खेळ कुणाला दैवाचा कळला.. भाग २

खेळ दैवाचा


खेळ कुणाला दैवाचा कळला.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की अवनीचे लग्न तिचा भाऊ सौरभ थाटामाटात करून देत आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" भाऊजी, या इथे." सौरभने आशिषला बोलावले. थोड्या नाराजीनेच आशिष तिथे गेला. समोर दोन पाट मांडले होते. सुमेधाला हाताला धरून अवनी घेऊन आली. छोटा रियांश सौरभच्या कडेवर होता.

" बसा इथे." सौरभने दोघांना पाटावर बसायला खुणावले. सुधाताई आणि सुधाकरराव उभे राहिले. सुधाताईंनी पैठणीने सुमेधाची ओटी भरली. सुधाकररावांनी आशिषच्या हातात सोन्याची अंगठी दिली. छोट्या रियांशच्या गळ्यात चेन घातली. हे बघून आशिष जरी खुश झाला तरी सुमेधाच्या डोळ्यात पाणी आले.

" हे एवढं सगळं करायची काय गरज होती?" सुमेधा बोललीच.

" आशिष, परत एकदा सांगतो. तुमच्या लग्नाच्या वेळेस जो काही मानपान राहिला आहे तो परत तर करता येणार नाही. यानंतर जसा जमेल तसा आम्ही नक्की करू. पण तुम्ही लग्नात नाराज राहू नका." हात जोडत सुधाकरराव म्हणाले.

" काहिही काय बाबा. मी कधी असं दाखवून दिलं का?" त्यांचे हात हातात घेत आशिष उठला. "असे लाजवू नका मला. आणि माझ्या लाडक्या मेव्हणीच्या लग्नात मी का नाराज राहू? आणि हे आवरा लवकर. नाहीतर हळद लावायला नवऱ्याकडची मंडळी येतील आणि थेट आहेर घ्यायला बसतील."

आशिषचे बोलणे ऐकून त्याचा मूड चांगला झाला हे सगळ्यांना समजले. मुलाकडची उष्टी हळद आली. हळदीचा कार्यक्रम जोरात सुरू झाला. अवनीला हळद लावून झाल्यावर सगळे हळद खेळू लागले. हळदीनंतर स्नॅक्स आणि त्यानंतर लगेचच संगीताचा कार्यक्रम होता. आलेले सगळे नातेवाईक सौरभचे कौतुक करत होते. ते ऐकून सुधाकरराव आणि सुधाताईंना कृतार्थ वाटत होते. मुलांची नाचगाणी चालू असताना दोघेच थोडावेळ घरात जाऊन बसले होते.

" कधी वाटलं होतं का ग तुला, आपल्या घरी असं काही होईल?" डोळ्यातलं पाणी लपवत सुधाकरराव बोलले.

" नाही ओ.. सौरभने घेतली सगळी जबाबदारी. नाहीतर आजकाल बहिणींसाठी कोण करतं एवढा खर्च?" सुधाताई बोलत होत्या.

" आता एकदा त्याचं लग्न झालं ना की मी डोळे मिटायला मोकळा.."

" भरल्या घरात कशाला अशुभ बोलायचे? वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते." रागाने सुधाताई बोलल्या.

" बरं नाही बोलत. पण खरं सांगू. आता ना मला कसलीच चिंता नाही.."

" हो ना.. एकदाच अवनीचं लग्न पार पडलं ना की जीव भांड्यात पडला. हीच लग्न झालं ना की आपण दोघं सौरभ म्हणतो तसं चार दिवस फिरायला जाऊन येऊ.."

" हनिमूनला?" सुधाकररावांनी हसत विचारले.

" इश्श्य.. काहिही काय.. चला मी जाते. मुलांना आवरतं घ्यायला सांगते. उद्या सकाळी लवकर हॉलवर जायचे आहे." सुधाताई लाजत बाहेर जात बोलल्या.


आतापर्यंत तरी सौरभने ठरविल्याप्रमाणे सगळं सुरू आहे. पुढेही राहिल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all