खेळ कुणाला दैवाचा कळला 2

नारीवादी कथा


निशा आणि रोहन दोघेही एकत्र नोकरीला जात होते. सकाळी सासूबाईंना थोडीफार मदत करून नाश्ता करून रोहनचा आणि स्वतःचा डबा बांधून घेऊन निशा तिचे सगळे आवरत होती. तसेही सासूबाईंवर सगळ्या कामाचा लोड होऊ द्यायचा नाही असेही तिने ठरवले होते त्यामुळे तिची सकाळ ही पहाटे पाच वाजताच व्हायची. सकाळचा नाश्ता ती स्वतः बनवायची आणि भाज्यासुद्धा ती स्वतः बनवायची. पोळ्या मात्र नंतर तिच्या सासूबाई बनवत होत्या. धुण्या भांड्याला तिने मुद्दामून बाई लावली होती कारण सासूबाईंना त्रास होऊ नये आणि तिची सकाळची ही गडबड त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने धुण्या भांड्यासाठी बाई नेमली होती.

संध्याकाळचा सगळा स्वयंपाक मात्र तिच्या सासूबाई करायच्या. खरंतर हा त्यांचा आदेश होता. कारण दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी थोडासा थकवा येतो हे त्या जाणून होत्या, ते त्यांनी अनुभवलं होतं त्यामुळे सुनेला या प्रकारचा त्रास होऊ नये याची त्या काळजी घेत होत्या. निशासुद्धा ऑफिसमधून येताना उद्यासाठी लागणारी भाजी घेऊन येत होती आणि आल्यानंतर ती निवडून फ्रीजमध्ये ठेवायची. दोघा राजाराणीचा संसार अगदी आनंदात सुरू होता. सासुबाई त्या दोघांना मदत करायच्या असा हा दृष्ट लागण्यासारखा संसार सुरू होता.

निशा तिच्या रुटीनमध्ये रमली होती. आता नोकरीमध्ये तिला प्रमोशन मिळाले होते त्यामुळे नोकरीत जबाबदारीची कामे तिच्यावर होती. कामाचा लोड वाढत चालला होता या सर्वांमुळे मला बाळाचा विचार तिच्या मनामध्ये आलाच नाही. जेव्हा तिच्या लग्नाला तीन वर्षे झाली तेव्हा तिच्या लहान बहिणीच्या लग्नाची बातमी तिच्या कानावर आली आणि तिला खूप आनंद झाला. तिने मुद्दामून चार दिवसांची रजा घेऊन माहेरी जाण्याचे ठरवले होते. या सर्वांमध्ये रोहन आणि त्याच्या आईने देखील तिला संमती दिली होती. निशाने ऑफिसमध्ये रजेचा अर्ज टाकला आणि तिला त्यासही संमती मिळाली त्यामुळे निशाला खूप आनंद झाला. ती तिचे सगळे पॅकिंग करून माहेरी गेली. तिला पाहताच सर्वांना खूप आनंद झाला. तसेही निशाचे माहेरी जाण्याचे प्रमाण खूपच कमी होते त्यामुळे तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी तिच्या माहेरचे सगळे आसुसले होते. आता तर इतक्या पाहुण्यांनी भरलेले घर त्यात निशा गेल्यावर सगळेजण तिच्याभोवतीच गोळा झाले होते.

"अगं निशा, तुझ्या लग्न होऊन किती वर्ष झाली ग?"

"तीन वर्षे झाले काकू"

"अगं, मग मला बाळाचा विचार करणार आहेस की नाही; की म्हातारी झाल्यानंतर मुलाला जन्माला घालणार आहेस. बघ बाई, तुला मुलबिल होतंय की नाही, की वांजोटी म्हणून आयुष्यभर राहणार आहेस." हे शब्द अगदी बाणासारखे निशाच्या हृदयाला जाऊन खिळले. तिच्या डोळ्यातून पाणी आल.े तिला यावर काय बोलावे तेच समजेना. ती तशीच स्तब्ध उभी राहिली कारण आजपर्यंत या गोष्टीची तिला कधी जाणीव झाली नव्हती. पण आता पहिल्यांदाच कुणीतरी तिला मूल न जन्माला घालण्याबद्दल बोलले होते. \"खरंच, आता मुलाचा विचार आपल्याला करायला हवा. पण याबद्दल आईने आणि रोहनने काहीच बोलले नाही. त्यांना मूल नको आहे का? आपल्याला याबद्दल बोलायला हवं.\" असे निशा मनातच म्हणाली.

"अहो, असे काय बोलताय? आमची निशा नोकरी करते त्यामुळे इतक्यात मूल नको असं इतर मुलींप्रमाणे तिची इच्छा असेल ना? आणि आता कुठे एवढे वय झाले आहे तिचे? तुम्ही उगाच काहीतरी बरळत आहात." निशाची आई म्हणाली.

"मी खरं तेच बोलते हो. तुम्ही विचार करून पहा. निशा चांगल्या डॉक्टरांना दाखव ग बाई." पुन्हा ती बाई म्हणाली.

"निशा बाळा, तू आत चल. तू त्यांच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देऊ नको. आणि हो मुलाचं जरा विचार करा नाहीतर अशी बोलणी तुला आयुष्यभर ऐकावी लागतील." आई हळूच म्हणाली.

पुढे काय होईल हे पुढच्या भागात पाहू..
क्रमशः

🎭 Series Post

View all