खेळ कुणाला दैवाचा कळला..

खेळ दैवाचा


खेळ कुणाला दैवाचा कळला..


" मुलींनो हळदीची तयारी झाली का? नवर्‍यामुलाकडची मंडळी कधीही येतील हं आता उष्टी हळद घेऊन.." सुधाताई विचारत होत्या.

" आई, तू जरा एका जागी शांत बस. मी करते आहे ना सगळं नीट?" सुमेधा आईला दम देत बोलली. "हे लिंबूसरबत घे आधी. तुझी साखर कमी झाली तर मला ती धावपळ करावी लागेल."

सुधाताईंनी ते लिंबूसरबत घेतले. तोंड पदराने पुसत त्या तिला म्हणाल्या,

" तू आहेस म्हणूनच मला कसलं टेन्शन नाही. पण तू आलीस काल. तुला माहित आहे का कुठे काय ठेवलं आहे ते. शेवटी मलाच द्यावे लागणार ना ते. तू एक काम कर, त्या अवनीचे आवरून झाले का बघ. नंतर गडबड नको व्हायला."

" ते मी बघते. पण तू इथून उठू नकोस." सुमेधा परत बोलेपर्यंत कोणीतरी सुधाताईंना हाक मारली. आणि त्या खांदे उडवतच तिथून गेल्या. सुमेधा लिंबूसरबताचा ग्लास उचलून निघाली तर पाठीमागेच तिचा नवरा आशिष उभा होता.

" बघितलं.. याला म्हणतात लग्न. आता सौरभसोबत जाऊन हॉल बघून आलो. काय हॉल आहे.. आणि आपल्या लग्नाला? ते मंगल कार्यालय." आशिष आपली नाराजी दाखवत म्हणाला.

" अरे, आपल्या लग्नाच्या वेळेस बाबांची आणि सौरभची परिस्थिती चांगली नव्हती. बाबांची कंपनी नुकतीच बंद पडली होती. त्यांना मिळालेल्या पैशात सौरभचे शेवटचे वर्ष, अवनीचे शिक्षण आणि माझे लग्न सगळं त्यांना बसवायचे होते." सुमेधा आशिषची समजूत काढत होती.

" असं काही नाही. तुम्हाला मोठा जावई साधा मिळाला ना म्हणून. मी पण थोडं अडवून धरलं असतं ना.." आशिष बोलत होता.

" काय जिजाजी.. आमच्या बहिणीच्या पाठी काय भुणभुण लावली आहे ?" सौरभने पटकन विचारले. ते ऐकून आशिष चपापला.

" काही नाही. हॉल बघून आलो तर हिला सांगत होतो. आपलं लग्न कसं झालं आणि हे कसं छान चालू आहे."

" हो. तुमच्या लग्नात तुमचा जास्त काहीच मानपान झाला नाही. खरंतर तेव्हा आमची परिस्थिती फारच वाईट होती. पण आता तसं नाही हं. तुम्हाला अजिबात नाराज होऊ देणार नाही मी." सौरभ बोलत होता.

" सौरभ.." सुमेधाने बोलायचा प्रयत्न केला.

" नाही ताई.. तुझा एकही सणवार आम्हाला नीट करता आला नाही. प्रत्येक वेळेस पैशाचे कारण. एवढं वाईट वाटायचं ना आम्हा सगळ्यांना. असं वाटायचं आपल्याकडे थोडे तरी जास्त पैसे असते ना तरी किती थाटात केलं असतं सगळं. पण आता नाही. देवाच्या दयेने हातात पैसा खेळतो आहे, म्हणून म्हटलं अवनीचे लग्न एकदम थाटात करायचं. लोकांनी नाव काढलं पाहिजे की काय लग्न झालं." सौरभच्या डोळ्यात पाणी होते.

" अरे वेड्या, रडतोस काय? छानच चालू आहे सगळं. एवढ्या जबाबदारीने करतो आहेस ना सगळं की मला तर वाटायला लागलं आहे मी तुझी धाकटी बहिण आणि तू मोठा दादा म्हणून. " सुमेधा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.

" माझी हळद सुरू होणार आहे आणि तुम्ही दोघं रडताय? चालणार नाही.. हसा बघू.." फोटो काढत अवनी म्हणाली. तिघेही हसू लागले. आणि लांबून त्यांचं बोलणं ऐकणारे सुधाकरराव, हे सगळं असंच छान राहू दे अशी देवाकडे प्रार्थना करू लागले.


होईल का अवनीचे लग्न व्यवस्थित? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all