाही म्हणून अडून बसलो होतो… आता लगेच हो म्हणालो तर आई काय विचार करेल बरं… आणि मला मुलगी आवडली तरी तिला ही मी आवडायला हवा ना… जाऊ दे उगाच नको ती स्वप्नं पहायला नको…

सकाळ पासून सुशांत शांत शांत आहे हे पाहून काकूंना ही समजेना सुशांत च्या मनात काय आहे… त्यात रात्री त्याने वेळ मागितला होता… त्यामुळे आता लगेच त्याला लग्नाबद्दल विचारणं ठीक नाही… म्हणून काकू ही शांत बसल्या..

नाश्ता आटपून आपली तयारी करून सुशांत निघाला… त्याने आपला टिफिन बॅग मध्ये भरला… शूज घातले… दारापर्यंत पोहचला… मागे वळत म्हणाला… तसं या रविवारी मी घरीच आहे… काहीच काम नाही…

मायाकाकू समजून गेल्या सुशांतला काय म्हणायचं आहे… मी आजच सुमनवहिनींकडे जाते आणि रविवारचा कार्यक्रम ठरवून येते…

सुशांत जिच्या नजरेने घायाळ झाला… तिला पसंत पडेल का सुशांत??? सुशांत चं आपल्या आईवरचं प्रेम असंच राहील का???... जाणून घेऊयात पुढच्या भागात…
सदर लेखाच्या प्रकाशनाचा व वितरणाचा हक्क लेखिकेकडे राखीव आहे… कथा आवडल्यास लाईक करा.. शेअर करा पण लेखिकेच्या मूळ नावासहित

🎭 Series Post

View all