Nov 30, 2020
प्रेम

खेळ मनाचा शकुन अपशकुनाचा (भाग २)

Read Later
खेळ मनाचा शकुन अपशकुनाचा (भाग २)

 

 संध्याकाळचे साधारण सहा वाजले असतील आणि थंडीचे दिवस असल्यामुळे जरा लवकरच अंधार पडत होता. सूर्याचा शेंधुरी गोळा पश्चिमेकडे त्याचा शेंधुरी रंग उधळत त्याच्या आस्थाकडे मार्गस्थ होत होता. आणि इकडे विद्युतला मात्र वेगळीच हुरहूर लागली होती.तो किती तरी वर्षांनी विदिशाला भेटणार होता. ती विदिशा जेंव्हा प्रेम म्हणजे काय हे ही कळत नव्हते तेंव्हा जिच्या प्रेमात पडला होता तो! जीच्या बरोबर भविष्यातील अनेक स्वप्ने पाहिली जिच्या बरोबर   त्याने अनेक आणाभाका घेतल्या होत्या ती विदिशा त्याला एका विधवेच्या रुपात  भेटेल असा स्वप्नात ही त्याने विचार केला नव्हता पण त्याचे तिच्यावरचे प्रेम तसु भर ही कमी झाले नव्हते. उलट त्याला आज पर्यंत दुसरी कोणतीच मुलगी भावली नव्हती म्हणून तर तो आज तागायत अविवाहित होता.परंतु आता नियतीने पुन्हा त्याला विदिशा बरोबर पाहिलेली स्वप्ने जगण्याची संधी  दिली होती आणि ही संधी त्याला कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती रादर विदिशाला त्याला गमवायची नव्हते.

 

           तो पारिजात सोसायटीमध्ये  पोहचला तसे त्याचे हृदय जोरात धडधडू लागले.तो आज खूप वर्षांनी विदिशाला भेटणार होता तिला बोलणार होता.त्याच्या मनात एक प्रकारची भीती ही होती की विदिशा आपल्या बद्दल गैरसमज तर करून घेणार नाही ना! पण त्याने ठरवले होते प्रयत्न करायचाच. तो पारिजात सोसायटीच्या गार्डन  मध्ये पोहचला गार्डन  गरबा मंडपा पासून  दूर असल्याने तिथे गोंगाट ऐकू येत नव्हता. ठरल्या प्रमाणे विदिशा तिथे दिव्याची सहा वर्षांची  मुलगी  सानिकाला  खेळायला घेऊन आली होती. सानिका खेळत होती आणि विदिशा तिथेच एका बेंचवर बसली होती. सानिकाच्या आईने म्हणजेच दिव्याने सांगितल्या प्रेमाने सानिकाने विद्युतला पाहिले आणि तिच्या मित्र मंडळाला घेऊन पळ काढला. विदिशा तिला काय झालं कुठे निघलीस म्हणून विचारत होती तर समोर विद्युत उभा होता. त्याला पाहून विदिशा खाली मान घालून निघाली. पण विद्युत तिला अडवत म्हणाला.

 

विद्युत,“ विदिशा मला तुझ्याशी बोलायचे आहे. इतकं ही अनोळख्या सारख वागू नकोस!” तो नाराजीने बोलला.

 

 विदिशा,“ बोल!” असं म्हणून ती थांबली.

 

विद्युत,“ जास्त आढेवेढे न घेता मी सरळच विचारतो  तुला! माझ्याशी लग्न करशील का?” त्याने तिला विचारले.

 

विदिशा,“हे बघ विद्युत तू ज्या विदिशाला ओळखत होतास ती विदिशा आता तशीच राहिली नाही. मी विधवा आहे आणि मला आता दुसरे लग्न करण्यात इंटरेस्ट नाही. तू माझ्या विषयीचे विचार काढून टाक तुझ्या मनातून माझ्या बद्दल तुला काहीच माहीत नाही!” ती असं म्हणून जायला निघाली तर विद्युतने तिचा हात धरला आणि तो बोलू लागला.

 

विद्युत,“ हो विदिशा मला सगळं माहीत आहे तरी ही मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुला दुसरं लग्न करण्याची इच्छा नासायला तुझं वयच काय आहे ग? दिव्याचा संसार तिची छोटीशी मुलगी पाहून तुला नाही का वाटत की तुझा ही छोटासा संसार असावा त्यात एक प्रेमळ नवरा आणि  एखादी छोटी परी असावी अगदी सानिका सारखी?” तो भावून होऊन बोलत होता. हे ऐकून विदिशाच्या डोळ्यात टचकन  पाणी आले आणि ती बोलू लागली.

 

विदिशा,“ हो वाटायचं ना मला ही सगळं उलट मी तुझ्याच बरोबर संसार करण्याची स्वप्न पहिली विद्युत पण नियती पुढे आपलं काहीच चालत नाही माझ्या बाबांनी माझं लग्न लावून दिल माझ्या मना विरुद्ध मग मी ही तडजोड केली नशीबाशी  आणि  रमण्याचा प्रयत्न केला नवऱ्या बरोबर संसारात पण माझ्या दैवात ते ही सुख नव्हते. नवरा गेला आमच्या लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यात एका अपघातात. सासरचे लोक मला अपशकुनी म्हणतात खरच आहे बघ ते कारण मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुझं आयुष्य उध्वस्त करून गेले नंतर माझ्या नवऱ्याच्या आयुष्य गेले आणि त्याला तर मी चक्क गिळला! माझ्या पासून दूर राहण्यातच हीत आहे तुझं विद्युत तुला काही झालं तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार! तू छानशी मुलगी बघ आणि लग्न कर माझा विचार सोडून दे यातच तुझं भलं आहे!” ती  त्याच्याकडे पाठ करून रडत बोलत होती.

 

विद्युतने तिचा हात धरून तिला स्वतः कडे वळवले आणि तो बोलू लागला.

 

विद्युत,“ वेडी आहेस का विदिशा तू? माझं काय आयुष्य उध्वस्त झालं ग? आणि तुझा नवरा गेला त्यात तुझा काहीच दोष नाही त्याच आयुष्य तितकच होत तो जगला आणि गेला. अग तुझ्याशी नसत लग्न झालं त्याच तरी तो गेलाच असता! तू शास्त्र शाखेत शिकून एक नर्स असून असा  मूर्खा सारखा विचार करतेस कमाल आहे तुझी! शकुन अपशकुन असं काही नसतं ग! तुला ही हक्क आहे नवीन स्वप्न पाण्याचा नवीन आयुष्य जगण्याचा थोडा विचार कर मी तुझ्या होकारासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे” असं म्हणून तो निघून गेला.

 

★★★★

 

      विदिशा दिव्याच्या घरी गेली आणि रडतच बॅग भरू लागली ते पाहून दिव्या तिच्या रूममध्ये आली आणि तीने विचारले.

 

दिव्या,“ विदू तू दसऱ्या पर्यंत थांबते असं म्हणाली होतीस मग बॅग का भरत आहेस?”

 

विदिशा,“ मी आत्ताच निघाले आहे!” ती रागातच म्हणाली.

 

दिव्या,“ अग पण झालं काय?” तिने आश्चर्याने विचारले.

 

विदिशा,“ तुला माहीत नाही? माझ्या कडूनच ऐकायचं आहे का तर ऐक विद्युतला माझी माहिती कोणी दिली सगळी तूच ना? आणि सानुला खेळायला सोसायटी गार्डनमध्ये  घेऊन जा म्हणून तिथे विद्युतला कोणी पाठवले तूच ना? वरून मलाच विचारातेस काय झाले म्हणून?मी आत्ताच्या अत्ता निघत आहे!” ती रागाने म्हणाली.

 

दिव्या,“ हो मीच सांगितले सगळे विद्युतला तुझ्या बद्दल कारण त्याने त्या दिवशी तुला गरबा खेळताना पाहिले आणि तुझी चौकशी केली. विद्युत खूप चांगला मुलगा आहे विदू तो तुझ्यावर प्रेम करतो जर काका तुझ्याशी तसे वागले नसते तर तू  केलच असतस ना त्याच्याशी लग्न? आता ही तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे विदू तू नशीबवान आहेस इतका प्रेम करणारा मुलगा तुला मिळाला आहे.काका-काकू तुझ्या आयुष्याला पुरले आहेत का? अग काका झुरतायत तुला असं पाहून रोज! एकटी कशी राहशील ग आयुष्यभर  एकट्याने आयुष्य काढणं इतकं सोपं नाही ग! तुझी चिंता वाटते मला आणि सुदैवाने विद्युत तुझ्या आयुष्य पुन्हा आला आहे विदू! त्याला असं झिडकारून स्वतःच  सुख नको डावलू! त्याच्याशी लग्न करून सुखी होशील!” ती   समजावत होती.


 

विदिशा,“ अग मला माझ्या सुखासाठी नाही कोणाचा जीव धोक्यात घालायचा! हो मी आहे नशीबवान कारण विद्युत सारखा मुलगा आज ही मला स्वीकारायला तयार आहे पण मला त्याच आयुष्यात विष नाही कालवायच! मी त्याच्यासाठी त्याच बॅड लक बनून नाही जाऊ शकत.स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या आयुष्याशी मी नाही खेळू शकत. मी अपशकुनी आहे जिने लग्न होताच स्वतःच्या सौभाग्यालाच गिळल! माझ्यामुळे विद्युतला काही झालं तर मी नाही सहन करू शकणार बरं मी निघते!” ती डोळे पुसत म्हणाली.

 

दिव्या,“ वेडी आहेस का ग विदू तू अग इतकी शिकली सवरलेली आणि जॉब करणारी मुलगी तू आणि शकुन अपशकुन असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस! तुझे सासरचे लोक मूर्ख होते. ज्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्युचा बोल तुला लावला.तुझ्या नवऱ्याच तितकंच आयुष्य असेल तो अपघातात गेला त्यात तुझा काहीच दोष नाही आणि परत तसच होईल कशावरून? माझं ऐक असले मूर्खांसारखे विचार डोक्यातून काढून टाक आणि धर विद्युतचा हात खूप सुखी होशील! सुदैव एकदाच दार ठोठावत विदू! ते तुझ्या दारात उभं आहे पण दुर्दैव आपण दार उघडू पर्यंत दारात उभं राहतं! विसर सगळं आणि नवीन आयुष्याला सुरवात कर!” ती कळकळून बोलत होती.

 

विदिशा,“ निघते मी!” तिला दिव्याच्या बोलण्याचा काहीच फरक पडलेला दिसत नव्हता.

 

दिव्या,“ ठीक आहे तुला जायचं आहे ना तर जा! पण उद्या सकाळी तुझे जीजू ही घरात नाहीत ते बाहेर गावी गेले आहेत तुला आमच्या जबाबदारीवर इथे आणले आहे.मी तुला एकटीला सोडू शकत नाही उद्या ते आले की मी तुला सोडायला येईन!” ती असं म्हणाली आणि विदिशा थांबली.

 

        इकडे विद्युत ही अस्वस्थ होता. तो घरी आला आणि त्याच्या रूम मध्ये गेला. त्याच्या आईने त्याला जेवण कर म्हणून  मिनतवाऱ्या केला. पण तो काही बदला नाही. त्याला सतत विदिशा डोळ्यासमोर दिसत होती. ती काय निर्णय घेणार हा प्रश्न त्याला सतावत होता.प्रथम दर्शनी तर विदिशाला त्याने लग्नासाठी विचारलेले तिला आवडले नव्हते असेच दिसत होते. त्याच विचारात त्याला रात्री कधी तरी झोप लागली.

 

     तिकडे विदिशा ही बेचैन होती तिला एकीकडे विद्युत बरोबरचे सुख खुणावत होते तर दुसरीकडे आपल्याला त्याचे आयुष्य असे पणाला लावण्याचा अधिकार नाही असे वाटत होते. तिची अवस्था खूपच विचित्र झाली होती. तिला राहून राहून आजचा विद्युतचा चेहरा आठवत होता. एक प्रकारची अनामिक ओढ तिला त्याच्याकडे खेचत होती. विद्युत  तिचे पहिले प्रेम होता. जो आज ही तिच्यावर तितकच प्रेम करत होता पण तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा गावी जाण्याचा निर्णय पक्का केला. कारण एकच तिच्या मनात पक्के बसले होते की ती अपशकुनी आहे तिने जर पुन्हा लग्नाचा विचार केला तर विद्युतला काही झाले तर..! तिच्या सासरच्या लोकांनी तिला इतकी दूषणे दिली होती तिला इतके अवहेरले होते की तिचा ही स्वतःबद्दल असाच समज झाला होता की अपशकुनी आहे आणि ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचे आयुष्य उध्वस्त होईल! म्हणून तिच्या मनात विद्युतसाठी प्रेम असून ही ती त्याला नाकारत होती. त्याला स्वीकारायला घाबरत होती. विद्युत आणि दिव्याने तिचे मन वळवण्याचा मुळात शकुन अपशूकुन असं काही नसतं हे समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण विदिशा मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती.

 

विदिशा गावी निघून जाईल? विद्युत आणि दिव्या तिला समजावू शकतील का? विद्युत आणि विदिशाची प्रेम कहाणी अपूर्णच राहणार होती का?


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

© स्वामिनी(अस्मिता) चौगुले.