खेळ कुणाला दैवाचा कळला- भाग ३ (सौ.वनिता शिंदे)

खेळ कुणाला दैवाचा कळला (आजीलाच फुटला पान्हा)


आजीलाच फुटला पान्हा- भाग-३

त्यावर बळी म्हणाला,"आरं काय सांगू लका! माझ्या बायकुला बरं वाटणा झालंय, ताप आलाय, थंडीनं गारठून अगदी कुडकुडायला लागलीय. काय बाय बडबडती पण हाय. तिला दवाखान्यात न्यायला पायजे, तू जरा छलतू का बैलगाडी घिवून.माझी तुला इनंती हाय आसं समज बाबा!"

रात्र खुप होती पण तरीही बळीच्या विनंतीला मान देत शिरपाही तयार झाला. दोघे बळीच्या घरी बैलगाडी घेवून आले. आता दवाखान्यात जायला एका बैलगाडीची सोय झालेली होती.

त्याकाळी बैलगाडी हे एकमेव प्रवासाचे साधन असायचे. दुचाकी, चार चाकी या गाड्या क्वचितच आढळायच्या त्याही शहरातच. ग्रामीण भागात फक्त बैलगाडी आणि सायकल.

बळीने शेवंताला बैलगाडीत घातले, आणि गाडी दवाखान्याच्या दिशेन चालू लागले. रस्त्यावर अगदी भयान शांतता होती.

तेव्हा रस्ते काय डांबरीकरण किंवा सिमेंटचे नव्हते तर साधा कच्चा रस्ता होता.

खाचखळग्यातून वाट काढत काढत रात्रीच्या अंधारात शिरपा बैलांना हाकत होता.

रात्रीच्या निरव शांततेमध्ये बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा छनऽऽ छनऽऽ असा मंजुळ नाद गुंजत होता आणि त्याच सोबत त्या काळ्याकुट्ट अंधारात रातकिड्यांचा किरऽऽ किरऽऽ असा आवाजही येतच होता.

रस्त्याच्या कडेला एखादी वस्ती दिसली की मग तिथली कुत्री भूऽऽ - भूऽऽ करत भुंकण्यासाठी सज्जच असायची.

बळी आपला शेवंताचे डोके मांडीवर घेवून गाडीत बसला होता. तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत होता. चेहऱ्यावर काळजी दिसत होती.

तो तिला आवाज देत म्हणायचा, " शेवंते, काळजी करु नगस हं! आपण आता दवाखान्यात चाललोय, तुला नक्की बरं वाटल बघ, तू घाबरु नगस."

बळी तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण तो मनातून खुप खचलेला कारण शेवंताची अवस्था अतिशय वाईट झालेली.

ती मरणाच्या दारात उभी होती हे स्पष्टपणे जाणवत होते.
बिचारा केविलवैण्या नजरेने तिच्याकडे फक्त पाहात होता. बैलगाडी हळूहळू पुढे चालत राहिली. पण निम्म्या रस्त्यापर्यंत गेली अन् विपरीतच घडले.

बळी शिरपाला म्हणाला, "शिरपा, वायीच गाडी थांबवतू का! ही बघ कशी करतीय, तिला लय तरास व्हया लागलाय वाटतं".

शिपराने बैलांच्या मुसक्या दोरीने आवळल्या अन् गाडी जाग्यावरच थांबवली.

श्वास गुदमरायला लागल्यामुळे शेवंताची तडफड जास्तच वाढलेली. ती इतकी वाढली, इतकी वाढली की अखेर तिने तडफडत शेवटचाच श्वास घेतला आणि तिची मान खाली ढळली. आता तिची प्राणज्योत मावळलेली.

बळीने शेवंताच्या नाकासमोर बोट धरुन पाहिले तर पुर्ण श्वास बंद होता. हृदयाचे ठोकेही थांबलेले, शिरपाने व बळीने जमेल तेवढे प्रयत्न केले पण शेवंता गेल्याचेच स्पष्ट झाले.

बळीचा धीर सुटला होता. त्याला रडू आवरत नव्हते. त्याची पत्नी, त्याची अर्धांगिनी, त्याची साथ सोडून त्याला एकटं टाकून गेली होती.

बळीच्या पुढे फक्त काळाकुट्ट अंधारच पसरलेला कारण
आता शेवंता हे जग कायमचे सोडून गेली होती.

शिरपाने बळीला सावरले, तो बोलला की, " घरी परत जावया का रं?"

बळीने काही न बोलता फक्त मान डोलवली.

पुढे दवाखान्यात जाण्यात काहीच अर्थ नव्हता त्यामुळे शिरपाने गाडी परत घराकडे वळवली.

शेवंताचे प्रेत घेवून बळी व शिरपा घरी परतले.

इकडे घरात राधा आजी घरातील आपल्या लहान लहान नातवंडांची समजूत काढत होती. आईला गाडीत घालून कुठेतरी घेवून गेलेत त्यामुळे लेकरं कावरी बावरी होऊन आईची चौकशी राधा आजीकडे करत होती.

क्रमश:

सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all