Login

खेळ मांडला...भाग 4

Katha Tichya Sangharshachi
खेळ मांडला...भाग 4

पूर्वार्ध...

मुक्ताने सेशन अटेंड केलं, त्यानंतर  डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेली.
डॉक्टरने तिला विचारलं, तिला धीर दिला. मुक्ताने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आता पुढे,


मुक्ता ढसाढसा रडायला लागली, खूप रडल्यानंतर ती थांबली.
डॉक्टरने तिला पाणी दिलं, तिला शांत केलं. त्यानंतर मग मुक्ताने बोलायला सुरुवात केली.
 
"मॅडम आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. चार बहिणी आणि एक भाऊ, आई-वडील असा सात जणांचा कुटुंब.
बाबा हमालीचे काम करायचे आणि आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन कपडे- भांडे करायची.
त्याच्यावरच आमचं घर चालायचं.
कित्येक रात्री आम्ही उपाशीच काढल्या, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मी शिकू शकले नाही, दहावी झाले त्यानंतर घरच्यांनी माझे शिक्षण बंद केले, शिक्षण अर्धवट राहील.
 
 
घरात मी मोठी असल्यामुळे पोरगी दहावी झाली आता तिचं लग्न लावून देऊ या विचाराने त्यांनी माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली.

दोन-तीन स्थळ आल्यानंतर सुमितच स्थळ आलं. सुमित कामाला आहे, घरदार चांगल आहे, शेती चांगली आहे, असा विचार करून घरच्यानी माझं लग्न पक्क केलं, साखरपुडा झाला.
 
 
त्यानंतर सुमित आणि त्याच्या घरच्यांनी माझ्या घरच्यांना हे सगळं सांगितलं.

एक दिवस दारावरची बेल वाजली, आईने दार उघडला. बघते तर काय दारात सुमित आणि त्याचे आई वडील उभे होते. आईने त्यांना आत बोलावलं.

"या ना, या आत बसा. आज अचानक कसं काय येणं केलंत?"

"आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं."
"हो बोला ना."
"थांबा मी पाणी आणते."

मुक्ताची आई पाणी घेऊन आली.
"आमचं काही चुकलं का? मुक्ताचे बाबा पॅनिक झाले.

"अहो नाही नाही असं काही नाही."

"आम्हाला तुमच्याशी जरा वेगळा विषयावर बोलायचं आहे. हे बघा आमचा मुलगा सुमित एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहे.

"काय? हे काय असतं?"

"हे बघा हा एक संसर्गजन्य रोग आहे, एकापासून दुसऱ्याला पसरू शकतो जर आपण काळजी घेतली नाही तर. हे बघा सुमित आणि मुक्ताचं साखरपुडा झालाय, आता सुमित आणि मुक्ता लग्न होऊन एकत्र आले तर हा रोग मुक्ताला पण होऊ शकतो."

"पण तुमच्या मुलाला हा रोग कसा झाला?"

"आमच्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली आणि म्हणून.." सुमितची आई बोलता-बोलता थांबली.


सगळ्यांना ऐकून धक्का तर बसला पण कोणीच काही बोललं नाही आणि ते लोक पण निघून गेले.
 
सुमित वाईट धंद्याला लागला होता त्यातूनच त्याला हा रोग झाला,  ही गोष्ट त्याने आधी नाही सांगितली साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितली मला यातलं काहीच माहिती नव्हतं.

त्या रात्री घरच्यांच बोलणं माझ्या कानावर पडल.
आई बाबा बोलत होते.


“अहो काय करायच आता, त्यांनी आधी आपल्याला काहीच कल्पना दिली नाही आणि आता हे सगळं काय होऊन बसलं, साखरपुडा मोडला तरी बोलण आपल्यालाच ऐकावं लागेल. आणि नाही मोडला तरी भोग आपल्यालाच भोगावे लागतील." आई काकूतेने बाबांना सांगत होती.

“साखरपुडा मोडायचा नाही, साखरपुडा मोडला तर पुन्हा पोरीशी लग्न कोण करेल? समाजात बदनामी होईल ती वेगळीच... साखरपुडा मोडलेल्या पोरीशी कोण लग्न करणार? बाबांची अवस्था तशीच होती पण समाजाच्या भीतीपोटी त्यांना हे लग्न मोडायचं नव्हतं.


"आपली परिस्थिती अशी हलाखीची, तिच्या पाठच्या तीन बहिणी आहेत, तीच ऐकल्यावर त्यांची लग्न नाही जमणार."
बाबांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

“अहो पण आता आपल्याला सगळं कळलय ना.”
 
“कळलंय तर कळलंय, काही फरक पडत नाही आपण करूया आपल्या पोरीचं लग्न, तिचं लग्न झालं की तिच्या पाठच्या तीन बहिणीचं लग्न होईल."


त्यांच्या तोंडातला एक एक शब्द माझ्या हृदयाला चिरा पाडून जात होता. पायाखालची जमीन सरकली. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या पण त्यावेळी काहीच करता आलं नाही.
मी तिथे तशीच उभी होती...निशब्द: 

 
त्यांनी पण साखरपुडाच्या आधी काही नाही सांगितलं, आधी सांगितलं असत तर जमलेलं लग्न मोडता आलं असत..पण साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितलं कारण त्यांनाही माहीत होतं साखरपुडा झाला की ही लोकं काहीही करू शकणार नाही, त्याचाच फायदा त्यांनी उचलला...फसवलं आम्हाला.. आम्ही गरीब... आमची परिस्थिती गरीब.. याचाच फायदा त्यांनी घेतला.


लग्नाची तयारी सुरू झाली, त्यांनी आम्हाला कपडे घेण्यासाठी बोलावलेलं होतं. त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो तर सुमित घरी नव्हताच. तो कुठेतरी बाहेर गेलेला होता असं त्याच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं.

आई बाबा बसले आणि मी सहज घर बघावं म्हणून तिथून उठले. बघता बघता माझं लक्ष पायऱ्यांकडे गेलं का कुणास ठाऊक पण माझ्या मनात शंकेची पाल चूकचुकली.