खेळ मांडला...भाग 8

Katha tichya sangharshachi


खेळ मांडला...भाग 8

पूर्वार्ध...

सुमित मुक्ताकडे तिला परत आणण्यासाठी गेला. मुक्ताने नकार दिला तर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली, मुक्ताने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्याला अटक केली.

आता पुढे,

"मुक्ता काळजी करू नकोस, पोलिसांनी त्याला अरेस्ट केलंय. आता तो तुला त्रास देणार नाही."

"पण मॅडम किती दिवस हे चालायचं?"

"काळजी करू नकोस एकदा का त्याला शिक्षा झाली ना की मग तो असा नाही वागणार."

"कसा विश्वास ठेवायचा आपण की तो पुन्हा असं नाही वागणार."
"मुक्ता तू का काळजी करते? असं केलंस तर कसं चालेल? तू विसरतेस का तू एकटी नाहीयेस. तुझ्यात एक जीव वाढतोय. त्याला या जगात आणायचे ना. हे जग त्याला दाखवायचे ना. मग तूच खचलीस तर कसं चालेल आणि हे बघ त्याला आता कळलं ना की तू इथे राहतेस तर आपण तुझी राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करूया तू काळजी करू नकोस. मी तुझी राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करून देते. आणि हो एकटी राहणार नाहीस मावशी राहतील तुझ्यासोबत."

"त्याने तुम्हाला त्रास दिला तर?"

"नाही नाही तो असं काही करणार नाही."

"तुमच्या मुलीला..."

"मुक्ता तू असा काहीही विचार करू नकोस. असं काही घडणार नाही. उगाच नको ते विचार करू नकोस. असं काहीही होणार नाही."

काही दिवसात कोर्टात केस सुरू झाली.

दिवस समोर सरकत गेले, बघता बघता मुक्ताला पाच महिने पूर्ण झाले. डॉक्टर तिची सगळी काळजी घेत होत्या. तिची औषध, तिच्या जेवणापासून सगळी काळजी घ्यायच्या. सगळे इन्स्ट्रक्शन देऊन ठेवले होते. मावशी बाई तिची खूप काळजी घ्यायच्या.

घरच्या घरी काहीतरी काम करावं म्हणून मुक्ताने जेवण बनवणं सुरु केलं होतं, ती घरी जेवण तयार करून द्यायची. बऱ्याच कॉलेजच्या मुली तिच्याकडून जेवणाची डबे घेऊन जायच्या आणि त्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडायचं. त्यांचे हळूहळू मुक्ताशी चांगले संबंध व्हायला लागले.


एका रात्री मुक्ताला झोपच येत नव्हती, मावशी बाई बाजूला येऊन बसल्या.

"काय ग मुक्ता झोप येत नाही तुला?"

"माहिती नाही मावशी आज मला झोपच येत नाहीये.

"ये माझ्या मांडीवर डोकं ठेव. मी तुझ्या डोक्यावरून हात फिरवते. बघ तुला झोप लागेल की नाही. तुला खूप बरं वाटेल."

तिने मावशीच्या मांडीवर डोकं ठेवलं, मावशी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागल्या.

"तुला माहितीये मुक्ता..ईश्वराची सर्वात मोठी निर्मिती म्हणजे आई!
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. एका जीवातून दुसरा जीव तयार करणं हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे.
आपल्याच रक्त मांसावर एक जीव पोटात नऊ महिने सांभाळायचा आणि प्राणांतिक वेदना सहन करुन त्या बाळाला सही सलामत जगात आणायचं हे काम फक्त एक आईच करते.
बाळाचं वाढणं, पोटातल्या पोटात त्याचं फिरणं, लाथा मारणं हे गोड अनुभव केवळ आईच घेऊ शकते.  त्या दिवसांत असलेले ते गोड अनुभव ती जन्मभर मनात सांभाळून ठेवते. पुरुष मात्र फक्त हे ऐकू शकतो आईकडून.. बाळ कसं करतं.. ती अनुभूती मात्र फक्त नी फक्त आईलाच येते.

ती गरोदर असल्याची बातमी समजल्यानंतर अवघं घर आनंदात न्हाऊन निघत असतं. कुणाला डोहाळे कडक असतात. कुणाला अगदी सहजावारी गरोदरपण लाभतं. मग डोहाळे जेवणं करुन कौतुकाचा वर्षाव केला जातो. चांदण्यातलं, बागेतलं, नावेतलं अशी नवलाईची कौतुकं निव्वळ आईच्याच वाट्याला येतात.
सुखाचे हे सुख अशीच आयुष्यातील ती अवस्था असते. कुणाचं गरोदरपण कसलाही त्रास न होता सहजसोपं असतं. त्यात पहिलीच वेळ असेल तर मग विचारायलाच नको. माझ्या वेळी पण असंच झालं होतं घरात सगळीकडे आनंद पसरला होता जुने दिवस आठवले की त्या आठवणीतच राहावंसं वाटतं."

"मावशी आता कुठे असतात तुमची मुले?"

"पाखरांना उडायला आलं की मुले भूरकन उडून जातात, पाखरे उडाली आणि आई मात्र त्याचं जागी राहिली. हे बघ मुक्ता आता पाच महिने झाले तुझं पोट वाढलं आता झोपताना व्यवस्थित झोपायचं.

पाचव्या महिन्यापासून गर्भवती महिलेचं‌ पोट चांगलंच वाढायला लागतं. अगदी पहिल्या तीन महिन्यांत जराही न दिसणारं पोट पाचव्या महिन्यापासून वाढायला सुरुवात होते. ते दिसू लागतं. ती गरोदर आहे हे लक्षात येईल इतपत पोट दिसू लागतं. तिच्या हालचालींवर थोडीशी मर्यादा येऊ लागते.

या काळात डाव्या कुशीवर झोपणं हे जास्त श्रेयस्कर. कारण या शेवटच्या टप्प्यात गर्भाशय वाढून उजवीकडं सरकलेलं असतं. त्यामुळे जर गर्भवती महिला उजव्या कुशीवर झोपली, तर महाधमनीवर दाब निर्माण होतो आणि रक्तपुरवठा कमी होतो. काही त्रास होऊ नये म्हणून डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि कसलाही त्रास उद्भवत नाही. कळलं का?"

क्रमशः

🎭 Series Post

View all