Jan 28, 2021
नारीवादी

खंबीर सासू

Read Later
खंबीर सासू

लतिका आणि विराजस यांनी पळून जाऊन लग्न केले. लतिका अवघी वीस वर्षाची तर विरजस पंचवीसचा. लतिका अती श्रीमंत घरातून होती तर विरजस मध्यम वर्गीय. लतिक्याच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता. तिच्या बाबांना तिच्यासाठी गर्भ श्रीमंत मुलगाच हवा होता. आणि असे ही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते. अजून थोडी समज आल्यावर ती विराजसला विसरेल असा त्यांचा समज होता. विरजसच्या आई बाबांचा विरोध नव्हता. पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विरजसने सुध्दा करिअर कडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती. आणि नंतर योग्य वेळ पाहून ते लतिकाच्या आई बाबांशी बोलतील असे त्यांनी विरजसला सांगितले होते. 

 

एकदा लतिका आणि विरकासला बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गेला.आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला. त्यांनी लतिकचे घराबाहेर पडणे बंद केले. या दोघां पुढे आणीबाणीची परिसथिती उभी राहिली. शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले. संधी मिळाली. दोघांनीही लग्न केले. लतिकाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले. तू कधीच सुखी होणार नाहीस असे शिव्या शाप दिले. विरजसच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता. पण त्या दोघांनी घेतलेल्या निर्णय त्यांना आवडला नाही.

"आम्हाला एकदा सांगून तरी बघायचं.. आम्ही काही मदत करू शकलो असतो.. आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो ... "असे त्यांचे मत होते. 

 

पण आता जे झालं ते झालं.. त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला. लतिका आणि विराजसला घेऊन ते लतिकाच्या माहेरी सुध्दा गेले... पण लतिकाचे बाबा अडून बसले होते. त्यांना लतिकाचे तोंड देखील पाहायचे नव्हते. बाबांच्या विरोधात जायची आईची हिम्मत नव्हती.. लतिका साठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते. 

 

हळू हळू लतिका विराजसच्या घरी रुळू लागली. आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते. लतिका अगदी लाडाकोडात वाढली आहे. तिला कुठल्याही कामाची सवय नाही. आपल्यालाच तिला सर्व गोष्टी शिकवल्या लागतील याची विरजसच्या आई ला म्हणजेच लतिकाच्या सासूला जाणीव होती.

 

सार छान सुरू होत. पण नियतीच्या मनात वेगळच काही होत. त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाल होत आणि एका अपघातात विराजस देवाघरी गेला. सर्वांवर दुःखांचा डोंगरच कोसळला. ऐन तारुण्यात मुलगा निधन पावल्याने विरजसच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. लतिका पूर्णपणे कोलमडून गेली. आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता. 

 

लतिकाच्या घरच्यांनाही ही बातमी कळली तरी कोणी आले नाही. विरजसची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती. त्याचे दिन कार्य उरकल्यावर त्यांनी लतिका ला तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला. पण लतिका तयार नव्हती. 

त्यांनी लतिकाला समजावलं," बाळा तुझ्या समोर अख्ख आयुष्य आहे. ते अस वाया घालवू नकोस. मी बोलेन तुझ्या आई बाबांशी. वेळ पडली तर पाय धरेन त्यांचे." तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या. 

 

पण या वेळी ही निराशाच त्यांच्या पदरी पडली. तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा राग निवळला नव्हता. विरजसच्या आई ने खुप विनवण्या करूनही त्यांनी लतिका ला माफ केले नाही. "तुम्हाला नको झाली असेल तर विहिरीत ढकलून द्या " असेही बोलायला कमी केली नाही. त्या लतिकाला पुन्हा घरी घेऊन आल्या. लतिकाच्या पुन्हा घरी येण्याने घरातील इतर मंडळी थोडी नाराज होती. आता तिला कोणीच खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हते. "पांढऱ्या पायाची, कुलक्षणी, चेटकीण, नातवाला खाल्ल माझ्या आता मुलाला पण खाईल ही", असे म्हणून विरजसची आजी म्हणजेच लतिकाची आजेसासू तिला हीनवू लागली. इथे विराजसच्या बाबांची प्रकृती खालावतच होती. हे सारं लतिकाला सहन होत नव्हतं. तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं. रात्री सर्व झोपल्यावर ती निघाली. नेमक्या सासू बाई जाग्या होत्या. 

त्यांनी लतिकाला अडवल. कुठे जाते आहेस म्हणून विचारलं.

 

"आई मला जाऊ द्या. मी अवदसा आहे. माझ्यामुळे हे सर्व घडलं. मी विराजसच्या आयुष्यात आलेच नसते तर. आमचं लग्नच झाल नसतं तर... आज तो असता जिवंत. बाबांची ही अवस्था झाली नसती. मला जाऊ द्या . मी इथे नाही राहू शकत. वेळ पडली तर आत्महत्या करेन पण आता इथे नाही राहायचं मला. खरच माझ्या इथे येण्यामुळे या घराचे वासे फिरले आहेत. मला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा.. " लतिक रडत बोलत होती.

 

सासू बाईंनी आधी तिला शांत केलं, "लतिका तुम्ही भेटला नसतं तर, तुमचं लग्न झालं नसतं तर.... त्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती तर.. रस्त्यावरच्या लोकांनी विराजस ला वेळेत हॉस्पीटल मध्ये नेले असते तर... खुप जर तर आहेत बाळा.. आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टींचा विचार करायची. विरजस माझ्या पोटचा गोळा होता. माझी काय अवस्था झाली असेल या सर्वात.. एकदा तरी विचार केलास का तू ... तो गेला मग तू ही सोडून जाणार आहेस मला अशी..? लतिका तुझं ओझं झालं म्हणून मी तुला तुझ्या माहेरी सोडायला गेले नव्हते. तुझ्या समोर अख्ख आयुष्य आहे. कोणाच्याही जाण्याने आपण जगणं थांबवणं चुकीचं आहे. इथल्या पेक्षा तिथे तू सुखात राहशील.. कारण इथे विराजसच्या आठवणी तुला सतत त्रास देतील अस माझं मत होत.. पण... असो जे झालं ते झालं.. तू आता तुझ शिक्षण पूर्ण करायचं. मी आहे तुझ्यासोबत. आणि ह्यांची काळजी घ्यायला मी आहे ना.. फक्त तुझी साथ हवी आहे मला बाळा या सर्वात.. विराजसच्या जाण्याने प्रत्येक जण हादरून गेला आहे. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. तुझं दुःख मी समजू शकते. पण आता तुला सावराव लागेल.. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. मन लावून अभ्यास करावा लागेल. तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याचे मला वचन हवे आहे. बाळा मी माझ्या मुलाला गमवाल आहे आता लेकीला गमावू नाही शकत.. "

 

त्यांच्या या बोलण्याने लतिकाला अश्रु अनावर झाले.. तिने सासूला मीठी मारली.." आई मी नाही जाणार तुला सोडून कुठेच.. तू म्हणशील ते सर्व करेन.." नकळत पणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली.. कारण तिने खरच सासूला आई मानले होते. आज तिची सासू सुध्दा मनमोकळे पणे रडली होती. आज पहिल्यांदा त्यांच्या दुःखाला वाचा फुटली होती.

 

लतिका मन लाऊन शिकली. सून नाही तर ती त्या घराची लेक झाली. असंख्य टोमणे, वाईट बोलणी ऐकून घेतली तिने.. प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्या सोबत. त्या दोघी एकमेकींच बळ बनल्या. लतिका आयएएस अधिकारी झाली. आता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती. एव्हाना तिच्या माहेरी सुध्दा ही बातमी कळली होती. तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विचारू लागले होते. सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्न सुध्दा लावून दिले.. पण तरीही लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती. अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती. सासूच्या रूपाने लतिकाला तीच आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती. 

 

 

(ही कथा काल्पनिक आहे. पण खरंच लतिकाच्या सासू सारख्या अशा किती तरी खंबीर स्त्रिया या समाजात असतील ज्या एका चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतात.. आणि दुसऱ्याचा आधार बनून त्यांचं जीवन सफल बनवतात. )

 

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

 

वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विसरू नका.

माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीच हरकत नाही????????.

Circle Image

Dr Ashwini Alpesh Naik

Physiotherapist

हॅलो.. मी पूर्वाश्रमीची डॉ. अश्विनी अनिल पांचाळ आणि आता डॉ. अश्विनी अल्पेश नाईक. मी फिजिओथेरपिस्ट आहे. गेले सहा वर्ष प्रॅक्टिस करते आहे. मला वाचनाची, लिखाणाची,प्रवासाची आवड आहे. मला आसपासच्या गोष्टी, निसर्ग, माणसं, यांचे निरीक्षण करायला फार आवडते.कदाचित ही आवड मला माझ्या प्रोफेशनमुळे निर्माण झाली असावी. निरीक्षणातून आपण बरेच काही शिकतो असे मला वाटते. माझी हीच आवड बरेचदा माझ्या लिखाणातून झळकते. माझी अजून एक ओळख म्हणजे मी एक आनंदी बायको आहे आणि अकरा महिन्याच्या बाळाची आई आहे.