खरे नातेवाईक ( भाग तिसरा)

खरे नातेवाईक कोण हा खरं तरं न सुटणारा प्रश्न. रक्ताने मिळालेले नातेवाईक खरे की आपल्या वेदना जाणून घेवून धावत येणारे..
नातीगोती - खरे नातेवाईक ( भाग तिसरा)

फोन वरचा माणूस अत्यंत निर्लज्जपणे तिला म्हणत होता,

" मॅडम तुम्ही काय काळजी करू नका. मी सगळ्या प्रकारची मदत तुम्हाला करेन. फक्त एकदाच माझं ऐका. एकदाच येऊन मला भेटा. अगदी आत्ता जरी आलात तरी चालेल मी माझा पत्ता सांगतो लिहून घ्या."

अंगावर कीळसवाणी घाण पडावी आणि अंग मलीन होऊन जावं तसं तिला वाटलं. एकदम ओकारीची भावना मनात निर्माण झाली कसलं किळसवाण हे जग होतं .

मुलींने आपल्याला सांगितलं म्हणून तिला मुलीचा खूप राग आला. ती मुलीवर ओरडणारच होती. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. हा फोन ओळखीचा होता. हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी फोन केला होता,

" मॅडम , तुम्हाला काही समजते की नाही. तुम्ही कशाला हॉस्पिटलच्या नावासकट फेसबुक वर पोस्ट टाकली. टाकण्याच्या आधी आम्हाला विचारायचं तर असतं. आत्ता पर्यंत अनेक लोकांचे फोन तुमच्या चौकशी साठी आम्हाला येवून गेले. पेशंट तुमच्या कडे ऍडमिट आहे का, ऑपरेशनला किती खर्च येणार वगैरे वगैरे. आता आम्ही पेशंट बघू की तुमच्या बद्दलच्या चौकशांना उत्तर देत बसू. या मुळे हॉस्पीटलच नाव खराब होत हो. तुम्हाला ऑपरेशन नसेल करायचं तर नका करू. पण ती पोस्ट अगोदर डिलीट करा."

डॉक्टरांचा पारा चढलेला होता. ती काही बोलण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण ते काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिने डोळे पुसून ती पोस्ट डिलीट केली.

मोठ्या दुःखाने तिने एका कवितेच्या माध्यमातून आपल्या दुःखाला वाट करून दिली. ती काही कवयित्री नव्हती. पण दाटून आलेल्या दुःखाने कुठं तरी वाट शोधली होती.

बाबा, तुमच्या मुलीला पोरक करून तुम्ही निघुन गेलात. आज सगळ्या जगा सोबत ती एकटी लढत आहे. अगदी तिला साता जन्माची सोबत करणारा साथीदार देखील तिला ओळख दाखवत नाही. वगैरे वगैरे. कदाचीत दुःखातच कवितेचा उगम असावा.

आणि तिने ती कविता तिच्या गृपवर टाकली.

रात्रीचे बारा साडे बारा वाजले होते. अचानक तिच्या नवऱ्याचा फोन वाजला. ती एकदम दचकली. पुन्हा फोन ? फोनचा तिने धसका घेतला होता. त्रयस्थ पणं फोनकडे बघत राहीली. झोपेतच मुलगी म्हणाली,

" आई बाबांचा फोन वाजतोय. उचलना."

तिला काय करावे ते सुचेना. फोन वाजत राहीला असता तर सगळेच जागे झाले असते. अगदी मनाच्या तळातून तिला संवेदना झाली की बघू तरी कोणाचा फोन आहे ते. आणि तिने फोन उचलला.

" सायली मॅडम बोलता आहात ना. मी तुमची डिलीट केलेली पोस्ट वाचली. माझ्या जवळ तुमच्या मिस्टरांचा नंबर होता. अगोदर मी कोण ते सांगतो. मी दिलीप. तुमच्या मिस्टरांनी मला दत्तक घेतलेल होत. म्हणजे माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचललेला होता. त्यांच्या मदतीमुळे आणि आशिर्वादा मुळे मी शिक्षण पूर्ण करुन परदेशात नोकरीला लागलो आहे. आज मला अचानक समजल की सरांना पैशाची खूप गरज आहे. तेंव्हा मॅडम मी तुम्हाला याचं नंबर वर पैसे पाठवत आहे. निसंकोचपणे स्वीकार करून मला सरांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी द्या. "

थोड्याच वेळाने पैसे जमा झाल्याचा मेसेज आला.

तिला ती काय ऐकत आहे हेचं कळेना. हा कोणाचा कोण दिलीप ज्याला मी अजून पाहिलेलंही नाही. तो आज साता समुद्रापाराहून मदतीला खरा नातेवाईक बनून मदतीला धावला होता.

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all