Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

खरी ओळख

Read Later
खरी ओळख

खरी ओळख ( लघुकथा )

 

" अजय, ये अजय. " मंदिरात देवीचं दर्शन घेणाऱ्या अजयला मागून त्याच्या चुलत भाऊ मनोज आवाज देत आत आला.

 

" काय झालं ? देवींचं दर्शन तरी नीट घेऊ दे. " असं म्हणत अजय मागे आला आणि मनोजकडे पाहत पुन्हा म्हणाला, " हा बोल आता काय झालं? "

 

" अरे बाळू तात्याचा फोन आलेला, शेजारच्या गावचे साने काका आहेत ना त्यांनी एक स्थळ सांगितलं आहे तुझ्यासाठी. तिथे आपल्याला लागोलग निघायचं आहे. " मनोज अजयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

 

" अरे पण एवढ्या घाईत? " अजय.

 

" हो, उद्या साने काका कामानिमित्त दुसऱ्या गावी जाणार आहेत. तू सुद्धा दोन दिवसात मुंबईला परत जाणार आहेस ना. मग कधी जाणार? म्हणून आता जायचं मुलगी बघायला असं म्हणाले तात्या. " मनोज.

 

अजय एक उच्चशिक्षित आणि रेल्वेत कामाला असलेला उपवर मुलगा. जो कुलदेवीच्या दर्शनासाठी आई वडिलांसोबत गावी आला होता. आणि तिथेच मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरला. 

 

अजय मनात विचार करत निघतो की, मला गावाकडच्या मुलीशी लग्न नाही करायचं कसं समजवायचं घरच्यांना कळतच नाही. मला शिकलेली आणि शहरी भागात वावरू शकेल अशी, आत्मविश्वास असलेली, सुंदर आणि कमवती मुलगी हवी आहे. असो एवढं स्थळ बघायचं आणि नकार कळवायचा असं ठरवून अजय घरी पोहचला.

 

अजय तिथे पोहचला तेव्हा सर्व तयारच होते फक्त अजय येण्याचीच वाट पाहत होते. मुलीबद्दल मनोजने विचार, " काका मुलीचं शिक्षण काय आहे आणि.... "

 

साने काका, " बाळा आपल्याला थोडं लांब जायचं आहे तेव्हा सर्व नंतर सांगतो किंवा तिथे पोहचल्यावर मुलीलाच विचारा. पण आता लवकर निघा कारण आधीच उशीर झाला आहे अजून नको. "

 

सर्वजण म्हणजेच जवळपास 12-15 जण मुलगी बघायला निघाले. मुलीच्या घरी पोहचले तर दारात दुभात्या गायी होत्या, तुळशीवृंदावन, सुंदर रांगोळी, दाराला तोरण पाहतात प्रवेश करणार खुश होईल असं वातावरण होतं.

 

सर्वजण बसले काही बेसिक प्रश्न विचारले, मुलगी आली लांब केस, सावळा रंग, पाणीदार डोळे खरंच सुंदर दिसत होती. थोडावेळ बोलणं झाल्यावर तात्याचं म्हणाले, " मी काय म्हणतो मुला - मुलीला भेटू द्या. त्यांना एकमेकांना काही विचारायचं असेल ते विचारू द्या. म्हणजे पुढे निर्णय घ्यायला आपण मोकळे. आणि आता मुली - मुला भेटतातच तर तुम्हांला काही हरकत नाही ना? " मुलीच्या वडिलांकडे पाहत तात्या म्हणाले.

 

" नाही, नाही कशाला हरकत असेल. तुमचं बरोबर आहे. आता मुलं - मुली आधी बोललेच बरं. " शैलजा " जा अजयरावांना आपला भाजीचा मळा दाखव. " शैलजाचे वडील म्हणले.

 

शैलजा अजय सोबत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या भाजीच्या मळ्यात गेली. शैलजाला अजय समोर काय बोलायचं ते सुचत नव्हतं. अजय सुद्धा शांतच होता. ते पाहून शैलजाच म्हणाली, " तुम्ही मुंबईला नक्की कुठे राहता? आणि कामाला नक्की कुठे आहात?"

 

" मी सांगितलं तरी तुम्हांला कळणार आहे का? कधी मुंबईला गेली आहेस का? " अजय वैतागून बोलत होता.

 

विषय बदलावा म्हणून शैलजा म्हणाली, " बरं ते जाऊ द्या. तुमच्या मुलीकडून काय अपेक्षा आहेत? "

 

अजय तिरकसपणे म्हणाला, " मला माझ्यासारखी उच्चशिक्षित, शहरी जीवन जगणारी, कमवणारी, गोरीपान, चार चौघात नेता येईल अशी बायको हवी आहे. जीची स्वतःची अशी ओळख असेल. आणि आता हे सर्व ऐकल्यावर तुझ्या लक्षात आलंच असेल की, तू यात कुठेच बसत नाहीयेस. "

 

अजयच्या बोलण्याचा रोख शैलजाला चांगलाच कळला होता. शैलजा म्हणाली, " निघुयात? "

 

अजयला जरा आश्चर्यचं वाटलं, तिची थंड प्रतिक्रिया त्याला अपेक्षित नव्हती. पाहण्याचा कार्यक्रम उरकला आणि सर्वजण घरी आले. अजयने ठरल्याप्रमाणे नकार दिला. मुलाला मुलगी पसंत नाही म्हटल्यावर विषय तिथेच संपला.

 

चार महिन्यांनंतर......

 

रेल्वे ऑफिसमध्ये थोडी धावपळ सुरु होती. नवीन सिनिअर ऑफिसर आजपासून रुजू होणार होते. अजय सुद्धा फुलांचा बुके घेऊन आला होता. सिनिअर खुश असणं खूप महत्वाचं असतं. सर्वजण आपापल्या परिने स्वागताची तयारी करत होता.

 

एवढ्यात अजयच्या कानावर गलका पडला. ' सिनिअर ऑफिसर आले.' अजय लगबगीने बुके घेऊन गर्दीतून वाट काढत समोर आला आणि बुके पुढे केला. समोर पाहताच त्याला 440 वोल्टचा झटका लागला. समोर शैलजा उभी होती.

 

 शैलजाचे सर्वांप्रमाणेच अजयकडून बुके घेतला. आणि स्वतः बद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. " मी शैलजा मोहिते, एका छोट्याश्या गावी जन्म झाला पण वडिलांना मुलीचं कौतुक त्यामुळे शाळा संपल्यावर मला शहरात पाठवलं शिकायला. त्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवला आणि आता या सिनिअर पदापर्यंत पोहचले. आणि हो हीच माझी " स्वतंत्र ओळख " आहे. तुम्हा सर्वांना कामात काहीही अडचण असल्यास बिनदिक्कत माझ्याकडे या. " असं बोलून शैलजा आपल्या कॅबिनच्या दिशेने चालू लागली आणि सर्वजण शैलजाच्या साधेपणच कौतुक करू लागले.

 

इकडे अजय कॅबिनच्या दिशेने जाणाऱ्या शैलजाकडे पाहतच राहिला. शैलजा आत आली, खुर्चीवर बसून तिने आपल्या नावाची पाटी सरळ करून ठेवली आणि काचेतून अजय ते नाव पाहतच राहिला. आणि आज तिची खरी ओळख त्याला पटली.

 

समाप्त.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//