खरा पाठीराखा

दारावर थाप ऐकून तिने दार उघडले समोर एक तृतीयपंथी उभा होता.त्याचे स्वागत तिने हसत हसत केले.


खरा पाठीराखा

राखी मिठाई आरती घेऊन स्नेहल राखी बांधण्यासाठी तयार होऊन बाहेर हॉलमध्ये आली. इतक्यात दारावर थाप पडली. तशी तिने पळत पळत जाऊन दार उघडले. समोर एक तृतीयपंथी उभा होता.

त्याला पाहून तिने त्याचे हसत हसत स्वागत केले. त्याचा हात धरून म्हणाली," काय हे किती उशीर केला. केव्हाची मी वाट पाहतिये."

यावर तो म्हणाला," क्या करना बहना आना के नहीं आना इस सोच में सारी रात बैठा था. तुम्हारी सोसायटी में आने डर लग रहा था रे.पता नहीं आसपास के लोग क्या कहेंगे. तेरे को क्या बोलेंगै. फिर तेरा मासूमचेहरा सामने आया तो दौडता चला आ गया."

यावर तिने फक्त एक छोटीशी स्माईल देत त्याला घरातील सुंदरशा सजवलेल्या सोफ्यावर बसवले. त्याला पाणी प्यायला देत म्हणाली," तेव्हा कुठे होते हे सोसायटी वाले जेव्हा तू माझ्या मदतीला धावून आला होता."

या दोघांचे संभाषण सुरू होते तोच आतून स्नेहल ची सासू बाहेर हाॅलमध्ये आली आणि समोर बसलेल्या तृतीयपंथींला बघून स्तब्ध होऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव ओळखून स्नेहल ने तिचा हात धरुन हळूहळू समोरच्या खुर्चीवर नेऊन बसविले.

" आई तुम्हाला आठवतंय का ती संध्याकाळ. जेव्हा मी आॅफिसमधून घरी परत येत होते आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला होता. नेमका त्याच दिवशी यांना म्हणजेच तुमच्या लेकाला दुसऱ्या शहरात जावे लागले होते एका मिटींगसाठी. तेव्हा मी घरी येण्यासाठी कॅब बुक केली होती. जेव्हा कॅब आॅफिसमधून निघाली तेव्हा त्या कॅबड्रायव्हरला कोणाचा तरी फोन आला होता. त्याने फोन वर फक्त एवढेच म्हटले की," हो दोन मिनिटात येतोय." आणि फोन ठेवून मला म्हटला," मॅडम इथे जवळच माझे घर आहे.माझे बाळ आजारी आहे त्याचे औषध द्यायचे आहे ते देऊन मग तुम्हाला घरी नेले तर चालेल का ? कारण घरात दुसरे कोणी नाही औषध आणण्यासाठी बायको एकटीच आहे.जर तुम्ही नाही म्हणालात तर काही हरकत नाही मी तुम्हाला सोडून येऊन मग जाईन घरी."

हे ऐकून मी त्याला म्हटले," हो हो चालेल.आधी औषध द्या. बाळ आजारी आहे तुमचे. त्यात हा पाऊस अचानक आला आहे."

हे ऐकून त्याने गाडी दुसऱ्या दिशेने वळवली. थोडेसे अंतर पुढे गेल्यावर त्याने एका घरासमोर गाडी थांबवली. तोच समोरून दोन पुरुष आले.त्यांनी कॅबचे दार दोन्ही कडून उघडले आणि आत शिरले. लगेचच ड्रायव्हर ने गाडी सुरू केली. मला काहीच कळले नाही. मी एकदम घाबरून गेले. मी काही बोलणार तोच माझ्या बाजूला बसलेला पुरुष मला त्याच्या घाणेरड्या नजरेने बघू लागला होता. तरी देखील मी घाबरत घाबरत उसणे धाडस दाखवत म्हटले," गाडी थांबव नाही तर मी आरडाओरडा करेन."

हे ऐकून हे तिघेजण जोरजोराने हसायला लागले. गाडी सुसाट वेगाने पळवत एका ठिकाणी थांबविली. मी माझा फोन घेण्यासाठी पर्स उघडायला गेले तर त्या नीच माणसाने माझी पर्स हिसकावून घेतली. बाहेर अंधार पडला होता. आता मी जोरात ओरडणार तोच एकाने माझ्या तोंडावर हात ठेवला. मला गाडीतून ओढत बाहेर आणले. माझ्यावर अत्याचार करणार तोच समोरून हा आपल्या घरी जात होता. एकदम याची नजर माझ्यावर पडली. तसा तो पळतच आला. या तिघांना सोडा हिला असे सांगू लागला. पण याला बघून ते पुन्हा जोरजोराने हसायला लागले. आणि त्यातील एकटा म्हणाला ," तू हिला वाचवणारा आहेस. अरे तू तर हिजडा आहेस हिजडा. स्वतःकडे बघ आधी. म्हणे हिला सोडा. थांब आधी तुलाच घेतो. मग हिला."

हे ऐकून याला खूप राग आला याने रागाच्या भरात समोर असलेला मोठा दगड उचलला आणि त्याला फेकून मारला.यानतंर मला त्याच्या हातातून सोडवून घेतले. मला बाजूला उभे राहण्यास सांगून त्या तिघांना बदडून काढले. तो त्यांना मारत होता तेंव्हा एकाने याला पण मारले. स्वतः मार खाल्ला पण मला बचावले त्या नराधमांपासून. आज मी इथे उभी आहे ती याच्यामुळेच. नाही तर केव्हाच माझ्या चिंधड्या उडाल्या असत्या आणि माझी लत्करे तोडली गेली असती.तुमच्या तब्येतीची काळजीपोटी मी हे तुम्हाला सांगितले नव्हते पण यांना हे सगळे सांगितले होते." असे म्हणत स्नेहल ने आपले डोळे पुसत पुसत त्याची आरती ओवाळून त्याला राखी बांधली.

हे ऐकून स्नेहल ची सासूने आपले डोळे पुसत उठून त्या तृतीयपंथी जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हटले," देवा परमेश्वरा तुझे खूप खूप उपकार.खरंच त्या रात्री जर हा नसता तर त्या नराधमांपासून तुझी सुटका झाली नसती. हाच खरा तुझा पाठीराखा."

©® परवीन कौसर
बेंगलोर