खेळ: आभास अन् वास्तवाचा (भाग - दोन)

Mysterious Story Of A Girl Yugandhara!

संकर्षण वारंवार शुभमची खेचत होता त्यामुळे शुभम संकर्षणला म्हणाला, " ए, गप रे तू संक्या! " शुभमने असं म्हणताच संकर्षण थोडा वेळ गप्प बसला.  


त्यानंतर शुभमने त्याचा मोर्चा अंशिकाकडे वळवला व तो तिला उद्देशून म्हणाला, " बाय द वे, अंशिका! आपण या परीला काय हाक मारायची? म्हणजे तुझ्या डोक्यात एखादं नाव आहे की नाही? " शुभम बाळाच्या मुठीत स्वतःचं बोट खेळवत बोलला. 


" मी ठरवलंय. " अंशिका मंद हसत बोलली. 


" काय? " संकर्षण आणि शुभमने एकत्रच विचारले. 


" युगंधरा! " अंशिकाने नाव उच्चारले अन् तिने नाव सांगताच संकर्षणच्या चेहऱ्यावर समाधानकारक स्मित पसरले; पण लगेच त्याने मनातल्या मनात एक विचार केला आणि तो अंशिकाला उद्देशून म्हणाला, " नको अंशिका! हे नाव नको. आपण दुसरं काहीतरी नाव ठरवून पाहू. " 


" पण तुम्हाला हे नाव आवडलंय ना? मग काय गरज आहे दुसऱ्या नावाचा शोध घेण्याची? " अंशिका संकर्षणच्या मनाची चलबिचल ओळखण्याचा प्रयत्न करताना बोलली.


" हो पण... " संकर्षण अवघडून बोलला. 


" काय पण? " अंशिकाने नजर रोखून संकर्षणला विचारले. 


" ऍक्च्युली 'युगंधरा' या नावात धरा आणि युगच्या नावाचा संयोग आहे आणि आपलं बाळ तर आपल्या प्रेमाची निशाणी आहे ना! मग त्यात तुझ्या आणि माझ्या नावाचा समावेश असायला हवा ना! हे नाव ठेवलं तर मला वाटेल की, मी तुझ्या इच्छा-आकांक्षांकडे दुर्लक्ष करतोय अन् कळत-नकळत तुझ्यावर अन्याय करतोय. " संकर्षण उदास स्वरात म्हणाला. 


" संकर्षण, किती विचार करता ओ तुम्ही? असं काही नाहीये आणि कुणी म्हटलं हे नाव ठेवल्याने मला वाईट वाटणार? युग माझ्यासाठीही महत्त्वाचा होता. मी ही भाऊच मानायचे त्याला! या नावात आपल्या नावाचा उल्लेख नाहीये म्हणून काय झालं? हे आपलं बाळ आहे, हे सत्य बदलणार आहे का? नाही ना... आणि आपल्या नावांचाही समावेश आहेच की! " अंशिका गूढ हसून बोलली. 


" म्हणजे? " संकर्षणने न कळून विचारले. 


" बघा! 'युगंधरा' या नावात आपल्या दोघांच्या नावातील अनुस्वारच खऱ्या अर्थाने त्या नावाला अर्थ प्रदान करतोय, हे नोटिस केलं नाही का तुम्ही? " अंशिका स्पष्टीकरण देत बोलली. थोड्या वेळाने संकर्षणच्याही ते लक्षात आलं आणि क्षणात त्याचा चेहरा खुलला.


" हो मी नोटिसच केलं नव्हतं. " संकर्षण हसून बोलला. 


" ह्म्म... " अंशिकाने मंद हसून हुंकार भरला. 


तेवढ्यात शुभम मध्यस्थी करत बोलला, " तर मग 'युगंधरा' हे नाव फिक्स झालंय ना? " 


" हो! " संकर्षण आणि अंशिका एकत्र एक सुरात बोलले. 


" बरं, ठीक आहे. बाय द वे, खाली हॉलमध्ये माझी गर्लफ्रेंड आर्या सुद्धा तुमची वाट बघतेय. तुमची भेट आजच करवून द्यायचा प्लॅन वेळेवर ठरला. सो, तुम्हीही आवरून लवकर या आणि सांगा कशी वाटली माझी आर्या ते! " शुभम मंद हसून म्हणाला. 


" ती भारीच असणार रे! फक्त तिच्या डोक्यात अन्यथा डोळ्यात फॉल्ट असणार म्हणून तिने तुझी बॉयफ्रेंड म्हणून निवड केलीय ना! " संकर्षण शुभमची फिरकी घेत बोलला. त्याच्या वाक्यावर तो स्वतः वगळता कुणीच हसले नाही. त्याउलट अंशिका आणि शुभम रागाने त्याच्याकडे पाहू लागले. त्यामुळे संकर्षण गप्प बसला. 


संकर्षण गप्प बसताच शुभम म्हणाला, " आता मी 'युगंधरा'ला घेऊन बाहेर जातोय. थोडा तिला माझ्यासोबत वेळ घालवू द्या. एरवी काय मला वेळ नसतोच. म्हणून आजचा दिवस फक्त माझा आहे. हो ना बच्चा? " असं बोलून शुभम बाळाला कुशीत घेऊन खोलीबाहेर गेला. 


शुभम खोलीतून बाहेर जाताच संकर्षणने अंशिकाला कडकडून मिठी मारली. ती देखील त्याच्या मिठीत डोळे मिटून विसावली. थोड्या वेळानंतर त्याने अंशिकाचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात आरपार बघत तो म्हणाला, " अंशिका थॅंक्यु सो मच फॉर एव्हरीथिंग! माझ्या भावना तू कायम समजून घेतेस. माझ्यावर विश्वास ठेवून तू तुझ्या भावाच्या विरोधात गेलीस, यासाठी तुझे मानावे तेवढे आभार कमीच! खरंच, तुझ्या या माझ्यावरील विश्वासामुळे मी तुझ्यात आणखी गुंतत गेलो. गेल्या एका वर्षात बरंच काही अनुभवलंय आपण; पण आता नवी सुरुवात करुया! युग आणि धरा आपल्यासोबत असते तर खरंच खूप भारी वाटलं असतं पण असो! "


" ते दोघेही आपल्यासोबत आहेत... आपल्याच अवतीभवती! आणि आपल्या हृदयातही! " अंशिका मंद स्मित करून बोलली. 


" बरोबर बोललीस अंशिका! " संकर्षण दुजोरा देत बोलला. 


" ह्म्म! " अंशिकाने हुंकार भरला. 


" अंशिका, आय लव्ह यु! आय लव्ह यु सो मच! सो,  बी विथ मी एव्हरीटाईम! " संकर्षण अंशिकाच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला. 


" आय लव्ह यु टू संकर्षण! आणि काळजी करू नका मी कायम तुमच्यासोबत आहे. " अंशिकासुध्दा युगच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. तिच्या उत्तराने संकर्षण आश्वस्त झाला नि मंद हसला. 


                        थोड्या वेळाने अंशिकाच्या डोळ्यात पाहताना संकर्षण अलगद अंशिकाच्या ओठांच्या दिशेने झुकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवून क्षणार्धात तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिचेही डोळे अलगद मिटल्या गेले आणि ती देखील त्याच्या ओठांत ओठ मिसळून पार विरघळून गेली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. काही वेळाने त्यांचं आवरताच दोघेही खोलीतून बाहेर गेले आणि लगेच बारशाचा कार्यक्रम आटोपला अन् ठरल्याप्रमाणे त्यांच्या मुलीचे नाव 'युगंधरा' ठेवण्यात आले. काही वेळाने त्यांचं आवरताच दोघेही खोलीतून बाहेर गेले आणि लगेच बारशाचा कार्यक्रम आटोपला अन् ठरल्याप्रमाणे त्यांच्या मुलीचे नाव 'युगंधरा' ठेवण्यात आले. 


                        पाहता पाहता दिवस, महिने अन् वर्ष सरू लागले आणि कधी पाच वर्षे उलटून गेले याची जाणीवही झाली. युगंधरा दहा वर्षाची झाली होती. शुभमनेही त्याच्या प्रेयसीसवे अर्थात आर्यासोबत लग्न करून संसार थाटला होता. सर्व सुरळीत सुरू होतं. एकदा संकर्षण सहपरिवार कोकणात फिरायला गेलेला असताना परतीच्या प्रवासात त्यांचा खूप मोठा अपघात झाला होता. ते तिघेही मृत्यूच्या दारातून परतले होते एवढा भयंकर अपघात होता तो! त्या अपघातात अंशिका आणि संकर्षणला बऱ्याच गंभीर जखमा झाल्या होत्या पण 'युगंधरा' त्यातून बचावली होती. तिच्या केसालाही धक्का लागला नव्हता त्यामुळे संकर्षण आणि अंशिका समाधानी होते; परंतु त्या अपघाताचा युगंधरावर मानसिक परिणाम झाला होता. 


                        त्या जीवघेण्या अपघातानंतर युगंधराला कायम चित्रविचित्र आभास व्हायचे. तिला रात्री-अपरात्री जाग यायची. केव्हाही, कुठेही नको त्या प्रतिकृती अन् आकृती दिसायच्या. ती रात्रंदिवस एकटीच संवाद साधायची. तिच्यातील हे बदल संकर्षण आणि अंशिकाच्याही लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी युगंधराशी संवाद साधण्याचे ठरविले. 


संकर्षण युगंधराची विचारपूस करत म्हणाला, " बाळा, हल्ली तू एकटीच काय बडबड करत असतेस? आजकाल तू तुझ्या खोलीतूनही बाहेर पडत नाहीस. नेमकी काय भानगड आहे? तुला काही त्रास होतोय का? तू ठीक आहेस ना? तब्येत बरी आहे ना तुझी? " 


" हो बाबा! मी अगदी ठीक आहे. मला काहीही झालेलं नाहीये. " युगंधरा मंद हसत म्हणाली. 


" मग बाळा तू एकटीच काय बोलत असतेस? तुला जर बोलायचंच असेल तर माझ्याशी किंवा तुझ्या आईशी का नाही बोलत? तुझं ऐकून घ्यायला आम्ही कायम तत्पर असतो. हे तुलाही ठाऊक आहेच ना! " संकर्षण युगंधराची काळजीने विचारपूस करत होता. 


" ऍक्च्युली बाबा, तुम्हाला गैरसमज झालाय. मी एकटीच बडबड करत नसते. " युगंधरा मंद हसून बोलली. 


" म्हणजे? मला कळलं नाही बाळा! " संकर्षण गोंधळून युगंधराकडे पाहू लागला. अंशिकाचा देखील गोंधळ उडाला होता. ती देखील युगंधराकडे अविश्वासाने पाहू लागली. 


युगंधराचं हसू मावळलं नव्हतं. ती मंद हसून म्हणाली, " आई-बाबा! मी चैत्रा ताईसोबत बोलत असते. " 


" कोण चैत्रा ताई? " अंशिका आणि संकर्षणने एकत्रच विचारले.


" चैत्रा ताई, माझी मैत्रीण आहे. तिची नि माझी एव्हाना खूप छान मैत्री झाली आहे. ती कधीच मला एकटं सोडत नाही. कायम माझ्यासोबत असते, माझी निरंतर बडबड ऐकून घेते आणि माझं मनही समजून घेते. आपण तिघे काही महिन्यांपूर्वी कोकणात फिरायला गेलो होतो ना... तेव्हा आपला खूप मोठा कार ॲक्सिडेन्ट झाला होता. त्या अपघातात तुम्हाला गंभीर दुखापती झाल्या होत्या पण तुम्हाला हे ही आठवत असेलच ना की, त्या ॲक्सिडेन्टमध्ये मला जराही दुखापत झाली नव्हती. तुम्हाला माहीत आहे का? कारण त्या अपघातात माझे रक्षण चैत्रा ताईनेच केले होते आणि तेव्हापासून ती आपल्यासोबतच आपल्या घरी राहतेय. " युगंधराने खुलासा केला पण तिचे उत्तर ऐकताच संकर्षण आणि अंशिका मात्र चिडीचूप झाले होते. त्यांच्याही नकळत त्यांना घाम फुटला होता अन् ते दोघेही एकमेकांकडे आळीपाळीने पाहू लागले. 


क्रमशः

........................................................... 


©®

सेजल पुंजे. 

🎭 Series Post

View all