खारीक-खोबऱ्याचे लाडू

Recipe

मागच्या वर्षी लिहून ठेवलेला माझा फूड ब्लॉग जसाच्या तसा टाईप करून पोस्ट करीत आहे. त्यामुळे काळाचे संदर्भ समजून घ्यावेत ही विनंती.




परवा स्वैपाकघर आवरत असताना कपाटातील एका कप्प्यात खारीक पावडरचा पॅक दिसला... अर्ध्या किलोचा असावा...



मग आठवलं की मीच जानेवारी महिन्यात तो वाण सामानात मागवलाय..डिंकाचे लाडू करायचे म्हणून...


पण झालं काय की लगेच आमच्या घरात कोरोनानं शिरकाव केला अन् आम्हां दोघांचाही दवाखाना, आयसोलेशन ह्यात फेब्रुवारी पूर्ण संपला.तरीही थोडा थकवा होताच म्हणून तेव्हा अतिरिक्त कामं न करता फक्त स्वैपाक आणि विश्रांती ह्यावरच लक्ष केंद्रित केलेलं.


मार्चमध्ये ऑफिस जॉईन केलं अन् पेंडिंग पडलेली कामं आणि मार्च एंडिंग अगदी काल परवापर्यंत पुरलं... मग सुट्टीच्या दिवशीही ऑफिस आणि ऑफिसच्या दिवशी लेट सीटिंग!


परवा जरा मोकळीक मिळाली अन् हे खारीक पावडरचं पाकीट दृष्टीस पडलं. आता हिवाळा केव्हाच संपून गेलाय आणि उन्हाळा अगदी मध्यावर आहे.


बरं! खारीक पावडर अगदी उत्तम स्थितीत आणि तितकीच चवदार राहिलेली! "ह्याचं काय करावं बरं?" असा विचार मनात घोळत राहिला...कारण भर उन्हाळ्यात डिंकाचे लाडू करणं तर योग्य नाही!


घरात उरलेल्या पदार्थांपासून नवीन पदार्थ करणं हा माझा आवडीचा छंद आहे... शक्यतो मुद्दाम काही विकत न आणता खारीक पावडरचं काय करता येईल ह्याचा विचार करताना एका डब्यात खोबराकीस दिसला अन् ठरलं! खारीक-खोबऱ्याचे लाडू करुया!!


पण ह्या लाडूला मी एक नवीन ट्विस्ट दिलाय...


आमच्याकडे "ह्यां"ना सगळ्या वस्तू घाऊक प्रमाणात आणायची सवय आहे. ह्या सवयीला अनुसरून "ह्यां"नी होळीला सुमारे किलोभर साखरेच्या गाठ्या आणल्यात!


त्यातल्या काही खाल्ल्या,पण बऱ्याच शिल्लक होत्या. बरं, आता नाही वापरल्या तर पावसाळ्यात एकतर त्यांना पाणी सुटतं किंवा त्या पिवळ्या पडतात... ह्या गाठ्या अडकित्त्यानं बारीक कातरून घेतल्या आणि मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेतली... नंतर कणकेच्या चाळणीने चाळून चाळणीवर राहिलेले धागे काढून घेतले. अशी पिठीसाखर तयार झाली! शिवाय गाठी प्रकृतीला थंड असं म्हणतात... तशीच ही गाठीची साखरदेखील!


पुढीलप्रमाणे घरात उपलब्ध असलेलं साहित्य घेतलं-


खारीक पावडर -2 वाट्या

खोबराकीस -2 वाट्या

बदाम -30

काजू -30

वेलचीपूड

साजूक तूप - दीड वाटी

गाठीची केलेली पीठसाखर -अडीच वाट्या


ह्यातलं साजूक तूप मी नियमितपणे घरीच करते...


तर खोबराकीस किंचित भाजून मिक्सरमध्ये थोडा भरड केला. काजू -बदाम आणि वेलची मिक्सरमध्ये पूड करून घेतले.


खारीक पावडर, खोबरेकीसाची भरड आणि काजू-बदाम-वेलचीची पूड, पिठीसाखर नीट एकत्र मिसळून त्यात लागेल तसं गरम तूप घातलं आणि लाडू बांधले.


वास्तविक साखरेचा किंवा गुळाच्या पाकातले पण करता आले असते... पण काय ना माझं आणि पाकाचं फारसं जमतच नाही... मला तोंडघशी पाडायला नेहमी तयारच असतो तो ?(म्हंजे पाक हो!)


तर ह्या एव्हढ्या साहित्यात मध्यम आकाराचे 25 लाडू झाले आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम!!!


तुम्ही घरात उरलेल्या सामानातून स्वैपाकात कसे प्रयोग करता ? नक्की कळवा!