खेळ कुणाला दैवाचा कळला.. भाग ४

खेळ दैवाचा


खेळ कुणाला दैवाचा कळला.. भाग ४

मागील भागात आपण पाहिले की अवनी लग्नासाठी घरातून निघते आणि तिच्या वडिलांचे निधन होते. आता बघू पुढे काय होते ते.

" सौरभ.. काय हे किती उशीर? कधीचे सगळे तुला बोलावत आहेत. आणि बाबा कुठे आहेत?" सौरभला बघितल्या बघितल्या आशिषने सुरूवात केली.

" भाऊजी, तुम्ही आणि ताई बसाल कन्यादानाला?" सौरभने भकास स्वरात विचारले.


" सौरभ.. बाबा???" आशिष काही बोलणार तोच सौरभने तोंडावर बोट करत नाही अशी खूण केली. समोरून छान नटलेल्या सुधाताई आल्या.

" अरे बाबा कुठे राहिले तुझे? पूजेला बसायचे आहे."

" आई, बाबांना बरं वाटत नाही म्हणून औषध देऊन झोपवलं आहे. ताई आणि भाऊजींना बसू दे पूजेला." नजर चोरत सौरभ बोलला.

" बरं नाही?काय झाले? मी जाते घरी."

" आई.. मी इथे आहे म्हणजे तेवढं गंभीर नाही ना. लग्न लागलं की जाऊ घरी. असं बाबांनीच सांगितलं आहे."

" ते सांगणार आणि तू ऐकणार. मी जातेच." सुधाताई पुढे काही बोलणार तोच त्यांना सुमेधा आहेर काढून दे म्हणून सांगायला आली. काही न बोलता त्या तिच्यासोबत गेल्या. आशिषने सौरभच्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याला डोळ्यातले पाणी दिसू न देता समारंभाकडे वळला.

"सौरभ, कपडे तरी बदल.. सप्तपदी चालू होईल आता. तुलाच जायचे आहे." सुमेधा सौरभकडे बघून वैतागली होती.

" ताई, असू देत.. इच्छा नाहीये." फक्त एवढेच बोलून सौरभ स्टेजवर गेला. तिथे अवनी होणाऱ्या नवर्‍यासोबत विधी एन्जॉय करत होती. सौरभला बघून तिने त्याला जवळ बोलावले.

" होतास कुठे इतका वेळ? आणि बाबा कुठे आहेत?"

" मी इथेच आहे आणि बाबा पण आहेत.." सौरभ हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

सर्व विधी झाले. जेवणं झाली. पाठवणीची वेळ जवळ आली. त्यानंतर मात्र आशिष आणि सौरभने अवनीच्या सासऱ्यांना सुधाकररावांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे पाठवणी घरून करायची का अशी विचारणा केली. ते ही तसे समजूतदार होते. त्यांनी होकार दिला. सुमेधा, सुधाताईंना घेऊन तयारीसाठी घरी गेली. त्या दोघींना हे सगळंच विचित्र वाटत होतं. पण लोकांसमोर काही बोलायला नको म्हणून त्या गप्प बसल्या. आशिष आणि सौरभ आधीच घरी पोहोचले होते. घरात झोपलेल्या सुधाकररावांना बघून सुधाताईंना धक्का बसला.

" सौरभ.. तू म्हणालास ते झोपले आहेत म्हणून."

" आई, मी सतत म्हणत होतो बघ.. ताईच्या लग्नात खूप अडचणी आल्या, मी अवनीचे लग्न थाटामाटात करणार. सगळ्यांनाच लक्षात राहिल असं करणार. पण ते दैव माझ्यावर हसत होतं ग. मी लग्नासाठी पैसा उभा करू शकलो पण बाबांना नाही.." सौरभ रडत होता. दारात उभ्या असलेल्या अवनीने हा संवाद ऐकला.

" दादा, अगदी बरोबर बोललास.. यापुढे मला माझे लग्न नाही आठवणार.. आठवणार तो बाबांचा मृत्यु. दैवाने माझ्यासोबत केलेला हा विचित्र खेळ.." रडत रडत अवनी बोलू लागली.



सदर कथा ही एका सत्य घटनेवर आधारित आहे. मुलीच्या लग्नाच्या दिवशी वडिलांचा झालेला मृत्यु हा दैवाचा विचित्र खेळ दाखवून गेला होता. कथा कशी वाटली नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all