खरंच मी स्वतंत्र आहे?

माझं स्वातंत्र्य..


गोष्ट छोटी डोंगराएवढी..

#खरंच मी स्वतंत्र आहे?

सोसायटीच्या आवारात ध्वजारोहण करण्यासाठी बाबांसोबत खाली गेलेली \"ओवी\" नाचत बागडत घरी आली. आईच्या गळ्यात पडून तिने निरागसपणे आईला विचारलं,

“आई, स्वातंत्र्य म्हणजे काय ग?"

आपल्या नऊ दहा वर्षाच्या निरागस बाळाच्या प्रश्नांने वीणा थोडी गोंधळून गेली. स्मित हास्य करत म्हणाली,

“आपल्याला हवं ते करता येणं. काहीही करण्यास आपण मुक्त असणं म्हणजे स्वातंत्र्य.."

ओवीला नीट समजले नाही तरीही खेळण्याच्या नादात ती मान डोलावून पटकन आईच्या गालाचा गोड पापा घेऊन खेळायला पसार झाली. वीणा मात्र ओवीच्या प्रश्नांने विचारमग्न झाली. खरंच आपण स्वतंत्र आहोत का? ओवीला दिलेलं उत्तर योग्य होतं का? डोळ्यासमोर पूर्ण तिचा जीवनपट तरळून गेला.

आईच्या गर्भात असल्यापासूनच गर्भसंस्कारातून वीणामधली स्त्री घडत होती. विणाची आई रामायणाचे पाठ वाचून नव्या युगातली सीता घडवत होती. दोन मुलींच्या पाठीवर विणाचा जन्म. त्यामुळे घरातलं नावडतं बाळ.. तिच्या आजीने केलेला आकांडतांडव.. याच गोंधळात तिचं झालेलं स्वागत. जसं तिला उमजू लागलं तसं तिच्या हातात भातुकली आली. तिच्या चुलत भावंडासोबत क्रिकेट खेळायला तिला आवडायचं पण आई रागावायची हे पुरुषी खेळ आहेत मुलींनी नाही खेळायचे. तू भातुकली , सागरगोटे, काचंपाणी, झिम्मा फुगडी असले बैठी खेळ खेळायचे. वीणाचं बालपण अशा वातावरणात सरत होतं. फक्त नावाला शाळेत जात होती. वीणा अभ्यासात हुशार असूनही कायम दुर्लक्षित राहिली. राजकारण तिचा आवडता विषय.. तिचे बाबा आणि काका बोलताना ती कान देऊन ऐकायची त्या चर्चेत भाग घ्यायची पण आई आजीला ते आवडायचं नाही. राजकारण समाजकारण हे पुरुषांचे विषय. पुरुषांच्या चर्चेत मुलींनी कशाला भाग घ्यायचा? मुलींना काय कळतं? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. वीणा मोठी होत होती तशी आईने तिला स्वयंपाक घरात कायमच डांबून टाकलं. ‘रांधा,वाढा, उष्टी काढा..’ यातच स्त्रीचा जन्म. हेच धडे ती गिरवू लागली. मग आलेला ऋतुचक्राचा कौल आणि मुलगी शहाणी झाली म्हणून विणाच्या आईवडिलांना आलेलं दडपण.तिला त्यांच्या डोळ्यांत कायम दिसायचं.डोक्यावर अवजड ओझं असल्यासारखं ते तिच्याशी वागायचे. कायम बाबा, काका आणि तिची चुलत भावंडं यांच्या आज्ञेत. कधीही त्यांचा शब्द मोडायची नाही.

काही दिवसांतच तिच्यासाठी सुशीलच स्थळ सांगून आलं. शिक्षण अर्धवट राहीलं. बारावीनंतर लगेच आईबाबांनी तिला काहीही न विचारता तिचं लग्न ठरवून टाकलं. वीणा तेंव्हाही शांत होती. आईबाबांच्या इच्छेनुसार ती सुशील सोबत विवाहबद्ध झाली. नव्या नवरीचा गृहप्रवेश झाला. विणाला वाटलं सुशील समजूतदार असेल, तो तिला समजून घेईल. तिच्या स्वप्नांना भरारी घेण्यास नक्कीच बळ देईल. भावी आयुष्याची स्वप्नं उराशी बाळगून सुशीलचा हात घट्ट धरून ती तिच्या संसाराला शुभारंभ करणार होती पण विणाचा इथेही भ्रमनिरास झाला.

वीणाने नवीन घरात प्रवेश करताच तिच्या सासूबाईंनी स्वयंपाक घरातून निवृत्ती घेतली आणि आपल्या सगळ्या जवाबदाऱ्या विणावर टाकून मोकळ्या झाल्या. सुशील स्वभावाने खूप कडक शिस्तीचा.. सगळं हातात द्यावं लागायचं. अगदी पाण्याच्या ग्लास सुध्दा.. वीणा हळूहळू नवीन घरात आपल्या संसारात चांगली रुळली. नवरा सासू सासरे, दिर जावा यांची शुश्रूषा करण्यात धन्यता मानू लागली. सर्वांच्या आवडी-निवडी जपू लागली. प्रत्येकाचं खाणंपिणं, पथ्यपाणी, पै पाहुणे सगळं जातीने स्वतः पाहू लागली. अशातच तिला दिवस गेले. आईपणाची चाहूल लागली. आई होणार म्हणून ती खूप आनंदात होती. ओवी आणि वेदांतचा जन्म झाला. मग नंतर तर ती पूर्णपणे व्यस्त झाली. मुलांचं करता करता तिला दिवस पुरेनासा झाला. पहाटे सर्वांच्या आधी उठून दिवसभर घरातली सगळी कामे उरकून सर्वांच्या नंतर झोपी जाणारी वीणा,घरातली स्वामिनी, एक हक्काची कामवाली बाई कधी झाली तिलाच समजलं नाही. घरातली माणसंच तिचं विश्व बनली. सर्वांच्या आवडीनिवडी जपता जपता ती स्वतःच्या आवडी निवडी पार विसरून गेली होती. स्वतः साठी जगायचं विसरून गेली होती.

आज ओवीच्या प्रश्नाने ती भांबावून गेली होती. भारत स्वातंत्र्यदिनादिवशी, सारा देश मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरी करत असताना तिचा तिलाच प्रश्न पडला होता.

“खरंच मी स्वतंत्र आहे?”

©® निशा थोरे (अनुप्रिया)