Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

खरचं आई रिटायर्ड होतेय का

Read Later
खरचं आई रिटायर्ड होतेय का

गोष्ट छोटी डोंगराएवढी.                                                                                           विषय:- आई रिटायर्ड होतेय.                                                                                            शिर्षक:- खरचं आई रिटायर्ड होतेय का.                                                                                      लहानपणी शाळेमध्ये कधीतरी आपण 'माझी आई' असा निबंध लिहिलेला असतो. आपण मोठे होत जात असतो तसे निबंधांचे विषय बदलत जातात आणि पुन्हा कधी 'माझी आई' निबंध लिहायची वेळच येत नाही. लहानपणी खाऊ-पिऊ घालणारी, शाळेत पाठवणारी एवढीच आई आपल्याला कळलेली असते. त्यानंतर आपण मोठे होऊ तसे आई या नात्याचे अनेक पदर आपल्याला उलगडत जातात.                                                                                     खरंतर आई 'आई होण्याआधी' मुलगी असते कुणाची तरी. आपल्या बहिणीसारखी तिच्या बाबांची लाडकी. आपण ती मुलगी असलेली आई पाहू शकत नाही पण आपल्या बहिणीसारखीच अवखळ, मैत्रिणींमध्ये रमणारी, शाळेत जाणारी, दंगामस्ती करणारी तरीही आजी-आजोबांच्या शिस्तीत, संस्कारात ती वाढलेली असते. विशी-पंचविशीत आल्यावर ती आजी-आजोबांचे घर सोडून बाबांच्या घरी येते त्यांची बायको म्हणून. केवढा मोठा बदल तिने स्वीकारलेला असतो आपल्यासाठी आणि आपल्या बाबांसाठी.                                                                                      बरीचशी स्वप्नं खुंटीला टांगून, जगरहाटी म्हणून ती काही कळायच्या आत वेगळ्या जगात प्रवेश करते बिनबोभाट आणि मुकाट. संसाराचा नवा डाव खेळायला ती सज्ज होते आणि त्यापाठोपाठ 'आई' ची भूमिकाही तिच्याकडे येते. आजकालच्या स्त्रिया करतात तसं करिअर वगैरे करायचं तिला माहित नसतं. संसाराला हातभार म्हणून आईपणाच्या जबाबदारी पाठोपाठ नोकरी किंवा छोट्या-मोठ्या व्यवसायाची जबाबदारी तिच्यावर येते. घरदार, मुलं, नवरा, नोकरी, नातेवाईक, दुखणी-खुपणी, सणवार सगळी खाती सांभाळणारी होम मिनिस्टर ती होते.                                                                                     मुलं मोठी आणि स्वतंत्र होईपर्यंत या आईच्या खात्यावर प्रचंड ताण असतो. तो ताण पेलत 'आई' मोठी होत असते. आई होण्याचं कुठं ट्रेनिंग तिला मिळत नाही. चुकत-शिकत ती मोठी होते. ३०-३५ वर्षांच्या या संसारात आणीबाणीचे प्रसंग खूप आलेले असतात. प्रसंगी या काळामध्ये सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेऊन कुटुंबाची नौका ती सहज पैलतीरावर नेते आणि काही वर्षांनंतर आई रिटायर्ड होते.                                                                                 आधी नोकरी, व्यवसायातून होते आणि नंतर शक्य झाल्यास संसारातून. विभक्त कुटुंब पद्धतीत मुलं वेगळी राहू लागल्यामुळे तर काही आयांची संसारातून रिटायर्डमेंट पण शक्य होत नाही आणि झालीच तिथून ती रिटायर्ड तरी आईपणातून ती कधी रिटायर्ड होते का ? कधीच नाही.                                                                                                          आई नावाच्या देव्हाऱ्यात आपण आईची स्थापना केलेली असते. विठोबा-रखुमाईला कमरेवरचा हात खाली घ्यायला परवानगी नाही तशी आईला पण क्षणभर शांत बसायला उसंत नाही. एकदा का मुलांची आणि नवऱ्याची अनंतकाळची माता झाली की ती सदैव दक्ष कमरेवर हात ठेऊन, कुटुंबाच्या सगळ्या गरजांना पुरे पडण्यासाठी. मध्येच कधीतरी तिला नैवेद्य मिळतो बाबांच्या प्रमोशनचा, आपल्या शाळा-कॉलेजातल्या बक्षिसाचा.                                                                                                    तिचं पोट भरतं तेवढयाने, पण म्हणून ती थांबत नाही. तुम्ही दहावी पास झालात की तिला बारावीची चिंता सुरु होते, बारावी व्हायच्या आधीच पुढच्या प्रवेशाची, कॉलेज संपायच्या आधीच तुमच्या नोकरीची, नोकरी मिळाली की ठिकाणच्या तुमच्या राहण्याची, तिथे तुम्ही स्थिर झालात की तुमच्या आयुष्यभराच्या जोडीदाराची आणि बरंच काही.                                                                                               तिच्या मनात चाललेले खेळ आणि विचार यांचा तुम्हाला सहजी थांग लागूच शकत नाही. ती तुमच्या इतकी गुंतलेली असते की तुमच्यापुढे तिला कधी काही महत्वाचं वाटतच नाही. आपल्या आयांची पिढी अगदीच घरात राहिलेली नाही. नोकरीच्या निमित्तानं तिनं घराबाहेरचं जग बघितलंय पण ती बाहेर गेली तरी तिचं इथेच कुठेतरी असतं तुमच्या जवळपास. आपण मोठे होत जातो, आपल्या भूमिका बदलतात पण आईची भूमिका तीच राहते. आपण 'एवढी काय काळजी करायचीये त्यात' असं सहज म्हणून जातो. पण 'काळजाचा तुकडा' कसा सांभाळायचा असतो ते तिलाच माहिती असतं. आपल्या आवडीची वस्तू जरा कुठे सापडली नाही तर अस्वस्थ होणारे आपण आईच्या काळजाचा तुकडा असतो, काय काय दिव्यातून तिने तो तिच्यासाठी मौल्यवान असलेला तुकडा सांभाळेला असतो आपल्याला थोडीच माहिती असतं.                                                                                            तुम्हाला बरं नसताना अस्वस्थ झालेली, तुमचा महत्वाचा पेपर सुरु असताना काळजी करणारी, तुमच्या नोकरीच्या पहिल्यादिवशी देवापुढे निरांजन लावणारी, तुम्ही प्रवासाला गेला असाल तर मिनिटामिनिटाला फोनकडे पाहणारी, जन्माच्या वेळेला नाळ तुटली तरी तुमच्याशी तितक्याच घट्टपणे जोडली गेलेली आई आपण पाहिलेलीच नसते. आई म्हणून तिला वापरताना कधीकधी तिला 'माणूस' म्हणून जगता येत नाही याची खंत वाटते. तुमच्यासाठी तिनं केलेल्या त्यागाची जाणीव झाली तर कधी अपराधी पण वाटते. आईला देवानं जन्माला घातलं असं आपल्याकडे म्हणतात पण मग त्याला आईपणाच्या देव्हाऱ्यातून सुटका करण्यासाठी काहीच नाही का करता आलं असं उगाचच मनात येतं. आपल्याकडच्या 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या प्रकारात आणि तरीही पुरुषप्रधानतेच्या संस्कृतीत कुठंतरी स्त्रीत्व आणि आईपण तिला बंधनात अडकवत तर नाही ना असा विचार मनात येऊन जातो.                                                                                                   असो. तरीही आपण मोठे होऊ तसं समजूतदारपणाचं आणि जबाबदार झाल्याचं गिफ्ट तिला देऊ शकतो. तिच्या आईपणाला पुरणार नाही, पण तिला थोडं सुखावणारं 'शहाणा मुलगा/मुलगी 'पण आपण स्वीकारू शकतो. विठ्ठलाला, संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांना, एवढंच नव्हे तर वारीमध्ये निरपेक्ष भावनेनं भेटणाऱ्या प्रत्येकाला माउली म्हणतात. जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या कवितांची वर्गवारी केली तर, आई विषयावरच्या कविता सर्वात जास्त सापडतील. म्हणूनच तर मातृत्व हे चराचराला व्यापून राहिलं आहे असं म्हणता येईल, अगदी सर्व प्राणिमात्रांमध्ये. आई आपलं बाळ अजून आपल्यासोबत आहे याचा आभाळभर आनंद देणारं. ज्या हातांनी आपल्या बाळाचा पाळणा जोजवला ज्या आईनं आचार-विचारांचं स्वातंत्र्य दिलं, वेगळा विचार करण्याचं, मांडण्याचं बळ दिलं, प्रामाणिकपणा आणि इतरांबद्दलची संवेदना जिने शिकवली, सत्य आणि सुंदर यांचा ध्यास घ्यायला शिकवलं, शब्दांमधलं सौंदर्य आणि सूरताल यांच्यातलं माधुर्य जिने दाखवून दिलं, प्रयत्नांवरची - कामावरची निष्ठा, कोणतंही काम करताना लाज न बाळगण्याचं धैर्य आणि सभोवतालच्या माणसांमधून चांगलं तेवढं शिकण्याचं बाळकडू जिने दिलंय असे संस्कार देणारी आई कधीच रिटायर्ड होत नाही.                                                                                            आईचा संघर्ष कितीही कठीण असला तरी ती करते कारण तिला माहित असते माझी मुले माझेच अनुकरण करणार त्यांना कोणी बोललेले तिला आवडणार नाही त्यांना यशस्वी व कर्तबगार तिला करायचे असते त्याचबरोबर स्वतःलाही घडवायचे असते. आपली मुले सर्व कलात पारंगत व्हावी माझ्या मुलाकडे कोणी बोट करू नये यासाठी ती धडपडत असते.त्यामुळे तिला सतत कार्यशील राहावे लागते.                                                                                            बाबा रिटायर्ड होतात. पण आई.. तिच्या हातचे काम कधीच संपत नाही. ती घरात आल्यापासून किचनचा ताबा सासूबाईनी तिच्याकडे देऊन त्या मोकळ्या झालेल्या असतात. पण आजच्या कळातील आई आजही किचनमध्ये राबताना दिसते. आजची नवीन पिढी या किचनचा ताबा आईकडून स्वत:कडे घेऊ इच्छितात का? आई तू बस मी यापुढे स्वयंपाक करते, असे म्हणू शकतात का? उलट आई त्याच किचनमध्ये राबेल..                                                                     आपण वेगळा संसार थाटू म्हणून मुलगा-सून वेगळे राहतील. पण आई तू आता आमच्यासाठी आजवर खूप केलेस. आता तू आराम कर असे म्हणून नव्या घरात आईला जागा मिळू शकेल का? आपल्या मुलीला स्वयंपाक यावा असे प्रत्येक आईला वाटते. पण आई आहे ना. मग कशाला शिकायचा स्वयंपाक म्हणून दुर्लक्ष केले जाते. यामुळे आई कायमच काम करत राहते. तिला विसावा कधी मिळतच नाही..                                                                                    जीवनाच्या रहाटगाडय़ातून आईला निवांतपणा कधी मिळतच नाही.. खरंच आई कधी रिटायर्ड होतच नाही..!                                                                   ©® ॲड. श्रद्धा मगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...

//