Login

खेळ कुणाला दैवाचा कळला 1

नारीवादी कथा


"ऐक ना रोहन, मला हे बाळ हवं आहे. मी हे एबॉर्शन नाही करणार. प्लीज माझं ऐक ना. मला समजून घे ना."

"निशा, तू माझं थोडं ऐकून घे. असं करू नकोस ग. तुझ्या भावना मी समजू शकतो. पण आपण तसे नाही ना करू शकत. तुला तर सगळंच माहित आहे."

"अरे, पण मला वांजोटी म्हणून सगळं आयुष्य कुढत काढायचं नाही. मला फक्त हे मूल जन्माला घालू दे. बाकी मी आयुष्यभर तुझी दासी बनेन."

"निशा, मी मुद्दामून करतोय का? शिवाय मलाही मूल न होण्याचा शिक्का बसणार आहे ना? तू इतका का त्रास करून घेत आहेस?"

"त्रास न करून घेऊ तर काय करू. तुम्हा पुरूषांना कोण नावं ठेवतंय. सगळा दोष तर बाईलाच देतात. मग यात तिचा दोष असो की नसो."

"तुला कुणीही दोष देणार नाही. मी आहे ना. मी सर्वांना सांगेन की दोष हा माझ्यातच आहे. मग तर झालं."

"अजिबात नाही. तुम्हाला ना माझे मन कधी कळणारच नाही." असे म्हणून निशाच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. ती काकुळतीला येऊन रोहनला विनवत होती. पण रोहन मात्र तिचे काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हता. तेव्हा निशा तिच्या विचारामध्ये रममान झाली.

पाच वर्षांपूर्वीचा तो दिवस तसाच्या तसा तिच्या नजरेसमोरून जात होता. पाच वर्षांपूर्वी रोहन आणि निशाचे लग्न झाले होते. अगदी थाटामाटात, जल्लोषात निशाने गृहप्रवेश केला होता. सगळीकडे आनंदी आनंद होता. जणू निशाच्या पावलांनी त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि आनंद सारे काही आले होते. रोहन आई बाबांचा एकुलता एक मुलगा. लहानपणीच वडील वारल्यामुळे रोहनच्या आईने एकटीने त्याला वाढवले होते. रोहनच्या आई या एक शिक्षिका होत्या. त्या शाळेत सोबतच रोहनला घेऊन जात आणि सोबतच येत होत्या. त्यामुळे त्यांना कशाचीच चिंता नव्हती. रोहन लहानाचा मोठा कधी आणि कसा झाला हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. फक्त त्या सर्व कालावधीमध्ये त्यांना रोहनच्या बाबांची मात्र आठवण येत होती. कितीही केले तरी आई ही बाबा बनू शकत नाही हे त्यांना समजले होते. रोहन हा इंजिनियर होता. त्याला चांगला पगार होता. सारे काही अलबेल होते. आता रोहनचे लग्न करायचे असा विचार त्याच्या आईच्या मनात आला आणि तिने त्याच्यासाठी स्थळे पाहण्यास सुरुवात केली. निशाचे स्थळ आल्यावर त्यांनी जेव्हा निशाचा फोटो पाहिला तेव्हा पाहता क्षणीच निशा दोघांनाही आवडली. आता फक्त बघण्याचा कार्यक्रम तेवढाच बाकी होता.

बघता बघता बघण्याचा कार्यक्रम देखील झाला आणि एकमेकांनी या लग्नाला संमती दिली. त्याप्रमाणे दोघांचेही विधीवत लग्न पार पडले. निशा ग्रॅज्युएट झालेली होती. निशाने लग्नानंतर नोकरी करावी अशी रोहनची आणि त्याच्या आईची दोघांचीही इच्छा होती त्यामुळे निशाने लग्नानंतर नोकरीला प्राधान्य दिले. लग्नानंतर मुलीने आपली स्वतःची ओळख सोडून घरातच बसून राहणे हे रोहनच्या आईच्या तत्वात न बसणारे होते. त्यांनी देखील नोकरी केली आणि त्यांच्या पाठीशी भक्कम नोकरी होतीे म्हणूनच त्या एकट्या रोहनला सांभाळू शकल्या त्यामुळे नोकरी करणे हे खूप महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटत होते म्हणूनच त्यांनी निशाला देखील नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले.

लग्न झाल्यानंतर ते दोघेही चार दिवस फिरायला जाऊन आले आणि त्यानंतर निशा नोकरीच्या शोधात निघाली. तिला नोकरी लगेच मिळाली. तसेही ती आधीपासूनच खूप हुशार होती त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीची वाट पहावी लागली नाही. तसेच नोकरीच्या बाबतीत घडले. आता निशा रोजच्या रोज नोकरीला जाऊ लागली. घरात सासूबाईंना थोडीशी मदत करून ती जाऊ लागली. तिचे एक रुटीन बसले होते. चांगली नोकरी मिळाली असल्याने इतक्यातच मूलबाळ नको अशी दोघांचीही इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी इतक्यात मूल होऊ द्यायचे नाही असे ठरवले होते.

निशाच्या आयुष्यात पुढे काय घडले असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
0

🎭 Series Post

View all