Login

खेळ नशिबाचा भाग 2

कथा premaa

शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

खेळ नशिबाचा…( भाग 2)

कथेच्या पहिल्या भागाची लिंक खाली दिली आहे :
https://m.facebook.com/story.php?story_fbid=391337811823184&id=100028409054438

सुशांतच्या लग्नाची स्वप्नं रंगवत…. मायाकाकू रात्री कितीतरी वेळ जाग्या होत्या… पहाटे पहाटे कुठे त्यांचा  डोळा लागला… जाग आली ती कसल्याशा आवाजाने… मायाकाकू गडबडीत उठल्या… सुशांतच्या लग्नाचे स्वप्नं अजूनही डोळ्यांत तरळत होतं…. आपण स्वप्नं पाहत होतो तर अजून…. उठायला आज उशीरच झाला… तेवढ्यात पुन्हा कसलासा आवाज आला… आवाजाचा कानोसा घेतला तर आवाज त्यांच्याच किचन मधून येत होता… मी अजून झोपली आहे तर मग किचन मध्ये कोण खुडबुड करतंय… 

अंथरून आवरून पटकन किचन मध्ये शिरल्या तो समोर सुशांत उभा… गुड मॉर्निंग आई झाली का झोप?? बरं झाली आलीस… मी आता तुलाच उठवायला येणार होतो… चल पटकन फ्रेश हो… आणि मस्त गरमागरम चहा घे… सुशांत स्पेशल चाय…. (हसतो)... आणि हो मस्त गरमागरम पोहे ही तयार आहेत माँ साहेब… 

अरे काय हे तू कशाला हे सगळं करत बसलास… मला आवाज नाही का द्यायचा… मला पण आज जाग कशी आली नाही काय माहीत …. तुला कामावर जायचंय ना उशीर होईल… थांब मी पटकन चार पोळ्या आणि तुझ्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या करते.. 

अगं हो हो थांब… काही घाई करू नकोस आज बँकेत पार्टी आहे… सो मी टिफिन नेणार नाही… त्यामुळे त्याची काळजी नसावी… 

चहा नाश्त्याचा म्हणशील तर आज जरा लवकरच जाग आली.. तुला पाहिलं तू गाढ झोपली होतीस… रात्री नक्कीच माझ्या लग्नाच्या विचाराने तुला झोप लागली नसणार(हसतो )… म्हणून मुद्दामहूनच तुला उठवलं नाही…. वेळ होता तर बनवला आज तुझ्या साठी चहा नाश्ता.. 

अरे पण ही काय तुझी कामं आहेत का ??...आणि ते ही मी घरात असताना तुला हे करावं लागलं… 

का?? तू रोज करतेस की माझ्यासाठी… माझा चहा, नाश्ता, टिफिन, कपडे,  जेवण, माझी रूम आवरणं, घर सांभाळणं सगळं तूच करतेस ना रोज… मग माझ्या लाडक्या आई साठी मी एक दिवस नाश्ता बनवला तर कुठे बिघडलं… आई आता अशीच बोलत बसणार आहॆस का?? … जा ना पटकन फ्रेश हो…. नाहीतर चहाचं आता  कोल्ड्रिंक होईल.. आणि पोहे ही थंड खावे लागतील… मला खूप भूक लागली आहे…. प्लीज लवकर…

(हसतच )...आलेच लगेच… आणि काही काळजी करू नको… ना तुला कोल्ड्रिंक प्यावं लागणार आणि ना थंड पोहे खावे लागणार... मी फ्रेश होऊन आले  की  पटकन गरम करून देते… 

मायाकाकू फ्रेश व्हायला जातात… सुशांत हॉल मध्ये टीव्ही पाहत बसतो… चहा पिताना  बातम्या ऐकणे त्याचा आवडता छंद… याच वेळी काय तो निवांत बसलेला  असतो… 

मायाकाकू फ्रेश होतात…ट्रे मध्ये दोघांसाठी गरमागरम चहा आणि पोहे घेऊन येतात… बातम्या पाहत दोघेही नाश्त्याचा आस्वाद घेतात…मायाकाकूंच्या लक्षात येतं… आज सुशांतचा मूड जास्तच चांगला आहे… म्हणजे मला जे हवंय ते मला नक्की मिळणार… 

नाश्ता करून सुशांत आपली तयारी करतो आणि बँकेत जायला निघतो.. तो दारात जातोय तोच काकू मागून टोकतात… सुशांत रात्री काय बोलणं झालं लक्षात आहे ना… मग मी जाऊ ना सुमनवहिनींकडे… समोरून काहीच उत्तर येत नाही… पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मायाकाकू म्हणतात… मी आज सुमनवहिनींकडे जातेय… जमलंच तर मुलीचा फोटो घेऊन येईन मग पाहूया काय करायचं ते… 

सुशांत आपले शूज घाईघाईने चढवत… आई तुला काय हवं ते कर मी कधी तुला कोणत्या गोष्टी साठी मनाई केली आहे का??? 

तसं नाही रे पण… 

पण बिन काही नाही चल मी निघतो मला उशीर होतोय… बाय…. रात्री कदाचित यायला  उशीर होईल… काळजी करत बसू नको… सुशांत घाईतच घराबाहेर पडला…. 

सुशांतचा होकार मिळाल्याने…. मायाकाकूंचा उत्साह चांगलाच वाढला…सकाळीच सुमनवहिनींकडे जाऊन कामं फत्ते करायचं… नाहीच आवडली मुलगी तर वधूसंशोधनाची मोहीम अशीच चालू ठेवायची...आपल्या मनाशी सगळं ठरवून..  त्यांनी भर भर घरातील कामं आटपली… थेट सुमनवहिनीचं घर गाठलं… दारावरची बेल वाजवली… सुमनवहिनींनीच दार उघडलं… मायाकाकूंना इतक्या सकाळी सकाळी समोर पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं… अगं तू  अशी अचानक… सगळं ठीक आहे ना… ये आत ये…बसं पाणी आणते…  

हो वहिनी सगळं ठीक आहे… कशाला उगाच काळजी करताय…

सुमनवहिनी पाणी घेऊन येतात.. मायाकाकूंना देत… घे पाणी पी आधी… दम बघ किती लागलाय… इतक्या घाईघाईने यायला झालं तरी काय.. 

 पाण्याचा घोट घेत… वहीनी कारणच तसं होतं… काल रात्री सुशांतशी लग्नाबद्दल बोलून घेतलं एकदाच…. त्याचा होकार मिळाला मग मला कुठे चैन पडतेय… तुम्ही मागे तुमच्या नात्यातल्या एका मुलीबद्दल बोलत होतात .. सुशांत साठी.. तिचीच चौकशी करायला आलेय… दुसरं माझं आपलं असं कोण आहे तुमच्याशिवाय… माझ्या अडचणीच्या काळात माझ्या नात्यात गोत्यात नसतानाही तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात आधार दिलात… आता माझ्या सुशांतच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्हीच मला मदत करा… 

हो गं सुशांत साठी एखादं स्थळ पाहायचं असेल तर मला आनंदच होईल… इतक्या सालस गुणी मुलासाठी स्थळपण त्याच्यासारखंच हवं… मी जिच्याबद्दल तुझ्याशी बोलले ती  माझ्या मावस भावाची मुलगी… नीता तिचं नाव.. पोरं खूप गुणी आहे.. शिक्षण ही झालं आहे… घरची गरिबी आहे… पण म्हणतात ना लेक द्यावी श्रीमंताघरी आणि सून करावी गरिबाघरची…थांब माझ्याकडे तिचा फोटो आहे… एकदा सुशांत ला दाखव… बघ काय म्हणतोय…. त्याला मुलगी पसंत पडली तर पुढची पावले उचलायला… उठून आपल्या कपाटात नीता चा ठेवलेला फोटो काढून तो मायाकाकू ला दाखवते.. 

फोटो नीट निरखून पाहत.. वहीनी मुलगी चेहर्यावरून तर खूपच सालस आणि गुणी दिसतेय… 

मी म्हटलं नव्हतं अगं मुलगी खूप चांगली आहे… घरातल्या कामातही हुशार आहे… अगदी तुझ्या घरात साखरेसारखी विरघळून जाईल बघ… सुशांत आणि नीताचा जोडा तर अगदी शोभून दिसेल… कोणाचीही दृष्ट लागण्यासारखा… 

हो हे आपलं मत झालं पण या सुशांत ला ही पटायला हवं ना… मुलगी पहायला ही नकार देतो…. काय करायचं मग मी तरी पण आता नाही इतकी चांगली मुलगी मी हातची जाऊ देणार नाही बरं… आज रात्री आला की त्याला फोटो दाखवते… पाहू फोटो पाहून कसा नाही म्हणतो ते…

मायाकाकू सुशांत साठी स्थळ पाहत आहेत… त्यांना मुलगी ही पसंत पडली आहे पण मग सुशांत होईल का लग्नाला तयार.. आईने पसंत केलेली मुलगी त्याला पसंत पडेल का?? 

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण पुढच्या भागात… 

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत… 

कथा आवडल्यास लाईक करा… शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित….

🎭 Series Post

View all