खेळ कुणाला दैवाचा कळला 3

नारीवादी कथा


बहिणीचे लग्न झाले. तिची पाठवणी करून झाल्यावर निशा पुन्हा तिच्या घरी आली. येताना तिच्या आईने तिच्यासाठी भरपूर काही सामान दिले होते पण निशा मात्र या सगळ्याने खुश नव्हती. राहून राहून तिला त्यादिवशी काकूंनी बोललेले शब्द मनात सारखे टोचत होते. आज संध्याकाळीच रोहनशी याबद्दल बोलायचे असे तिने ठरवले होते. रोहन संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला. जेवण वगैरे आटोपल्यानंतर झोपण्यासाठी निशा खोलीत गेली. रोहन आल्यापासून तिच्याकडे पाहत होता पण निशा आज खूप शांत शांत होती. तिचे काही बिनसले आहे का? आता तर माहेरहून आली आहे म्हणजे ती आनंदी असायला हवी होती पण ती तर शांत शांत दिसत आहे असे का? तिथे काही बिनसले असेल का? या विचारात रोहन होता. झोपताना तिला याचे कारण विचारावे असे त्याने ठरवले होते.

"निशा, तुझे काही बिनसले आहे का? काही झालं आहे का? तुझी तब्येत बरी आहे ना?"

"हो. मी अगदी व्यवस्थित आहे. मला काही झाले नाही."

"मग तू अशी शांत शांत का आहेस?"

"मला तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का?"

"हो. विचार ना. तुला कसली परवानगी लागेल."

"तुम्हाला मुल नको आहे का?"

"म्हणजे?" रोहन आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला.

"आपल्याला मूल व्हावे असे तुम्हाला वाटत नाही का?"

"अगं, खूप वाटतं. एव्हाना मीही तुझ्याशी त्याबद्दल बोलणार होतो. आईने तर मला खूप दिवस झाले सांगितले होते पण तू तुझ्या नोकरीमध्ये गुंतली होतीस, शिवाय तुझी दिवसेंदिवस प्रगती होत आहे तेव्हा तुझी इच्छा नसेल आत्ताच मूल जन्माला घालण्याची असे मला वाटले म्हणून मी तुझ्याशी त्या विषयावर काही बोललो नाही. पण मला सांग आता अचानकच तुला मुलाबद्दल कशी काय आठवण झाली?"

"ते लग्नात सगळेजण मला विचारत होते ना म्हणून."

"अच्छा, म्हणजे लग्नात विचारत होते म्हणून तुला मूल व्हावेसे वाटत आहे का? म्हणजे मनापासून वाटत नसेल ना. ठीक आहे. राहू दे. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण प्लॅनिंग करू." रोहन चेष्टेने म्हणाला.

"नाही नाही. माझी सुद्धा खूप इच्छा आहे. मलाही वाटते की, आता बस. आपण हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्याही एक मूल असावं शिवाय आईंना सुद्धा एकटेपण वाटत असेल ना? मग त्याही नातवात रमल्या की बरे होईल." निशा अडखळतच बोलली.

"अच्छा, तर ही गोष्ट आहे का." असे म्हणत रोहन तिच्याजवळ जाऊन बसला आणि निशा हळूच त्याच्या मिठी शिरली.

रोहन आणि निशाचे मुल होण्यासाठी खूप प्रयत्न सुरू होते पण काही केल्या त्यांना गुडन्यूज मिळाली नाही. निशाच्या पाठीमागून तिच्या बहिणीला लगेचच गुडन्यूज मिळाली होती त्यामुळे निशाला सर्वांचे बोलणी ऐकावी लागत होती त्यामध्ये काय करावे हे तिला समजत नव्हते. रोहनने तिला डॉक्टरांकडे तपासणी करून घेऊन येऊयात का? असे विचारले पण डॉक्टरांकडे गेल्यावर सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. असे निशा म्हणाली. तेव्हा ठीक आहे असे म्हणून रोहनने देखील त्याकडे दुर्लक्ष केले. तसेही त्याचे निशावर खूप प्रेम होते त्यामुळे त्याला निशाच्या कलाने जावे असे वाटत होते.

शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांना गुडन्यूज समजली. दोघांच्याही आनंदाला उधाण आले होते. दोघेही खूप आनंदात होते शिवाय दोघांच्याही घरचे आनंदात होते. अखेर कोणत्याही डॉक्टरी उपचारांशिवाय नैसर्गिकरित्या निशाला राहिले यातच ते समाधानी होते.

निशाने लगेचच दवाखान्यामध्ये जाऊन कन्फर्म केले. खरोखरच आनंदाची बातमी होती त्यामुळे ते निश्चिंत झाले. आता तीन महिन्यानंतर पहिल्यांदा सोनोग्राफी करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले. तसे डॉक्टरांनीच सांगितले होते.

यापुढे काय होईल ते पुढील भागात पाहू..
क्रमशः

🎭 Series Post

View all