सर्वेश एका मोठ्या शहरात राहणारा मॉडर्न मुलगा होता. त्याच्या आईच्या ओळखीत एक मुलगी होती. मुलगी खेड्यातली होती. पण सुशील, सुंदर होती. ते तिला बघायला गेले. त्याच्या आईवडिलांना ती पसंत पडली. त्यालाही ती पसंत पडली म्हणून त्यानेही होकार दिला. नंतर त्यांचा विवाहसोहळा देखील पार पडला.
लग्न झाल्यानंतर त्यांच्या कंपनीतर्फे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांना जोडीने बोलावले होते. ते दोघेही पार्टीसाठी निघाले. सर्वेशने ब्लॅक कलरचा कोट घातला होता. विद्याने छान साडी नेसली होती. केसांत गजरा माळला होता. नाकामध्ये एक नाजूकशी नथ पण घातली होती. तिला पार्टीमध्ये स्त्रिया कुठले कपडे घालून येणार याची कल्पना नव्हती. तसेच सर्वेशनेही त्याचा विचार केला नव्हता. उशीर झाल्यामुळे घाईघाईत ते पार्टीला जाऊन पोहोचले.
तिथे सर्वेशला त्याचा कलीग भेटला. त्याच्या पत्नीने वेस्टर्न ड्रेस घातलेला होता. तोही गुडघ्यापर्यंतच! तिच्या कपाळावर ना टिकली होती ना नाकामध्ये नथ. गळ्यात साधं मंगळसूत्र पण नव्हतं. विद्याला तिला बघून नवलच वाटलं. तिने हे सर्व प्रत्यक्षात बघितलेलं नव्हतं. अगोदर तिला वाटलं की हीच सगळ्यांत वेगळी दिसत आहे. नंतर तिला जाणवलं की पार्टीमध्ये असेच ड्रेस घालतात. ती अस्वस्थ झाली.
ते तिघे काहीतरी बोलत होते. इंग्रजी व मराठी मिक्स बोलत होते. तिला अर्ध्या गप्पा कळल्याच नाही. नंतर तिने विद्याला इंग्रजीत काहीतरी विचारलं. विद्याला ते पूर्णपणे समजलं नाही. एकतर ती विद्याकडे, 'पार्टीत असे कपडे घालून कोण येतं?' अश्या नजरेने बघत होती. त्यामुळे विद्या अगोदरच अस्वस्थ होती. त्यात तिने काहीतरी इंग्रजीत विचारलं. तिला काय बोलावं कळेना. ती शिकलेली तर होती. हुशारही होती अभ्यासामध्ये. पण खेड्यामध्ये कुठं इंग्रजीत बोलतात? आपल्याकडे सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की इंग्रजी येत तर असते पण बोलण्याची सवय नसते. त्यामुळे आपण भीत असतो.
शेवटी ती म्हणाली, "ओके फाईन. सी यू."
विद्या काही बोलू शकली नाही. सर्वेशचा चेहरा उतरला होता. विद्याला फार वाईट वाटू लागले होते. सर्वेश परत-परत तिच्या साडीकडे बघू लागला. त्यामुळे ती अजूनच अस्वस्थ झाली. ते दोघे केव्हाचे आत गेले होते.
विद्या म्हणाली, "चला ना! आत जाऊयात आपण."
ती अडखळत बोलली. तिने त्यांचं बोलणं चालू असतांना 'कपल डान्स ' असं काहीतरी ऐकलं होतं. तिला ते काही येत नव्हतं. आता त्याचा चेहरा आत गेल्यावर परत उतरेल असं तिला वाटलं. ती आणखीच अस्वस्थ झाली.
तो म्हणाला, "जाऊदे. माझी इच्छा होत नाहीये. आपण घरी जाऊयात का?"
तिचे डोळे पाणावले होते. तिला रडू कोसळले.
तो म्हणाला, "अगं रडतेय का?"
ती म्हणाली, "तुम्हाला माझी लाज वाटत असेल ना! सॉरी. मी उगाच आले तुमच्याबरोबर."
तो म्हणाला, "अगं शांत हो. प्लिज. चल जाऊयात आपण आतमध्ये. डोळे पूस आता."
ती शांत झाली. खरं तर तो अस्वस्थ झाला होता. पण तिचं रडणं बघून आता कोण काय विचार करेल याचा त्याला फरक पडणार नव्हता. ते दोघे आत गेले.
आत जाताच काही जणांना तिला बघून नवलच वाटले. पण बऱ्याच जणांची नजर तिच्यावरच खिळली होती. ती सर्व स्त्रियांमध्ये वेगळी दिसत होती. कॅमेरामन तर राहून-राहून त्या दोघांचेच फोटो काढत होते. बऱ्याच जणांनी तिच्या रूपाचे कौतुक केले. काही स्त्रियांनी मात्र नाकं मुरडली. ते बघून ती थोडी गंभीर झाली. ते सर्वेशला जाणवलं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिच्याकडे बघून मधुर हसला. तिला आता कशाचीच चिंता नव्हती. कोण काय म्हणेल. काय विचार करेल. असं काहीच तिच्या मनात नव्हतं.
तेवढ्यात एक स्त्री तिच्यासमोर उभी राहिली.
ती म्हणाली, " मी पण छोटया गावातून इकडे नोकरीसाठी आले होते. सुरुवातीला थोडा त्रास झाला. राहणीमान साधं होतं. तसेच इंग्रजी बोलणं जमत नव्हतं. तसंही जगात या बाह्य गोष्टींवरूनच लोक जज करतात. चांगलं मन, चांगला स्वभाव या गोष्टी सर्वांत शेवटी बघितल्या जातात. जे महत्वाचं त्यालाच शेवटी प्राधान्य! कधीही स्वतःला कमी समजू नकोस. साधं असणं काही गुन्हा थोडीच आहे. "
तिच्या बोलण्याने विद्याला फार धीर मिळाला.
सर्वेश म्हणाला, "हो बरोबर आहे. मी आहे तुझ्यासोबत. तू जशी आहेस छान आहेस."
विद्याने मान हलवली. ते दोघे नंतर आनंदात घरी परतले. त्या घटनेनंतर सर्वेशचे तिच्यावरील प्रेम अधिकच घट्ट झाले.
आवडल्यास share नक्की करा.
©Akash Gadhave