खेळ नशिबाचा... भाग 1

आयुष्यात अश्या काही गोष्टी घडतात ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं

नमस्कार 
    वाचक मित्रांनों…. कथा तुझी अन माझी… प्रेमापासून लग्नापर्यंत या माझ्या कथामालिकेवर तुम्ही भरभरून प्रेम केलत… त्याबद्दल तुम्हां सर्वांचे मी मनापासून आभार मानते… आज मी तुमच्या भेटीला नवीन कथा मालिका घेऊन आले आहे… आशा करते या कथामालिकेवरही तुम्ही असच प्रेम कराल… तुमचे कमेंट, तुमचे सजेशन नक्कीच स्वीकार्य असतील… 

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

खेळ नशिबाचा…. भाग 1

दारावरची बेल वाजली… तश्या मायाकाकू हातातलं काम सोडून उठल्या… रात्रीचे आठ वाजले होते… आणि ही त्याची येण्याची वेळ होती… त्याची म्हणजे आपल्या कथेच्या नायकाची… सुशांतची…. 

सुशांत मायकाकूंचा एकुलता एक मुलगा… मायाकाकूंचे मिस्टर सुशांत 5वर्षांचा असतानाच एका अपघाताचे बळी पडले…सासरच्यांनी मायाकाकू आणि सुशांत कडे तोंड फिरवले…आधाराला माहेर होते पण फक्त नावापुरते… 

मग मायाकाकूंनी सुशांत साठी कंबर कसली शिक्षण जेमतेम पाचवी पर्यंत झालेलं… नोकरी मिळण्याची आशा नव्हतीच…ओळखीने जवळच असणाऱ्या अगरबत्ती कारखान्यात पॅकिंगचं काम मिळालं… महिना पाच हजार पगार… एवढुश्या तुटपुंज्या पगारात… सुशांतच शिक्षण… दोघांचा खर्च करणं फारच अवघड जात होतं…

 शेवटी काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं...त्यांच्या हाताला उत्तम चव होती… मग काय त्यांच्याच कारखान्यात कामाला असणाऱ्या ज्यांना टिफिन ची गरज आहे… अश्या लोकांना गाठून त्यांना टिफिन पुरवण्याचं काम हाती घेतलं… त्यातून चार पैसे सुटू लागले… किमान दोघांचा खर्च तरी भागू लागला… 

सुशांत लहानपणापासूनच आपल्या आईचे कष्ट पाहत आला होता… त्याला आपल्या आईचा खूप आदर होता… की एक स्त्री असूनही  तिने आपल्या बिकट  परिस्थितीत हार मानली नाही… खंबीर पणे उभी राहिली…

आपल्या आईच्या कष्टांची जाणीव असल्याने त्याने कधीच आपल्या आईला दुखावले नाही… उलट आईला सुखात कसं ठेवता येईल याचाच तो विचार करत असे… 

दहावी नंतर कॉमर्स घेऊन बँकिंग मध्येच करियर करायचं ठरवलं… 

आणि आज एका सहकारी बँकेत तो मॅनेजर पदावर काम करत होता… कष्ट आणि बुद्धीच्या जोरावर तो यशाची एक एक शिखरं पार करत होता.. 

मायाकाकूनी दार उघडलं… स्मित हास्य करतच सुशांतने घरात प्रवेश केला…त्याला पाणी देत काकू म्हणाल्या… काय रें दमलास का???...  किती काम करशील रे….

सुशांत… दमलो नाही पण आज बँकेत काम थोडं जास्तच  होतं …. मार्च महिना आहे न… इयर एंडिंग… तर कामाचं प्रेशर जरा जास्त आहे… बाकी काही नाही गं… 

मायाकाकू… एवढा दमून रमून येतोस पण चेहऱ्यावर कधी दाखवत नाहीस हो ना… नेहमी आपला हसरा चेहरा… 

सुशांत… (आईला आपल्या जवळ बसवत )...माझा हसरा चेहरा पाहून तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो माझ्यासाठी खूप मोलाचा आहे….
(स्माईल करत) म्हणून हा चेहरा मी सदैव हसरा ठेवतो… 

मायाकाकू… माहीत आहे… त्याच्या डोक्यावर टपली मारत… बरं ऐक तू फ्रेश होऊन घे तोवर मी तुझ्यासाठी चहा टाकते… की जेवूनच घेतोस जेवण तयार आहे… 

सुशांत… मी फ्रेश होऊन येतो पण तुझ्या हातचा गरमागरम चहा आधी दे… मग जेवण करूयात.. 

मायाकाकू… आत्ता टाकते बघ चहा… तू जा फ्रेश हो… 

सुशांत आपल्या रूम मध्ये जातो… बॅग जागेवर ठेऊन कपडे चेंज करतो… फ्रेश होतो… इतक्यात काकू आवाज देतात चहा तयार आहे… ये लवकर… 

सुशांत… आलो आलो.. (सुशांत रूमच्या बाहेर पडतो… हॉल मध्ये येउन बसतो… )मायाकाकू त्याला चहा देतात… गरमागरम चहाचे घोट घेत सुशांत निवांत बसतो… 

मायाकाकू तिथेच घुटमळतात… सुशांत च्या लक्षात येतं… आई काही बोलायचं आहे का?? 

मायाकाकू… नाही…. म्हणजे हो… अरे तुझ्या सगळ्या मित्रांची लग्न झाली… तू कधी मनावर घेतो आहेस… 

सुशांत… आई असं कुठे लिहिलं आहे का???...मित्रांची लग्न झाली म्हणजे माझं पण झालच पाहिजे… 

मायाकाकू.. तसं नाही रे...शिक्षण, नोकरी… त्यानंतर तू हे घर घ्यायचा अट्टाहास केलास… मला वाटलं तू घर घेतो आहेस म्हणजे लग्नाची तयारीच करतो आहॆस… पण कसलं काय….. घर  घेऊन दोन वर्ष झाली तरी… तू लग्नाचा विषय काढत नाही आहॆस… 

सुशांत च्या जवळ जाऊन बसत … मी काय म्हणते ती सुमनवहिनींची लांबची एक नातेवाईक आहे… त्या विचारत होत्या तुझ्या साठी… मुलगी म्हणे ग्रॅज्युएट आहे… घरची परिस्थिती जेमतेमच आहे… तिच्या साठी वरसंशोधन सुरु आहे तर विचार करायला काय हरकत आहे म्हणजे तू म्हणत असशील तर मी बोलू का सुमनवहिनींशी… 

मायाकाकू सुशांतकडे पाहत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करतात… पण त्यांना सुशांतच्या मनात काय सुरु आहे काहीच कळत नाही… त्यांना बऱ्याचदा वाटे की सुशांतला एखादी मुलगी आवडत असावी… आणि म्हणूनच तो लग्नाचा विषय टाळत असावा पण… आज पर्यंत त्याने तसं काही स्पष्ट सांगितले ही नव्हते.. त्याला जर कोणी आवडत असेल तर मी आनंदाने लग्न लावून देईन की… आपल्या मनाशीच उगाच बडबडतात… पण मी एकटीने ठरवून काय उपयोग… सुशांतने ही काही सांगायला हवं ना…. 

आज काही झालं तरी सुशांतशी लग्नाबद्दल काय ते  फायनल बोलायचंच असं ठरवून मायाकाकू सुशांतला म्हणतात…. अरे तू कोणाच्या प्रेमात पडला असशील तर तसं सांग… अगदी दुसऱ्या जातीतील असेल तरी माझी काही हरकत नाही…. तुझी आई पाचवी शिकली असली तरी… जुनाट विचारांची मुळीच नाही बरं… 

आपल्या आईच्या बोलण्यावर सुशांत ला हसू येतं… काय गं आई तू पण…मला चांगलं माहीत आहे तू शिकली नसलीस तरी तुझे विचार मात्र आधुनिक आहेत… 

आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत आपलं डोकं टेकवतो….. आणि लग्नाचं म्हणशील तर आई मी तुझे कष्ट त्रास लहानपणापासून पाहत आलो आहे… आपण दोघेच आहोत किती खुश आहोत… माझी बायको म्हणून जी कोणी येईल ती तुझ्याशी जुळवून घेईल ना घेईल… तीने जर तुझ्याशी जुळवून नाही घेतलं तर सगळ्यात जास्त त्रास मला होईल… आणि मला या वयात तुला कोणत्याही प्रकारे दुखवायचं नाही… माझ्या लग्न झालेल्या मित्रांची तू उदाहरणे देत आहॆस… तेच मित्र आई आणि बायकोच्या भांडणात पिचून निघतायत… मला ते सगळं नको आहे… आणि म्हणून मी ठरवलंय मी लग्नचं नाही करायचं…

वेडा आहॆस का??... म्हणे लग्न नाही करायचं… जे अजून घडलं नाही ते घडेल याचा विचार आताच कशाला करत बसायचं… आणि पटणार नाहीच तिचं आपल्याशी हे तू आतापासूनच का गृहीत धरतो आहॆस… आयुष्य असं एकट्याने नाही निघत रे… बाळा 

आई तू नाही का एकटीच राहिलीस कोणाच्याही आधाराशिवाय तसाच मी ही राहीन की… 

अरे वेड्या तेव्हा तू होतास माझ्या सोबत… माझा सगळ्यात मोठा आधार… आयुष्यात सुखदुःखांची देवाणघेवाण करायला जोडीदार हवाच रे… फार अवघड असते ही वाट… पदराने आपले अश्रू पुसत आणि मी काय पिकलं पान आज ना उद्या गळून पडणार… मग तुला जपणारी.. आधार देणारी कोणी तरी हवीच ना… 

ते काही नाही आता यापुढे मी तुझा एक शब्द ऐकणार नाही… मी उद्याच जाते सुमनवहिनींकडे आणि त्या मुलीची सगळी माहिती काढते…. समजलं… 

सुशांतला माहीत होतं आईने एकदा काही ठरवलं की ती ते करणारच… त्यामुळे आता तिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही… 

ठीक आहे तू म्हणशील तसं… पण आता माझं एक ऐकशील का??? जाम भूक लागली आहे जेवायला देतेस की ते ही लग्न ठरवून झाल्यावरच देशील… (हसायला लागतो )

गप रे… आता वाढते जेवण थांब… 

सुशांत आणि मायाकाकू एकत्रच जेवण करतात.. सुशांत आपल्या रूममध्ये झोपायला जातो...उद्या बँकेत काय काय काम वाढून ठेवलंय याची उजळणी करत झोपी जातो… 

इकडे मायाकाकू किचन मध्ये सगळी आवराआवर करतात… आणि झोपायला जातात पण बराच वेळ झाला तरी त्यांना झोप लागत नाही… आपल्या लाडक्या एकुलत्या एक लेकाच्या लग्नाचं स्वप्नं उघड्याडोळ्यांनी त्या पाहू लागतात … कानात सनईचौघड्यांचे सूर तर केव्हाच घुमू लागले होते… 

मायाकाकूंचं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होईल… की…. सुशांत आपलंच म्हणणं खरं करेल…जाणून घेण्यासाठी माझ्या कथेला फॉलो करा…  
कथेचा पुढचा भाग घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येइन 

….शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत… 
कथा आवडल्यास लाईक करा… शेअर करा… पण लेखिकेच्या मूळ नावासहित…