खेळ कुणाला दैवाचा कळला- भाग ४ (सौ.वनिता शिंदे)

खेळ कुणाला दैवाचा कळला (आजीलाच फुटला पान्हा)


आजीलाच फुटला पान्हा- भाग- ४


भीमा व शांताला आई आजारी आहे, तिला दवाखान्यात नेलेय हे समजले पण कांताला काय कळत नव्हतं. तरीही ते सगळे आजीला सारखे विचारायचे की, " आजे सांग की ग, आमची आय कुठाय, परत कधी येनार हाय?
राधा आजी अर्जुनला मांडीवर घेवून बसली होती. ती पोरांची समजूत काढण्यासाठी म्हणायची की," ईल हं, लवकर ईल तुमची आय! तवर तुम्ही झोपा, तिला डाक्टरकडं न्हिलीय की नाय, मग ती याक इंजिक्शन घिल आन लगीच ईल."

हे ऐकून मुले थोडा वेळ शांत बसायची पण नंतर कावरी बावरी होऊन आईच्या वाटेला डोळे लावून पाहायची. मुलांकडे पाहून राधा आजीचा जीव वरखाली व्हायचा.

पोरांची समजूत काढणे सोपे होते पण राधा आजीचाही जीव लागत नव्हता. बळी शेवंताला परत कधी घेवून येतोय, डॉक्टर काय सांगतिल हीच चिंता तिलाही मनात सतावत होती.

सगळे फक्त वाट पाहात बसले होते. तितक्यात दारात बैलगाडीचा आवाज आला. तसे सगळे धावत गाडीकडे गेले. पण.....

बळीचा पडलेला चेहरा पाहताच राधा आजीने त्याला विचारले, " आरं बळी, काय झालं रं! लगीच परत कसं काय आलासा, दवाखान्यात गेलता का नाय?"

त्यावर बळी म्हणाला," आई, दवाखान्यात जाण्या आगूदर निम्म्या रस्त्यातच शेवंता आपल्याला सोडून गेलीय ग!" असे बोलत बोलतच त्याचा कंठ दाटून आला. पुढे काय बोलण्याची क्षमताच उरली नव्हती.

त्याच्या तोंडून हे एेकताच राधा आजी धायमोकलून रडायला लागली. तिच्या गहीवरून रडण्याच्या आवाजाने सारा गाव जागा झाला. आजीला रडताना पाहून शेवंताची मुलेही टाहो फोडून रडत होती. नक्की काय झालय हे कळण्या इतपत त्यांना समजत नव्हते. लहानगा तान्हा अर्जून अगदी निरागस होता, त्याला तर आपली आई आपल्याला सोडून गेलीय हे काय कळणार होते.

घरात रडारड चालू होती, भावकी-गावकी जमा होते, पै- पाहुणेही आले. त्यानंतर मयत झाल्यावरच्या रितीनुसार शेवंताचे अंतिम संस्कार करण्यात.

शेवंताचा मृत्यू नक्की कशाने झाला हे अद्याप कुणालाही समजले नाही. ती आता गावातील फक्त चर्चेचा विषय बनली होती. कुणी म्हणायचे की हृदयविकाराचा झटका आला असेल, तर कुणी म्हणत होते की आमुशाच्या रातीला घराबाहेर पडलेली म्हणून तिला भुताची बाधा झाली. लागीरल्यामुळं शेवंताचा जीव गेलाय.

शेवंताच्या जाण्याने राधा आजीच्या घरावर दु:खाचा डोंगर कोळला होता. त्यांच्या हसत्या खेळत्या घराला जणू कुणाची दृष्टच लागलेली. मुलांवरचे आईचे छत्र हरवले होते. आता राधाला रडत बसूव चालणार नव्हते. छोट्या नातवंडासाठी आता तिलाच आई बनायचे होते.

सगळे दु:ख, यातना बाजूला सारुन राधा आजी आता खंबीर बनण्याचा प्रयत्न करत होती. मुलं आईचा आक्रोश करुन खुप रडायची अन् राधा आजीला बिलगायची. राधा आजी त्यांना आपल्या कुशीत घेवून शक्य तेवढे त्यांची आई बनण्याचा प्रयत्न करायची.

भीमा, शांता व कांता यांना समजावणे तिला जमत होते पण तीन चार महिन्याच्या अर्जूनला कसं समजवायचं हे तिलाच कळत नव्हते. आई गेल्यामुळे त्याला दुध तरी कोण पाजणार? राधा आजी गायी म्हैशीचे दुध त्याला पाजायची पण ते त्याला पचत नव्हते. तो पितही नसे त्यामुळे त्याचे पोट भरत नव्हते मग तो खुप रडायचा.

राधा आजीच्या मनात मुलांविषयी इतका जिव्हाळा आणि लळा होता की ती आपल्या नातवंडांना पोटच्या मुलांसारखेच जपू लागली. आईविना पोरके झालेल्या लेकरांना आजीच आईचे प्रेम देण्याचा प्रयत्न करत होती.

अर्जून रडायला लागला की तो शांत व्हावा म्हणून राधा आजी आपल्या छातीजवळ धरायची. बिचारा अर्जूनही त्यातून दुध येत नसले तरी फक्त चोखत बसायचा. हे आता रोजचच चालू होता.

एक दिवस देवालाही अर्जूनची व राधा आजीची दया आली असावी असेच घडले. त्या दिवशीही अर्जून रडायला लागला म्हणून ती अर्जूनला छातीशी धरुन भिंतीला टेकून अशीच बसली होती अन् अचानक एक चमत्कार झाला.

तो म्हणजे राधा आजीलाच पान्हा फुटला, तिला आपोआप दुध यायला चालू झाले, आणि अर्जून सख्ख्या आईचे दुध पिल्यासारखा राधा आजीचे दुध घटाघटा पिऊ लागला होता. स्वत:ला दुधाचा पाझर फुटलेला पाहून राधा आजीचा आनंद गगनात मावत नव्हता.

राधा आजीच्या मनातील अर्जूनची चिंता आता मिटली होती. तो यापुढे ट उपाशी राहणार नव्हता हे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते. ती अर्जूनला कुशीत घेऊन प्रेमाळे कुरवाळत आपले दुध पाजत बसली.

आजीला पान्हा फुटला ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली तेव्हा सगळ्यांच्या तोंडात हेच उद्गार ऐकायला मिळायचे की देवाची किमया अजब आहे. देवानं आजीलाच आई बनवलं. देवाचा खेळ कसा आहे. खरच...
"खेळ कुणाला दैवाचा कळला!"

त्या दिवसापासून पुढे अर्जून किमान चार वर्षाचा होईपर्यंत आजीचे दुध पित होता आणि राधा आजीही अर्जून ची आई बनूनच त्याला आनंदाने दुध पाजत होती.

------------------
समाप्त

लेखन- सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all