Jan 26, 2022
स्पर्धा

खरे प्रेम

Read Later
खरे प्रेम

मला यांच स्थळ आल. माझे काका आणि माझे सासरे आधीपासून ओळखत होते तर माझ्या बहिणीचे सासरे आणि माझे सासरे एकमेकांचे काॅलेजपासूनचे मिञ. अशी ओळख असल्याने डायरेक्ट बघण्याचा कार्यक्रम ठरला. आता मुलगा कसा आहे हे आम्ही बहिणी खिडकीतून बघितलं. तेव्हा “मुलगा थोडा रागीट आहे वाटतं.” मी मनातच म्हणाले.

दोन्हीकडून पसंती झाल्यावर लग्न ठरले आणि ते सुरळीत पार पडले. लग्नाआधी माझ्या बहिणी, मैत्रिणी त्यांचे अनुभव सांगायच्या की लग्न झाल्यावर दोघांचे प्रेमाने बोलणे.. एका कपात चहा पिणे.. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे.. माहेरी आले की फोन मेसेजेस आणि पिक्चरला जाणे.. केसात गजरा माळणे.. वगैरे वगैरे... हेच प्रेम असते..

तेच सगळं मनात साठवून आणि नवीन स्वप्न घेऊन मी गृहप्रवेश केला. घरी आल्यावर ते माझ्याशी रोमँटीक अस काहीच बोलेनात गिफ्ट तर लांबची गोष्ट. मी मनाची समजूत घातली की ‘पाहुणे असतील म्हणून बोलत वगैरे नसतील.’

काही दिवसांनी सगळे पाहुणे गेले तरी पण यांच ना गिफ्ट ना रोमँटीक ना कोठे फिरायला जायचं प्लॅनिंग. मला कसेतरीच वाटतं होते. मी विचारावं तर अजून नविनच होते. काय करावे कळेना. त्यात काही करमत नव्हतं. घरची आठवण येत होती. मग मला रडायला येऊ लागलं. हे अचानक रूममध्ये आले. मी लगेच तोंड धुवून आले.

हे, “काय झालं रडत होतीस?”

मी मानेनेच नाही म्हणाले.

मग ते माझा हात हातात घेऊन म्हणाले, “हे बघ, मला असे प्रेम व्यक्त करता येत नाही. ते गिफ्ट देणं, रोज डे, व्हॅलेन्टाइन डे हे मला फालतू वाटतं. अस फक्त एकच दिवस प्रेम असतं का? प्रेम हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असायला हव. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हव. न बोलताही सगळं समजायला हवं.. एकाला ठेच लागली की दुसर्याच्या डोळ्यात पाणी यायला हव. आयुष्यभराची साथ आणि समर्पण हव. हेच खरं प्रेम आहे. तुझी आणि माझी प्रेमाची व्याख्या वेगळी असू शकते. सो तुझ्या अपेक्षा काही वेगळ्या असतील तर सांग.”

मी काहीच बोलत नाही. फक्त हो म्हणून मान हलवली. 

परत ते म्हणाले, “आणि हो परवा पिवळ्या साडीत खूप सुंदर दिसत होतीस. तस तू रोजच छान दिसतेस. पण तेव्हा सांगायचे राहिलेच.”

मला खूप भारी वाटलं. मग मी धाडस करून हळूच विचारले, “फिरायला कोठे जायचं का?”

मग ते “अगं हो विसरलोच. तेच तर विचारायला आलो होतो. तस मला आवडतच नाही पण तुझ्यासाठी आपण जाऊ. सांग कोठे जायचं?”

मी “कोठेही?”

मग ते “सर्च करायला पाहिजे.”

मी “काय?”

ते “जगाच्या नकाशात कोठेही हे ठिकाण आहे की नाही ते.”

मग मी जोरात हसू लागले. तेव्हा ते म्हणाले “अशीच हसत रहा. हसताना खूप सुंदर दिसतेस.” तेव्हाच त्यांनी माझ्या मनात एक स्थान निर्माण झाले.

©®प्रियांका अभिनंदन पाटील. 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..