खेळ मांडला...भाग 9

Katha tichya sangharshachi

खेळ मांडला...भाग 9


पूर्वार्ध...

मुक्ता आणि मावशी दुसरीकडे राहू लागल्या. मुक्ता कॉलेजच्या मुलींसाठी डबे बनवायची. मुलींचे आणि मुक्ताचे छान संबंध तयार झाले होते. मावशीने मुक्ताला काळजी कशी घ्यायची हे सांगितलं.

आता पुढे,


"हे बघ मी हे सगळं तुला सांगते ना, हे सगळं तुला करायचं आहे. मी आहे ग तुझ्या सोबत आता. तुझ्या बाबतीत आता काही  वाईट घडायला नको म्हणून हे सगळं तुला सांगत आहे."


"तुम्ही माझ्यासोबत आहात ना मग आता सगळं चांगलं आणि चांगलं होईल."

"असं आपल्याला वाटतं सगळं चांगलं होईल पण जसे सुखाचे दिवस येतात ना तसे दुःखाचे दिवस येतात, दुःख पालटलं की सुख येतं आणि सुख पालटलं की दुःख येतं. हाच नियतीचा नियम आहे." मावशी बोलत होत्या आणि मुक्ताला झोप लागली.

मुक्ता झोपूनही गेली, सकाळी उठली तेव्हा तिला खूप फ्रेश वाटत होतं.

"काय मुक्ता झोप झाली?"

"मावशी रात्री कधी झोपले मलाच कळलं नाही पण तुम्ही झोपलात ना की माझ्याजवळच बसून होतात?"

"झोपले, मी पण झोपले. चल तू फ्रेश हो, मी चहा केला दोघीजणी चहा घेऊ मुली येतीलच आता मुलींना नाश्ता द्यायचा आहे पटकन."

हळूहळू मुक्ताच्या मेस मध्ये मुली वाढायला लागल्या, तिला छान वाटायला लागलं बसल्या बसल्या स्वयंपाक करणे मुलांना जेवू घालणे. तिला आत्मिक समाधान मिळत होतं आणि हाताशी पैसे येत होते. सगळं छान होणार असं वाटतच होतं. तितक्यात कानावर बातमी पडली की

"सुमित जामिनावर सुटून आलाय."

आता मुक्ताला पुन्हा घाबरायला झालं, तिला भीती वाटायला लागली आता कुठे सुखाचे दिवस आले होते आणि आता हे दुःखाचा सावट आलं.

मुक्ताने डॉक्टर मॅडमला फोन केला.

"मॅडम मनात जी भीती होती तेच झालं, तो पुन्हा सुटून आलाय मॅडम. तो मला पुन्हा त्रास तर देणार तर नाही ना?"

"नाही आणि तू कुठे राहतेस ते फक्त मलाच माहिती आहे, त्यामुळे काही काळजी करू नकोस आणि हो पुढल्या आठवड्यात मी तिथे इथे तुला न्यायला. आपल्याला चेक अप करायचाय ना. तिथून तुला घेऊ मग आपण इकडे येऊ. बाकी कसं चाललंय बरी आहेस ना तू? मावशी काळजी घेत आहेत ना तुझी?"

"हो मावशी माझी खूप काळजी घेतात. माझी आईच आहे असं वाटतं."

बोलता बोलता मुक्ता शांत झाली.

"काय ग काय झालं. मुक्ता शांत का झालीस?"

"काही नाही अचानक तोंडातून आई निघालं आणि आईची आठवण आली. बघा ना मॅडम मी किती अभागी आहे माझ्या आईला आठवण सुद्धा येत नाही की आपली लेक कशी आहे काय आहे जिवंत आहे की नाही हे सुद्धा त्यांना बघावसं वाटत नाही दुर्भाग्य माझं अजून काय."

"चुकीचा विचार करतेस तू दुर्भाग्य तुझं नाही दुर्भाग्य त्यांचा आहे तुझ्यासारख्या मुलीचा ते विचार करत नाहीत आणि हो तुझ आता दुर्भाग्य नाही सौभाग्य तुला आईच्या रूपात मावशी मिळाली. त्या खूप चांगल्या आहेत. सगळी नाती खूप छान जपतात. माझी मुलं लहान असल्यापासून त्या माझ्याकडे काम करतात, त्यांना मी चांगलं ओळखून आहे आणि त्या तुझी काळजी नक्की घेत असतील मला माहितीये विश्वास आहे मला तेवढा त्यांच्यावर. चल मी फोन ठेवते, तुझी काळजी घे."

"हो मॅडम.."

दुसऱ्या दिवशी डॉक्टर मुक्ताला न्यायला आल्या. मुक्ता तयारच होती. दोघी निघाल्या मावशी बाई घरी एकट्याच होत्या. दोघे हॉस्पिटलला गेल्या. आज एका दुसऱ्या मॅडमचा सेशन होतं. एचआयव्ही बद्दल त्या माहिती सांगणार होत्या.

मुक्ताने ते सेशन अटेंड केलं.

"हॅलो एवरीवन, कश्या आहात तुम्ही सगळ्या, आनंदात असाल मला खात्री आहे.

आज आपण बाळाचं जन्म झाल्यानंतर काय काय काळजी घ्यावी लागेल या बद्दल बोलणार आहोत.

जन्माच्या वेळी बाळ आईच्या जननेंद्रियातून जात असतं, तेव्हाही संसर्गाचा धोका असतो. तसंच आई बाळाला स्तनपान करतानाही संसर्ग होऊ शकतो.

आईच्या दुधात हा विषाणू आढळला आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. काही अभ्यासांतून समोर आलेल्या माहितीनुसार एचआयव्हीग्रस्त महिलेच्या पोटी जन्मलेल्या 10 ते 15% बाळांना स्तनपानाद्वारे एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते.

पण आईच्या दुधात अशी अनेक पोषक तत्वं असतात ज्यामुळं बाळाचं आरोग्य सुदृढ राहतं. स्तनपानाचे बाळ आणि आई दोघांसाठीही असलेले फायदे सर्वश्रुत आहेत.

तसंच आता प्रभावी अशी ARV औषधंही उपलब्ध आहेत. त्यामुळं एच.आय.व्ही.ग्रस्त मातांनी बाळांना स्तनपान सुरू ठेवण्याची शिफारस सध्या केली जाते."
आजच्या सेशनमध्ये एवढंच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे.


क्रमशः

🎭 Series Post

View all